आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एका वंडरलँडमधून

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिशिरातही आपली आतून फुललेली प्रसन्नता आसमंतात संक्रमित करणाऱ्या त्या दोघांना भेटलो, तेव्हा असं काहीसं मनात उमलत होतं. ज्यांना वसंतात मातीत गाडून घेणं उमजतं, त्यांचा शिशिरही किती उमदा असतो, हे अनुभवत होतो.

मंदिराच्या गाभाऱ्यात एकुलता नंदादीप तेवत राहतो रात्रभर. रात्रीच्या अंधारावर तो लिहू पाहतो उजेडाची गाणी. त्यानं स्वतःभोवती उभारलेली असते हेमाडपंथी तटबंदी. म्हणून तर बाहेरचे मतलबी वारे त्याच्या शांतपणे उजळणाऱ्या ज्योतीपर्यंत पोहचू शकत नाहीत. एलईडी बल्बच्या उजेडानं अधिकच अंधारलेल्या शहराच्या रस्त्यांवर एक क्षीण प्रकाशकिरण पोहचू पाहतो, दूरवरून आलेला. प्रत्येक दिवा आपल्या अंतरात तेलवातीचं बळ घेऊन जन्माला येतो, कुठून येतं हे बळ? प्रत्येकाचे स्त्रोत वेगळे, पण अंधारात उजळायचं सामर्थ्य महत्त्वाचं! शिशिरातही आपली आतून फुललेली प्रसन्नता आसमंतात संक्रमित करणाऱ्या त्या दोघांना भेटलो, तेव्हा असं काहीसं मनात उमलत होतं. ज्यांना वसंतात मातीत गाडून घेणं उमजतं, त्यांचा शिशिरही किती उमदा असतो, हे अनुभवत होतो. ऋतू झाडागणिक वेगळे असतात, माझीच ओळ मला आठवत होती.

