आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On Vishal Bhardwaj's Film Haider By Priyanka Dahale

असहिष्‍णू भावनांचा वेध

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नुकताच विशाल भारद्वाज दिग्दर्शित ‘हैदर’ हा शेक्सपिअरच्या ‘हॅम्लेट’ या नाटकावर आधारित चित्रपट प्रदर्शित झाला आणि शेक्सपिअरच्या नाटकांवर आधारित चित्रपटांची ट्रायोलॉजी पूर्ण केली. ‘मकबूल’ आणि ‘ओमकारा’ या चित्रपटांनंतर आलेला ‘हैदर’ हा चित्रपट केवळ चित्रपट म्हणून महत्त्वाचा ठरत नाही, तर भारताच्या राजकारणाचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग असलेल्या काश्मीर प्रश्नावर केलेले भाष्य म्हणूनही महत्त्वाचा ठरतो.

ही ट्रायोलॉजी म्हणजे दोन भिन्न संस्कृतींच्या मिलाफाचे, संस्कृती-आंतराचे अत्यंत उत्तम उदाहरण म्हटल्यास वावगे ठरणार नाही. भारद्वाज यांनी शेक्सपिअरच्या नाटकांचे भारतीयीकरण करताना केवळ संस्कृती बदलली नाही, तर शेक्सपिअरच्या नाटकांमधील राजवाड्याची, राजदु:खांचीही पार्श्वभूमी बदलली. याच मुद्द्याला धरून ‘हैदर’चे कथालेखक व पत्रकार बशरत पीर म्हणतात, ‘मला हॅम्लेटचं भारतीयीकरण करताना राजवाड्यातली
शोकांतिका नको होती. त्यामध्ये भारताचा अत्यंत संवेदनशील चेहरा मला हवा हेता. काश्मीरमधील १९९५सालचा धुमसता संघर्ष मला यासाठी कथेला बळ पुरवणारा ठरला.’
या आधीही ‘माचिस’ चित्रपटामध्ये पंजाबचा १९८०मध्ये पेटलेला संघर्ष तरुणांना कसा दहशतवादाकडे वळवतो, हे कथानक वापरण्यात आले होते. हैदरमध्येही स्वत: हैदर, चित्रपटाचा नायक सरहद के पार जाण्याची, मिलिटंट होण्याची भाषा करताे. फरक हा आहे (जो फार मोठा आहे) की, हैदरला हॅम्लेट नाटकातील मानवी मनोविश्लेषणाची पार्श्वभूमी आहे. विश्वासघात, प्रेम, हतबलता, क्रोध, भ्रमिष्टावस्था, दु:ख या भावना वैश्विक आहेत. मात्र त्या भावनांच्या प्रतिमा प्रत्येक संस्कृतीनुसार वेगवेगळ्या आहेत. शिवाय एखादी भावना मनातून ओठावर येईपर्यंत वा कृतीत उतरेपर्यंत व्यक्तीपरत्वे तिचे स्वरूप, तिची तीव्रता बदलत जाते. अनावर होणारा संताप हा अनेकदा सामान्य माणसाच्या बाबतीत कृतीमध्ये व्यक्त होईस्तोवर विरून गेलेला असतो. पांढरपेशा म्हणवल्या जाणा-या समाजामध्ये अशा भावना बव्हंशी सहिष्णूच रूप धारण करीत असतात. पण याच भावनांच्या मनामधल्या प्रतिमा जशाच्या तशा प्रत्यक्षात व्यक्त होतात, तेव्हा खून, विश्वासघात, कपट, कत्तल, दंगल, फसवणूक या कृती आकार घेतात. अशा वेळी या भावनांची तीव्रता प्रचंड असते.

हैदर ज्या वेळी इस्लामाबादहून आलोय, असे श्रीनगरमध्ये प्रवेश करताना जवानांना सांगतो; तेव्हापासून हैदरच्या मनात भवतालच्या परिस्थितीतला संशय आकार घ्यायला लागतो. अंडरवर्ल्ड ज्या वेळी मकबूलमध्ये भारद्वाज यांनी दाखवले होते, त्या वेळी अंडरवर्ल्डच्या जगतात संशय, विश्वासघात, कपट-कारस्थान असणारच, असे प्रेक्षक गृहीतच धरू शकत होता. ‘ओमकारा’चेही तसेच. हैदरमध्ये जो काश्मीरचा प्रश्न दाखवला तो सुद्धा आता हैदरला संशय, कपटाचा, कुणाला तरी गमावण्याचा सामना करावा लागणार, याचा अंदाज बांधायला प्रेक्षकांसाठी पुरेसा ठरतो.

