आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'ती'ची मैत्रीण आणि 'ती'चा प्रॉब्लेम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मी औरंगाबादची. मध्यमवर्गीय ब्राह्मण कुटुंब. घरात सोवळंओवळं पाळलं जायचं. (आताही जातं) आम्ही दोघी बहिणी, आई, आजी आणि बाबा त्यामुळे घरात महिलांची संख्या अधिक. मी शेंडेफळ त्यामुळे माझ्या आधी बहीण वयात आली. मी फारच कमी काळ घरात असायचे. खेळ, डान्सचा क्लास, नाटक आणि शाळा यातच माझे २४ तास निघून जायचे. आई शिक्षिका, तीही घराबाहेर म्हणून तिला कावळा शिवला असला तरी फारसा फरक नाही पडायचा. पण बहीण तशी घरातच असायची. शाळा, शिकवणी आणि मग घर, त्यामुळे तिला कावळा शिवला की जाणवायचं, कारण आजीला घरात काय हवं काय नको, मदत करणं हे तीच करायची. ती तशी अबोल, त्यामुळे कावळा नक्की कधी शिवला आणि मग तुझं पोट का दुखतंय, आईला कावळा शिवल्यानंतर तर तिचं पोट नाही दुखत, असे एक ना अनेक प्रश्न मला पडायचे. पण उत्तर एकच ‘तुला कळेल लवकरच.’

मला मासिक पाळीविषयी पहिल्यांदा शाळेत कळलं, याबद्दल मी शाळेची आभारी आहे. घरात यावर बोलण्याइतकं मोकळं वातावरण नव्हतं. माझी शाळा शारदा मंदिर कन्या प्रशाला, शाळेत सगळ्या मुलीचं. व्हिस्परची टीम शाळेत आली आणि त्यांनी व्हिडिओ दाखवून आणि डेमो देऊन मासिक पाळी म्हणजे काय आणि या काळात कशी स्वच्छता राखायची, हे सांगितलं. त्यामुळे माझ्या मनावर मासिक पाळीबद्दलचं पहिलं इम्प्रेशन म्हणजे तो एक शारीरिक त्रास आहे, हेच पडलं. पण तेव्हा फार मजा आली शाळेत. माझ्या वर्गातील काही जणी आधीच रज:स्वला झाल्या होत्या, पण मी तशी ‘कोरी’च होते. व्हिस्परच्या टीमने प्रत्येक मुलीला २ पॅडचं एक पाउच दिलं आणि सोबत एक माहिती पुस्तिका. त्या वेळी मला फार वाईट वाटलं, कारण मी ते लगेच वापरू शकणार नव्हते. ही घटना साधारण १९९५-९६ सालाची. मी घरी येऊन हे आजीला नाही दाखवलं, तिला फक्त पुस्तक दाखवलं. आईला काहीही सांगितलं नाही, फक्त मिळालेल्या दोन गोष्टी दाखवल्या. तिची प्रतिक्रिया, ‘कळलं का आधीच सगळं?’

पहिली पाळी आली तेव्हा मी शाळेतून बसने घरी येत होते. मला कळलं, काहीतरी वेगळं आहे. पोट, पाठ दुखत होती. पण आनंद होता ते आता मला व्हिस्पर वापरायला मिळणार याचा. घरी आले आणि झोपले. कुणालाही काहीही न सांगता. मग संध्याकाळी आई घरी आली. तिला सांगितलं. तिने जवळ घेतलं आणि म्हणाली, माझी काळजी मिटली. तू मोठी झालीस. आजीलाही सांगितलं. पण त्यांनी मला बाजूला नाही बसवलं. (दीदीला बसवलं होतं.) मी शेंडेफळ असल्याने कदाचित, मला फारच क्वचित ‘बाजूला’ बसावं लागलं. खास करून श्रावण, गणपती, नवरात्र या काळात पाळी आली की. घर मोठं असल्यामुळे वरच्या मजल्यावर जाऊन बसायचं, हे ठरलेलं. त्या वेळी फेसबुक, व्हॅट्सअप असले असते तर काय मज्जा आली असती.

