आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सबसे बडा रूपया

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चांदीचे - धातूचे चलन म्हणून सुरू झालेल्या रुपयाचा प्रवास आज कागदाच्या नोटा, धनादेश, डिमांड ड्राफ्ट मार्फत ‘प्लॅस्टिक मनी’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या कार्ड‌्सपर्यंत येऊन ठेपला आहे. अशी व्यवस्था घातक की उपयुक्त ठरेल, यावर तज्ज्ञांचे मतभेद होतील; पण त्यातून रुपयाचे अस्तित्व केवळ संकल्पना पातळीवर, ‘व्हर्चुअल’ पातळीवर राहील, असे दिसते आहे.
जगभरात मानवी संस्कृती जसजशी विकसित होऊ लागली, त्याप्रमाणे दैनंदिन गरजा भागविताना वस्तुविनिमय हाच सहजीवनाचा आधार बनला. विकासाच्या प्रक्रियेत विनिमयातील वस्तूंची संख्या ज्या प्रमाणात वाढत गेली, त्या प्रमाणात वस्तुविनिमयाचा व्यवहार गुंतागुंतीचा होत गेला. म्हणून वस्तुविनिमयाला पर्याय म्हणून वस्तुनिरपेक्ष चलनविनिमयाला महत्त्व आले.

भारतात चलन किंवा पैसा नाण्याच्या स्वरूपात अगदी वेदकालापासून अस्तित्वात असल्याचे संदर्भ आहेत. वैदिक कालखंडानंतर बौद्ध आणि जैन या दोन अहिंसावादी दर्शनांच्या प्रभावामुळे युद्धातील हिंसा टाळून आर्थिक साम्राज्य ही कल्पना दृढ होऊ लागली. व्यापाराला राजाश्रय प्राप्त होऊन व्यापारउदीम तेजीत आला.
वस्तुविनिमयाची पारंपरिक भारतीय पद्धत जन्मावर आधारित जातीव्यवस्थेला बळकटी देणारी होती. ज्या कार्याचा मोबदला म्हणून वस्तू अथवा धान्य दिले जात असे, ते कार्य वर्णव्यवस्थेच्या आधारावर ठरलेले असे. त्यामुळे सामाजिक अर्थव्यवहारात चलनाचा-नाण्यांचा वापर वाढल्यामुळे सेवेचा मोबदला पैशाच्या रूपात रोख दिला जाऊ लागला, त्यातून वर्णव्यवस्थेवर आघात झाला.

सर्वसामान्य माणसांनी चलन म्हणून पैशांचा अथवा नाण्यांचा वापर हा मौर्य काळापासून मोठ्या प्रमाणावर सुरू झाला. कौटिल्याच्या काळात जी करवसुली होत असे, त्यात द्रव्य म्हणून मुद्रांचा समावेश आहे. सोन्याची ‘सुवर्णरूप’ चांदीची ‘रुप्यरूप’ आणि तांब्याची ‘ताम्ररूप’ या मुद्रांचा उल्लेख आहे. त्यात सोने दुर्मीळ असल्यामुळे ‘रुप्य’ हे चांदीचे नाणे सर्वात लोकप्रिय ठरले आणि यातूनच पुढे भारतीय चलनाला ‘रुपया’ हे नाव मिळाले! संस्कृत भाषेत ‘टंक’ म्हणजे पैसा, यावरून ‘टका’ हा शब्द रूढ झाला, जो रुपयाला समानार्थी शब्द म्हणून बंगाल, त्रिपुरा, आसाम या प्रदेशात आजही वापरला जातो. किंबहुना बांगलादेशचे चलनही ‘टका’ हेच आहे.
नाणी पाडणे जेवढे महत्त्वाचे होते, तेवढेच ती नाणी प्रचलित होणेदेखील महत्त्वाचे असते. एखाद्या शासकाने पाडलेली नाणी विनिमयासाठी स्वीकारली जाणे, हे त्या शासकाच्या विश्वासार्हतेवर तसंच राज्यव्यवस्थेवरील पकड किती भक्कम आहे, यावर ठरत असे. थोडक्यात, नाणी प्रचलित होण्यासाठी आवश्यक असते, ते राजकीय आणि सामाजिक स्थैर्य! मौर्य साम्राज्यानंतर गुप्त, सातवाहन, शक आदी राजघराणी सत्तेवर होती, तेव्हा त्यांची नाणी प्रचलित झाली. काही शासकांची नाणी केवळ प्रतिकात्मक होती. राज्यारोहणानंतर एखादी कालगणना सुरू करावी, तशी नाणीही काढली जात.
जी व्यवहारात प्रचलित होत नसत. हर्षवर्धननंतर देशात एकही मोठी सत्ता निर्माण होऊ शकली नाही. त्यामुळे त्यानंतर प्रचलित होतील, अशी नाणी निर्माण होऊ शकली नाहीत. त्यानंतर हे घडले थेट मुघल साम्राज्याच्या काळात!

