आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डरांव डरांव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
व्यक्ती तितक्या प्रकृती, त्याचप्रमाणे प्राणी-पक्षी तितक्या त्यांच्या प्रजनन तऱ्हा. डरांव, डरांव करत उड्या मारणारा बेडूक पावसाळ्यात अंडी घालतो हे आपल्याला ठाऊक असतं, पण त्या प्रक्रियेबाबत आपण अनभिज्ञच असतो…
आपणा सर्वांच्या परिचयाचा उभयचर बेडूक. अंडी घालण्याचा त्यांचा काल अल्प असतो, आणि तो ऋतूशी निगडित असतो. समशीतोष्ण प्रदेशांतील बहुतेक उभयचरांचा प्रजनन काळ वसंत ऋतू असतो, तर उष्ण प्रदेशांत पावसाळा. आपल्याकडे पावसाळ्यात बेडकांच्या ‘डरांव - डरांव’ला ऊत आलेला असतो. त्यांच्या डरांव - डरांवने त्रासलेला कुणी कवी काव्य करतो, ‘का ओरडता उगाच राव’. पण ही डरांव-डरांव उगाच नसते. ती नराने मादीला प्रजननासाठी घातलेली साद असते. ही डरांव - डरांव केवळ नराचीच असते. मादीत आवाजनिर्मितीची यंत्रणा नसते.

नराच्या साद घालण्याच्या पद्धतीतही विविधता असते. मंजुळ आणि कर्कश. अर्थातच मंजुळ साद ‘नाजूक’ कार्यभाग साधण्यासाठी. साप, पक्षी असा एखादा शत्रू चालून आला की, ती कर्कश बनते. मंजुळतेतही ‘ज्याची त्याची मंजुळता.’ बेडकांच्या अनेक जाती आहेत. आपल्याच जातीच्या ‘मंजुळते’ला त्या जातीची मादी आकर्षित होते. (उदा. ‘क्रिकेट फ्रॉग’ हा लहानखोर बेडूक रातकिड्यांसारखा आवाज काढतो.) इतर ‘मंजुळां’शी तिला देणं-घेणं नसतं. (जातिभेद ही काही मानवाची मक्तेदारी नाही. नागनाथ मंजुळे प्लीज नोट!) आर्चिस बेडकाची मादी दगडांच्या खांचात अंडी घालते. अंड्यामध्येच अळ्या तथा पिल्लं विकसित होतात. तथापि बहुतेक बेडूक जातीच्या माद्या पाण्यात अंडी घालतात. (काही जातीचे बेडूक झाडावर राहतात. तथापि त्यांचा निवास पाणवठ्याजवळ असतो. कारण, त्यांची प्रजनन क्रिया पाण्यातच होते.) मादी अंडी घालतानाची जाणीव नराला होते. अंडी घालतानाच, नर शुक्राणूंतर्फे त्यांचं फलन करण्याच्या कार्यास लागतो. तो मादीच्या शरीरावर आरूढ होतो. यासाठी त्याला मादीला घट्ट पकडून ठेवावं लागतं. हे काम सोपं नसतं. कारण मादी फुगीर असते आणि नर आकाराने मादीपेक्षा बराच लहान असतो. मादीच्या छोट्या हालचालीनेदेखील त्याच्या कार्यात अडथळा निर्माण होऊ शकतो. त्यांच्या या अवस्थेस Amlexus असं शास्त्रीय नामाभिधान आहे. तथापि, या कामासाठी निसर्गयंत्रणा तयार असते. नर लहान असला, तरी त्याच्या हाताचे स्नायू मादीच्या हाताच्या स्नायूपेक्षा मोठे असतात. त्याचे पायदेखील मादीच्या पायांपेक्षा मजबूत असतात. तसंच प्रजनन काळात बहुतेक नर बेडूक फुगतात आणि त्यांच्या पायाच्या बोटावर काटेरी पट्टा तयार होतो. त्याच्या सहाय्याने मादीला पकडून ठेवता येतं. काही जातींमध्ये नराच्या छाती अगर दंडावर चिकटपट्ट्या तयार होतात. मादीला पकडून ठेवण्यास त्या सहाय्यभूत ठरतात.

या अवस्थेत नराचा cloaca मादीच्या cloacaला घट्ट चिकटून असतं. नर लहान असला, तरी आपल्या ‘ध्येया’वर ठाम असतो. आपले पुढचे पाय मादीच्या पायांखाली वेढून त्याने तिला घट्ट पकडून ठेवलेले असतं. कारण ही मिठी अल्पकाळाची नसते, तर काही दिवसांची असते. (नर बेडूक माजावर आला की हालचाल करणाऱ्या कोणत्याही सजीवाला मिठी मारत सुटतो. ‘दिवाना हुआ पागल’ अशी त्याची अवस्था असते. त्याच्या मिठीत एखादा मासाही येऊ शकतो, वा दुसरा एखादा नर बेडूकही. तथापि नर बेडकाला आपल्या स्वलिंगीची ही सलगी आवडत नाही. तो गुरगुरतो आणि ‘दिवान्या’ला योग्य तो संदेश मिळतो.) आपले शुक्राणू अंड्यांवर टाकल्यानंतरच नर आपली पकड सोडतो. त्यानंतर फलनक्रियेस सुरुवात होते. बहुतेक बेडकांच्या फलधारणा शरीरांबाहेरच होतात.

चार्लस डार्विनने शोधून काढलेला द. अमेरिकेतला डार्विन बेडूक. यांची पिल्लं नराच्या शरीरात विकसित होतात. मादी जमिनीवर अंडी घालते. नर जवळपासच असतात. ८-१० दिवसांनंतर नर ही अंडी तोंडाने उचलून आपल्या voacal sacsमध्ये ठेवतात. फलन होऊन पिल्लू या सॅकमध्येच विकसित होतं. ऑस्ट्रेलियातील एक बेडूक कोरड्या झऱ्याच्या किंवा दलदलीच्या तळाशी बिळं करून, त्यात राहतो. प्रजननकाळात पाऊस पडण्यापूर्वी बिळाच्या तोंडाशी मादी अंडी घालते. पाऊस झाल्यावर बीळ पाण्याने भरतं. त्या कालावधीत अंडी विकसित होतात. पिल्लं बाहेर येतात. त्यांचं पुढंचं जीवन झऱ्यात किंवा डबक्यात सुरू होतं.

बेडकं मोठ्या संख्येत अंडी घालतात. झाडावर राहणारे बेडूक त्यातल्या त्यात काटकसरी. ते जेमतेम हजार एक अंडी घालतात. बरेच बेडूक एका वेळेस २० हजारांपर्यंत अंडी घालतात. समुद्र भेक या बेडकाची मादी ३५ हजार अंडी घालते. पण प्रश्न पडू शकतो, एवढ्या मोठ्या प्रमाणांवर अंडी घालण्याचं कारण काय असतं?

eknathjosh@gmail.com
बातम्या आणखी आहेत...