आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article By Shahaji Pawar In Rasik About Wildlife And Their Living Zone

सिंह गेले वाहून (रसिक विशेष)

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दर दिवशी होणारे सरकारी ‘इव्हेंट’ आणि मीडिया-सोशल मीडियात एवढ्या-तेवढ्यावरून होत असलेला असभ्य कोटीतला नित्य थयथयाट यांत सामान्य माणसाच्या जगण्या-मरणाचे प्रश्न दगड-धोंड्यांसारखे वाहून जाताहेत. मग त्यात काही दिवसांपूर्वी गुजरातमधल्या गीर जंगल परिसरात आलेल्या पुरात ९ सिंह वाहून गेले, ३५ बेपत्ता झाले, तर त्यांची काय कथा?
एरवी, शहरी-निमशहरी भागात सुरक्षित आयुष्य जगणाऱ्यांचा या घटनेशी संबंध काय, या प्रश्नाला केंद्रस्थानी ठेवून नैसर्गिक आपत्ती आणि मानवी बेपर्वाई यामुळे वन्यप्राणी संपदेवर पर्यायाने मानवी समूहांवर येणाऱ्या अपरिहार्य संकटांचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सूचन करणारा हा विशेष लेख...

‘विस्तीर्ण वनराई, खळाळणाऱ्या नद्या, नीलगाई, सांबरांसह बागडणारे शेकडो वनचर, हे शेराचे साम्राज्य. भीतीलाही ‘भीती’ वाटावी, अशी त्याच्या डरकाळीची जातकुळी. ती तो जगला. गीर अन् परिसरातील जंगलात त्याने कैक उन्हाळ्या-पावसाळ्यांशी दोन हात केले. परंतु, २३ जूनला ‘काळ’ बनून आलेल्या पावसाने आणि अतिवृष्टीमुळे आलेल्या पुराने त्याच्या साम्राज्याला हादरे दिले. त्याच्या नजरेदेखत त्याची बछडी, राण्या अन् भावंडं या पुराने गिळली. एरवी, इतरांच्या काळजात धडकी भरवणारी त्याची डरकाळी या आपत्तीपुढे फिकी पडली. आपल्या गणगोतांच्या कलेवरांकडे पाहात तो स्वत:शीच पुटपुटला असेल, ‘माझ्यासाठी दुसरं एखादं घर असतं, तर कदाचित माझी लेकरं वाचली असती...’

वास्तवाची उकल करणारे अन् अाशियाई सिंहांच्या सार्वत्रिक संवर्धनाची गरज वर्तवणारे हे शेरुचे स्वगत म्हणजे, त्याच्यावर प्रेम करणाऱ्या आणि तो माणसाप्रमाणे टिकावा, यासाठी स्वार्थी व्यवस्थेबरोबर लढा देणाऱ्या सगळ्यांची जणू आंतरिक हाक आहे. निसर्गाने या वसुंधरेला दिलेली ही अनमोल देणगी जणू आपलीच ‘जायदाद’ आहे, असे गुजरात सरकारला वाटते. त्यामुळे गेली अनेक वर्षं गीरमधील सिंहांचा प्रश्न अटीतटीचा होऊन बसला आहे. खरे तर गीरचा सिंह मुळी भारतीय नाहीच. तज्ज्ञांच्या मते, हजारो वर्षांपूर्वी अन्नपाणी अन‌् अधिवासांच्या शोधात अनेक वन्यजीव आफ्रिकेतून जगभरात विखुरले. अन्न व सुरक्षित अधिवास असलेल्या जंगलांत विसावले. त्यात मुख्यत: सिंह व तरसाचा (हायनाज) समावेश होता. सुमारे शंभर वर्षांपूर्वी अाशियाई सिंहांचे वास्तव्य पश्चिम इराणपासून पूर्व भारतापर्यंत होते. १९व्या शतकात आजच्या गुजरातप्रमाणे त्यांचा वावर बिहारमध्येही होता. परंतु, हे वैभव फार काळ टिकले नाही. घरे-कारखाने उभारण्यासाठी आणि शेतीच्या विस्तारासाठी जंगलावर कुऱ्हाडी पडल्या. बंदुकीचा शोध अन् क्रौर्यालाच शौर्य मानणाऱ्या संस्थानिकांचा शिकारीचा छंद वन्यजीवांच्या जिवावर उठत गेला. डरकाळीमुळे फारशा प्रयत्नाशिवाय सिंहाचा माग शिकाऱ्यांना लागू लागला. सिंहाचे खाद्य असलेली हरणे व नीलगायींची शिकार मोठ्या प्रमाणात होऊ लागली. त्यामुळे हे जीव उण्यापुऱ्या संख्येवर आले. परिणामी, अन्नदुर्भिक्ष्य वाढले व उपासमारीमुळेही बरेच सिंह मरण पावले. हरणांना पर्याय म्हणून वनराजाने गुरांना लक्ष्य केले. परिणामी, १९०५च्या सुमारास मानव व सिंह असा संघर्ष उभा ठाकला. गुरांचे संरक्षण करण्यासाठी सिंहांना मारले जाऊ लागले, त्यामुळे या राजेशाही थाटात जगणाऱ्या प्राण्याची संख्या बोटावर मोजण्याइतपत उरली.
त्या वेळी वनराजाला वाचवण्यासाठी जुनागडच्या नबाबाने प्रयत्न केले. पुढे १९११मध्ये ब्रिटिशांनी हे जंगल ताब्यात घेतले. आशियाई सिंहाच्या संरक्षण, संवर्धनासाठी १९६५मध्ये गीर अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले. या जिवांची संख्या वाढावी, म्हणून गुजरात वनमंत्रालयाने कृतिशील आराखडा तयार केला.

