आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

द ग्रेट'बहुरूपी'शो

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चारएक वर्षांपूर्वीची गोष्ट... प्रशांत दामलेकडून निरोप आला होता. शेखर ढवळीकरांनी लिहिलेल्या एका नव्याको-या नाटकात प्रशांत दामले दुहेरी भूमिका साकारणार होता. नाटकाचं नाव ‘बहुरूपी’...!
‘आपल्याकडे कला आणि कलाकार यांच्याबद्दल पारंपरिक दृष्टिकोन आहेत; पण जसा प्रसारमाध्यमांचा वेग वाढला, तसं मार्केटिंगला महत्त्व आलं. केवळ कलागुण असून चालत नाही, तर त्यांचं मार्केटिंग करता आलं पाहिजे. त्यामुळे ग्रासरूटवर आपल्याकडे ज्या प्रथा होत्या, लोकसंगीत होतं, लोककलाकार होते, ते मार्केटिंगअभावी काळाच्या उदरात गडप झाले. हे संचित आपण जपले नाही. या सर्वांवर माझं लक्ष गेलं आणि मी नाटक लिहिलं. मग या नाटकात बहुरूपी घेतला. कारण आपल्याकडचे ते सगळ्यात ताकदीचे कलाकार. पण त्यांना उत्तेजन मिळाले नाही. त्यांच्याकडे लोकसंस्कृती होती, त्याच्या गाण्यांचे फॉर्म होते, भाषेचे फॉर्म होते. हे सगळं काळाच्या ओघात हातून निसटतंय. यावर माझं नाटक थेट बोलतं’, असे नाटकाचे लेखक शेखर ढवळीकर त्या वेळी म्हणाले होते.
तर ‘बहुरूप्यांची भाषा, देहबोली, कॉन्फिडन्स लेव्हल हे सगळं जोखणं खूप इंटरेस्टिंग होतं आणि त्यासाठी मी खूप मेहनत घेतली’, असं प्रशांत दामले म्हणाला होता.
जवळपास प्रत्येक प्रसारमाध्यमाने प्रशांत दामलेच्या ‘बहुरूपी’ या नाटकाबद्दल भरभरून लिहिले होते.
याच्या नेमके उलट दोन वर्षांपूर्वी घडले. बुलडाणा जिल्ह्यातील मोहिदेपूर गावच्या तीन बहुरूप्यांची नागपूरच्या कळमना परिसरात संशयाने पछाडलेल्या जमावाने दगड-विटांनी ठेचून हत्या केली. प्रशांत दामलेच्या ‘बहुरूपी’ नाटकावर पानभर लिहिणा-या प्रसारमाध्यमांना क्रौर्याची परिसीमा गाठणारी ही घटना फारशी महत्त्वाची वाटली नाही.
मात्र त्या घटनेचे इतके भीषण सावट आजही बहुरूप्यांवर पडले आहे की, लोककलेची परंपरा जिवंत ठेवणा-या या समाजाचा जीवनमरणाचा प्रश्नच आता ऐरणीवर आला आहे. आज बहुरूपी समाजाला अज्ञातवास जवळचा भासतोय. कधीकाळी शर्टाच्या आतील मनं स्वच्छपणे बघणारा हा बहुरूपी, आता माणसांकडे बघणंही टाळायला लागलाय. त्याला आता प्रत्येक
माणूस ‘बहुरूपी’ वाटतोय... राक्षसाचे सोंग घेतलेला बहुरूपी!
‘राधा-गवळण केली, पोटुशी असलेल्या बाईचं सोंग घेतलं, कधी शिपाई झालो, तर कधी पोस्टमन झालो, पन कोण्या माय मावलीले उलटून नाय बोललो. आमची शिकवणच तशी हाये... बेइमानी, चोरी अन् छिनाली आमी करीत नाय. आमी मनोरंजन करतो, माना मोडत नाही...’ बहुरूप्यांची ही आतडं पिळवटून टाकणारी वेदना प्रत्येकाच्या पालांमध्ये आज दिसतेय...
-----------------------------
‘लाफ्टर थेरपी’चा हा जमाना आहे. स्ट्रेस आणि स्ट्रेन हे शब्द वापरणे रोजच्या कामकाजाचा एक भाग झालाय. अगदी ‘लाफ्टर शो’पासून ते ‘लाफ्टर क्लब’पर्यंत लोकांना हसवण्याचे अनेक फंडे आता विकसित झाले आहेत. परंतु याचे खरे श्रेय जाते ते बहुरूप्यांना... भारतीय परंपरेत लाफ्टर थेरपी विकसित केली, ती बहुरूप्यांनीच. त्यांच्या पिढ्यान्पिढ्या दु:ख भोगतच जगल्या, पण लोकांना हसवत राहिल्या. लहान मुलांना कसे हसवायचे, मुलींच्या गालावरची कळी कशी फुलवायची, माहेरवाशीण, थोराड सासू, म्हातारी आजी आणि दात पडलेले
आजोबा, यापैकी कुणाशी कसा संवाद साधायचा, त्यांचं मन कसं ओळखायचं आणि त्यांच्यावर हास्याचा शिडकावा कसा करायचा, याचे बाळकडूच त्यांना मिळालेले.
