आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article By Priyanka Dahale In Rasik Magazine In Divya Marathi

स्थलांतरिताच्या वेदनेचा ठाव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कथेची उत्तम बांधणी, सामाजिक विषयाची सखोल जाण आणि कलाकारांनी कथेला दिलेला न्याय, स्थलांतरामधून दिसणाऱ्या भारताच्या चेहऱ्याला चित्रपटाच्या दाेन तासांच्या अवकाशात आकार देण्याचा केलेला प्रयत्न यामुळे ‘लायर्स डाइस’ चित्रपट वेगळा ठरतो. या चित्रपटाची ८७व्या अकॅडमी पुरस्कारासाठी म्हणजे ऑस्कर पुरस्कारासाठी नुकतीच भारतातर्फे शिफारस करण्यात आली.
सांस्कृतिक-सामाजिक वैविध्य असणाऱ्या भारतामध्ये राज्याराज्यांमधील स्थलांतर हा दिवसेंदिवस कळीचा बनत चाललेला प्रश्न आहे. दिल्लीत येणारे माणसांचे लोंढे, मुंबईत होणारी स्थलांतरे व त्यातून निर्माण होणारे गरिबीसारखे अनेक प्रश्न वेगवेगळ्या माध्यमांमधून चर्चिले जात आहेत. ‘लायर्स डाइस’ या गीतू मोहनदास या दिग्दर्शिकेचा चित्रपट नेमका याच विषयावर आधारित आहे. कथेची उत्तम बांधणी, कलाकारांनी कथेला दिलेला न्याय, स्थलांतरामधून दिसणाऱ्या भारताच्या चेहऱ्याला चित्रपटाच्या दाेन तासांच्या अवकाशात आकार देण्याचा केलेला प्रयत्न, यामुळे ‘लायर्स डाइस’ चित्रपट वेगळा ठरतो. या चित्रपटाची ८७व्या अकॅडमी पुरस्कारासाठी म्हणजे, ऑस्कर पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली. मल्याळम दिग्दर्शक गीतू मोहनदास यांचा हा दिग्दर्शक म्हणून पहिलाच चित्रपट. नवाजुद्दीन सिद्दिकी, गीतांजली थापा, मान्या गुप्ता यांना घेऊन हिंदीमध्ये हा चित्रपट बनवताना गीतू यांना अनेक आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला होता. गीतू यांचे पती राजीव रवी यांनी या चित्रपटाचे छायाचित्रण केले आहे. एका आंतरराष्ट्रीय चित्रपट महाेत्सवात हा चित्रपट दाखवण्यात आला. त्यानंतर गीतू यांना तेथील प्रतिसादानंतर हा चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी पैसा उभा करता आला होता. जानेवारी २०१४मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने प्रेक्षकांमध्ये फारसा प्रतिसाद मिळवला नसला तरी समीक्षकांनी मात्र त्यास उचलून धरले. राजीव यांनी याआधी ‘देव डी’ आणि ‘गँग्ज आॅफ वास्सेपुर’ यांसारख्या चित्रपटांचे छायाचित्रण केले होते. राजीव यांना छायाचित्रणासाठी, तर गीतांजली थापा यांना अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला.
हिमाचल प्रदेशातील इंडो-तिबेटियन सीमेजवळ असलेल्या एका छोट्याशा गावापासून या चित्रपटाची कथा सुरू होते. या गावातील कमला या तरुण विवाहितेचा नवरा दिल्लीमध्ये कामासाठी गेल्यापासून गायब आहे. कमलाशी त्याचा संपर्क तुटलेला आहे. गावापलीकडचे विश्व ठाऊक नसलेली कमला आपल्या मान्या या तरुण मुलीसह व बकरीसह नवऱ्याच्या शाेधात दिल्लीला जायचे ठरवते. तिला सिमल्यापर्यंत एक आर्मी ऑफिसर मदत करतो.
वरकरणी सामान्य वाटणारी ही कथा, पुढे स्थलांतरामुळे सामान्य माणसाच्या आयुष्यात काय बदल होतात, त्यांना किती समस्यांना सामोरे जावे लागते, याचा वेध घेते. कॅमेरा हिमाचल प्रदेशातील नयनरम्य बर्फाळ प्रदेशातून सुरुवातीला फिरतो; पण हाच कॅमेरा पुढे कमलाच्या नजरेतून, तिच्या नवऱ्याच्या शोधाच्या धडपडीतून एका भीषण वास्तवाचा वेध घ्यायला लागतो. बघणाऱ्या प्रेक्षकाला जगण्याची दुसरी बाजू बघण्यास भाग पाडतो. शहरीकरणापासून, पायाभूत सुविधांपासून, नोकऱ्यांपासून कोसो दूर असणारी गावे, आणि त्यामुळे आपल्या बायकापोरांना सोडून दूर शहरांमध्ये रस्त्यावरचे जगणे स्वीकारत येणारे माणसांचे लोंढे हे अलीकडे दाट हाेत जाणारे वास्तव, या चित्रपटात गीतू यांनी साकारले.

