आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article By Shashikant Sawant About Erotic Literature

श्रृंगार आणि साहित्य (इरॉटिका)

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इरॉटिका हा जागतिक पातळीवर मान्यता पावलेला साहित्यप्रकार. गेल्या काही वर्षांपासून भारतात भरणाऱ्या विविध लिटरेचर फेस्टिव्हलमधून इरॉटिकाविषयी चर्चा, कार्यशाळा असे बरेच काही घडत आहे. त्या पार्श्वभूमीवर, शृंगाररसाला प्राधान्य देणारे साहित्य आणि साहित्यलेखक यावर प्रकाशझोत टाकणारी ही लेखमालिका.

पोर्नो आणि इरॉटिक लिटरेचर यात मूलत: फरक आहे. आपल्याकडे चंद्रकांत काकोडकरांपासून ते भाऊ पाध्यांपर्यंत अनेकांनी इंग्लिश शब्दांचे, लैंगिक संबंधाचे धीट वर्णन करणाऱ्या कथा, कादंबऱ्या लिहिल्या आहेत. इंग्रजीत तर सर्वच प्रकारचे साहित्य विपुल प्रमाणात आढळते. त्यामुळे पोर्नो काय किंवा इरॉटिक काय, या प्रकारचे साहित्य भरपूर उपलब्ध आहे. एकेकाळी डी. एच. लॉरेन्सच्या ‘लेडी चॅटर्लिज लव्हर’ या प्रसिद्ध कादंबरीवर अश्लील म्हणून खटला झाला. आज वाचलं तर यात फारसं धक्का बसण्यासारखं काहीही नाही. यापेक्षा कितीतरी बोल्ड मजकूर हेन्री मिलरसारख्या अनेक लेखकांनी लिहिलेला आहे. फ्रेंच भाषेतील इमॅन्युअल या लेखिकेच्या त्याच नावाच्या कादंबरीतील नायिका विमानात एका अनोळखी पुरुषाशी सेक्स करते, असं वर्णन आहे. २० वर्षांपूर्वी प्रसिद्ध झालेल्या शोभा डे यांच्या ‘स्टारी नाईट्स’मध्ये तसेच शृंगारिक वर्णन आहे. आपल्याकडे शृंगारिक कादंबऱ्यांची मोठी परंपरा आहे. अनेक ग्रंथांमध्ये धीट शृंगाराचे वर्णन आले आहे. ‘कुमारसंभव’मध्ये पार्वतीच्या स्तनांचे वर्णन ‘ते इतके घट्ट होते की, त्याच्यातून तृणाचे पातेही जाऊ शकत नव्हते.’ असे कालिदासाने केले आहे. हे वर्णन वाचून आम्ही (आपल्याकडे आज वयाच्या चाळिशी-पन्नाशीला आलेल्या पिढीला लैंगिक ज्ञान झाले, ते असे. त्या काळात मराठी माध्यमात शिकणारी मुलं हमखास शाळेच्या वयात चंद्रकात काकोडकर वाचत. नंतर मग ‘विवाहितांचा वाटाड्या’, ‘निरामय कामजीवन’ अशा पुस्तकांतून हे ज्ञान व्हायचे. ११-१२वीतील कितीतरी मुलं सिमोन् द बोव्हुआरचं ‘सेकंड सेक्स’सारखं वैचारिक पुस्तकदेखील अशा वर्णनांच्या आकर्षणांमुळे वाचत.) शाळेत एकमेकांना टाळ्या देत असू. अशा मजकुराच्या आकर्षणातच परिचय व्हायचा, तो आधी हेरॉल्ड रॉबिन्सचा आणि त्यानंतर हेन्री मिलरचा. मिलरने पानाला काही डॉलर घेऊन, एका श्रीमंत वाचकासाठी इरॉटिका लिहिल्या होत्या. ज्या नंतर ‘ओपस पिश्चोरम’ या नावाने प्रसिद्ध झाल्या. त्यात त्याने लैंगिक वर्णनांचा कळस गाठला आहे. आज त्यातील बराचसा मजकूर कायद्याच्या कचाट्यात सापडू शकतो. किंबहुना, पुस्तकावर अनेक देशांत आजही बंदी आहे.

हेन्री मिलर आणि अनायस नीन ही लेखिका दोघेही मित्र होते. दोघांच्याही जीवनावर ‘हेन्री अँड ज्यून’ हा चित्रपटही निघालेला होता. दोघांचाही नित्य पत्रव्यवहार होता. अनाएस नीनचं लेखन हे ‘सेन्सुशअल’ या सदरात मोडणारं होतं. त्यात शारीरिक संबंधांची वर्णनं होतीच, पण स्त्रीला आवश्यक तो रोमान्स, गुलाबी भावना आणि तिचे हळूहळू उद्दिपीत होणे, हे सारं तिने विलक्षण तरलपणे रंगवलेलं आहे. त्यामुळे स्त्रियांइतकेच पुरुषांमध्येही तिचे लेखन लोकप्रिय झाले. होमोसेक्शुअल, लेस्बियन अशा संबंधांतील तिची वर्णने वाचताना इरॉटिक आणि पोर्नो यांतील फरक काय, तो कळतो.

