आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नुसतीच बोलबच्चनगिरी !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एका मराठी चॅनलवरील बोलबच्चन मुलाखतीच्या कार्यक्रमात मुलाखतदेवी मराठी नटी मुलाखतघेव्या जितेंद्र जोशीला म्हणाली, “आम्ही खूप हळवे आहोत. लताबाईंचं गाणं ऐकलं आणि सचिनचं शतक झालं, तरी डोळ्यात पाणी येतं.” अरे बापरे! मग अजून काही दिवसांनी बोलबच्चन नाना पाटेकर निखिल वागळे यांच्याबरोबर बोलताना (महत्त्वाचे म्हणजे कंठ दाटून बोलताना) बोलला,
“ निखिल, मी मृत्यूपूर्वी तुला एक सीडी देईन. मी गेल्यानंतर तू ती प्रकाशित कर, जाहीर कर. वगैरे वगैरे...” या दोन्हीही कलाकारांच्या दुःखाची झळ आपण जाणू शकत नाही, या खंतेने ताबडतोब आरशासमोर जाऊन स्वतःचा निषेध करण्यापलीकडे मला दुसरे काही करता आले नाही. इतके संवेदनशील कलाकर हॉलीवूड-टॉलीवूड आणि बॉलीवूडमध्ये नसून फकस्त मायमराठीत आहेत, या जाणिवेने आनंदही वाटला...
काही दिवसांपूर्वी रविवारी ‘विनय नावाचं वादळ’ हा विनय आपटे यांना श्रद्धांजली वाहणारा कार्यक्रम प्रसारित झाला. कार्यक्रमामध्ये अनेक मराठी नाटका-सिनेमातले कलाकार उपस्थित होते. यात विनय आपटे यांच्या नाटकातील काही निवडक नाट्यप्रयोग सुरू झाले. नथुराम ऊर्फ शरद पोंक्षे किंवा शरद पोंक्षे ऊर्फ नथुराम या नामवंत कलावंताने दात खाऊन अभिनय करत ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ नाटकामधील निवडक डायलॉग हाणले, आणि जमलेली पब्लिक दनादन टाळ्या पिटू लागली. मग उत्साहाने या नटाने डॉ. श्रीराम लागू आणि पंडित भीमसेन जोशी यांनी त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप कशी हाणली आणि आपल्याला बरे कसे वाटले, हाही किस्सा सांगितला. अजून टाळ्या पडल्या. ते पाहून, ऐकून निव्वळ गहिवरून आले... शरद पोंक्षेचे मोठे कौतुक वाटले... त्याचा गांधी द्वेष व सावरकर प्रेम पाहता शरद पोंक्षे हा नट फार उशिरा जन्माला आला हे बरेच झाले, असे वाटले. ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ नाटकात मुख्य हीरो(?) म्हणून काम केल्यापासून कुठेही काहीही वक्तव्य करण्याचे विशेषाधिकार आपल्याला प्राप्त झालेत, अशी भाबडी समजूत करून घेऊन हा नट (पक्षी हीरो) कुठे कुठे काहीबाही वैचारिक (?) पिंका सतत टाकत राहतो. त्याची व्यक्त होण्याची आजची धडाडी पाहता खरेच या बहाद्दराने आधी जन्म घेतला असता तर... असे मनाला वाटून गेले.
दुसरा महान नट नाना पाटेकर. हा कलाकार भावनिक बोलबच्चन टाकत, कविवर्य दवणे व संदीप खरे यांच्या पंक्तीला बसत चिंतनशील गाणी गात व गद्य म्हणत पब्लिकला भावनेच्या झुल्यावर जाम झुलवतो. पब्लिकही झुलते. मग नानाही डुलतो. (आतली बात. किशोर कदम हल्ली वैतागला आहे. गद्य कवितेत नाना टफ फाइट देईल की काय? ही दहशत त्याला बसली आहे.) मग तो एकाच वेळी ‘राज’ व ‘उद्धव’चे कौतुक करतो. ‘अजित’ फार चांगला आहे. तो काय बोलला (संदर्भ : दादाचा धरणात मुतू का? हा अगतिक सवाल.) यापेक्षा तो काम कसे करतो, हे मला जास्त महत्त्वाचे वाटते, असे जाहीर करतो. बाळासाहेब ठाकरे म्हटले की याच्या डोळ्यांत पाणी तरळते, तर शरद पवार म्हटले की या माणसाच्या (म्हणजे शरद पवार यांच्या) जाणतेपणाला तोड नाही. महाराष्ट्रातलं एक प्रगल्भ आदरणीय व्यक्तिमत्त्व, असं कौतुक करत नानाच्या डोळ्यांत चमक तरळते. नाना निव्वळ निव्वळ नतमस्तक होतो. सुनील तटकरेंच्या स्टेजवर जाऊन नाना असे काही बोलबच्चन टाकतो की, पब्लिक ‘जस्ट लव्हज सुनील तटकरे’ या स्टेजला अल्लद पोहोचते.
