आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article By Prashant Dixit In Rasik About Bankruptcy In Greece

दिवाळखोरीचे मूळ ग्रीक संस्कृतीत ? (आकलन)

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘ग्रीस’ या लहानशा देशाने सध्या जगाला वेठीला धरले आहे. ग्रीसने दिवाळखोरी जाहीर केली आहे. या आर्थिक संकटाची कारणे अर्थव्यवहारात आहेत, की ग्रीस सरकारच्या चुकीच्या धोरणात?
गोल्डमन साकसारख्या अमेरिकी गुंतवणूक कंपनीने केलेली आकड्यांची गोलमाल हे ग्रीसच्या दुखण्याचे मूळ आहे, असे सांगतात. ते बरोबर आहे. तथापि, या संकटाच्या मुळाशी चुकीच्या आर्थिक धोरणापेक्षा सांस्कृतिक कारणे महत्त्वाची अाहेत.
प्रत्येक देशाचा एक स्वभाव असतो. बहुसंंख्यांच्या या स्वभावातून संंस्कृती बनते. कसे जगायचे, हे ही संस्कृती सांगत असते. त्यानुसार माणूस जगत असतो. जगण्यात चढ-उतार येत असतात. अशा वेळी कसे वागायचे, हे संस्कृती सांगते. संस्कृतीचे हे नियम मुद्दाम शिकविले जात नाहीत, पण शाळेत शिकविल्या गेलेल्या धड्यांपेक्षा हे नियम बळकट असतात. ते प्रत्येकाकडून सहज काम करून घेतात. लाच घेऊ नये, असे शाळेत शिकविले असले, तरी पैसे पुढे झाले की, अधिकारी लाच घेऊन मोकळा होतो. सहजतेने लाच घेण्याची प्रवृत्ती ही संस्कृती असते. संस्कृती हा शब्द आहे बहुधा साहित्य, तत्त्वज्ञान, कला, विज्ञान अशा संदर्भात वापरला जातो. परंतु, रोजच्या जगण्याची पद्धती हेच संस्कृतीचे मुख्य अंग असते. समाजाच्या सामान्य व्यवहारात जे दिसते तीच खरी संस्कृती, पुस्तके नव्हेत.

रोजच्या जगण्यातील व्यवहार, (म्हणजेच संस्कृती) हे देशाला एक तर वैभवावर नेतात किंवा खाली खेचतात. ओब्रायन ब्राऊनी यांनी जगाचे विभाजन दोन संस्कृतीत केले आहे. ‘रेड लाइट संस्कृती’ व ‘ग्रीन लाइट संस्कृती’. रेड लाइट संस्कृती म्हणजे, नियम पाळणारी संस्कृती. नियम पाळताना त्रास झाला तरी तो सहन करणारी संस्कृती. चौकातील सिग्नल लाल असेल तर रस्ता न ओलांडणारी संस्कृती. या उलट ग्रीन लाइट संस्कृती म्हणजे, नियम मोडण्यात अभिमान मानणारी संस्कृती. नियम मोडणे हे माझ्या सामर्थ्याचे लक्षण आहे, असे मानणारी संस्कृती.

जगातील प्रत्येक देश रेड किंवा ग्रीन लाइट संस्कृतीत बसविता येतात. देेशातील काही प्रदेेश किंवा समाजांचेही असे विभाजन करता येते. युरोपकडे पाहिले तर इटली, स्पेन, ग्रीस, रशिया, काही प्रमाणात फ्रान्स हे ग्रीन लाइटमध्ये मोडतात, तर जर्मनी हे रेड लाइटचे झगझगीत उदाहरण. अमेरिकेमध्ये पूर्वेकडील राज्ये ही रेड लाइटमध्ये येतात, तर कॅलिफोर्निया हे ग्रीन लाइटमध्ये मोडते. कॅलिफोर्नियातील सर्वात जास्त महापालिका डबघाईला आलेल्या आहेत.

भारत कशात बसतो, हे वेगळे सांगायला नको. ग्रीन लाइट संस्कृतीत कष्ट करण्याची गरज नसते, जबाबदारी उचलायचीही नसते. झटपट श्रीमंत होण्याच्या संधी तेथे असतात. या उलट रेड लाइट संस्कृतीत बरीच मेहनत करावी लागते. स्वत:मधील गुण वाढवावे लागतात. स्वत:ची क्षमता सतत सिद्ध करावी लागते. त्यासाठी शिक्षण घ्यावे लागते. हे करण्यात बराच वेळ जातो व मेहनतीच्या मानाने पैसा मिळतोच असे नाही. तरीही रेड लाइट पद्धतीनेच जगण्याची चिकाटी ज्या देशातील लोकांनी दाखविली, ते जगावर राज्य करू लागले. ग्रीन लाइटवाल्यांना काही काळ मौजेचे दिवस आले, पण नंतर वाताहत सुरू झाली.