स्त्रीवर्गामध्ये एकेकाळी आणि आजही ‘मिल्स अँड बून’ने प्रकाशित केलेली पुस्तके लोकप्रिय होती. तर पुरुषांमध्ये हेन्री मिलर ते हेरॉड रॉबिन्स, आयर्विन वॉलेस यांसारख्या लेखकांची पुस्तके सर्वाधिक वाचली जात होती. स्त्री आणि पुरुष दोघांच्याही रोमान्सच्या आणि संबंधाच्या कल्पना किंचित वेगळ्या आहेत, असं मानलं जात होतं. परंतु आता आलेल्या ‘फिफ्टी शेड्स ऑफ ग्रे’ पुस्तकाने हा समज खोटा ठरवला. हे पुस्तक आधी ब्लॉगच्या स्वरूपात प्रसिद्ध झाले. तो जगभरात लक्षावधी महिलांनी आणि पुरुषांनी पसंत केले आहे. हे पुस्तक आहे, मर्किस दी साद या लेखकाच्या धर्तीवर. सादच्या कथा, कादंबऱ्यांत स्त्री-पुरुषांची वर्णने आढळतात, आणि शारीरिक संबंधांबद्दलची चित्रणेही. ‘वेदनेतून आनंदाचा जन्म होतो’, ही त्याची फिलॉसॉफी दोन-अडीचशे वर्षांपूर्वीच्या त्याच्या लेखनात आढळते. त्यावरून ‘सॅडीझम’ हा शब्द रूढ झाला. अनाएस नीनच्या एका कथेत लैला ही नायिका चामडी पट्टीने शरीरावर वार करते, असं वर्णन आहे. तर अलीकडेच गाजलेल्या ‘निम्फोमेनिया’ या चित्रपटात लैंगिक आनंदाची बेसुमार आवड असलेली नायिका असा छळवाद करून आनंद देणाऱ्या पुरुषाकडे जाते, असे चित्रण आहे. एका दृश्यात तर तो तिच्या उघड्या शरीरावर चामड्याच्या पट्टीने ४० वार करतो. परंतु हे वर्णन अनेक प्रेक्षकांना जराही पाहवले नाही.

अर्थात, आपली सोज्ज्वळ, साधी मराठी भाषा या साऱ्यापासून काहीशी दूर आहे. मात्र, त्या-त्या काळात आपल्याकडे रंभा, चंद्रकांत, हैदोस अशी मासिकं होतीच, शिवाय पिवळ्या वेष्टनातील हिंदी-मराठी पुस्तकेही होती. पण त्यातील लैंगिक वर्णनं कित्येकदा संवेदना जागृत करण्यापेक्षा पोट धरून हसायलाच लावत. परंतु, पुन्हा हा प्रश्न येतोच की, पोर्नो आणि इरॉटिक यात फरक तो काय? ‘लोलिता’सारख्या कांदबरीला पोर्नोग्राफी ठरवून त्यावर बंदी आणण्याचे ठरत होते, त्यावर जवाहरलाल नेहरूंसारख्या साहित्याची प्रगल्भ जाणीव असलेल्या आणि स्वत: लेखक असलेल्या जाणकाराने म्हटले की, हे तर दर्जेदार साहित्य आहे. म्हणजेच, आपल्याला असे म्हणता येईल की, पोर्नो आणि इरॉटिका यातल्या सीमारेषा पुसट असल्या, तरी प्रगल्भ वाचक त्याबद्दलचा निर्णय नक्कीच घेऊ शकतो. एकेकाळी ऑस्कर वाइल्डने टोपणनावाने लिहिलेली कांदबरी ‘टेलनी’ अश्लील मानली गेली. आज ती उत्तम साहित्याचा नमुना मानली जाते! हे सारे साहित्य ऑलिंपिया प्रेसने हिरव्या कव्हरांच्या पुस्तकात प्रसिद्ध केले होते.

पण अशी पुस्तकं संस्कृतीरक्षकांच्या हातून सोडवण्यासाठी पाश्चिमात्य देशांत अनेक लेखक, विचारवंतांनी वेळोवेळी आवाज उठवलेला आहे. स्वातंत्र्य आणि समानतेच्या कल्पना घटनेत आणि प्रत्यक्ष जगण्यात जाणीवपूर्वक राबवल्यामुळे तिथे हे घडू शकले. या उलट आजही भारतात ‘लेडी चॅटर्लिज लव्हर’ या पुस्तकावर अधिकृतपणे बंदी आहे. हे सारे लक्षात घेऊन शृंगारभावनेला हात घालणाऱ्या पुस्तकांकडे साहित्याची एक शाखा म्हणून पाहायला हवे. या लेखमालेतून माझा तोच प्रयत्न राहणार आहे.

shashibooks@gmail.com
(विजय कुलकर्णी यांचे ‘वात्स्यायनाचे जग’ हे सदर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या रविवारी प्रकाशित होईल.)