त्याची शिस्तबद्ध अंमलबजावणी केली. त्यामुळे स्थापनेच्या वेळी १७७ असलेली सिंहांची संख्या २०१५मध्ये ५२३ वर पोहोचली. ही बाब नक्कीच अभिनंदनीय; परंतु, २३ जूनला आलेल्या पुरात ९ सिंह मारले गेले. ३५ सिंहाचा शोध अजूनही लागलेला नाही. तसे पाहता, महापूर, भूकंपासारख्या नैसर्गिक आपत्ती येतच असतात. त्यांना थोपवता येत नाही. मात्र, जगात एशियाटिक लायन केवळ गीरमध्ये शिल्लक असताना त्यांचे अन्य अभयारण्यांत स्थलांतर करून आपत्तीची व्याप्ती नक्कीच कमी करता येते. गुजरातमधील सिंहांवर महामारी, वणवा, पुरासारखी संकटे पुढेही गुदरु शकतात. त्यात, टप्प्याटप्प्याने सिंहांचा संहारही होऊ शकतो, अशी भीती गीरच्या सिंहांवर डॉक्टरेट मिळवलेले, बंगळुरुचे ज्येष्ठ वन्यजीव शास्त्रज्ञ तथा बीएनएचएसचे उपाध्यक्ष डॉ. रवी चेल्लम व युवा वन्यजीव अभ्यासक ऐश्वर्या श्रीधरसह अनेक वन्यजीव अभ्यासक, शास्त्रज्ञ व प्राणीप्रेमींना वाटत आहे. गीरचे काही सिंह अन्य वनांत हलवावेत, तिथे त्यांचा वंश वाढवावा, असा उपाय त्यांनी सुचवला आहे.
तथापि आजपर्यंत गुजरात सरकाने याला या ना त्या कारणाने खोडाच घातला आहे. ‘गीर का शेर गुजरात का शेर है। वो हमारी पहचान है। हम उसे औरों को नही देगें।’ हे त्यांचे उत्तर आहे. या स्वार्थी वृत्तीने वन्यजीव प्रेमी, अभ्यासक अस्वस्थ आहेत. गुजरात सरकारने वास्तवाला स्वीकारावे आणि सिंहाच्या वंशविस्तारासाठी देशात अन्य एका ठिकाणी अभयारण्य निवडावे, यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. तिथे हा विषय अभ्यासपूर्ण रूपात मांडण्यात आला. संशोधन अहवाल सादर करण्यात आले. राजस्थानातील दारा व सीतामाता अभयारण्य, सर्वानुकूल म्हणून अभ्यासकांनी मान्य केलेले मध्यप्रदेशातील कुनो अभयारण्य सिंहांचे योग्य आश्रयस्थान ठरले आहेे, याचे सबळ पुरावे न्यायालयात सादर करण्यात आले. वन्यजीवशास्त्रज्ञ चेल्लम, जस्टिस जोसवा, क्रिस्टी ए. विलियम्स, ए. जे. टी. जॉनसिंग, बीएनएचएसचे संचालक डॉ. असद रहेमानी, पी. के. मल्होत्रा, विभा दत्ता, पी. एस. नरसिंहा यांनी नोंदवलेल्या अभ्यासपूर्ण बाबी या याचिकेला बळ पुरवणाऱ्या ठरल्या. तथापि यावरही गुजरात सरकारने आक्षेप नोंदवले. त्यामुळे कुनोचे पुन्हा सर्वेक्षण झाले. शेवटी सिंहाला दुसरे आश्रयस्थान असणे, या मागणीलाच न्याय मिळाला.

