आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मायबोलीचं मोल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भाषेबद्दलचा न्यूनगंड हा शहरातल्या शिक्षित, उच्च पदावरच्या माणसांनाही असतो. मग ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना किती असेल, त्याचं गणित मांडणं कठीण आहे. मात्र त्याचा अनुभव पदोपदी येत राहतो. बोली असो की प्रमाणभाषा, ती आत्मविश्वासानं आणि जिथे जशी गरज असेल तशी बोलली पाहिजे.
मी जेव्हा महाविद्यालयात रुजू झाले तेव्हा सुरुवातीच्या काळात माझी भाषा (प्रमाण भाषा) एेकून अनेक मुलांमध्ये भाषेबद्दल न्यूनगंड निर्माण होतोय हे समजलं, तेव्हा वाईट वाटलं. मग मी हळूहळू प्रमाण भाषेचा वापर कमी करून त्यांच्या बोलीभाषेत बोलायचा प्रयत्न सुरू केला. तेव्हा त्यांचे चेहरे अधिक विश्वासानं वर्गात बसू लागले. एका वेगळ्या जाणिवेनं उजळू लागले. तुम्ही आमची बोली बोलू शकता तर आम्हीही तुमची प्रमाण भाषा बोलू शकतो, हा विश्वास त्यांच्यात निर्माण व्हायला लागला.
एकदा मुलींसाठीची व्यक्तिमत्त्व विकास कार्यशाळा सुरू होती. त्यात बोलताना प्रमुख अतिथी म्हणाले, ‘मायवं, बाईवं, हाव ना जाय ना, असल्या फालतू शब्दांचा वापर करू नका. शुद्ध बोला.’ मी ते ऐकून चकित झाले. भाषा विषय शिकवणाऱ्या त्या व्यक्तीला आपण काय बोलतोय आिण त्याचा काय परिणाम होईल, याची कल्पनाच नव्हती. मुली अपमानित चेहऱ्यानं थोड्या कावऱ्याबावऱ्या होऊन बघत होत्या. मी बोलायला उठले तेव्हा त्यांना सांगितलं की, आपल्या बोलीभाषेवर मनापासून प्रेम करा. कारण बोली ही सर्वश्रेष्ठ अशी काळजाची भाषा असते. तुमच्या घरात, गावात बोलीचाच वापर करा. कारण जो गोडवा बोलीत आहे, तो कशातच नाही. मात्र प्रमाण भाषाही बोलायला आणि समजून घ्यायला शिका.’
बोलीभाषा हा त्या त्या गावाच्या, प्रदेशाच्या आणि गावातल्या माणसांच्या अस्मितेचा घटक असते. ती बाजूला काढून कुणीही, शहरी असो की ग्रामीण, जगू शकत नाही. मात्र नव्याचा स्वीकार करणं त्यांना जमू शकतं. फक्त त्या उमलत्या वयाच्या मुलांना त्याची जाणीव करून द्यावी लागते.
मुंबईच्या लोकलमधून प्रवास करताना एके दिवशी एक तरुण समोर उभा राहिला आणि हात जोडून म्हणाला, ‘नमस्कार मॅडम, ओळखलंत?’ मी त्याच्याकडे पाहिलं. नीटनेटके कापलेले केस, बारीक सोनेरी काडीचा चश्मा, महागडे कपडे आणि महागडे बूट घातलेला तो कुणीतरी मुंबईकर आहे, असा विचार करून मी नकारासाठी मान हलवली. तेव्हा तो म्हणाला, मी महादेव पाटील. ‘मले चांगलं बोलायले नई जमनार,’ असं तुम्हाला नेहमी सांगायचो. त्यानं हे सांगितल्यावर अंधुकसं आठवलं की, असा एक विद्यार्थी होता, ज्याला मोकळं आणि चांगलं बोलता येणारच नाही, असं वाटायचं. वर्गात उत्तर द्यायला उभं केलं की, तो नुसता मान खाली घालून उभा राहायचा. मग तास संपला की, वर्गाबाहेर येऊन सांगायचा, ‘मले बोलायले नई जमनार.’ मी त्याला समजावत राहायची. पण तोच विद्यार्थी आज चांगलं बोलत होता. त्याच्या सगळ्या व्यक्तिमत्त्वाचाच कायापालट झाला होता. मग त्यानं सांगितलं, सोयगावमधून बाहेर पडल्यानंतर त्यानं एमए, बीएड केलं. मुंबईजवळच्या एका गावात तो शिक्षक म्हणून नोकरीला लागला. भाषा ही प्रयत्नसाध्य आहे, हे त्याच्या लक्षात आलं होतं. तो एवढ्यावरच थांबला नाही. त्यानं सांगितलं, “मी जिथं नोकरी करतो त्या परिसरात आदिवासी आणि कोळी समाज जास्त आहे. त्यांच्या मुलांना शाळेबाहेर भाषा कशी बोलावी, हे मी शिकवतो. भाषेवरचे अनेक प्रयोग करत असतो. यातून मला निखळ आनंद मिळतो.’
