आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article By Samidha Pathak About Social Condition

असाही एक दिवस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रोजीरोटीसाठी दिवसरात्र एक करणारे कित्येक जण आपल्या आजूबाजूला दिसत असतात. त्यांच्या नशिबी आलेली ही फरपट आपण थोडी कमी करू शकतो का? निदान एकदा तरी त्यांना पोटभर जेवू घालू शकतो?

नुकतीच एका परिसंवादाकरिता बेळगावला गेले होते. विषय फारच नाजूक होता. स्त्री रोजगार आणि समाज. अगदी जबरदस्त चर्चा झाली. रात्री सर्वांच्या भेटी घेता घेता बराच उशीर झाला. परतीच्या प्रवासात निपाणीला एकेठिकाणी जेवून लाॅजवर निघालो होतो. रात्री दीडचा सुमार होता.

तेवढ्यात एक महिला एकटीच अनवाणी पायी चालताना दिसली. मी गाडी थांबवली. चकवा, भुताटकी यातला तर काही भाग नाही ना, असा संंशय वाटला. पण हे सर्व थोंताड असतं अशी मनाची समजूत घातली. गाडी थांबवून तिच्याशी बोलू लागलो. ती कावरीबावरी झाली. तिला शांत केलं व आमच्या बरोबर हॉटेलवर चलायचा आग्रह धरला. प्रथम तिनं नाकारलं, पण लागलीच तयार झाली. तिच्या चर्येवरून मी हेरलं की, ती उपाशी आहे. तेवढ्या रात्री दोसा अॉर्डर केला. तिनं अगदी आवडीनं खाल्ला.
“आणखी काही हवंय?”
“नाही जी, धन्यवाद, लय उपकार हाय तुमचे.”
“अगं उपकार कसले, कर्तव्य समज. बरं असो. तुझं नाव नाही सांगणार?”
“शीला.”
“शीला, एक विचारू?”
“इचारा की.”
“तू एवढ्या रात्री कुठं गेली होतीस?”
“विडी कारखान्याले.”
“इतक्या रात्री?”
“व्हय जी, दिवसा आठले जातो, ते रातले एकलेच घरला येतो.”
“अगं, पण तू एकटीच जातेस?”
“नाय जी. रोज माझ्या समदं बहुत बाया असतात, पर आज मले थोडा उशीर झाला. धाकलं लेकरू लयी रडत व्हतं, मून बबल्या त्याले घेऊन आलता.त्यासनी पाजलं अन् उगी केलं, मून हजार इड्या वलायले उशीर झाला. पैकं भेटलं नसतं तर उद्या चूल कशी पेटली असती?”
हे बोलताच शीला गंभीर झाली.
“किती पैसे देतात तुला?”
“हजार इड्यांचे चार रुपये ऐंंशी पैसे.”
“फक्त? अगं काय होतं त्यात?”
“काय व्हत असनं जी तुम्हीच विचार करा, कधी तेल हाय तर मीठ नाय, अशी आमची गत.”
“तुझा दिनक्रम कसा आहे?”
“पहाटे पाचले उठायचं, मंग पानी हापसायचं, स्वयंपाक करायचा, शिदोरी बांधायची, लेकाले पाजायचं अन् हातात भाकरीचा तुकडा घेऊन आठच्या ठोक्याला कारखान्यात हजर व्हायचं. जरा बी उशीर व्हता कामा न्हाय.”
“पण तिथं जाऊनच का नाही खात?”
“मालक बरा खाऊ दिल, त्याचं काम नाही का कमी पडणार? इथं कुत्रं तरी थांबून भाकरी खातं, पर आमच्या नशिबी ते बी नाय.”
“घरी कोणकोण असतं?”
“म्या, नवरा, तीन पोरं नि सासरा. सासरा क्षयरोगानं आजारी हाय.”
“पण मग तुम्ही दुसरं काम का नाही करत? म्हणजे मोलमजुरी वगैरे?”
“जो या धंद्यात पडला, त्याले हाडाचं काम झेपत नाय जी. रातले बी कंदील लावून काम केल्यानं, दृष्टी कमजोर व्हते. आमचा दिस रोजचा असाच. सुट्टी नाही न् सण बी नाय.”
“कामही फार किचकट असेल ना?”
“अवं काय सांगू, जर्दा कमी- जास्त व्हता कामा नाय, जेवढा दिला असतो तेवढाच पुरवायला हवा. भल्या पहाटे पानं आनावी लागतात. तीबी एक कलाच हाय जी.”
“अगं शीला, तुमचं आयुष्य हीच मोठी कसरत आहे. खरंच तुमची कमाल आहे.” म्हणत मी तिच्या हाती धनादेश ठेवला. तिच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले.
“लय उपकार हाय तुमचे जी. म्या तुमचं ऋण कसं नि कंदी फेडू हे समजत न्हाय.”
“अगं शीला, हे काही ऋण वगैरे फेडायची गरज नाही. हे माझंं कर्तव्य आहे आणि मला ते निभवायला हवं. तुझ्या मुलांना शिकव आणि खूप मोठं कर.”
“व्हय जी. मले ठाव होतं की ज्येनं आभाल हुबं केलं त्यानं पंखं बी दिले.”
केवढं सखोल तिचं तत्त्वज्ञान! मी विचारात गढून गेले. रात्र सरली.
“मले घरले सोडता का जी? लय उशीर व्हील मले पायी जायले.”
“अगं हो, त्यात काय, चल निघूया.”
शेजारी शीला गुणगुणत होती. माझ्या डोक्यात कैक विचार थैमान घालीत होते.
आपण रोजचं आयुष्य किती तणावात जगतो. भारतात ही पीडा सोसणारे कित्येक नागरिक असतील. एक सुशिक्षित व जबाबदार नागरिक म्हणून अशा एका व्यक्तीला आपण दत्तक घ्यायला हवं. नुसती आर्थिकच नव्हे, तर सर्वार्थाने. तेव्हाच ‘अच्छे दिन’ येतील.