आज चार दशकांहूनही अधिक काळ लोटून गेला आहे, जेव्हा ते पहिल्यांदा भेटले होते. १९७०-७१चा काळ होता. तो अर्थशास्त्रात तर, ती मराठीत एमए करत होती. पुणे विद्यापीठाचा रम्य परिसर. फुलपाखराचे पंख ल्यालेलेच दिवस होते हे. विद्यापीठाच्या स्नेहसंमेलनानिमित्त स्मरणिका प्रकाशित करायचे ठरले होते. त्या स्मरणिकेसाठी जाहिराती गोळा करण्याचे काम या दोघांवर आले होते, कारण हे दोघेही मूळ पुणेकर! या स्मरणिकेच्या कामाने आयुष्यभर स्मरणात राहतील, असे काही क्षण दिले. काम संपले पण ओढ... ती नव्यानं निर्माण झाली होती, दिवसांगणिक वाढत होती. जोडणारे अदृश्य धागे असतात काही, तो बॉडी बिल्डर. अगदी पुणे विद्यापीठाच्या गॅदरिंगमध्येही त्यानं ‘मसल कंट्रोल’चे अवाक करणारे प्रयोग करून दाखविले होते. हे बाळकडू त्याला वडलांकडूनच मिळाले होते. रेव्हेन्यूमध्ये असणारे त्याचे वडील उत्तम कसरतपटू होते. त्यांनी आपल्या मित्रांसोबत चाळीसच्या दशकात कसरतींचे काही प्रयोग तत्कालीन मुख्यमंत्री बाळासाहेब खेर यांनाही दाखविले होते. त्या वेळी खूश होऊन मुख्यमंत्र्यांनी या व्यायामपटूंना प्रत्येकी चार आणे बक्षिस दिले होते. हिलाही खेळात रस. विद्यापीठ स्तरावर ती खोखो खेळत होती. कदाचित खेळाच्याच या धाग्यानं ती दोघं जवळ आली, घरच्यांचा विरोध असण्याचं काही कारण नव्हतं. त्यांनी आपल्या सहजीवनाचा अध्याय सुरू केला. अरुण दातार आणि आरती गद्रे यांची ही कहाणी म्हटलं तर साधी सोपी प्रेम कहाणी होती, चारचौघांच्या आयुष्यात घडणारी, पण आयुष्य कधी कधी आपल्याला अशा वळणावर नेऊन उभं करतं की, जिथं आपला कस लागतो, परीक्षा होते आपल्या आतून उगवलेल्या धाग्यांची. लग्न होऊन अवघं एक वर्ष झालेलं तेव्हाची घटना. एका कंपनीत काम करणारा अरुण, त्या दिवशी आंबेघाटातून रत्नागिरीकडे चालला होता.आणि पुढच्याच क्षणी येणारं वळण हे आपल्या सबंध आयुष्याला वळण देणारं असणार आहे, याची त्याला कल्पना नव्हती. समोरून येणाऱ्या बेदरकार एसटीने अरुणच्या मोटारसायकलला धक्का दिला. अरुण गाडीवरून पडला. त्याचा उजवा पाय एसटीखाली आला, तर डावा पाय अंगाखाली मुडपला गेला. पन्नास पंचावन्न प्रवासी असलेली एसटी त्याच्या उजव्या पायावरून गेली. काय होणार होतं? उजवा पाय चिरडला गेला. पायाची, मांडीची हाडं असंख्य ठिकाणी मोडली. कमरेचा खुबा निखळला. पायाच्या बोटांच्या हाडाचाही चुराडा झाला. प्रचंड रक्तस्राव होत होता. एका गाडीवाल्याच्या मदतीनं अरुण मिरजेच्या डॉ. जी एस कुलकर्णींच्या हॉस्पिटलला पोहचला. रक्त आणि वेदना यांचा एक प्रदीर्घ अध्याय सुरू झाला होता. पायाची हाडं कातडी फाडून बाहेर आली होती. ऑपरेशन्स, प्लास्टर, जखमा, इन्फेक्शन, पू, पुन्हा ऑपरेशन, पुन्हा जखमा. वेदनेचा पाढा संपायला तयार नव्हता. डाव्या मांडीची कातडी काढून उजव्या पायाच्या जखमेला लावली तरी जखम नीट भरून यायला तयार नव्हती. संसर्ग हाडांपर्यंत पोहचला होता. पूमधून हाडाचे तुकडे बाहेर येत. हाडं नीट जुळून येत नव्हती. ‘अरुणची प्रकृती धडधाकट म्हणूनच तो या अपघातातून बचावला, अन्यथा इतका गंभीर अपघात आणि मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव होऊनही शुद्धीवर असलेला रुग्ण मी पाहिला नाही,’ डॉक्टर सांगत होते. आरती आणि अरुणचे नाते जणू या अपघाताने बदललेे. अरुणची प्रिया असलेली आरती आता त्याची आई झाली होती. त्याच्या गळ्यापासून खाली पायाच्या बोटांपर्यंत प्लास्टर होते. केवळ दोन हात आणि डाव्या पायाचा काही भाग मोकळा होता. तो जणू प्लास्टर ऑफ पॅरिसचा जिवंत पुतळा बनला होता. त्याचं स्पंजिंग करणं, त्याला बेडपॅन देणं सारं आरती आईच्या मायेनं करत होती. पण तिचं हे प्रेम, माया, सेवाभाव प्रत्येकाला समजत होता असं नाही. ऐन पंचविशीत तारुण्यातल्या नवथर नात्याचं असं ‘मेटामॉर्फोसिस’ करायला आंतरिक ताकद लागते. संतसाहित्यावर पिंड पोसलेल्या आरतीच्या व्यक्तिमत्त्वात ही आंतरिक ताकद ओतप्रोत भरली होती. पणतीचं निरपेक्ष जळणं, उजळणं, तिला नवं नव्हतं. अनेकांना हा वेडेपणा वाटत होता. त्यातच तीनेक महिने होऊनही हाडं जुळत नसल्यानं अरुणचा पाय मांडीपासून कापावा लागेल, असे डॉक्टरांनी सांगितले. भेटायला आलेल्या एका नातेवाईकाने आरतीला स्पष्टच सांगितले, ‘हे बघ, तू अरुणचा नाद सोड. तो काही त्याच्या पायावर उभा राहील, असे मला वाटत नाही. तू तरुण आहेस. उभं आयुष्य पडलंय तुझ्यासमोर. तू तुझा विचार कर.” पण सेवा आणि समर्पणात सर्वस्व शोधणारी आरती त्यांना उमगत नव्हती. खरं तर या अपघातानंतर मूलबाळ होण्याची शक्यतादेखील मावळली होती, पण त्यामुळं आपल्या नात्यात काही उणीव राहील, असं दोघांनाही वाटत नव्हतं. आयुष्याचा असा सकारात्मक स्वीकार करायला मानसिक ताकद लागते आणि ती या दोघांकडे पुरेपूर होती. म्हणूनच डॉक्टर पाय कापायचा म्हणाले, पण आरती आणि अरुणने उमेद हरली नव्हती. त्यांनी डॉक्टरला नम्रपणे नकार दिला आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे, पुढील ३-४ आठवड्यात हाडं जुळण्याची प्रक्रियेने एकदम वेग घेतला. दीडेक वर्षाच्या रुग्णालयातल्या मुक्कामानंतर अरुण नावाचा जखमी योद्धा घरी परतला.

पण अजूनही स्वतःहून उभा राहणे, चालणे जमत नव्हते. वजनही निम्म्याने कमी झाले होते. वैद्यकीय प्रमाणपत्र चाळीस टक्के अपंगत्व असल्याचं सांगत होतं, पण या दोन वेड्या जीवांना, ‘अरे पण त्याहून अधिक म्हणजे, साठ टक्के सक्षमता आहे,’ हे महत्त्वाचं वाटत होतं. दवाखान्याच्या खर्चाने अर्थव्यवस्था डबघाईला आली होती. पण अरुणला घरी आणल्याबरोबर आरतीनं छोटी मोठी कामं करून आर्थिक घडी बसविण्याचा प्रयत्न सुरु केला. प्रूफ रीडिंग, टायपिंग, शिकवण्या अशी कामं करून संसाराला हातभार लावणं सुरू होतं. काही काळातच तिला गरवारे महाविद्यालयात मराठी प्राध्यापक म्हणून पूर्ण वेळ नोकरी मिळाली आणि लाटांवर हिंदकळणारे तारू थोडेसे स्थिर झाले.

