आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article By Narendra Bandabe About Unemployment In Rasic

बेकारीच्या रंजक! (फिल्मफेस्ट)

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गेल्या काही वर्षांमधली हॉलीवूडच्या सिनेमांमधल्या वेगवेगळ्या तत्कालीन विषयांची हाताळणी खरंच वाखाणण्याजोगी आहे. मंदीवर बनलेल्या सिनेमातून अमेरिकेच्या आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीवर जोरदार भाष्य करण्यात आलं आहे. बेरोजगारीवरचे हे सिनेमे कुठेही निगेटिव्हिटी अर्थात नकारात्मकता न पसरवता, त्या परिस्थितीतून बाहेर पडण्याच्या प्रक्रियेची गोष्ट सांगतात.

गेल्या काही वर्षांमधली हॉलीवूडच्या सिनेमांमधल्या वेगवेगळ्या तात्कालिन विषयांची हाताळणी खरंच वाखाणण्याजोगी आहे. कारण अफगाणिस्तान-इराक युद्धापासून ते अलीकडे येऊन गेलेल्या आर्थिक मंदीपर्यंतच्या सर्व विषयांवर सिनेमे बनले आणि ते जगभरात बॉक्स ऑफिस हिट ठरले आहेत. मध्यंतरी म्हणजे, २००८-२००९ या कालावधीत अमेरिकेत आलेल्या मंदीवर बनलेल्या सिनेमातून अमेरिकेच्या आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीवर जोरदार भाष्य करण्यात आले आहे. बेरोजगारीवरचे हे सिनेमे कुठेही निगेटिव्हिटी अर्थात नकारात्मकता न पसरवता, त्या परिस्थितीतून बाहेर पडण्याच्या प्रक्रियेची गोष्ट सांगतात.
१९९० नंतर खरं तर अमेरिकेच्या रोजगारासंदर्भातला आलेख वर वर जात होता. पण २००५ नंतर तो घसरला. याचा फटका कुठल्या एका विशेष सेक्टर अर्थात क्षेत्राला बसला, असे नाही; तर सर्वच क्षेत्रांत बेरोजगारीचे वारे वाहू लागले. मग ते मॉल असो की सॉफ्टवेअर कंपन्या. ‘ले ऑफ’ हा रोजच्या वापराचा शब्द बनला. कालपरवापर्यंत वर्षाला हजारो डॉलर्स कमवणारे अनेक जण रस्त्यावर आले. बेरोजगारीमुळे सार्वजनिक वित्त व्यवस्थेवर परिणाम झाला. कारण टॅक्सद्वारे मिळणारा महसूल कमालीचा कमी झाला. देशाची आर्थिक घडी योग्य पद्धतीनं कशी बसवता येईल, यावर जोरदार खल केला गेला. त्यातून मागणी झाली ती म्हणजे, टॅक्स कमी करणे. शिवाय टॅक्सच्या नियमात बदल करणे.
२०१२च्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत बेरोजगारी हा सर्वात चर्चेचा विषय राहिला. जास्तीत जास्त नोकऱ्या निर्माण करण्याला प्राधान्य देण्यात आले. खुद्द राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा जागतिक पातळीवरच्या दौऱ्यामध्ये अमेरिकेतल्या बेरोजगारांच्या हाताला काम मिळेल, यासाठी कार्यरत राहिले. यातून अनेक करार झाले. २०१३ पर्यंत ही परिस्थिती सुधारताना दिसत होती. २०१४ हे वर्ष तसं अमेरिकेतल्या बेरोजगारांसाठी चांगलं होतं. महिन्याला दोन लाख रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्यात अमेरिकन सरकारला यश आलं. यात खाजगी क्षेत्राचा हातभारही मोठा होता. यामुळेच २०१४च्या शेवटी सुमारे ११ दशलक्ष रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्यात आल्या. ५४ महिन्यांत हे सर्व घडलं आणि अमेरिकेची आर्थिक घडी सुधारण्याचा प्रयत्न करण्यात आला. तरी ही अमेरिकेतले बेरोजगारीचे प्रमाण हवे तेवढे कमी झालेले नाही. बेरोजगारी तशीच आहे अजून ठाण मांडून बसलेली. हे सर्व असे आसपास घडत असताना यावर सिनेमे बनले नसते तर नवलच. सिनेमे बनले आणि तुफान चालले. मुख्य म्हणजे, हॉलीवूडच्या, टॉप क्लास नट-नट्यांनी त्यात काम केले, हे विशेष.

