आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article By Raj Kulkarni In Rasik About Science And Its Interpretation About It

भाकड वारसा ( गाळीव इतिहास )

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतातील इतिहासात मानवी श्रमाच्या आणि प्रयत्नाच्या माहितीचा अभाव जाणवतो. म्हणूनच शोध-संशोधन आपल्याकडे दैवी स्वरूप प्राप्त करतात आणि आपसूकच अविश्वसनीय होऊन जातात.
जपान सरकारच्या सहकार्याने देशात बुलेट ट्रेन विकसित केली जाणार, या बातम्या झळकल्या. पण ज्या देशात प्राचीन काळातील तंत्रज्ञानांच्या आधारावर पुष्पक विमाने आकाशात भराऱ्या मारत होती, त्या देशाला बुलेट ट्रेनसाठी जपान तंत्रज्ञानाची गरज का भासावी, अशा आशयाचे एक फेसबुक स्टेटस माझ्या वाचण्यात आले होते. खरे तर पुष्पक विमान काय, किंवा गणपतीच्या सोंडेची प्लास्टिक सर्जरी काय, किंवा ‘महाभारता’तल्या संजयची दिव्यदृष्टी म्हणजे टेलिव्हिजन काय; या सुरस गोष्टी आजही ठरावीक समूहात खूप चर्चिल्या जातात आणि प्राचीन इतिहासातील आधुनिकतेच्या अभिमानाने अनेकांची छाती ५६ इंचांपेक्षाही जास्त फुगते.
विज्ञान आणि तंत्रज्ञान याचा उच्चार एकत्रित केला जात असला, तरीही तंत्रज्ञानाचा जन्म विज्ञानाच्या फार पूर्वी झालेला आहे. जगातील सर्वच संस्कृतींमध्ये विकसित झालेले विज्ञान हे अनुभवजन्य ज्ञानातून, निरीक्षणातून आणि मानवी संस्कृतीच्या विकासाच्या प्रक्रियेत आवश्यक असणाऱ्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विकसित झाले आहे. त्यामुळे प्रगतीचे प्रतीक म्हणून दिसणारी मोठमोठी स्थापत्ये आज प्राचीन तंत्रज्ञानाची साक्ष देत असली, तरीही भारतात मूलभूत विज्ञान, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि संशोधनाचा पाया, हा मुख्यत: ब्रिटिश काळातच घातला गेला आणि त्यानंतर स्वतंत्र भारतात तो पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या कालखंडात अधिक विकसित केला गेला, ही वस्तुस्थिती आहे.

खगोल भौतिक शास्त्रामध्ये अतुलनीय कार्य करणारे आर्यभट्ट, भास्कराचार्य हे मोठे गणिती आणि संशोधक. परंतु, त्यांनी फलज्योतिष अध्ययनात गणित स्कंधाचा वापर करूनही ते शुद्ध गणितीय विज्ञान समाजात रुजवू शकले नाहीत. भारतात अनेक महान विद्वान, पंडित असूनही मूलभूत विज्ञानाची मात्र उपेक्षा होत राहिली. भास्कराचार्य महान गणिती; परंतु स्वतःच्या मुलीच्या जन्मकुंडलीत असलेले वैधव्य टाळण्यासाठी योग्य मुहूर्त शोधत बसले आणि यातून गणितापेक्षा कुंडली आणि राशीफळ महान ठरवले गेले. रामानुजसारखे थोर गणिती परदेशात गेल्यावर सतत विटाळ होऊ लागला म्हणून स्नान करून विषमज्वराने निधन पावले. मूलभूत विज्ञानाची परवड होण्याचे मूळ कारण या अवैज्ञानिक वृत्तीत आहे. आजही स्वतःला मोठे शास्त्रज्ञ म्हणवून घेणारे कोण्यातरी बुवा-बाबाच्या किंवा देवतेच्या पायाशी लीन होताना दिसतात. मुलाच्या लग्नाच्या वेळी पत्रिका पाहात बसतात, तेव्हा ती कोणती प्राचीन भारतीय वैज्ञानिक परंपरा असते? प्राचीन परंपरेतील ज्या बाबी विज्ञानाच्या कसोटीवर टिकत नाहीत, त्यांचा त्याग करण्यापेक्षा त्यांनाच विज्ञान ठरविण्याचा अट्टाहास केला जातो, आणि त्यातून अशा सुरस कथांचा जन्म होतो.

