आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अखंड ‘काव्यहाेत्र’

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गेल्या वर्षी तब्बल ५२ तास कविता वाचन झाले. यंदा तर गाेवा कला अकादमीचेे रेकाॅर्ड करण्याचे उद्दिष्ट अाहे. असा हा काव्यहाेत्रचा उपक्रम २१ ते २३ जुलै दरम्यान हाेताे अाहे. त्या निमित्त घेतलेला हा अाढावा...
काव्यहाेत्रची कल्पना गाेवा कला अकादमीचे अध्यक्ष, कवी विष्णू सूर्या वाघ यांनी मांडली. त्यावेळी त्यामागे उपक्रमशीलता, सर्वसमावेशकता अाणि विक्रमी उत्सवाचे विचार हाेतेच. यंदाच्या काव्यहाेत्रमागे विक्रमांचे उद्दिष्ट असले तरी त्यात सामील हाेणारे कवी, कलाकार, रसिक, श्राेते यांच्या मनात कवितेविषयीचे ममत्त्व हाेतेच. त्यामुळे या विक्रमाच्या महाछायेत कवितेची असंख्य लहानमाेठी बीजे अंकुरताना, बहरताना, वाढताना काव्यहाेत्र एका वेगळ्याच पातळीवर गेले अाणि हा केवळ एक विक्रमाचा उत्सव न राहता ताे कवितेचा हक्काचा सण बनला.

विविध भाषा, प्रांत, धर्मीय यांच्या सहभागाने ताे सेक्युलर सण बनला अाहे. अाणि अाता तर राष्ट्रीय पातळीवरचा एक काव्यमहाेत्सव म्हणून साऱ्या देशाचे लक्ष याकडे लागले अाहे. हा एक विशिष्ट गटाचा, विचारसरणीचा, रंगांचा विचार अाहे अशी टीका करणाऱ्यांची ताेंडे बंद करून हा उत्सव अाता सर्व जनांचा, सामान्यांचा अाणि अभिजनांचा उत्सव बनला अाहे. काव्यविश्वातील एक अटळ, वार्षिक उच्चार बनला अाहे.

अवघ्या भारतवर्षाला ज्या कला अाहेत त्यात संगीत, नाटक, शिल्पकला अाणि दृश्यकला यांच्या बराेबरीने काव्यलेखन ही महत्त्वाची कला अाहे. मात्र ती एक साहित्य विद्या असल्याने तिचा एकूणच अाविष्कार किंचित मागे राहिल्यासारखे वाटते.

कविता संगीताला बाेलकं करते. नाटकाला नाट्यमयता देते. शिल्पकलेचं अभिसरण रेखांकित करते तर नृत्यकलेचं भाववैभव शब्दांकित करते. या सर्व कलांना जणू कविता अनुसरूनच असते. मात्र तरीही तिचे वेगळे महाेत्सव हाेत नाहीत. साहित्य संमेलनाच्या माेठ्या मंडपात एक छाेटेसे दालन कवितेचे, एक सत्र कवितेचे अादी एक मर्यादित मान्यता कवितेला मिळत असते. कवितेकडे संपूर्णपणे साकल्याने पाहण्याचे भारतीय कला उत्सवातील पहिले स्टेशन म्हणजे काव्यहाेत्र! काव्यहाेत्र ही अशी एक भारतीय पातळीवरची घटना जिथे कवितेच्या या एेतिहासिक गुढीवरचा अतिउच्च असा उपाय याेजला गेला अाहे. सलग ४८ तास वा ५२ तास असा तीन दिवसांत विभागलेला असा हा अविश्रांत यज्ञ अाहे, हाेत्र अाहे. मात्र या हाेत्रात कवितेच्या समिधा टाकायच्या नाहीत तर या मागच्या अविरत अार्याची महापूजा म्हणजे काव्यहाेत्र.

समाज माणसामाणसांनी बनलेला अाहे अाणि माणसे भावभावनांनी, विचार व्यूहांनी... अनुभव संचितांनी अाणि कल्पना विभ्रमांनी बनलेली असतात. एकसंघ समाजाचे लक्षण असते. त्याची भावनिक एकता कविता हीच अधाेरेखित करते. शब्दांकित करते. अशा संस्कार भूषण साहित्य विद्येचा उच्चार अाणि त्या उच्चारांचा उत्सव हा कधीही समाजाला हितकारक, गुणकारक ठरताे. काव्यहाेत्र या उपक्रमाकडे अशा दृष्टीने पाहिले की, अभूतपूर्व काव्यहाेत्राचं महत्त्व अापल्या लक्षात येतं.

कवितेची संमेलने सतत हाेतात, कवी कालिदासाचा जन्मदिन हा कविता दिन म्हणून साजरा केला जाताे. क्वचित कुठे एखादा दिवस कविता दिवस वा कविता उत्सव म्हणून साजरा हाेताे. मात्र काव्यहाेत्र नावाचं सलग तीन दिवसांचा काव्ययाेग हा पहिलाच. काव्यसारग्रहण, काव्य अर्ध निर्णयन, काव्य अास्वाद या साऱ्या विद्या येथे स्वाभाविकपणे उत्पन्न हाेतात. कारण तीही कवितेची अंगेच अाहेत. कवितेचे प्रभावी सादरीकरण, कवितेचे नेटके उच्चारण हे मानवी मनाच्या चेतना जागृत करणारे असते. तसेच ते अापल्या चरित्राचे गुंतागुंतीचे चलन व्यक्त करणारेही असते. इतके माेठे सलग काव्यहाेत्र हे म्हणूनच समाजाच्या मानसिक चरित्राचे जाहीर दर्शन ठरते. काव्यहाेत्र हा संकल्पनेमागे हाच सामाजिक अभिसरणाचा विचार अाहे. एका विशिष्ट काळाच्या बिंदूवर समाजाचा मानसिक अनुभवपट कसा अाहे, अाकलन - व्यवहार कसे अाहे अाणि तरलतेचा अापदर्शक काय दर्शवताे, हे असं काव्यहाेत्र सांगतं. जणू समाजाची नाडी पाहणं अाणि दिशा दिग्दर्शन करणं हे कवीप्रमाणे काव्यहाेत्रचं अंतस्थ कर्म ठरतं.

गाेवा कला अकादमीने या कठीण व्रताचं शिवधनुष्य उचललं अाणि महाराष्ट्र गाेव्यातीलच नव्हे तर देशभरातील कवी अाणि कवी हृदयाचे रसिक या कवी धर्माचरणासाठी सज्ज अाहेत.
बातम्या आणखी आहेत...