मध्यंतरी सलग जाहिराती दाखवण्याचा पण करून, तो न पेलल्याने झी मराठीमध्ये फँड्री चित्रपटाचे तुकडे दाखवले गेले. तुकड्याच्या आधी व तुकडा खत्म झाल्यानंतर काही मराठी कलाकार लोक मत व्यक्त करत होते, विक्रम गोखले राठ मराठीत, सोनाली कुलकर्णी (थोरली) मंजुळ्या मराठीत, ऊर्मिला मातोंडकर सिलेक्टेड मराठीत, स्मिता जयकर बोललेच पाहिजे या मराठीत. मत एकच ‘जाणीव झाली बदल हवा’, ‘जाणीव झाली बदल हवा’. नेमकी काय जाणीव झाली आणि नेमका काय बदल हवा, हे मात्र एकाही कलाकाराने सांगितले नाही. आम्ही वाढूळ वाट बघत राहिलो. हे कलाकार लोक असा अपेक्षाभंग करून गेले.
हे मराठी कलाकार लोक आणि यांच्या बाइटवर पोट जाळणारा इलेक्ट्रॉनिक मीडिया फार दाबजोरपणे स्वतःचा प्रभाव जनमानसावर टाकतो आहे. आपले काही मराठी कलाकार लोक राजकीय जाणिवेतून राजकीय पक्षांशी संधान बांधून आहेत. सेनेतले पैठणी देणारे आदेश भावोजी व शिवबा साकारणारे डाक्टर कोल्हे, आणि ज्यांनी वाक्य उच्चारायच्या आधीच पब्लिक हसू लागते, ते परत परत भरत जाधव! हे सेनेत आणि मनसेनेत आपापले चवाळे टाकून बसलेत. ही सगळी कलावंत मंडळी. यांच्या कलेवर उभा महाराष्ट्र प्रेम करतो. आणि हे या प्रेमाचा मोबदला कसा देतात? कलावंताची सामाजिक बांधिलकी लक्षात घेतली जाते, ती असायलाच हवी, यात शंका नाही. नाना पाटेकर तिथे सरस आहे. राजकीय, धार्मिक बांधिलकी त्यांच्यावर सक्तीची नाही; पण जर तुम्ही भूमिका घेत असाल तर नेमकेपणाने स्वतःला तपासून भूमिका घेत लोकांसमोर यायला पाहिजे. कारण कलाकार म्हणून तुम्ही घातलेल्या प्यांटीचे अनुकरण लक्षात राहते. त्याचा बारकाव्याने विचार करून बोलायला हवे. हे लोक चित्रपटात करत असलेल्या भूमिका आणि यांच्या थेट प्रत्यक्ष जीवनातील व्यक्ती, घटना विचारधारा याबाबतच्या भूमिका यातले भेद ओळखणे गरजेचे आहे. कलावंतांच्या बोलबच्चनला भुलणा-यांनी आणि वर उल्लेख केलेल्या काही चुकून राहिलेल्या कलावंतांनी
डॉ. श्रीराम लागू, निळू फुले, सदाशिव अमरापूरकर ही ठळक उदाहरणे आठवावीत. ‘परमेश्वराला रिटायर’ करा, म्हणणा-या लागूंना धार्मिक भूमिका कशाकरिता, विचारल्यानंतर ती भूमिका चित्रपटातील पोटापाण्याचा उद्योग यापुरती मर्यादित, हे तत्त्वासाठीचे जगणे, असे उत्तर देणारे लागू आठवावेत. सुरेश जैन यांना थेट तोंडावर तुमच्यासारखा चोरीचा, भ्रष्टाचाराचा पैसा आमच्याकडे नाही, तेव्हा आम्ही कसे जिंकणार? हा सवाल करणारे सदाशिव अमरापूरकर आठवावेत. राज ठाकरेंच्या मी महाराष्ट्राचा, महाराष्ट्र माझा या फतव्यानुसार नॉन महाराष्ट्रीय लोकांना हाकलण्याचा निषेध व्यक्त करणारे निळू फुले आठवावेत. बाळासाहेब ठाकरे हे हत्यारे आहेत म्हणणारे, तसेच कुणी पिस्तूल दिले तर मोदींना गोळी घालीन म्हणणारे विजय तेंडुलकर आठवावेत. या मराठी कलावंतांचा आदर्श ठेवून निर्भीड सामाजिक, राजकीय, धार्मिक मतमतांतरे व्यक्त करण्याची धमक आज किती मराठी नट-नट्या बाळगून आहेत? मराठी कलाकारांच्या भूमिका ख-या आणि खोट्या तपासून यांच्याकडे पाहायला पाहिजे.

sbwaghmare03@gmail.com