आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article By Raghuraj Deshpande About Rangoli Of Sanskar Bharti

संस्कारभारतीतून नवसंजीवनी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फ्लॅटसंस्कृतीमुळे हरवलेले अंगण आणि महिलांचा सतत वाढणारा जबाबदाऱ्यांचा आलेख यामुळे रांगोळीच्या परंपरेची नाळ तुटत असतानाच ९०च्या दशकात या कलेला संस्कारभारतीच्या रूपाने नवसंजीवनी मिळाली. उत्सव, सामाजिक उपक्रमांच्या ठिकाणी पवित्र, वेदकालीन चिन्हांचा वापर करत काढल्या जाणाऱ्या या रांगोळीचा पाहता पाहता एक मोठा प्रवाहच बनला. अर्थात प्रवाहाचे पाईकही हजारोंच्या संख्येने आहेत.

भारत हा कृषिप्रधान देश म्हणून गणला गेला आहे. निसर्गातील हिरवीगार पाने व रंगीबेरंगी फुले यांची मुबलक उपलब्धता आणि गायीगुरांच्या शेणाचे नैसर्गिक महत्त्व. या पार्श्वभूमीवर प्राचीन काळापासून भूमीचे पूजन व विविध प्रकारांनी भूमीच्या अलंकरणाची प्रथा आपल्या देशात आहे. ललित कलांच्या यादीतील चित्रकलेशी जवळीक साधणारी ही रांगोळीची कला वैदिक व रामायणाच्या काळापासून विकसित झालेली आढळते. या कलेमध्ये सुरुवातीपासून महिलांचा सहभाग जास्त राहिलेला आहे.

मूलतः अंगठा व पहिल्या बोटाच्या चिमटीत पकडून सरावाने रांगोळी काढण्याची पध्दत रूढ आहे. भारतातील विविध प्रांतांत उपलब्ध नैसर्गिक साधनसामग्रीनुसार रांगोळी काढली जाते. या सर्व प्रकारात वैयक्तिक रांगोळी चित्रे काढण्याची परंपरा आहे.

अलिकडच्या काळात म्हणजे १९८१मध्ये लखनऊत संस्कारभारतीच्या स्थापनेपासून, ललित कलांच्या माध्यमातून भारतीय संस्कृती व कलांचे संवर्धन व संघटन हा विषय पुढे आला व १९८८पासून चित्रकलेशी जवळीक असलेल्या या रांगोळीच्या सामूहिक प्रकटीकरणासाठीचा विचार सुरू झाला. त्याच वेळी सामाजिक उत्सव, सणांसाठीच्या सजावटीसाठीचा भाग म्हणून संघटित रांगोळीची प्रथा सुरू झाली. या निमित्ताने रांगोळीच्या कलेमध्ये पुरुषांचा सहभाग वाढू लागला आणि मग देशभरासाठी रांगोळी-भूअलंकरणाचे कार्य सुरू झाले. देशातील बऱ्याच राज्यातून पाचबोटी संस्कारभारतीच्या रांगोळीचे प्रशिक्षण वर्ग, अभ्यास वर्ग व साप्ताहिक वर्ग होऊ झाले व विशाल संस्कारभारतीच्या रांगोळ्या दिसू लागल्या.

ही सामूहिक व संघटितपणे काढावयाची रांगोळी असल्यामुळे, तसेच ती लांब अंतराच्या व आकाराची असल्यामुळे ती काढण्यासाठीचे तंत्र हे उभे राहून व कमरेत वाकून पाच बोटातून रांगोळी सोडण्याच्या पध्दतीने विकसित झाले. यामुळे रांगोळी जलदगतीने काढता येऊ लागली, कित्येकांनी या रांगोळीचे नाव ‘जलदगती रांगोळी’ असेही ठेवले. यासाठीचे पावडर प्रकारातील विविध रंग, हळद, कुंकू, गुलाल आदींचा वापर चाळणीने चाळून केला जाऊ लागला. म्हणजे सुरुवातीला अपेक्षित डिझाइनचे मार्किंग करून त्यात रंग भरत जायचा व क्रमाक्रमाने पांढऱ्याशुभ्र रांगोळी पावडरने सांस्कृतिक प्रतिकांचे आकार काढून डिझाइन पूर्ण करायचे.

रांगोळीच्या शुभ चिन्हांच्या आकाराचे रेखाटन व त्यातील भाव, श्लोकाच्या रूपाने समजून घेतल्यास रांगोळी नुसती भौमितिक न राहता कला व संस्कृतीचे दर्शन घडवते.

उदाहरणादाखल पुण्यातील गणेशोत्सवातील मिरवणूक मार्गावरील पायघड्या, सोलापुरातील ८०० वर्षांची परंपरा असलेल्या श्री सिध्दरामेश्वराच्या गड्डा यात्रेतील नंदीध्वज अक्षता सोहळ्याच्या मिरवणूक मार्गावर गेली सतरा वर्षे सातत्याने तीन किमी अंतराच्या नयनरम्य व आकर्षक रांगोळीच्या पायघड्या २५० कलासाधकांकडून अंथरल्या जात आहेत. ग्वाल्हेर येथे झाशी राणी शताब्दी वर्षात तेथील विविध शाळांतील विद्यार्थ्यांना सोबत घेऊन रस्त्यावर रांगोळी पायघड्या साकारून २० फुटांचे झाशीचे राणीचे पोर्टेट रांगोळी रेखाटन करण्यात आले. ठाणे, मुंबई आदी शहरात गुढी पाडव्यासाठीच्या स्वागत मिरवणुकीत आवर्जून रांगोळ्या सातत्याने काढल्या जाऊ लागल्या.

भूअलंकरण ही अत्यंत मार्मिक व पवित्र भावना आहे, अशा चित्रांची (रांगोळीची) पूजा होत नसली तरी त्यात पूजाभाव जडला आहे. व्यक्तीबरोबर परिवार, परिवारासोबत समाज आणि वेगवेगळ्या समाजाबरोबर राष्ट्राचा उत्कर्ष, वैभव आणि मंगल कामना ठेवणारी कला आहे. संस्कृतीच्या एकतेचं प्रतीक आहे.
rn_creative@yahoo.co.in
( लेखक संस्कार भारती संस्थेत अखिल भारतीय भू-अलंकरण (रांगोळी) प्रमुख आहेत.)