मला कधी आईने पाळीबद्दलची धार्मिक कारणं सांगितली नाहीत, कारण माझा याबद्दलचा पहिलाच धडा शास्त्रीय कारणांचा होता. ती नेहमी म्हणायची, तुला पटणार नाही, जाऊ दे. पण आम्ही हे पाळत राहणार. म्हणून दर महिन्याला आईला न चुकता कावळा शिवायचा आणि ती चार दिवस एका कोपऱ्यात असायची. आमच्या घराच्या आजूबाजूला बऱ्याच मुली राहायच्या. घराची मागची बाजू अंगण होतं, किमान सहा ते आठ घरं या अंगणाच्या अवतीभवती. त्यामुळे त्या अंगणात दर आठवड्याला कोणी ना कोणी कोपरा गाठून बसलेली असायची. मला हे मुळीच नाही आवडायचं. पण शिवाशीव चालणार नाही, देवासाठी पाळावंच लागेल, वगैरे नेहमी ऐकावं लागायचं.

माझ्या मनात कायम हेच असायचं, जर देवीही स्त्री होती तर मग ती पण यातून गेलीच असेल ना? एकदा आईला विचारलंही होतं, पण तिने धपाटा घातला आणि डोकं जास्त चालवू नको, अभ्यास कर, म्हणून पिटाळून लावलं. पुढे शिक्षणासाठी पुण्यात आले आणि मग नोकरी निमित्ताने मुंबई. लग्नही मुंबईतच झालं आणि विचारांनी पुढारलेल्या लोकांची संगत वाढत गेली. आम्ही कॉलेजमध्ये पाळीला प्रॉब्लेम म्हणायचो. इथेही हाच शब्द राहिला. नोकरीच्या ठिकाणी सगळेच दिवस सारखे. पाळी असो अथवा अन्य कोणताही शारीरिक त्रास, काम त्याच एनर्जीने करावं लागणार. हळूहळू त्याचीही सवय झाली.

लग्नानंतर हे चार दिवस किती महत्त्वाचे आणि घरातल्यांच्या अडचणीचे असू शकतात, हे पहिल्यांदा कळलं. म्हणजे बाजूला वगैरे नाही बसवत, पण काहीही गोष्टी ठरवायच्या झाल्या तरी तुझ्या डेट्स सांग, परत त्रास नको, हे वाक्य ठरलेलं. विचार कितीही पुढारलेले असले तरी शुभ कार्याला पाळी नको, हे मात्र पक्कं.

मात्र एरवी त्या चार दिवसांत नवरा काळजी घेतो. म्हणजे तू काही करू नकोस, आराम कर, असं अनेकदा म्हणतो. बरं वाटतं. या काळात आपली कोणी काळजी घेतली की छान वाटतं. पण कोपऱ्यात बसवणं नाही योग्य. या चार दिवसांत देवळात जाणं, पूजा करणं मीही करत नाही. पण अनेकदा या दिवसांतही अंघोळ झाल्यावर देवासमोर हात जोडले जातातच. ते मी गैर मानत नाही. पाळी आहे आणि देवळासमोरून जात आहोत तर हात जोडले जातातच. त्यात गैर काय? देव तर माझ्या मनात आहे. सर्वत्र आहे. देवळात जाणं हे मनापासून व्हायला हवं, आम्ही किती पुढारलेले आहोत किंवा नियम मोडायचा म्हणून देवळात जाऊ नका.

मी कधीच या चार दिवसांत घडीच्या कपड्याचा वापर केला नाही. अजूनही अनेक भागात पॅड्स वापरणं चुकीचं मानलं जातं. पण मी पहिल्यापासूनच पॅड वापरले. त्याची विल्हेवाट लावणं ही सगळ्यात मोठी समस्या, पण आता अशाही काही मशिन्स आहेत, ज्यात पॅड टाकताच त्याची पावडर बाहेर टाकतात. त्यामुळे याही समस्येवर आपण मात करू शकतो. बाकी या सगळ्याचा विचार करता पूर्वी धर्माच्या, देवाच्या नावाखाली महिलांना दर महिन्याला किमान ते चार दिवस आराम तरी मिळायचा, पण सध्याच्या पुढारलेल्या विचारांमुळे आणि बदलत्या जीवनशैलीमुळे ‘ती’ला आराम नावाचा प्रकारच राहिला नाही. माझ्या सगळ्या सख्यांना आणि त्यांच्या अवतीभवती असणाऱ्या पुरुषांना एकच सांगणं आहे की, प्लीज किमान ते चार दिवस ‘ती’ला आराम द्या. तिच्या शरीराची ती गरज आहे.

prajakta7777@gmail.com
बातम्या आणखी आहेत...