आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोठ्या प्रवासातलं पहिलं पाऊल (चल उड जा रे पंछी)

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ज्या अर्थी पालक मुलांना आपल्यापासून दूर, बाहेरगावी ठेवतात, तेव्हा निश्चितच त्यामागे एक दृष्टिकोन असतो. मुलांना घडवायचे, खऱ्या अर्थाने जगणे शिकवायचे तर त्यांना या विशाल, अथांग आकाशात भरारी घ्यायचा शिकवलेच पाहिजे...

‘जगण्याची ओढ अशी, उडण्याचे वेड असे
घरट्याच्या लोभातही, गगनाचे भव्य पिसे
हे विचित्र दु:ख असे, घेऊनि उरी मी जगतो
घरट्यांतून, गगनातून, शापित मी तगमगतो.’
मंगेश पाडगावकरांची मला आवडलेल्या कवितांपैकी एक कविता. पूर्वी जेव्हा मी ही कविता वाचली होती, तेव्हा या कवितेच्या अर्थाचा परीघ मला केवळ माझ्यापुरता मर्यादित वाटला होता. आज मात्र वाचताना वाटले, ही कविता तर समस्त पालक वर्गाचेच मनोगत व्यक्त करतेय, ज्यांची मुले बाहेरगावी शिकायला आहेत.

जैविक व मानसिकदृष्ट्या कोणतेही पालक आपल्या मुलांना दूर ठेवू इच्छित नाहीत. ज्या अर्थी ते मुलांना आपल्यापासून दूर, बाहेरगावी ठेवतात, तेव्हा निश्चितच त्यामागे एक दृष्टिकोन असतो. येथे दोन बाजू आपल्या दृष्टीस येतात. एकीकडे मुलांवर असलेले प्रचंड प्रेम, पण त्यासोबतच दडपण स्वप्न पूर्ण करण्याचे. एकीकडे चिंता की, मुलांचे आयुष्य घडले पाहिजे, तर दुसरीकडे मुले सुरक्षितदेखील राहिली पाहिजेत. वाटते, मुलांना घडवायचे, खऱ्या अर्थाने जगणे शिकवायचे तर त्यांना या विशाल, अथांग आकाशात भरारी घ्यायचा शिकलेच पाहिजे. त्यांना घरट्याच्या लोभातून मुक्त केलेच पाहिजे. आपण तसे करतोदेखील. पण आपली मानसिक कुचंबणा इतकी विचित्र असते की, पाडगावकरांनी म्हटल्याप्रमाणे मनाच्या द्विधावस्थेत आपण तगमगत राहतो.

सर्वसाधारणपणे बारावी झाल्यानंतर मुले बाहेरगावी शिकायला जातात. तोपर्यंत ती पालकांना सोडून राहिलेली नसतात. पालकदेखील पाल्यांना सोडून राहायला सरावलेले नसतात. त्यामुळे त्यांनाही हे सर्व खूप जड जाते. पण जगाच्या जीवघेण्या स्पर्धेत टिकायचे तर धीरोदात्तपणे पाऊल टाकावेच लागेल ना! एक चिनी म्हण आहे, ‘प्रवास एक मैलाचा असो नाहीतर हजार मैलांचा, प्रवासाची सुरुवात ही अशी पहिल्या पावलानेच होते.’

चार वर्षे झालीत, माझी मुलगी पुण्यात शिकायला आहे. पहिल्या वर्षी थोडी चिंता वाटत होती, पण ती छान रुळली होती. आणि एक दिवस अचानक फोन आला, तिला हॉस्पिटलमध्ये अॅडमिट केलेय. रात्री अचानक खूप पोट दुखायला लागले. तपासणीनंतर ‘किडनी स्टोन’ असल्याचे कळले. त्यामुळे नंतर साहजिकच तिच्या तब्येतीची काळजी वाटायची. अकोला हे छोटेसे शहर. येथे छंद जोपासायला कधीच अडचण आली नाही. माझ्या मुलीला नृत्य खूप आवडते. गायचीदेखील छान. तिचे हे छंद तिला खूप आनंदी ठेवायचे. पण पुणे त्या मानाने मोठे शहर. काही करायचे म्हटले तरी अंतरही खूप.