गेल्या शतकात दोन वेळा जर्मनी पुरता बेचिराख झाला. पण तरीही सामर्थ्याने उभा राहिला. १९४७मध्ये भारत स्वतंत्र झाला, तेव्हा जर्मनी पूर्णपणे खाक झाला होता. पण पुढील २५ वर्षांत जर्मनी महासत्ता झाली, तर भारत अजूनही चाचपडत आहे. विज्ञान व अभियांत्रिकीची कास धरली आहे, या कारणाबरोबरच जर्मन माणसाचा मेहनती, नियम पाळणारा स्वभाव, हे वैभवाचे मुख्य कारण आहे. सतत काहीतरी काम करीत राहणे, नवनवीन उत्पादने तयार करणे आणि कोणाचे लक्ष असो-नसो, नियमांचे काटेकोर पालन करणे, हे जर्मनांच्या हाडीमांसी मुरले असल्याने कितीही आपत्ती आल्या तरी जर्मनी पुन्हा उभा राहतो, वैभव टिकवून धरतो.

ग्रीन लाइट संस्कृतीला पैसा टिकवून धरता येत नाही. मायकेल लेविस या पत्रकाराने, दिवाळखोरीकडे निघालेल्या देशांचा दौरा करून ‘बुमरॅन्ग’ नावाचे पुस्तक चार वर्षांपूर्वी लिहिले होते. ग्रीस अडचणीत सापडणार, हे त्याने त्या वेळीच सांगितले होते. ग्रीक लोकांची जगण्याची पद्धत नाशाकडे नेणारी आहे, असे लेविस याला ठामपणे वाटत होते. सार्वजनिक पैशावर डल्ला मारून स्वत: गब्बर होणे आणि चैनीत आयुष्य घालविणे, हा ग्रीकांचा स्वभाव झाल्यामुळे काही काळ आर्थिक सुबत्ता आली तरी त्यांना ती टिकवून धरता येत नाही, असे मायकेल लेविसने म्हटले.

लेविसने त्या काळी केलेले ग्रीसचे वर्णन पाहा : सरकारी नोकरीत खासगीपेक्षा तिपट्ट पगार मिळतो, पेन्शन मिळते आणि काम करण्याची सक्ती नसते. पुरुषांना ५५ नंतर तर महिलांना ५० नंतर भरभक्कम निवृत्तीवेतन सुरू होते. कितीही कमाई झाली, तरी उद्योगपती व व्यावसायिक मामुली कर भरतात. करचुकवेगिरी करताना पकडले गेले, तरी बिघडत नाही. कारण कोर्टात खटला किमान १५ वर्षे चालतो. तोपर्यंत व्यवसाय वा नोकरी सुरू असते. सरकारने पैसा पुरविणे हा हक्क आहे, असे प्रत्येक जण समजतो. भ्रष्टाचाराने देशाची वाट लागली आहे, असे प्रत्येक जण सांगतो. मात्र भ्रष्टाचारासाठी दुसऱ्याला जबाबदार धरतो. सरकारी नोकरांचा पगार व निवृत्तीवेतनाच्या बोजाने अर्थव्यवस्थेचे कंबरडे मोडले आहे. शाळांमध्ये शिक्षकांची बेसुमार भरती झाली आहे, व त्यांंना पगारही भरपूर आहेत. तरी सरकारी शाळेत चांगले शिक्षण मिळत नसल्याने प्रत्येक मूल खासगी शिकवणीला जाते. सरकारी वाहतूक व्यवस्था डबघाईला आली, तरी चालक-वाहक व कर्मचाऱ्यांचे पगार वाढत आहेत. प्रत्येक सरकारी उपक्रम तोट्यात आहे, पण कामगारांची चलती आहे. सार्वजनिक आरोग्यसेवेवर सरकार भरपूर पैसे खर्च करते, पण बहुतेक साहित्य डॉक्टर्स, नर्स व अन्य कर्मचाऱ्यांच्या घरी जाते. भ्रष्टाचार उघडकीस आणला की बदली होते. मठाधीशांच्या पायाशी सत्ताधारी बसतात व मठाधिशांना सर्व सवलती मिळतात. इत्यादी.

हे वर्णन ग्रीसचे आहे की भारताचे? ही ग्रीन लाइट संस्कृती आहे. ग्रीकांच्या अंगी रुजलेली. भारताची अवस्था ग्रीससारखी होणार नाही, कारण अर्थसंकल्पातील आकडे आशादायक आहेत, असे म्हटले जाईल. पण ग्रीसनेही आपली तूट जीडीपीच्या फक्त ३ टक्के दाखविली होती. त्यावर जग विसंबून राहिले. प्रत्यक्षात ती १५ टक्के होती. तेव्हा आपणही आकड्याची मिजास करू नये. कारण आकडे रेड लाइटचे असले तरी आपला स्वभाव ग्रीन लाइटचा आहे.

prashant.dixit@dbcorp.in