‘रुपया’ या अधिकृत चलनाची सुरुवात शेरशहा सुरी याने १५४०च्या दरम्यान केली असली, तरीही हे चलन मोठ्या प्रमाणावर मुघल साम्राज्याच्या काळात सम्राट अकबराने प्रचलित केले. छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकानंतर ‘होन’ हे सोन्याचे आणि ‘शिवराई’ हे तांब्याचे नाणे वापरात आणले होते. नाणे ज्या राजाने पाडले, त्याच्या मुद्रेसोबतच राजाला आपले नाणे लोकप्रिय होण्यासाठी जनतेच्या आवडीनिवडी, श्रद्धा यांचा विचार करणे भाग पडत असे. अकबर, शहाजहान, औरंगजेब, हैदरअली, टिपू सुलतान या मुस्लिम शासकांनी काढलेल्या नाण्यावर ‘रामसीता’, ‘श्री’ आणि ‘स्वस्तिक’ अशी हिंदू चिन्हे आढळतात. शिवाजी महाराजांच्या काळात जेव्हा नाणी निघाली, तेव्हा त्यांनाही त्यावर मुसलमानी हरप ठेवावा लागला होता. इतकेच नव्हे, तर ईस्ट इंडिया कंपनीची अधिसत्ता सुरू झाल्यावर, त्यांनीही १७व्या शतकाच्या प्रारंभापासून नाणी काढण्यास सुरुवात केली. ही नाणी लोकांनी वापरावी म्हणून त्यावर हिंदू देवदेवतांची चित्रे कोरली होती.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या ‘रुपयाचा प्रश्न’ या ग्रंथात म्हणतात, ‘मुघलांच्या काळात भारत आर्थिकदृष्ट्या विकसित असा देश होता. त्या काळी व्यापार आणि पतपेढ्या यांची स्थिती अतिशय संपन्न होती. हिंदू राजांचा कल सोन्याची आणि तांब्याची नाणी पाडण्याकडे होता, मात्र मुस्लिम राजांनी चांदीच्या नाण्याचा वापर केला. त्या काळात अकबराने ‘मोहोर’ नावाचे सोन्याचे नाणे आणि ‘रुपया’ नावाचे चांदीचे नाणे प्रचलित केले.’
ब्रिटिश अधिपत्याखालील भारतात आधी बंगाल, मुंबई आणि मद्रास हे तीन प्रांत १८३३ पर्यंत स्वतःची स्वतंत्र नाणी पाडत असत. त्यातील अंतर्गत व्यवहारावर याचा विपरीत परिणाम होऊ लागला, म्हणून १८३३ पासून सर्व प्रांतासाठी ब्रिटिशांनी एकच रुपया हे चलन अस्तित्वात आणले आणि सोन्याची नाणी बंद करून टाकली.
पुढे कंपनीने १८६२मध्ये राणी व्हिक्टोरियाचे चित्र असणारे एक तोळ्याचे सोन्याचे नाणे प्रचलित केले. त्याला पुन्हा ‘मोहोर’ हेच नाव देऊन त्याचा विनियोग दर १ मोहोर म्हणजे १५ चांदीचे रुपये, असा ठरवला गेला! या दोन प्रमुख नाण्यांबरोबर चांदीचीच अर्धा रुपया, पाव रुपया आणि दोन आण्याची नाणी काढली. ‘मोहोर’ हे नाणे प्रचलित होऊ शकले नाही, ‘रुपया’ मात्र प्रचलित झाला. नव्हे, तो लोकप्रियदेखील झाला. ब्रिटिशांच्या तत्कालीन सर्वच वसाहतीत रुपया प्रचलित होऊन आज भारताबरोबर पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, नेपाळ, भूतान आदी देशांत रुपया हे चलन अस्तित्वात आहे.

कंपनीचे सरकार जाऊन प्रत्यक्ष ब्रिटिशांची सत्ता स्थिर झाल्यावर पूर्वीची धान्य स्वरूपातील सारा वसुली, पैशांच्या रूपात होऊ लागली, पगार पैशांच्या रूपात होऊ लागले आणि व्यापार वाढला. बदलत्या परिस्थितीत इंग्लंडला खंडणी म्हणून भारतातून पैशाची निर्यात होऊ लागली. चलनतुटवडा भासू लागला. पैशाचा पुरवठा वाढविण्यासाठी लोकांकडून चांदी घेऊन तिच्या बदल्यात रुपये देण्याची आणि बँकांना सोने, चांदी, रुपये ठेवून नोटा काढण्यासाठी परवानगी देण्यात आली. भारतात पूर्वी ‘बँक ऑफ हिंदुस्तान’ने कलकत्त्यात १७७०मध्ये पहिली नोट छापली होती. त्यानंतर विविध बँकांनी स्वतःच्या नोटा १८४३ पर्यंत छापल्या होत्या. पण त्याचे विनिमय-क्षेत्र मर्यादित होते.