शिवाय वाढलेला अभ्यास, वेगळे वातावरण, यामुळे तिला तिचे छंद जोपासता येतील की नाही, याची सारखी चिंता वाटायची. सर्वांसाठीच मित्रमैत्रिणी म्हणजे जीव की प्राण असतात. माझ्या मुलीचे काही मित्र बालपणापासून बारावीपर्यंत कायम होते. बारावीनंतर सगळे वेगवेगळ्या दिशेला गेले. आपले काही मित्र असे असतात की, आपल्या भावनेचा निचरा केवळ त्यांच्याजवळच होतो. माझ्या मुलीचे सर्व मित्र वेगवेगळ्या ठिकाणी गेले. त्यामुळेही तिची काळजी वाटायची. नवीन मैत्री ही स्वीकारेल का? ही मैत्री पहिल्या मैत्रीइतकीच गहिरी राहील का?

मी मुलीला आत्मसन्मानाने जगायला शिकवले. तिला मत मांडण्याचा पूर्ण अधिकार घरात होता. तिच्या मताचा सन्मान आम्ही नेहमीच केला. मी तिला अनेकदा सांगायची, तुला निराश वाटले तर माझ्याशी बोलत जा. काही चूक घडली तर मला सांग, मी नेहमी तुझ्या सोबत आहे. कोणतीही चूक आत्महत्या करून जीवन संपवण्याइतकी मोठी नक्कीच नसते. चूक दुरुस्त करता येते.’ एक दिवस माझ्या मुलीचा फोन आला, ‘आई, हॉस्टेलमधल्या एका मुलीने आत्महत्या केली.’ काळजात एकदम धस्स झाले. त्या मुलीची आईच डोळ्यांसमोर आली. काय झाले असेल त्या मुलीच्या आयुष्यात, की तिला आत्महत्या करावीशी वाटली? तेव्हापासून मुलीच्या आवाजात थोडे जरी नैराश्य जाणवले तरी मी अस्वस्थ व्हायचे.

मोठ्या शहरांमधील शिक्षकांमध्ये मला एक उणीव भासली, जी इकडे अकोल्यात कधीच जाणवली नाही. ही शिक्षक मंडळी कधी विद्यार्थ्यांना समजून घेताला दिसलीच नाहीत. (काही सन्माननीय अपवाद असतीलही. हे मोठ्या शहरांमध्ये वाढलेले शिक्षक, यांना ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची मानसिकता कळणार तरी कशी!) एका नातेवाईक मुलीचे आयुष्य अशाच शिक्षकामुळे बरबाद झालेले मी पाहिलेय, जिच्यावर अजून मानसोपचार सुरू आहेत. त्यामुळे शिक्षकांनी केलेला अपमान मुलगी पचवू शकेल की नाही? तिला नैराश्य तर येणार नाही? चिंता, चिंता, सतत चिंता.

मुले आपल्यापेक्षा हुशार असतात. आपल्याला न सांगता अनेक समस्या ते त्यांच्या परीने सोडवतात. पण तरीही जातीय दंगली, त्यात होणारी स्त्रीदेहाची विटंबना, निर्भया प्रकरणासारखी रोज घडणारी प्रकरणे वाचली की, मुलीची खूप काळजी वाटायला लागते. येथे जवळ असताना हट्टाने आईकडून सर्व करून घेणाऱ्या मुलीला कितीही कंटाळा आला तरी सर्व स्वत: करावंच लागतं, अभ्यास सांभाळून. कधी कधी लक्षात येतं की, आपली मुलगी बारावीनंतर बाहेर शिकायला गेली, म्हणजे खरे तर ती सासरी गेल्यासारखेच आहे. कारण शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ती लग्नायोग्यच होणार आहे. त्यामुळे ती घरी येऊन राहण्याचा प्रश्नच उद‌्भवत नाही. हे सर्व लक्षात आले की, माझे डोळे पाणावतातच. पण करणार काय? होईलच सवय हळूहळू. कारण शेवटी...

‘प्यार का पहला खत लिखने में वक्त तो लगता है।
नये परिंदों को उडने में वक्त तो लगता है।
लंबी दूरी तय करने में वक्त तो लगता है।’