आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिवस पासबुकाचे!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
६जानेवारी २०१२ रोजी मधुरिमामध्ये ‘आयुष्याचं पासबुक’ या सदरात प्रसिद्ध झालेल्या ‘माझ्या मनासारखं’ या लेखापासून प्रारंभ झालेला व तब्बल ३३ महिने चाललेला पासबुकाचा प्रवास आज काही काळासाठी विश्रांती घेतो आहे. आजपर्यंतचे ५२ लेख हे माझे केवळ प्रत्यक्ष अनुभवच नव्हते तर मानवीय मनोव्यापाराचे अचंबित करून टाकणारे पैलू होते. कल्पनाविलासाच्या भरा-या नव्हत्या तर या व्यक्तींशी समुपदेशन व प्रशिक्षणाच्या निमित्ताने माझी भेट झाली होती. त्यांच्या समस्यांवर समाधानकारक उपाय शोधल्यानंतर याच उपायांचा इतरांना लाभ कसा मिळवून देता येईल, या कल्पनेतून आयुष्याच्या पासबुकाचा जन्म झाला. प्रत्येक विषय वाचकांच्या जिव्हाळ्याचा असल्यामुळे पहिल्या लेखापासूनच वाचकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया व्यक्त करण्यास सुरुवात केली. वाचक प्रतिक्रिया व्यक्त करूनच थांबले नाहीत तर त्यांनी पोहनकर फाउंडेशनच्या नि:शुल्क हेल्पलाइनचा मोठ्या प्रमाणात लाभ घेतला. या लेखांच्या वाचनामुळे मोडकळीस आलेले किती संसार वाचले, आत्महत्येपासून किती अनमोल जीव वाचले याची मोजदाद करणे केवळ अशक्य आहे. मधुरिमाच्या वाचकांप्रति अंत:करणापासून कृतज्ञता व्यक्त करून काही काळासाठी आपल्या सर्वांचा निरोप घेतो. (लेखकाचा दूरध्वनी क्र. ९८२२६९८१०० )