युरोपात प्रस्थापित निसर्ग व्यवहार आणि त्यामधील सातत्य यांची वैज्ञानिक उकल करणाऱ्या विचारवंतांची, संशोधकांची अॅरिस्टॉटलपासून आईनस्टाइनपर्यंत एक सशक्त साखळी आहे. तशी ती भारतात नाही, हे खेदाने मान्य करावे लागते. भारतात प्रस्थापित ज्ञानाच्या विरोधात बंड करणारे, हे कोणत्या न कोणत्या धर्माचे संस्थापक होऊन बसले असल्याचे चित्र दिसते. एक चार्वाक सोडला, तर मूलभूत विज्ञानाची कास धरून मानवी समाजातील व्यवहारांची, धार्मिक बाबींची चिकित्सा इतर कोणीही केली नाही. चरक, सुश्रुत या संशोधकांनी वनस्पतींचे वैद्यकीय गुणधर्म अभ्यासून लक्षणांच्या आधारावर अनुभवजन्य ज्ञानाधारे विकसित केलेली उपचार पद्धती जगात मान्य झाली. परंतु वैज्ञानिक दृष्टिकोन, मूलभूत विज्ञानाचे संशोधन आणि अध्ययन हे विषय उपेक्षितच राहिले.

युरोपात किंवा अमेरिकेत विमानाचा शोध लागण्यापूर्वी वाफेचे इंजिन, आगगाडी, वाहने यांचा शोध लागला आणि संशोधन विकसित होत होत विमान, पुढे अग्निबाण आणि त्यानंतर अंतराळयान यांचे शोध लागले. भारतात थेट पुष्पक विमान असल्याचे वाचायला मिळते; मात्र त्यापूर्वीच्या कोणत्याही शोधाचा एकही पुरावा आढळून येत नाही. भारतातील इतिहासात या मानवी श्रमाच्या आणि प्रयत्नाच्या माहितीचा अभाव जाणवतो, म्हणूनच असे शोध आपल्याकडे दैवी स्वरूप प्राप्त करतात आणि आपसूकच अविश्वसनीय होऊन जातात. प्राचीन काळी मानवी जीवन सुखकर करण्यासाठी मानवाने त्याच्यासमोर उपलब्ध साधनांचा वापर करून अनुभवातून तंत्र आणि कला विकसित केल्या. हे भारतातच घडले असे नव्हे; चीनमध्ये, इजिप्तमध्ये सर्वत्र असाच अनुभव आहे. या तंत्रज्ञानाचा हेतू हा मानवी जीवन अधिकाधिक सुखकर बनविणे हा होता, आणि मानवाने त्याच्या श्रमावर, त्याला उपलब्ध असणाऱ्या साधनांच्या आधारे हे ध्येय गाठले. प्राचीन भारतात प्लास्टिक सर्जरी, खगोल गणित, पुष्पक विमान, अणुऊर्जा असे प्रगत विज्ञान अस्तित्वात होते, असे मान्य केले तर जात, धर्म, अस्पृश्यतेसारख्या अवैज्ञानिक गोष्टी समाजामध्ये हजारो वर्षांपासून आजपर्यंत का टिकून राहिल्या, याचे उत्तर प्राचीन भारतीय विज्ञानाचे समर्थक देऊ शकतील काय? विदेशात अंधश्रद्धा आणि अवैज्ञानिक गोष्टी नाहीत, असे नव्हे; पण निदान आपण विज्ञान युगात आहोत, याची जाणीव तरी त्यांना आहे. आज युरोप, अमेरिका या राष्ट्रांत आम्ही फक्त विज्ञानावर विश्वास ठेवतो, असे अभिमानाने सांगणाऱ्या लोकांची सख्या वाढत असताना, भारतीय उपखंडात मात्र धार्मिक तत्त्वज्ञानावर आधारित विचारांचा प्रभाव वाढताना दिसत आहे.