भारतात सर्वांच्या वापरासाठी सर्वप्रथम कागदी चलन दहा रुपयाच्या नोटेच्या रूपाने ६ ऑगस्ट १८८१ला सुरू झाले. पण या नोटेलाही समाजात मागणी निर्माण झालीच नाही, कारण कित्येक नोकरदारांचे पगार दहा रुपयापेक्षा खूप कमी होते. फाळणीनंतर भारत आणि पाकिस्तान या दोन राष्ट्रांचे चलन स्वतंत्रपणे निर्धारित करण्याचे दोन्ही देशांनी ठरवले. मात्र पाकिस्तानने भारतीय नोट, त्यावर केवळ ‘पाकिस्तान सरकार’ असा शिक्का मारून अनेक काळ चलनात वापरली, पुढे त्यातून पाकिस्तानी रुपया हे चलन त्यांनी स्वीकारले.

भारताने स्वातंत्र्योत्तर काळात १९५०मध्ये नवीन नाणी काढली. नवीन नाण्याचे स्वरूप आणि दर पूर्वीप्रमाणेच होता, मात्र नवीन नाण्यात ब्रिटिश साम्राज्याची चिन्हे काढून भारतीय प्रतीके दर्शविण्यात आली. स्वातंत्र्यानंतर दशमान पद्धती स्वीकारून, चार पैसे म्हणजे एक आणा, असे मूल्य असणाऱ्या जुन्या पैशाऐवजी सव्वा सहा पैशाचा एक आणा, हे मूल्य असणारा नया पैसा अस्तित्वात आला आणि १०० नये पैसे म्हणजे १ रुपया, असे भारत सरकारचे अधिकृत चलन म्हणून रूढ झाले! तरीही फ्रेंच रुपया १९५४ पर्यंत, हैद्राबादी रुपया आणि त्रावणकोर रुपया १९५९ पर्यंत आणि पोर्तुगीज रुपया १९६१ पर्यंत चलनात होता, त्यानंतर ही चलने रद्द केली गेली.
जगभरातील चलनांना एक विशिष्ट चिन्ह असते, तसे चिन्ह रुपया या चलनास २०११मध्ये मिळाले, जे देवनागरी ‘र’ आणि रोमन ‘R’ यांचे एकत्रित रूप आहे.

अधिकृत चलन म्हणून केवळ १ रुपयाची नोट भारत सरकारकडून छापली जाते आणि त्यावर वित्त सचिव यांची स्वाक्षरी असते. एक रुपयाची नोट वगळता इतर सर्व नोटांवर रिझर्व बँकेच्या गव्हर्नरची स्वाक्षरी असते आणि या नोटांची छपाई, नियंत्रण आणि नियोजन हा संपूर्ण विषय १९३४मध्ये स्थापन झालेल्या रिझर्व बँकेच्या अखत्यारीत असतो. नोट म्हणजे, एका अर्थाने ती रिझर्व बँकेच्या गव्हर्नरने नोटेच्या किमतीएवढे रुपये देण्याचे वचन देणारी ती ‘वचनचिठ्ठी’ असते! भारतात आज एक, दोन, पाच, दहा, वीस, पन्नास, शंभर, पाचशे रुपयाच्या नोटा चलनात आहेत. नुकतेच रिझर्व बँकेने ९ नोव्हेंबर २०१६ रोजी दोन हजार रुपयांची नोट चलनात आणली असून १ हजार रुपयांची नोट रद्द ठरवली आहे.

चांदीचे - धातूचे चलन म्हणून सुरू झालेल्या रुपयाचा प्रवास आज कागदाच्या नोटा, धनादेश, डिमांड ड्राफ्ट मार्फत ‘प्लॅस्टिक मनी’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या कार्ड‌्सपर्यंत येऊन ठेपला आहे. भविष्यात ‘कॅशलेस’ व्यवस्थेचे स्वप्न देशाचे पंतप्रधान पाहात आहेत. अशी व्यवस्था घातक की उपयुक्त ठरेल, यावर तज्ज्ञांचे मतभेद होतील; पण त्यातून रुपयाचे अस्तित्व केवळ संकल्पना पातळीवर, ‘व्हर्चुअल’ पातळीवर राहील, असे दिसते आहे.

वस्तुविनिमयाची पारंपरिक भारतीय पद्धत जन्मावर आधारित जातीव्यवस्थेला बळकटी देणारी होती. त्यामुळे सामाजिक अर्थव्यवहारात चलनाचा-नाण्यांचा वापर वाढल्यामुळे सेवेचा मोबदला पैशाच्या रूपात रोख दिला जाऊ लागला, त्यातून वर्णव्यवस्थेवर आघात झाला.

राज कुलकर्णी
rajkulkarniji@gmail.com
बातम्या आणखी आहेत...