मध्यंतरी अजिंठा लेणीत विद्यार्थ्यांची सहल नेली होती. वेगवेगळ्या वस्तू, रंगीबेरंगी दगड, माळा पाहात सगळे दुकानांसमोरून लेणींकडे जात होतो. तेवढ्यात आमच्या एका िवद्यार्थ्याने आवाज दिला. मग कौतुकानं आम्ही सगळे त्याच्या दुकानात गेलो. चौकशी केली तेव्हा समजलं की, ते त्याच्या भावाचं दुकान आहे आणि तो विद्यार्थी गोव्याला गाइड म्हणून काम करतो. आम्हाला खूप आश्चर्य वाटलं. तावडी बोलीत बोलणारा तो मुलगा अनेक भाषा बोलू शकत होता. परकीय भाषांचं त्यानं कुठलंही औपचारिक शिक्षण घेतलेलं नव्हतं; पण प्रयत्न आणि इच्छाशक्तीच्या बळावर त्यानं हे साध्य केलं होतं. केवळ तो विद्यार्थीच नाही तर त्याच्यासारखी अजिंठा सोयगाव परिसरातली अनेक मुलं आहेत, जी प्रयत्नांनी विविध भाषा शिकून गाइड म्हणून काम करतात. केवळ अजिंठ्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात. भाषेच्या न्यूनगंडात न अडकता ही मुलं आपल्या मायबोलीचं आणि एकूणच भाषेचं मोल जाणतात, म्हणूनच अशा तऱ्हेनं काम करू शकतात.
उत्तम भाषा येणं गरजेचं असतं. ज्याची भाषा उत्तम त्याचं काहीही विकलं जातं म्हणतात, ते यामुळंच. बोली असो की प्रमाणभाषा, ती आत्मविश्वासानं आणि जिथे जशी गरज असेल तशी बोलली पाहिजे. प्रत्येक बोलीप्रमाणे त्या परिसरातली तावडी बोलीही अतिशय गोड आहे. कधी कधी गावातल्या बायकांच्या गप्पा एेकताना त्यांच्या बोलीचं, त्यांच्या अभिव्यक्तीचं निरीक्षण करते तेव्हा ती त्यांच्या काळजातून आपुलकीचे शब्द घेऊन येणारी बोली भाषा एेकून मी थक्क होते. त्यातली ताकद आणि परिणामकारकता एखाद्या अभिनय सम्राज्ञीला लाजवू शकेल इतकी प्रचंड असते. ही इथल्या बोलीची ताकद
ना. धों. महानोर, प्राचार्य भगवानराव आणि अशोक कौतिक कोळी या साहित्यिकांनी जाणली आणि आपल्या साहित्याच्या माध्यमातून वैश्विक पातळीवर नेली.
या शेतानं लळा लाविला असा असा की
सुख दु:खाला परस्परांशी हसलो रडलो
आता तर हा जीवच अवघा असा अवघडला
मी त्याच्या हिरव्या बोलीचा शब्द जाहलो
(ना. धों. महानोर)
मराठी साहित्याला समृद्ध करणारी इथली तावडी बोली आणि तिचं मोल अनन्यसाधारणच आहे. फक्त विद्यार्थ्यांना त्याची जाणीव व्हायला वेळ लागतो. पण जाणीव होतेच.
jyoti25.swami@gmail.com
बातम्या आणखी आहेत...