मकबूल आणि ओमकारामध्ये वापरलेली शिवराळ भाषा हैदरमध्ये नाही. पण हैदरमधील घटना हिंसक आहेत. १९९५च्याच काळात सलमान खानच्या चित्रपटांची क्रेझ भारतीयांमध्ये होती. रोमँटिसिझम, रोमान्स, स्वप्नील जगणे सलमानच्या चित्रपटांमधून त्या वेळी समोर येत होते. हैदरमध्ये सलमानचे दोन चाहते (ज्यांचे दोघांचेही नाव सलमानच आहे) देशामधला आणि काश्मीरमधल्या परिस्थितीचा फरक सलमान खानच्या चित्रपटांच्या आधारे अधोरेखित करतात. दोन परिस्थितींमधला विरोधाभास दाखवताना हे दोन्ही सलमान सुरुवातीला हसवतात, पण हसता हसता या विरोधाभासाचे गांभीर्य कळत जाते. मकबूलमध्येदेखील असा ब्लॅक कॉमेडीचा परिणाम ओम पुरी आणि नसिरुद्दीन शाह यांनी भ्रष्ट पोलिस अधिका-यांच्या भूमिकेतून साधला होता. शेक्सपिअरच्या नाटकांमधील हा ब्लॅक कॉमेडीचा धागा भारद्वाज आपल्या ट्रायोलॉजीमध्ये मुख्य कथेच्या आधारे उत्तमपणे वापरतात.

काश्मिरी गाणी, लोकनृत्य आणि समकालीन नाट्यशैली यांचा आधार घेत काश्मीरचा कॅनव्हास कथेसाठी वापरण्याबरोबरच साऊंडट्रॅकमध्ये काश्मीरमधील बर्फाचा खणण्याचा आवाज, सुफीचा गंध असणारे शब्द पण रॉक संगीत असणारे ‘आओ ना’सारखे गाणे एखाद्या तरुणाची संशयापोटी, विश्वासघातापोटी होणारी मानसिकता तर दाखवतोच; पण कधीही मन:शांती न मिळणा-या काश्मीरचा झाकाेळलेला, मृत्यूकडे झुकलेला चेहरा स्पष्ट करत जाते.
अनवट नातेसंबंध व त्यातून निर्माण होणारे समज-गैरसमज, मनाचा संशयाने घेतलेला ताबा, सत्तेची, पैशाची लालसा, धर्मनिष्ठेच्या भावनेने गाठलेली कट्टरता अशा असहिष्णू कारणांनी आजवर युद्धे, दंगली झाल्या आहेत. त्यामुळे ‘हैदर’मध्ये हैदरचे वडील ज्या वेळी डॉक्टर या नात्याने एका दहशतवाद्यावर उपचार करतात, त्या वेळी भयभीत झालेली त्यांची पत्नी गजाला (हैदरची आई) डॉक्टरांना विचारते, ‘तुम किस की तरफ हो?’ त्या वेळी डॉक्टर ‘जिंदगी की तरफ’ असे उत्तर देतात; तेव्हा ही सहिष्णुता, मानवताच काश्मीरमधून त्या काळात (काही प्रमाणात आजही) लोप पावली आहे, हे लक्षात आल्यावाचून राहात नाही. शिवाय या उत्तराचे महत्त्व चित्रपटभर आपल्याला क्षणोक्षणी पटत राहते. एका प्रसंगात ट्रकमधील मृतदेहांच्या गराड्यात हैदर आपल्या वडलांना शोधत असताना एक बेशुद्ध पडलेला तरुण मुलगा हैदरच्या हालचालीने शुद्धीवर येतो व आनंदातिरेकाने उड्या मारत पळत जातो, हे भावनेचे दुसरे टोक मृत्यूच्या भयाचे आणि जगण्याच्या इच्छेचे उत्कट टोक ज्या वेळी दाखवते, त्या वेळी ‘जिंदगी की तरफ हैं’ या डॉक्टरांच्या वाक्याची शेवटपर्यंत कशी भारद्वाज यांनी सुसूत्रता बांधली आहे, याचीही जाणीव प्रकर्षाने होत राहते. मकबूलमधील व ओंकारामधील गुन्हेगारी जगतामधील संवेदनांपासून हैदरमधील निष्पाप नायकाच्या उद‌्ध्वस्त होण्यापर्यंतचा भारद्वाज यांचा ट्रायोलॉजीचा प्रवास हा केवळ चित्रपटातल्या नायकापुरता उरत नाही, तो आपल्या देशातल्या महत्त्वाच्या प्रश्नांचा प्रातिनिधिक चेहरा ठरतो. हैदरमध्ये बशरत पीर यांच्या पत्रकारितेचा स्पर्श झाल्याने नकळत ट्रायोलॉजीची परिपूर्णता वाढते. म्हणूनच हैदरची वा मकबूल वा ओमकाराची कथा निव्वळ कथा न उरता ती संस्कृती-आंतराचे उत्तम उदाहरण ठरते.

हैदरच्या निमित्ताने भारद्वाज यांनी काश्मीरच्या राजकीय व सामाजिक पार्श्वभूमीचा पुरेपूर वापर केवळ सादरीकरणाकरता नव्हे तर कथेकरता, नाट्याकरताही उत्कृष्टपणे केला आहे. ज्यात त्यांना राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि मानवी मूल्यांची एकत्रित बखुबी सरमिसळ साधता आली आहे. भारताचा एक ग्रे शेडमध्ये रंगलेला चेहरा जर पाहायचा असेल तर हैदर, मकबूल, ओमकारा हे तिन्ही चित्रपट उत्तम अशी प्रातिनिधिक उदाहरणे आहेत.

dahalepriyanka28@gmail.com