आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्‍ट्रातील माझ्या तमाम बांधवांनो!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महाराष्ट्राला सभेतल्या वक्तृत्वाची फार दांडगी आणि देखणी परंपरा आहे. विशेषतः पुण्या-मुंबईतली उन्हाळी व्याख्यानं ज्यादा फेमस आहेत. साहित्यिक, कलाकार आणि राजकारणी यांचे बोल म्हटले की, आपोआपच जनतेच्या मनात थोडंसं लाडिक कौतुक आधीच तयार झालेलं असतं. या तिन्ही धंद्यांना सोडून वेगळ्या धंद्याचा कुणी इसम बोलायला लागला, की त्याबाबत असले कुतूहल वगैरे काही निर्माण होत नसल्याने, त्याच्या वक्तृत्वाची सरळसोट नीटच चिरफाड होऊन योग्य ती वासलात लावली जाते. पण या राजकारणी लोकांबाबत समर्थक आणि विरोधक अशा दोन्ही पातळीवरील टोळ्या तीव्र कार्यरत असल्याने आम जनतेची जरा गोची होते. निवडणूक म्हणजे लढाईच! आणि लढाई म्हटले की शस्त्रे आलीच. या निवडणुकीच्या काळात इमोशनल वेपन्सचा सर्रास वापर करून मूळ मुद्दे बाजूला ठेवत जनतेचा भावनिक कत्ल करण्याचे काम महाराष्ट्रात सध्या जोरदार चालू आहे.
बाळासाहेब ठाकरे मराठी माणसाच्या मनातली अस्सल भावना, अस्सल भाषेत बोलून सभा जिंकत. आणि म्हणून ते लोकांना आणि लोक त्यांना अपील होत. शरद पवार नागरी, ग्रामीण दोन्ही मने जिंकणारे वक्तृत्व करतात. भाजपात सध्या महाराष्ट्रापुरते बोलायचे झाले तर काहीच सकस वक्तृत्व राहिलेले नाही. आधी दिवगंत गोपीनाथ मुंडे व प्रमोद महाजन होते, आता ग्रामीण महाराष्ट्र आणि संघपरिवार यांची नाळ जोडणारा जोरकस ताकदीचा थेट दुवा महाराष्ट्रात उरलेला नाही. पण आता याबाबतची विशेष काळजी करण्याचे काही कारण नाही. लोकांच्या भावनेला हात घालत, हास्याचे हलके फवारे उडवत, कालपरवाच्या सिंधुदुर्ग आणि गोंदियातल्या निवडणूक प्रचारसभेत भाजपाचे केंद्रीय मंत्री गडकरी बप्पा बोलले, “थोडंसं चेह-यावरून भविष्य जाणण्याची कला मला अवगत आहे. पत्रकार बंधूंचे चेहरेही मी बघितले. येत्या दहा-बारा दिवसांत आपल्या सर्वांना लक्ष्मी दर्शनाचा योग आहे. पॅकेज... पत्रकारांचं वेगळं, वर्तमानपत्रांचं वेगळं, संपादकांचं वेगळं, मालकांचं वेगळं... सगळे भिडून आहेत...बाप का माल है... जितना लूटना है लूटो...” पुढे अंधाराची सवय झालेल्या आदिवासी बांधवांची रेवडी उडवताना ते म्हणाले, “सोनियाजी आयी है, नयी रोशनी लायी है... कुठे आहे रोशनी? इथे तर भारनियमन. अंधेरी रात मे दिया तुम्हारे हाथ मे...” वगैरे वगैरे...
थेट लोकांच्या भावनेला हात घालणारे भाषण !
