आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॅनव्हास: चांदईचं 'कैलास'लेणं!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
त्याचं गाव चांदई. घर शेतकरी कलावंतांचं. त्याच्यावर प्रभाव अस्सल मातीतून उगवणाऱ्या जगण्याचा. तो उत्तम वक्ता-गायक-कथाकार-अभिनेता-कवीसुद्धा. याच गुणांच्या बळावर तो आपलं क्षितिज विस्तारतोय. चांदईलाही मोठं करतोय...
हॅलो, मी चांदईवरून बोलतोय... अरे कोणती चांदई? दादा, चांदई कैलास... तसं चांदईचं कालपर्यंतचं नाव चांदई महादेवाची. पण कैलास वाघमारे या पोरानं गावाची नवी ओळखच बनवली... शेक्सपिअर म्हणतो, नावात काय आहे? पण, हा नियम त्यांच्या देशात. आपल्याकडं कार्यक्रमपत्रिकेवर नुस्ती नावाची क्रमवारी जरी बदलली, तरी नव्या छापाव्या लागतात. कैलासने तर नवी ओळखच दिली. आता गाव अभिमानानं कैलासचं नावं घ्यायला लागलंय...
अभिनय क्षेत्रात मानाच्या स्थानावर विराजमान होऊ पाहणारा कैलास वाघमारे. ‘शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला’ या नाटकाने सर्वदूर पोहोचलेला आणि खऱ्या अर्थाने नाटकं पोहोचवणाराही. ‘मनातल्या उन्हात’ या चित्रपटाने पडद्यावर मुख्य नायकाच्या भूमिकेत गाजलेला कैलास, तसा अचानक उगवलेला नाही. एरवी, मुंबईत येऊन उंबरठे झिजविले तरच आपल्या लेखी तो स्ट्रगल. जसा वाढदिवस साजरा करताना, आपण आईच्या उदरातून बाहेर आल्याशिवाय वय काऊंटच करत नाही, तसंच काहीसं. पण त्या आधीही नऊ महिने अंकुर असतोच, हेच आपण विसरतो. तसंच काहीसं हे. कैलास अंकुरला, जेव्हा त्याच्या वडिलांनी त्याच्या छोट्याछोट्या हातात, बँडमध्ये खुळखुळे दिले. भाकरीबरोबर कलाही त्याला वारशातच मिळाली. तुम्ही ज्याला स्ट्रगल समजता, त्याला तो जगण्यातला संघर्ष म्हणतो. कलेचा वारसा घरातून जरी लाभला, तरी तो दारातच घुटमळला नाही. शाळा-कॉलेजमधून वेगवेगळ्या पीठावर त्याचं दणक्यात सादरीकरण होऊ लागलं, ते त्याच्या चहू अंगी नेतृत्वामुळे. हा उत्तम वक्ता, उत्तम गायक, कथाकार, अभिनेता, कवी. त्यानं त्याची कविता ‘मन पाऊस पाऊस पाऊस... आणि पावसा... पावसा... थोडं थांबून ये... कधी येशिल ते... जरा सांगून ये...’ म्हणताच महाराष्ट्रभर जाईल तिथे त्याच्यावर बक्षिसांचा बारमाही पाऊस व्हायचा. त्याच्या या कथाकथन व कवितेच्या ओलाव्यात मनं चिंब तर झालीच, पण हाडाचा शेतकरी असलेल्या कैलासने महाराष्ट्रभर माणसंही पेरली. आता अख्ख्या महाराष्ट्राच्या शिवारभर मैत्रीचं पीक डोलताना दिसतंय. असं एकही शहर-गाव नसेल, जिथे कैलासचे मित्र नाहीत. त्याला कारण त्याच्यातली माणुसकी!

आपल्याकडे एक प्रघात पडलाय, विक्षिप्त म्हणजे कलावंत. मोजकीच बुद्धी असणारांनी ही गोष्ट हेरली व त्यांनी कला जोपासण्यापेक्षा सरावानं विक्षिप्तपणाच जोपासला. तोच पायंडा पडला. त्यामुळे कलावंत चांगला माणूस असावा लागतो, याकडे कुणी लक्षच दिलं नाही. मग माणुसकीची शिकवण आणायची कोठून? पण ती कैलासकडे आहे. या प्रेमाची शिकवण त्याला कुठल्या ग्रंथानं वा कुठल्या शाळेतून मिळाली नाही, तर हा वारसा त्याला त्याच्या आईकडूनच मिळाला, हे आपण त्याच्या घरी गेलं की लक्षात येईल. ज्यानं आयुष्यात आईच अनुभवली नाही, त्याला जर आई पाहायची असेल तर त्यानं कैलासच्या घरी जावं.