कोणत्याही वैज्ञानिक शोधाचे व्यावहारिक विनिमय मूल्य असते, एडिसनला विजेचा बल्ब तयार करण्यास आयुष्य खर्चावे लागले, परंतु त्याच्या त्या श्रमाचे, आजचे विनिमय मूल्य केवळ दहा ते वीस रुपये एवढे असते. प्राचीन भारतातील पुष्पक विमाने केवळ दैवी पुरुषांसाठी होती, सर्वसामान्य लोकांना त्याचा व्यवहारात काहीच उपयोग नव्हता, असे असेल तर त्यास वैज्ञानिक शोध म्हणता येईल काय? सर्वसामान्य लोकांसाठी अशी विमाने उपयोगात आली तीही त्यांना सदेह वैकुंठाला घेऊन जाण्यासाठीच! भारतातील ज्येष्ठ वैज्ञानिक जयंत नारळीकर त्यांच्या ‘विज्ञान गंगेची अवखळ वळणे’ या पुस्तकात म्हणतात, ‘आपल्याकडे ज्या कालखंडात ताजमहाल बांधला गेला, त्याच काळात लंडनमध्ये सेंट पॉल कॅथेड्रलची निर्मिती झाली. दोन्ही वास्तुकलेचे महान नमुने म्हणून प्रसिद्ध आहेत, पण युरोपात न्यूटन निर्माण झाला, तसा भारतात झाला नाही. युरोपीय राजघराण्यांनी वैज्ञानिकांना आश्रय दिला; परंतु संगीत, साहित्य, कला यांना आश्रय देणाऱ्या भारतीय राजे-महाराजांनी विज्ञानाबद्दल थोडीही आस्था दाखवली नाही.’ यात अपवाद केवळ जंतर मंतर उभारणाऱ्या जयपूर येथील राजघराण्याचा. मात्र त्यांनाही तिथी, नक्षत्र यांच्या खगोल गणिताच्या अभ्यासात योग, करण आणि वार मिसळण्याचा मोह आवरला नाही. जंतर मंतर वेधशाळा बांधण्यात आली, ही सकारात्मक बाब आहे; मात्र हे करत असताना ग्रहशांतीसारखे विधी त्यांनीही केले आणि राशीफल, ज्योतिष, भविष्य कथन यांसारख्या बाबींना राजाश्रय मिळवून दिला. सतराव्या शतकात संशोधक ला प्लास याने ग्रहांच्या परिभ्रमणाचे अध्ययन करून ‘मेकॅनिक सेलेस्टियाला’ हा ग्रंथ लिहिला, आणि तो वाचायला नेपोलियनला दिला. तो ग्रंथ वाचून नेपोलियन म्हणाला, ‘या ग्रंथात परमेश्वराचा कुठेच उल्लेख नाही?’ ला प्लास म्हणाला, ‘मला ग्रहाच्या परिभ्रमणाचे विश्लेषण करण्यासाठी त्याची कुठेच गरज भासली नाही.’ भारतात शुद्ध विज्ञानाचा आणि वस्तुनिष्ठ इतिहासाचा अभाव जाणवतो, कारण समाजात प्रचलित बाबींची वैज्ञानिक चिकित्सा कोणीही केली नाही आणि दैवी प्रभावापासून मुक्त असे संशोधन म्हणजेच मूलभूत विज्ञान पुरेशा सामर्थ्याने विकसित होऊ शकले नाही...

rajkulkarniji@gmail.com