अंटार्क्टिका खंडावर वेळेचे महत्त्व अनन्यसाधारण ठरते. परिस्थितीचा अंदाज घेऊन पावलं उचलली तरी सर्वश्रेष्ठ निसर्ग तुम्हाला चकवा देण्यास तयारच असतो. अशा वेळी आकारास आलेल्या शीतसागरात नाव निर्माण करणं, ही आव्हानात्मक गोष्ट असते...
स्टेशन उभारणीचं काम जोरात चाललं होतं. अडचणी येतच होत्या, मुख्यतः खराब हवामानाच्या. केवळ ५० टक्के दिवस चांगल्या हवामानाचे मिळाले. अशा वेळी दिवसाकाठी १५-२० तासदेखील आम्ही काम करत होतो. मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत बांधकाम संपवून परतण्याची योजना होती. जहाजचालकांचीही घाई चालली होती. मार्चपासून केव्हाही समुद्र गोठू लागतो. तसं झालं तर, जहाज बर्फात अडकण्याची शक्यता असते.
रशियाचं ‘दि ओब’ हे जहाज १९७२ मध्ये समुद्रबर्फात १०० दिवस अडकून पडलं होतं. ‘गोटलँड’ हे जहाज १९८२ मध्ये समुद्रबर्फात चेपल्यामुळं त्याला जलसमाधी मिळाली होती. असं काही झालं तर सुरक्षिततेसाठी जहाजावर छोट्या होड्या (लाइफ बोट्स) मुक्रर केलेल्या असतात. आमच्या जहाजावर अशा सहा लाइफ बोट्स होत्या. प्रत्येक बोट २५ माणसांच्या क्षमतेची होती. म्हणजे, दीडशे जणांच्या सुटकेची सोय होती. आम्हाला या बोटींचा वापर करावा लागला नसला तरी इतिहासात काही मोहिमांना अशा संकटांना तोंड द्यावं लागलं होतं.
महत्त्वाची म्हणजे शॅकल्टनची ट्रान्स अंटार्क्टिक मोहीम. गोष्ट १९१४ची. त्यांचं ‘एंड्युुरन्स’ हे जहाज समुद्रबर्फात अडकून भरकटत जाऊ लागलं. अशा भरकटीतच त्याची एका हिमनगाशी टक्कर झाली. जहाजावरल्या २८ जणांनी शीतसागरात उड्या घेत (लाइफ बोट्स ही नंतरची सुधारणा असावी.) कसातरी (शीत)सागरकाठ गाठला. (त्यातली आणिक एक उपकथा सांगण्याचा मोह आवरत नाही. या पथकात फ्रँक हर्ले नावाचा उत्तम छायाचित्रकार होता. जहाजावरून ऊडी मारताना त्याच्या निगेटिव्हज पाण्यात पडल्या. जिवाचा धोका पत्करून पठ्ठ्याने शीतसागरात सूर मारून त्या हस्तगत केल्या. पुढं हर्लेने ‘शॅकल्टन आर्गोनॉट्स’ नावाचं पुस्तक प्रसिद्ध केलं. साहसी माहितीपेक्षा हर्लेच्या छायाचित्रांमुळं ते गाजलं.)
त्यांच्याकडं लाइफ बोट्स नसल्या, तरी त्यांना या शीत काठावर लाइफ सेव्हिंग निवारा मिळाला. ओटो नॉर्देन्स्कजोल्ड या साहसवीराने १९०१मध्ये बांधलेली झोपडी तिथं कशीबशी तगून होती. तिच्यात काही अन्नही होतं.
आपल्या निवाऱ्यात काही अन्नसाठा ठेवण्याचा अलिखित नियम अंटार्क्टिकात पाळला जातो. भविष्यात तो आपद्ग्रस्त वीरांच्या कामी येऊ शकतो. (अंटार्क्टिक हा नैसर्गिक फ्रीझच असल्याने, हे अन्न कितीही काळ टिकून राहतं.) पुढं काही दिवसांतच ‘एंड्युुरन्स’ला जलसमाधी मिळाली.
तर आमच्या मोहिमेदरम्यान, जहाज फसणं जहाज कंपनीला तसंच भारतालाही परवडण्यासारखं नव्हतं. म्हणून बऱ्याच वेळा मोहिमेचे सदस्य जिवावर उदार होऊन काम करत. आमच्या जवळच (८-१० कि.मी.वर) जर्मनी आणि रशियाचे तळ होते. ते संशोधक आमच्या तळाला भेट देत. बांधकामाचा आवाका पाहून अंदाज बांधत, ‘एवढ्या बांधकामासाठी किमान तीन-चार मोहिमांची आवश्यकता आहे.’ आमचा आत्मविश्वास बोलायचा, ‘नाही, याच मोहिमेत आम्ही फत्ते करणार आहोत.’ संकटं आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देत होती.
एके दिवशी वादळ फोफावलं. जहाजावरून काही सामान आणणं अत्यंत निकडीचं होतं. वादळाचा वेग होता ७५ नॉट्स (नॉट हे सागरी मैलाच युनिट आहे.). सुरक्षेच्या दृष्टीने २५ नॉट्सहून अधिक वाऱ्याच्या वेगात हेलिकॉप्टर न उडवण्याचा नियम आहे. तथापि कॅप्टन सक्सेना हा धोका पत्करायला तयार झाले. अशा वादळात आवश्यक ते सामान हेलिकॉप्टरमधून ते घेऊन आले. अशा वादळात लँडिंगही तेवढंच धोकादायक होतं. त्यांनी हे कसं काय साधलं, तेच जाणोत.
हेलिकॉप्टरमधून कॅप्टन सक्सेना सुखरूप उतरले. सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचा सन्मान केला. श्रमपरिहार करताना सक्सेना म्हणाले, “आज तुम्ही माझा सन्मान केला. दिल्लीला गेल्यावर एअर फोर्स विभाग कोणती कारवाई करेल सांगता येत नाही. कदाचित सन्मान होईल, कदाचित कोर्ट मार्शलला सामोरं जावं लागेल.” पुढं समजलं, त्यांच्या ऑफिसने त्यांचा सन्मानच केला होता.
फ्रँक हर्ले नावाचा उत्तम छायाचित्रकार होता. जहाजावरून उडी मारताना त्याच्या निगेटिव्हज पाण्यात पडल्या. जिवाचा धोका पत्करून पठ्ठ्याने शीतसागरात सूर मारून त्या हस्तगत केल्या.