स्थलांतराचा मुद्दा तसा चित्रपटांमध्ये नवीन नाही. ‘लायर्स डाइस’मध्ये कमलाचा नवरा, इतकेच प्रतीक या चित्रपटात वापरले आहे. हा नवरा शेवटपर्यंत पडद्यावर दिसत नाही. दिसत राहते ती कमला. म्हणजे चित्रपटाचा नायक कुणी व्यक्ती नाही, तर ‘स्थलांतर’च नायक आहे. चित्रपट व्यक्तिकेंद्रित न बनवता विषयकेंद्रित बनवणे, तसे एक प्रकारे आव्हानच असते. ‘लायर्स डाइस’मध्ये गीतू यांनी तो साधण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. आज दिल्ली-मुंबई-काेलकातासारख्या शहरांमध्ये वेठबिगारीवर काम करणारे अनेक कामगार स्थलांतरित झाले आहेत. या स्थलांतराला घेऊन आपल्याकडे आसाममधील ९९मध्ये बिहारींची केलेली कत्तल असो, मुंबईतील दंगली असोत, या कामगारांची फसवणूक असो वा शाेषण असो; या सगळ्या बाजूंचा वेध आतापर्यंत चित्रपटाच्या माध्यमातून विविध अंगांनी घेतला गेला आहे. ‘लायर्स डाइस’ चित्रपटही त्यातलाच असला तरी चित्रपटाला दिलेली ट्रीटमेंट मात्र वेगळी आहे. नियती जे फासे टाकते, ते कायम माणसाला भूल देणारे असतात, प्रसंगी ते दिशाभूल करतात, आपल्याशी खेळ करतात, हा शीर्षकात लपलेला अर्थदेखील चित्रपट पाहताना लक्षात येतो. अर्थात, ऑस्करच्या अंतिम सोहळ्यामध्ये हा चित्रपट किती यश मिळवतो, ते पाहायचे. या चित्रपटाला यश मिळाल्यास चित्रपटात अभिनय करणाऱ्या नवाजुद्दीन सिद्दिकीबराेबर गीतू मोहनदास यांच्यासाठी आपल्या कारकीर्दीकरिता महत्त्वाचे यश ठरणार आहे.

ऑस्करसाठी शर्यत...
‘स्लमडाॅग मिलेनियर’ला मिळालेले ऑस्करमधले यश वगळता दरम्यानच्या काळात भारताला क्वचितच ऑस्करच्या अंतिम फेरीत यश मिळाले आहे. मागील वर्षीचा ‘द गुड राेड’ हा सोनाली कुलकर्णी अभिनीत चित्रपटही कमाल दाखवू शकला नव्हता. मराठी चित्रपट अलीकडे राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये आपली वर्णी लावायला लागला आहे. मात्र ऑस्करसाठी भारताचे प्रतिनिधित्व करण्याकरिता ‘श्वास’ चित्रपटानंतर मराठी चित्रपटांना कायमच हिंदी व इतर भाषिक चित्रपटांशी स्पर्धा करावी लागली आहे. ‘फँड्री’, ‘यलाे’सारख्या चित्रपटांची बरीच चर्चा झाली. या चित्रपटांनी हाताळलेले विषय व मांडणी मराठी चित्रपटांचा दिवसेंदिवस वाढणारा दर्जा दाखवून देणारी हाेती. मात्र ‘लायर्स डाइस’ने यात बाजी मारली. मागील वर्षी २५ चित्रपट यासाठी स्पर्धेत होते, या वेळी ३० चित्रपट होते.