बरं या बहुरूप्यांचा इतिहास किती मोठा, तर अगदी श्रीपतिभट्टांच्या ‘ज्योतिष रत्नमाला’ या मराठी ग्रंथात, लीळाचरित्रामध्ये, ज्ञानेश्वरीत, तुकोबाच्या अभंगात बहुरूप्यांचा उल्लेख सापडतो. अकबर-बिरबलाच्या कथेत या समाजाची नोंद आढळते. महाराष्ट्रात तर छत्रपती शिवाजी महाराजांनी बहुरूपी समाजाचा अतिशय चपखल वापर करून घेतला. शत्रूच्या गोटातली बित्तंबातमी काढण्यासाठी शिवराय याच बहुरूपींना शत्रूंच्या प्रदेशात धाडत आणि त्यांनी आणलेल्या खबरीच्या जोरावर पुढचे बेत आखत. शिवरायांच्याच कारकिर्दीत नावारूपाला आलेला बहिर्जी नाईक, हा बहुरूपी समाजाचाच. आजही प्रत्येक बहुरूपी अभिमानाने आपल्या समाजाची ख्याती सांगतो.
बहुरूप्यांचे कसब किती वरच्या दर्जाचे होते, याची महती सांगणारी ही कथा...
एकदा एक बहुरूपी भोजराजाकडे गेला. राजाने त्याला आपले सोंग घ्यायला सांगितले. थोड्याच वेळात हुबेहूब त्या राजाप्रमाणे बनून तो बहुरूपी राजसभेत शिरला. त्याचे त्या कलेतील असामान्य कौशल्य पाहून खुश झालेल्या भोजराजाने बहुरूप्याला एक मौल्यवान हार देऊ केला. भोजराजाचे सोंग घेतलेल्या त्या बहुरूप्याने रत्नहार तर घेतलाच नाही; पण राजाला साधा मुजरा करण्याचा शिष्टाचारही पाळला नाही. एवढेच नव्हे, तर तो राजसभेत ज्या दिमाखाने आला होता, तशाच ऐटीत निघून जाऊ लागला.
दरबारी मंडळींना बहुरूप्याचा हा उद्धटपणा आवडला नाही. काहींनी राजाकडे तक्रार केल्याबरोबर राजाने बहुरूप्याला पकडून हजर करण्याचे फर्मान सोडले. त्या बहुरूप्याला पकडून समोर हजर करताच राजा त्याला म्हणाला, ‘अरे उद्धटा, तुला मी एवढा रत्नहार देऊ केला, पण तो तू स्वीकारला तर नाहीसच; पण मला मुजरा करण्याचे सौजन्यही दाखवले नाहीस. तुझ्या या अपराधाबद्दल मी तुला आता कारावासाची शिक्षा ठोठावणार आहे.’
बहुरूपी म्हणाला, महाराज सोंग घेतलं असलं, तरी ते राजाधिराज भोज महाराजांचं घेतलं आहे. तेव्हा इनाम म्हणून रत्नहार स्वीकारणे, मुजरा करणं किंवा आपल्याला पाठ न दाखवता उलट चालत जाणं या गोष्टी मी जर केल्या असत्या, तर आपला अपमान झाला असता. म्हणून मी हुबेहूब आपल्यासारखं वागलो.’
बहुरूप्याने केलेल्या या खुलाशाने भोजराजा प्रचंड खुश झाला आणि त्याला तो रत्नहार आणि एक हजार सुवर्णमुद्रा इनाम म्हणून दिल्या...
------------------------
महाराष्ट्रातील नाट्योपासकांपैकी बहुरूपी हा सर्वात महत्त्वाचा आणि आद्य घटक म्हणून ओळखला जायचा. त्यानेच नाट्याभिनय, नृत्य, गीत, हावभाव करत रंजन आणि समाजप्रबोधन केलं. प्रत्येक माणसाच्या मनात एक चोर दडलेला असतो. त्या दडलेल्या चोराला हा बहुरूपी काही वेळ बाहेर काढतो. राम-सीता, शंकर-पार्वती, बजरंग बली, नंदी मोर, घोटा, हवालदार, वाहतूक पोलिस, हाल्या, पाठीवर बसलेली म्हातारी, नकटी, राक्षस असे विविध रूपांचे सोंग बहुरूपी घेत असतो.
लग्नाला चला, तुम्ही लग्नाला चला...
उंदराची गाडी त्याला मांजराची जोडी
इतभर गाडी त्यात खंडीभर गडी
तुम्ही लग्नाला चला...
बिबळ्याचं काजळ घाला,
उतरंडीसंगं फुगडी घाला
तुम्ही लग्नाला चला...
जेवायला केली चिखलाची कढी,
दगडाची वडी, मस्करी लोनचं
गाढवाचं भजं, तरसाच्या पोळ्या
लांडग्याची खीर
लग्नाला चला तुम्ही लग्नाला चला!
हितं काय जेवायचं नाही
तिथं काही खायचं नाही
तुम्ही मातर आल्याबिगर राहायचं नाही
शनवारचं लग्न, आईतवारची हळद
सोमवारी देवकार्य, न्् मंगळवारी वरात
ढेकणाची मोटार, विंचवाचे टांगे घोडे
आवरा लवकर चला...
आला बहुरूपी आला
लग्नाला चला, तुम्ही लग्नाला चला...!
लग्नाचे निमंत्रण देणा-या बाईचे सोंग घेऊन येणारा बहुरूपी या एका गाण्याने सबंध महाराष्ट्रात लोकप्रिय झाला. या गाण्यातून विनोदनिर्मिती करत महाराष्ट्रातली खेडीपाडी बहुरूप्यांनी पिंजून काढली. चित्रविचित्र प्रतिमांचा असंबद्ध वापर करून रचलेले हे गाणे म्हणत बहुरूपी गाव जमा करायचा. त्याच्या या सोंगाला सारं गाव प्रतिसाद द्यायचं. असं म्हणतात, की ‘लग्नाला चला’ म्हणजेच ‘लढाईला चला’ अशा सांकेतिक भाषेत बहिर्जी नाईकने शिवाजी महाराजांना सांगावा धाडला होता. (क्रमश:)
shivaprash@gmail.com