लॅरी क्राऊन(२०११) या सिनेमातला हिरो अर्थात टॉम हँक एका मॉलमध्ये काम करणारा सेल्समन आहे. अनेकदा ‘एम्पॉयी ऑफ द मन्थ’ किताब मिळवलेल्या लॅरीला अचानक नोकरी सोडायला सांगितलं जातं. तो ग्रॅज्युएट नसतो. खरं तर ‘ले ऑफ’साठी कंपन्यांना काही तरी कारण हवं असतं. लॅरी क्राऊनच्या बाबतीत तो ग्रॅज्युएट नसणं हे पुरे असतं. अनेक वर्षांच्या नोकरीनंतर तो एक दिवस अचानक बेरोजगार होतो. आता नोकरी हवी मग ग्रॅज्युएट व्हायलाच हवं, अशा ध्यासानं तो वयाच्या पन्नाशीत दाखल होतो. तरुण मुला-मुलींबरोबर तरुण होतो, आणि जगण्याचा नवा पर्याय म्हणून शौक असलेल्या कुकिंगच्या जोरावर शेफ बनण्याची प्रक्रिया सुरू होते. लॅरी क्राऊनचा हा सेल्समन ते शेफ बनण्याचा प्रवास फार रंजक आहे. आपल्या आत दडलेल्या एखाद्या कलेला, सुप्त गुणांना पुन्हा नव्यानं जगण्याचं साधन बनवण्याचा संदेश सिनेमातून देण्यात आलाय. दिवस तसेच राहात नाहीत, ते नेहमीच बदलतात, असा आशावाद लैरी क्राऊन देतो. सिनेमातलं ‘सम डेज आर डायमंड, सम डेज आर स्टोन’ हे गाणं अगदी समर्पक आणि कथानकाच्या गाभ्याला हात घालणारं आहे. टॉम हँक या ऑस्कर विजेत्या अभिनेत्यानं लैरी क्राऊनचं दिग्दर्शन केलंय आणि अभिनयही.
यापूर्वी आलेल्या ‘अप इन द एअर’(२००९) या सिनेमानं बेरोजगारी, ले ऑफ आणि त्याच वेळी बदलतं कुटुंब, असं बरंच काही एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. जरी सिनेमा रायन या सतत फिरतीवर असणाऱ्या हिरोची गोष्ट सांगत असला, तरी तो सर्वात जास्त बेरोजगारीचाच होता. कारण या हिरोचं कामच वेगवेगळ्या देशांमध्ये जाऊन लोकांना ‘ले ऑफ’ करणं हेच असतं. त्यातून या समस्येकडे मानवी दृष्टिकोनातून बघण्याचा प्रयत्न तर झालाच आहे. पण त्यापेक्षा जास्त अमेरिकन कुटुंब एकसंध ठेवण्याच्या दृष्टीनं जास्त भर सिनेमात देण्यात आलाय. रायनची भूमिका करणाऱ्या जॉर्ज क्लुनी लेखक आणि मोटिव्हेशनल स्पीकरही आहे. हजारो लोकांचे जॉब घेणारा, सतत विमानात प्रवास करणारा हा सिनेमाचा हिरो ‘रायन’ हळवा आहे. त्यानं लिहिलेल्या मोटीव्हेशनल स्पीचमध्ये बॅकपॅकमध्ये सर्वात जास्त वजन हे नेहमी नातेसंबंधाचेच असले पाहिजे, असे ठासून सांगतो. शिवाय ‘वुई आर शार्क नॉट स्वाईन’ असे सांगत तो त्यासमोर बसलेल्या प्रेक्षकांना नवी उमेद देण्याचा प्रयत्न करतो. सिनेमाच्या सुरुवातीला बेरोजगार झालेल्या आणि नंतर याच बेरोजगारीने त्यांना नवीन संधी मिळाल्याचा आनंद दाखवण्यात आलाय. अर्थात पुन्हा पॉझिटिव्ह एंडिंग. अमेरिकेतल्या बेरोजगारीवरचा अलीकडे आलेला सिनेमा म्हणजे, इंटर्नशीप (२०१३). हा सिनेमा तसा थेट रिसेशनच्या बेरोजगारीशी जोडता येणार नाही. पण नव्या दमाच्या ऑनलाइन युगात सेल्समनशीप कशी मागे पडलीय, हे दाखवण्यात आलेय. यामुळे सेल्समनची नोकरी गेलेले सिनेमाचे दोन्ही हिरो गुगलची इंटर्नशीप स्वीकारतात. वयाच्या ४०-४५चे हे दोघे १७-१८ वर्षांच्या इतर टेकसॅव्ही तरुणांबरोबर खांद्याला खांदा लावून नवीन तंत्रज्ञान शिकतात. पुन्हा नव्यानं कामाला लागतात. नवं तांत्रिक जग त्यांच्या स्वागतासाठी सज्ज झालेलं असतं. सिनेमाची मांडणी विनोदी असली तरी हा सिनेमा बेरोजगारीत खितपत न राहता, नवीन पर्याय शोधण्याचा मार्ग दाखवतो. तो तेवढा सोपा नाही, पण कठीण तर अजिबात नसतो. इथंही हॅप्पी एंडिंग हा फॉर्म्युलाच वापरण्यात आलाय.
अमेरिकेतल्या बेरोजगारीवर बनलेल्या सिनेमांची यादी तशी फार मोठी आहे. ‘द पर्स्युट ऑफ हॅपीनेस’(२००६) या सिनेमाचा उल्लेख इथं करणं गरजेचं आहे. या सिनेमातला काळ जुना आहे. क्रीस गार्डनरची ही खरीखुरी स्टोरी. अगदी फाटका, कफल्लक क्रीस मिलेनियर बनण्याची ही स्टोरी फिनिक्स संकल्पनेला उचलून धरते. याच जोरावर सिनेमा खडतर जगण्याचा आशावाद देऊन जातो. सिनेमाला ‘फिलगुड इफेक्ट’ येतो तो त्यामुळेच. इंटर्नशीपनंतर नोकरी मिळाल्याचा आनंद क्रीस गार्डनची भूमिका करणाऱ्या विल स्मिथनं इतका अप्रतिमपणे दाखवलाय की, तोवर त्याच्याशी भावनिक नातं जोडलेला प्रेक्षकही त्याच्याबरोबर वॉल स्ट्रीटवरचा आनंदीयात्री बनतो, हे विशेष.
narendrabandabe@gmail.com