आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article By Shashikant Sawamt In Rasik Magazine In Divya Marathi

प्रेशियस गिफ्ट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘लाइफ्स लिटिल इन्स्ट्रक्शन बुक’ म्हणजे जीवनाबद्दलचे बारीक निरीक्षण करणारे पुस्तक आहे. स्वत:च्या मुलासाठी एच. जॅक्सन ब्राऊन यांनी लिहिलेल्या टिपणांचं रूपांतर ५११ सूचनांमध्ये झालं आहे. त्यातील बहुतेक सूचना आदर्श जीवनासाठी उपयोगी आहेत.
माझा मुलगा अॅडम हॉस्टेलचं नवं आयुष्य सुरू करण्यासाठी म्हणून टाइपरायटर, ब्लेझर अशा काहीबाही वस्तू घेऊन निघाला, तेव्हा त्याच्यासाठी मी हे पुस्तक लिहिलं. म्हणजे बाजूच्या खोलीत बसलो आणि माझी काही निरीक्षणं आणि दोन सल्ल्यांची वाक्ये लिहून काढली. काही वर्षांपूर्वी मी असं वाचलं होतं की मुलाला रस्ता तयार करून देणं हे पालकांचं काम नसतं, तर रस्त्याचा नकाशा त्याला देणं, हे त्यांचं काम असतं. मला वाटले की हे पुस्तक त्याला नकाशासारखे उपयोगी पडेल.’ एच. जॅक्सन ब्राऊन या गृहस्थाची ही वाक्ये आहेत. या पुस्तकाबद्दल तो आपल्याला सांगतो आहे, त्या पुस्तकाचे नाव आहे लाइफ्स लिटिल इन्स्ट्रक्शन बुक. (Life’s Little Instruction Book) या छोटेखानी पुस्तकाच्या कोट्यवधी प्रती खपल्या आहेत. भेट द्यायला इतकं सुंदर पुस्तक दुसरं शोधून सापडणार नाही. स्वत:च्या मुलासाठी ब्राऊन यांनी लिहिलेल्या टिपणांचं रूपांतर ५११ सूचनांमध्ये झालं. त्यातील बहुतेक सूचना आदर्श जीवनासाठी उपयोगी आहेत. अशी पुस्तकं वाचून आयुष्य बदलतं का, याबद्दल शंकाच आहे. पण त्यातील सूचना या बऱ्याचशा प्रॅक्टिकल आहेत. उदा. नेहमी तुमच्या वयाचा डॉक्टर शोधा, म्हणजे तुम्ही दोघेही समांतरपणे मोठे होत जाता किंवा मुलांशी खेळताना त्यांना जिंकू द्या, जेवताना टीव्ही बंद ठेवा, वगैरे.

पुस्तकातल्या अनेक सूचना मिश्कील पण जीवनाबद्दलचं बारीक निरीक्षण दाखवणाऱ्या आहेत. उदा. ‘जी माणसं आपण किती प्रामाणिक आहोत असं सांगतात, त्यांच्याबद्दल साशंक राहा.’ ही सूचना घ्या; किंवा ‘नव्या शेजाऱ्यांना नेहमी तुमची आवडती डिश बनवून पाठवा आणि सोबत रेसिपीही असू द्या.’ किंवा ‘दोरीचा गुंता जर हाताने सोडवता येत असेल तर कापू नका.’ यातील एक सूचना अशीही आहे, ‘चुंबन घेताना जर तो डोळे मिटत नसेल तर सावध राहा.’

माझ्या कथा लिहिणाऱ्या मित्रांना किंवा इतरांनाही कायम हे पुस्तक वाचायला सांगतो. कारण यातील अनेक सूचना या अत्यंत कठीण आहेत. या काही सूचना पाहा. ‘स्कूल बसकडे पाहून नेहमी हात हलवा किंवा तुमची मुलं तुमच्या सोबत असतील तर त्यांचा हात धरा. कारण लवकरच ते मोठे होतात व दूर निघून जातात.’

यातील काही सूचना अमलात आणणं अनेकांना परवडणारं नाही. ‘नेहमी तुमच्यापेक्षा बुद्धिमान लोकांना कामावर ठेवा.’ ही सूचना कोणाला परवडेल? एक सूचना अशी आहे, ‘जे काही दिसेल किंवा हाताळाल ते अधिक चांगलं करून ठेवा.’ तसेच कितीतरी सूचनांमध्ये सहृदयता दिसते. उदा. ‘किंचित महाग असली तरी स्थानिक दुकानात वस्तू खरेदी करा.’ ही सूचना घ्या; किंवा ‘दर आठवड्याला एक दिवस उपाशी राहून तशी रक्कम अनाथाश्रमाला द्या.’

व्यवहारीपणा ही या पुस्तकाची खूप महत्त्वाची बाजू आहे. जॅक्सन पुढे सुचवतात, लोकांना एखादी गोष्ट कशी करायची ते सांगू नका; फक्त काय करून हवे आहे ते सांगा आणि मग ते आपल्या सर्जनशीलतेने तुम्हाला चकित करून सोडतील. ही सूचना घ्या; किंवा जास्त किंमत म्हणजे जास्त दर्जा नव्हे, हे वाक्य घ्या. चार्टर्ड अकाउंटंटला कधीही गुंतवणुकीबद्दल विचारू नका. कारण त्यांना चुका शोधण्याचे प्रशिक्षण असते, पॉझिटिव्ह वागण्याचे नव्हे.

इंग्रजीतील सेल्फ हेल्फ प्रकारातील पुस्तकाचे दालन चांगलेच समृद्ध आहे. डेल कार्नेजी ते ‘अलकेमिस्ट’पर्यंत अनेक पुस्तकं त्यात येतील. या पुस्तकांमध्ये आणि ब्राऊन यांच्या पुस्तकात एक फरक आहे; तो म्हणजे, सुटसुटीतणाचा. या पुस्तकात प्रत्येक पानावर तीन-चार ओळीच आहेत. त्यामुळे जाता-येता ते कधीही आणि कसेही वाचता येते. याचमुळे ते अधिक लोकप्रियही आहे.

वाचन करायला वेळ नाही, अशी तक्रार जे करतात, त्यांनी हे पुस्तक वाचले पाहिजे. यातील सूचना केवळ आयुष्याबद्दल नाहीत तर त्या जगण्याबद्दलही आहेत. पाठीवर पहुडा, खुल्या आकाशाखाली पाठीवर पहुडून तारे पाहा, अशा काव्यमय सूचनाही या पुस्तकात आहेत.

या पुस्तकातील काही सूचना अमलात आणणं अनेकांना परवडणारं नाही. ‘नेहमी तुमच्यापेक्षा बुद्धिमान लोकांना कामावर ठेवा.’ ही सूचना कोणाला परवडेल? एक सूचना अशी आहे, जे काही दिसेल किंवा हाताळाल ते अधिक चांगलं करून ठेवा. तसेच कितीतरी सूचनांमध्ये सहृदयता दिसते.