असे असले तरी अजूनही गुजरात सरकारने गीरबाहेर सिंह काढलेले नाहीत, ही वेदनादायी आणि अस्वस्थ करणारी बाब आहे. यावर चेल्लम म्हणाले, ‘सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा तरी आदर करावा. टोलवाटोलवीत वेळ काढला तर कोण जाणे, हाती काहीही लागणार नाही. सिंह वाचावेत, त्यांना दुसरे आश्रयस्थान मिळावे, म्हणून मी बंगळुरु ते दिल्ली न्यायालयात अनेकदा हजेरी लावली. त्यात यशही मिळाले, परंतु राजकीय अनास्थेमुळे हे सगळे अजूनही सरकारी फाइलीतच अडकले आहे. तुम्ही मध्यप्रदेशमधल्या नर्मदेचे पाणी घेता, मग गीरचे सिंह मध्य प्रदेशात पाठवताना दुटप्पी भूमिका का व कशासाठी? माझ्या मते, भारतच काय अन्य देशांनी अशियाई सिंहांच्या संगोपन अन् संवर्धनाचे दायित्व पत्करले, तर त्यांनाही सिंह दिले जावेत, असे वाटते. शेवटी, ही अनमोल भेट जपली अन् जगली पाहिजे. तसे झाले, तर जग तुमच्या उदार मानसिकतेचे जग कौतुक करेल.

गीरच्या जंगलातील मर्यादित जागा व तिथेच सिंह ठेवण्याचा हट्ट म्हणजे, ५० अंडी ठेवण्याच्या कटोरीत १०० अंडी कोंबण्याचा वेडेपणा आहे. ते कसे राहतील? आफ्रिकेतल्या सेरंगीटीत आलेल्या साथरोगाने अनेक सिंहांना संपवले, त्याची पुनरावृत्ती गीरमध्ये वणवा, महापूर, साथरोग अशा अनेक आपत्तीतून होऊ शकते. नजरेसमोर घडलेल्या घटनांतून आपण शहाणपण न घेतल्यास आपल्यासारखे करंटे आपणच ठरू.’ वन्यजीव संगोपन अन‌् संवर्धनात युवा पिढीत आघाडीवर असलेल्या मुंबईच्या ऐश्वर्या श्रीधरचेही नेमके हेच म्हणणे आहे. संकुचित मनोवृत्तीने निराशेशिवाय हाती काहीही लागणार नाही. अाशियाई सिंह ही कोणा एकाची संपत्ती नाही, ती वैश्विक आहे. तिचा विस्तार अन्य जंगलात झाला तरच ती टिकेल, नाहीतर येणाऱ्या पिढ्यांसाठी तो ‘वन्स देअर लिव्हड अ लायन’ एवढ्यापुरतेच तिचे अस्तित्व उरेल.’

जंगली कोण ?
पुरामुळे सैरभैर झालेले गीरचे काही सिंह जंगलाची हद्द ओलांडून महामार्गालगत, मानवी वस्तीजवळच्या नदीकाठापर्यंत आल्याचे दिसले. पण गीरचे सिंह तसे माणसाळले आहेत, असे तज्ज्ञ मानतात. मात्र हेच तज्ज्ञ मुंबईतल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिसरातील बिबळ्यांच्या बाबतीत कडक इशारा देतात. अलीकडेच, वन्यजीव अभ्यासक निकीत सुर्वे यांचा ३५ बिबळ्यांच्या जीवनशैलीचा माग काढणारा पाहणी अहवाल प्रकाशित झाला. त्यात गेल्या काही वर्षांत मानवी वस्तीने जंगलाच्या सीमांत अतिक्रमण केल्याचे बिबळ्यांच्या खाद्य सवयी बदलल्याचे निरीक्षण मांडण्यात आले. हरीण, चितळ, सांबर, माकडे हे बिबळ्यांचे नैसर्गिक खाद्य, पण आता कुत्री, मांजरी, शेळ्या, गायी हे बिबळ्यांचे खाद्य ठरू लागले आहेत. बिबळ्यांच्या पुढच्या पिढ्यांमध्येही हा बदल झिरपतो आहे.
हेच भविष्यात माणूस आणि वन्यप्राण्यांमधल्या संघर्षाचे मोठे कारण ठरणार आहे.

shahajipawar71@gmail.com