नंतर सर्वात जास्त कौतुक करावेसे वाटते ते पंकजा पालवे-मुंडे यांचे. राजकारणात तशा त्या अगदी नवख्या असूनसुद्धा भावनिक भाषण करून सबंध भगवानगड त्यांनी हलवून टाकला. “गोरगरीब, अडाणी, फाटक्या लोकांच्या डोळ्यांत मला मुंडेसाहेब दिसताहेत. माझी लढाई नियतीशी आहे. मी आकाशात पाहताना ढग दिसला तरी बाबा आठवतात. मला त्यांचे स्वप्न साकार करायचे आहे...” वगैरे वगैरे... २६ कोटीची मालमत्ता असणा-या पंकजाताई आणि ८८ कोटींची मालमत्ता असणा-या प्रीतमताई यांना त्यांच्या दिवंगत बाबांचे स्वप्न साकार करणे फार कठीण गोष्ट नाही. त्यांचे स्वप्न नेमके काय होते, हे मात्र भाषणात त्यांनी अद्याप सांगितलेले नाही. गोरगरीब फाटक्या जनतेचे स्वप्न साकार करणे वा काय स्वप्ने आहेत याचा विचार करणे, ही तशी भाजपासाठी असंबंध गोष्ट आहे. मराठवाड्याचे दिवंगत नेते प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांनी इतकी वर्षं जिल्ह्यावर पकड ठेवूनदेखील तिथला काय आणि कशाचा विकास केला, हा प्रश्नच खुबीने पडू न देण्याची ताकद या भावनिक भाषणामध्ये आहे. मुंडेसाहेबांच्या भाषणाची क्लिप ऐकून रडणा-या बायाबापड्यांकडे पाहून सीट फिक्स झाल्याच्या खात्रीने केंद्रीय नेतृत्व रवाना झाले. भाजपचा शंभर दिवसांचा प्रवास हा असा निव्वळ चमकोगिरीने भारून टाकलेला आहे. महाराष्ट्रात पुन्हा येरे माझ्या मागल्या, याशिवाय ते करणार काय?
दुसरीकडे नवनिर्माणकार राज ठाकरे आता मोदींवर ज्याम चिडलेत. यांच्या भाषणाची तऱ्हा म्हणजे ते स्वतः जेम्स बाँड आणि बाकी सब ‘शोले’मधले कालिया. त्यांचे तासाभराचे भाषण पेपरवाले एका प्यारेग्राफमध्ये बसवतात. आता बोला! यांच्या इंजिनाला ट्रायल अँड एरर बेसिसवर नाशिकच्या रोडवर धावण्याची संधी नाशिककरांनी दिली. हे स्टार माझा कट्ट्यावर गेले. उद्योजकांना काय सवलती देणार? या प्रश्नावर बाहेरच्या राज्याच्या तुलनेत ज्यादा देणार, असे म्हणाले. पण काय सवलती देणार, त्या सवलती सांगितल्या नाहीत. प्रश्न विचारणारा परेशान! चिकन सूप-तेलकट वडा आख्यान किंवा मग रामदास, नाथाभौ वा जमतील तेवढ्या नेतेमंडळींचे आवाज आणि एकूण रंगतदार भाषण! इथले दलित आदिवासी भटके भुकेले यांच्या रडारवर या जन्मात तरी येणार नाहीत. पोलिस आणि रेल्वेत जाऊ पाहणारा मुंबईतला मराठी मुलगा म्हणजेच मराठी मुलांचे प्रश्न!
रामदास आठवलेंवर कुणी नाराज होऊच नये. ते या रुक्ष राजकारणातले ओअ‍ॅसिस आहेत. निव्वळ विरंगुळ्याचे मौलिक क्षण! मला मंत्री कधी करणार? या प्रश्नाशिवाय त्यांना महाराष्ट्र सोडा; स्वसमाजाचेसुद्धा काही प्रश्न पडत नाहीत. एकूण निवडणूक प्रचारात सध्या इमोशनल वेपन्स चढाओढीने वापरणे चालू आहे. आता तुटलेली युती आणि आघाडी यांच्या टीकास्पद प्रचाराचे रोख पहिले तर हे भावी आघाडी युती व सत्तेची संधी यांचा विचार करून धोरणाने पावले टाकताना दिसत आहेत. सिंचन घोटाळा यावर सेना बोलतेय. आणि भाजप मिठाची गुळणी धरून आहे. चिरपरिचित धरणात मुतू का? या दादांच्या सवालाला सेना-मनसेना उचलून धरतेय. भाजप हे विसरली. उद्या राष्ट्रवादी भाजप आघाडी झालीच तर तसे काही आपल्याला विशेष वाटायला नको.