अरुणची जिद्द फिनिक्ससारखी होती. त्याचा गुडघा पूर्णपणे लॉक झाला होता. उजवा पाय म्हणजे निव्वळ हाडांना गुंडाळलेली कातडी होती. उजव्या पायाचं त्यानं कष्टानं कमावलेलं सौष्ठव हरवलं होतं, पण प्रचंड मेहनत, व्यायाम, फिजिओथेरपी करून तो शरीर कष्टवत होता. मनाच्या निर्धारापुढं शरीर हळूहळू मान तुकवू लागलं होतं. अरुणनं बाहेर पडलं पाहिजे, असं आरतीला मनोमन वाटत होतं. बॉडीबिल्डिंग हे अरुणचं पॅशन होतं. त्याच क्षेत्रात त्यानं काम सुरू करावं, असं तिनं सुचविलं. ‘ बॉडीबिल्डिंगसारख्या क्रीडाप्रकारात असा अपंग प्रशिक्षक मुलांना कसा पटेल?’ अरुणला प्रश्न पडला पण काही काळ! नकारात्मकता दोघांच्याही स्वभावात नव्हती. एका क्रीडा संघासाठी त्याला प्रशिक्षक म्हणून बोलावलं गेलं आणि दार किलकिले झाले. खुर्चीवर बसून तो मुलांना बॉडीबिल्डिंगचे प्रशिक्षण देऊ लागला. या विषयातील त्याचं ज्ञान वादातीत होतं. विद्यार्थ्यांना त्याच्या सल्ल्याचा फायदा होऊ लागला. मुलं वेगवेगळ्या स्पर्धामध्ये बक्षिसं मिळवू लागली, दातारसरांभोवती मुलांची गर्दी वाढू लागली. यातूनच ‘सूर्या’ जिम जन्माला आली. मुलं व्यायाम करू लागली, घाम गाळू लागली, शरीरसौष्ठव एखाद्या शिल्पासारखं फुलू लागलं. दातारसरांच्या मुलांनी ‘भारतश्री’, ‘विश्वश्री’ असे किताब मिळवायला सुरुवात केली. इकडे दातारसरांचा स्वतःचाही व्यायाम सुरू होता. चिरडलेल्या उजव्या पायाची फिकीर न करता हा फिनिक्स निळ्या आभाळात झेपावत होता. चालणे अवघड असलेले दातारसर आता चारचाकी गाडी चालवू लागले. जिमला पस्तीस वर्षे पूर्ण झाली, तेव्हा सत्तरीच्या उंबरठ्यावर असलेल्या अरुण दातारसरांनी आपल्या असंख्य तरुण विद्यार्थ्यांसमोर ‘बॉडीबिल्डिंग शो’ सादर केला. ‘वृद्धत्वाच्या विरोधात उभा ठाकलेला सिंघम’ अशा भाषेत माध्यमांनी या कार्यक्रमाची दखल घेतली. आपल्या पीळदार स्नायूंच्या लीलया हालचाली करत प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा सत्तरीतला तरुण अरुण पाहताना दातारमॅडमना पूर्णपणे प्लास्टरमध्ये लपटलेला पंचविशीतील अरुण आठवत होता आणि डोळे भरून येत होते. सानेगुरुजींचे ‘बलसागर भारता’चे स्वप्न फुलविणारे दातारसर आणि दातारमॅडम आज अनेक मुलांना मातृ-पितृस्थानी आहेत. स्वतःचं मूल नाही, ही खंत या अंगाखांद्यावर बागडणाऱ्या मुलांमुळे हवेत विरून गेली. सत्तरच्या दशकात ऐन पंचविशीत असणारं अरुण आणि आरती हे जोडपं आज सत्तरीच्या उंबरठ्यावर उभं आहे. आरती दातारांनी संतसाहित्यात केवळ डॉक्टरेटच मिळवली नाही, तर त्या अवघ्या साहित्याचा आशय त्यांच्या दैनंदिन जीवनाचा श्वास बनला आहे. अरुण दातारांनी ‘ट्रायन आर्ट’ हा नवा क्रीडाप्रकार विकसित करून आपल्या आवडीच्या क्षेत्रात पीएचडी संपादन केली आहे. पण माणसं भौतिक उपाध्यांनी मोठी होत नाहीत. ती मोठी असतात, त्यांच्या जगण्यातून झिरपणाऱ्या मूल्यातून!

‘वुडलॅण्ड अपार्टमेन्ट’मधील त्यांच्या घरी या तरुण जोडप्याला भेटताना प्रेमात शरीरापलीकडं नेणारी ‘वंडरलॅण्ड’ अजूनही नामशेष झाली नाही, याचं आश्वासन मिळतं, तेव्हा मनाला व्यापून उरणारी तृप्तता शब्दांत नाही सांगता येत!

dr.pradip.awate@gmail.com
बातम्या आणखी आहेत...