त्या माउलीचे हात जेव्हा तुमच्या चेहऱ्यावरून फिरतात, तेव्हा पांग फिटतो. म्हणून त्याच्यातल्या कलावंतामध्ये जो उदारपणा पाझरलाय, तो स्वभावच त्याला सुनील शानबागसारख्या शहरी दिग्दर्शकाच्या ‘लोरेटा’ या इंग्रजी नाटकातही चपखल बसवतो, जेवढा नंदू माधवांच्या अस्सल मराठवाडी ‘शिवाजी’मध्ये. तेव्हा त्याचं ‘लोकल टु ग्लोबल’ पण लक्षात येतं. सूर-पारंब्यासारखा आवडता खेळ खेळता खेळता, घरच्या ढोरामागं फिरता फिरता, उघड्या माळरानावर मोकळ्या गळ्यानं गाणं गात गात गळा कमावलेल्या कैलासला एम. ए. मराठी झाल्यानं तिन्ही भाषा उत्तम येतात. त्याला वाचनाची खूप आवड. नामदेव ढसाळ, बाबुराव बागुल, शंकर पाटील, राहुल सांस्कृतायन, महाश्वेता देवी, भालचंद्र नेमाडे वाचायला आणि नसिरुद्दीन शाह, ओम पुरी, नवाजुद्दीन सिद्दिकी पाहायला आवडतात. खायला नाही, पण खाण्यापेक्षा खाऊ घालायला खूप आवडतं. कोंबडं, बकरू, तितरं, लाव्हरं... त्याच्या घरी गेलं, की पोट माहेराला जातं. त्यात प्रकाशभाऊ म्हणजे, पाहुणचार. आजच्या काळात भाऊ म्हणजे काय असतो, हे समजून घ्यायचं असेल तर प्रकाशकडे पाहावं. कैलासला मुंबईत उभं राहण्याचं बळ त्यानं चांदईतून दिलं.
खरं तर कैलासला प्राध्यापक व्हायचं होतं. पण गावातल्या जातीवादी भांडणाची त्याला उबग आली म्हणून तो मुंबईला गेला. जाताना एकटा नाही तर थव्यानं गेला. कैलास, मिनाक्षी राठोड, माया, वैशाली दाभाडे तिथं त्यानं मुंबई विद्यापीठाच्या थिएटर अकादमीत प्रवेश मिळवला. वामन केंद्रे सरांच्या तालमीत घडला. मराठवाडी माणसं माळरानावरच्या काटाळ झुडपासारखी तगदार असतात. ती अवर्षणाला भीत नाहीत. टिकून राहतात. नंदू माधव, चंद्रकांत कुलकर्णी, मकरंद अनासपुरे आणि अशी उदाहरणं होती त्यांच्यासमोर. उत्तम गळा, अभिनयजाण, सामाजिक भान असणाऱ्या कैलासने कामंही तशीच केली. ‘वुई आर रिस्पाॅन्सिबल’ ही शॉर्ट-फिल्मही शेतकऱ्यांच्या वेदना जगभर घेऊन गेली. अादिवासींचं जगणं मांडणाऱ्या संदेश भंडारेच्या ‘म्हादू-एक मिथक’मधील परिस्थितीवर मिश्कील भाष्य करणारा जनार्दन काय वठवलाय त्याने. ‘हाफ तिकीट’मधील पोत्यादादा, चंद्रकांत कुलकर्णींच्या दिग्दर्शनात ‘तुकाराम’मध्येे त्यानं काम केलं. याचबरोबर सुमित्रा भावेंच्या मालिकेत व सिनेमातही तो दिसला. त्याच्याच लेखणीतून साकारलेली ‘सायकल’ ही शॉर्ट-फिल्मसुद्धा जीवनाचं सुंदर चित्र आहे.

तो गाव सोडून गेला पण नाळ तोडून नाही, याचा हा पुरावा. त्याच्या लेखनाला खजिनाही मातीतच सापडतो. तो नवं जगायला गावाकडेच येतो. एखाद्या दिग्दर्शकाला आयुष्यभर पुरतील एवढ्या कथा आहेत, त्याच्याकडे. तो लवकरच हिंदीतही दिसणार आपल्याला. त्याचं काम चांदईला मुंबईशी आणि माणसाला कर्तृत्वाशी जोडायला निघालंय. म्हणूनच आज त्याचं गाव ‘शिवाजी अंडरग्राऊंड’ आणि ‘मनातल्या उन्हात’ पाहायला जिपा-टेम्पो-रिक्षा-गाड्या घेऊन उलथतंय. जणू काही वऱ्हाड निघावं. म्हणूनच दुष्काळी जिल्हा, मागास जिल्हा, श्रीमंताचं शहर आणि गरिबांचा जिल्हा, अशी ओळख असलेल्या जालना जिल्ह्याची कैलास वाघमारेचा जिल्हा, अशी ओळख उदयाला येवो, ही अपेक्षा गैर ठरू नये.
राजकुमार तांगडे
rajkumar.tangade@gmail.com
बातम्या आणखी आहेत...