मुळात पवार साहेबांचे धोरण पाहता, राष्ट्रवादी काँग्रेसने अ. भा. काँग्रेस पक्षाशी केलेली आघाडी ही सत्तावाटपाच्या व्यावहारिक तडजोडीवरच आधारलेली होती. तिला कोणताही तात्त्विक आधार नाही. (राष्ट्रवादीत तात्त्विक आधार शोधणे हे तसे चुकीचेच आहे म्हणा) पवार सायबांची व्यक्तिगत तमन्ना काँग्रेस पक्षात पूर्ण होत नसल्यानं त्यांनी सोनिया गांधींच्या विदेशीपणाचे निमित्त दाखवून पक्ष काढला. राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापनाच मुळात वैयक्तिक महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी झालेली असल्यामुळे या पक्षामध्ये अशाच प्रकारच्या लोकांचा गोतावळा जमला. खतरनाक इच्छेने झपाटलेले लोक कोणत्याही परंपरा, कायदे-कानू, नियम इत्यादींना फार थारा देत नाहीत. स्वतःच्या तुमड्या भरणे हा राष्ट्रवादीच्या राजकारणाचा मुख्य पाया असल्यामुळे या पक्षाने काँग्रेस पक्षाशी युती करून मिळविलेल्या सत्तेचा वापर आपल्या लेकी-पुतण्यांचे, मुलाबाळांचे, आणि आपल्या चेल्या-चपाट्यांचे आर्थिक हित जपण्यासाठी केला. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मंत्रिपद भूषविलेल्या नेत्यांच्या संपत्तीमध्ये मागील दशकभरात झालेली प्रचंड वाढ पाहिली तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी महाराष्ट्राच्या तिजोरीची कशी लूट केली, हे दिसून येईल.
पण यावर फार काही न बोलता विरोधी पक्ष निव्वळ फोकस दुसरीकडे करून आहे. महाराष्ट्रातल्या दलित हत्या, आणि तरुणांच्या बेरोजगारीचे प्रश्न यावर कोणती ठोस उपाययोजना कुठल्या पक्षाकडे आहे? भरमसाठ शैक्षणिक संस्था असलेला राष्ट्रवादी पक्ष इथले शिक्षण किती स्वस्त करू शकला आहे? हा विचारात घेण्याजोगा प्रश्न.
अठरापगड जातींना राजकारणात नेतृत्व देणा-या शिवसेनेने कट्टर हिंदुत्व जरा बाजूला ठेवले तर त्यांचा फायदा होऊ शकेल. शाहू फुले यांची पाटी दुकानावर टांगून आत फक्त ९६ कुळी उत्पादन ठेवणा-या पक्षापेक्षा बाहेर हिंदुत्वाची पाटी टांगून सर्वसमावेशक बहुजन माल ठेवणारी शिवसेना महाराष्ट्राला जास्त परवडेल. काँग्रेस आणि शिवसेना युती ही इथल्या आघाडी युत्यांना यशस्वी छेद देणारा पर्याय असेल. निवडणुकीच्या भाषणबाजीत अजून तरी हे दोन्ही पक्ष जरा बूज राखून वावरताना दिसताहेत. बाकी भाजप आणि राष्ट्रवादीच्या जाहिराती ऐकल्या-पहिल्या तरी काल्पनिक विश्वाच्या दर्शनाचे निखळ मनोरंजन होत आहे.
sbwaghmare03@gmail.com