आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article By Prof. Jyoti Swami In Madhurima About Students Of Rural Area

विद्यार्थ्यांनी विस्तारले अनुभवविश्व (फुलत्या तरुणाईच्या मनातून)

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फॅशनेबल कपडे घालून स्मार्टफोन वापरणारी, धूमस्टाइल बाइक चालवणारी तरुणाई आपल्या सर्वांच्याच नित्य परिचयाची. मात्र कष्ट करून, अडचणींवर मात करत शिकणारा ग्रामीण विद्यार्थी हा उपेक्षित घटक. अशा विद्यार्थ्यांच्या विश्वात डोकावून त्यांच्या मनाचा तळ शोधण्याचा प्रयत्न करणारं हे मासिक सदर आजपासून...

मधुरिमाच्या माध्यमातून तुमच्याशी संवाद साधायचा आजचा पहिला दिवस. ग्रामीण भागातील वरिष्ठ महाविद्यालयातील एक शिक्षिका म्हणून माझा अनुभव, माझ्या विद्यार्थ्यांचं भावजीवन, ग्रामीण संस्कृतीतली त्यांची जडणघडण, आणि त्यांचं यश-अपयश, अशा कितीतरी गोष्टी मी या माध्यमातून मांडू शकणार आहे, याचा विलक्षण आनंद वाटतो. खरं तर सदर लेखनाबद्दल विचारलं तेव्हा असं वाटलं, सातत्यानं आपण एकाच विषयावर कितीसं लिहू शकणार आहोत? पण सदर सुरू करण्याचं निश्चित झालं, त्या क्षणापासून मनाच्या तळाशी दडून बसलेल्या विद्यार्थ्यांशी संबंधित अनेक घटना-प्रसंग माझ्या मनात पिंगा घालायला लागले. लक्षात आलं की, माझ्याकडेही सांगण्यासारखं पुष्कळच आहे की...

गेली बारा-तेरा वर्षं मी या गावाला, इथल्या माणसांना, त्यांच्या संस्कृतीला, विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या मानसिकतेला समजून घेण्याचा प्रयत्न करतेय. त्या सर्वांकडे त्यांच्याच नजरेनं पण थोडं अंतरावरून पाहायला लागले नि माझ्या विद्यार्थ्यांचं हे जग मला वेगळंच भासू लागलं. बदल्या काळाच्या गतीचं, जबाबदारीचं, रूढी-परंपरांचं, नात्यांचं, ध्येयांचं आणि स्वप्नांचं आभाळ पेलताना या मुलांची अनेकदा दमछाक होते, ती गोंधळून जातात; पण निराश होत नाहीत. आत्मविश्वासानं आणि अदम्य इच्छाशक्तीनं ती स्वत:ला उभं करत, एक-एक पाऊल टाकत राहतात. प्रसंगी तडजोडी करतात. मात्र आयुष्याला समजून घेऊन जगतात. टाकलेलं एक एक पाऊल अायुष्यासाठी नवी वाट निर्माण करणारं आहे, हे त्यांना माहीत असतं. आपल्या पूर्वीच्या हजारो पिढ्या अज्ञानाच्या अंधारात गाडल्या गेलेल्या आहेत. आता आपण ज्ञानाच्या प्रकाशाला मुठीत धरलं नाही तर पुढची कित्येक वर्षं स्वत:ला अंधाराच्या खाईत लोटून द्यावं लागेल, याची त्यांना लख्ख जाणीव असते. त्यामुळेच कितीही कठीण परिस्थिती आली तरी ती डगमगत नाहीत. विद्यार्थ्यांना शिकवत असताना त्यांची जडणघडण, जिद्द, मानसिकता, ऊर्मी, इच्छाशक्ती किंवा फरपट पाहून त्यांना अनेक प्रकारे समजून घेता आलं. त्यांच्या सहवासातला निखळ-निरागस आनंद जसा अनुभवला, तसाच अनेकदा त्यांच्या वाट्याला आलेल्या विदारक परिस्थितीनं अतिशय अस्वस्थही झाले. खरं तर त्यांना पुस्तकातले धडे शिकवता शिकवता त्यांच्याकडूनच जीवनातले धडे शिकत आलेय, असं म्हटल्यास वावगं ठरू नये.

शिकवण्याबरोबरच महाविद्यालयात सांस्कृतिक कार्यक्रम सादर करताना, राष्ट्रीय सेवा योजनेचे सामाजिक जाणीव निर्माण करणारे उपक्रम राबवताना, वार्षिक स्नेहसंमेलनात त्यांच्यासोबतची धम्माल मस्ती अनुभवताना, फिल्म क्लबच्या नव्याच जगाची ओळख करून घेताना विद्यार्थांची वाढत गेलेली समज, त्यांचा व्यक्त होण्यातला आनंद, सादरीकरणासाठीची धडपड हे सर्व बघताना, काही गोष्टी लक्षात येत गेल्या. वर्षभर मौनात असणारा, लाजाळू असणारा एखादा विद्यार्थी स्नेहसंमेलनाच्या वातावरणात एकदम फुलून येतो. त्याच्या आत दडलेल्या कलाकाराचा त्यालाही पहिल्यांदाच शोध लागतो. किंवा कधी कधी राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या शिबिरातून आपल्यात एक नेता किंवा वक्ता दडलाय, याची त्यांना प्रथमच जाणीव होते. या सगळ्या जादू महविद्यालयात घडतात. तेव्हा त्यांचे आत्मिवश्वासानं फुलून येणारे चेहरे, त्यांच्या व्यक्तिमत्त्वात होणारे बदल आणि येत असलेली प्रगल्भता याचा अनुभव घेणं, शिक्षक म्हणून अतिशय सुखावणारं असतं. अशा विद्यार्थ्यांना उपदेश न करता त्यांच्या पातळीवर जाऊन शिक्षणाचा आणि एकूणच जगण्याचा अर्थ समजावून सांगत राहते. धडे, कविता अभ्यासणे म्हणजे शिक्षण नाही, तर तुम्हाला माणूस बनवण्यासाठी ऊर्जा देणारी ती केवळ साधनं आहेत. त्या साधनाच्या माध्यमातून तुमच्या आत दडलेल्या एका विलक्षण माणसाला तुम्हाला शोधायचं आहे, असं मी त्यांना वारंवार सांगत असते. कारण शिक्षक आणि विद्यार्थी हे एक श्रेष्ठ नातं आहे. मी असं मानते की, शिक्षकाकडं एक सुप्त शक्ती असते.

तिचा सकारात्मक उपयोग करून अनेक विद्यार्थ्यांचं आयुष्य तो उजळवून टाकत असतो. शिकणं आणि शिकवणं हा एक विलक्षण आनंददायी अनुभव आहे. अशा आनंददायी अनुभवासाठी विद्यार्थी आणि शिक्षकाची शिकण्यावर आणि शिकवण्यावर निष्ठापूर्ण श्रद्धा मात्र असली पाहिजे. अशा या अनुभवांच्या गोड, तुरट, आंबट आणि कडू चवींची शिदोरी घेऊन भेटतेच पुढच्या भागापासून...

jyoti25.swami@gmail.com