आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑनलाइन फराळ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिवाळी अंक हा मराठीजनांच्या दिवाळीचा अविभाज्य भाग. छापील अंकांची परंपरा शंभरहून अधिक वर्षांहून जुनी, तर आॅनलाइन अंकही आता रुळू लागलेले...

दिवाळी आणि फराळ हे जसं अतूट नातं, तसंच नातं दिवाळीचं आणि दिवाळी अंकांचं. बहुतेक घरांमध्ये एक तरी दिवाळी अंक विकत घेऊन वाचला जातोच. अनेक लोक एकापेक्षा जास्त अंक विकत घेतात, किंवा सरळ अंकांची लायब्ररी लावतात. लायब्ररी लावली की तीन-चार महिने पुरतील एवढे अंक वाचायला मिळतात. दिवाळी अंकांची प्रथा महाराष्ट्रात शंभरहून अधिक वर्षांची. ती इतक्या वर्षांत कमीकमी न होता वाढतच जात आहे. दरवर्षी शेकडो दिवाळी अंक प्रसिद्ध होतात. त्यातून अनेक अनुभवी व नवशिक्या कवी व लेखकांचं लेखन वाचकांसमाेर येतं. अनेक आघाडीच्या लेखकांनी त्यांच्या लिखाणाची सुरुवात दिवाळी अंकांपासून केलेली आहे. कथा, कविता, लघुकादंबरी, रिपोर्ताज, चर्चा, व्यक्तिचित्रं आणि व्यंगचित्रं यांनी हे दिवाळी अंक सजलेले असतात.

गेल्या काही वर्षांपासून डिजिटल किंवा आॅनलाइन दिवाळी अंकही प्रसिद्ध होऊ लागले आहेत. हे अंक आंतरजालावर उपलब्ध असल्याने जगभरात कोणीही, कधीही वाचू शकतं, संगणक, टॅब्लेट वा हातातल्या मोबाइलच्या पडद्यावर. या अंकांचं वैशिष्ट्य म्हणजे, हे अंक केवळ वाचनीय नसतात, तर त्यांना दृक‌्श्राव्य अनुभूतीचीही जोड असते. कोणत्याही लेखासोबत अनेक छायाचित्रं तर देता येतातच; पण एखाद्या गाण्याची वा चित्रपटातील दृश्याची लिंक टाकता येते, ज्याने हा वाचनाचा आनंद अधिक समृद्ध होतो. उदा. रेल्वेत चित्रित झालेल्या हिंदी चित्रपटगीतांवरचा लेख छापील अंकात आपण फक्त वाचू शकतो. आॅनलाइन अंकात त्या गाण्यांच्या लिंक दिल्याने वाचता वाचता ती गाणी ऐकू व पाहूही शकतो. अनेक अंकांमध्ये मुलाखती वा पुस्तक अभिवाचनाच्या ध्वनिचित्रफितीही असतात. मुलाखत वाचण्यापेक्षा ती एेकण्यात व पाहण्यात अधिक आनंद नक्कीच मिळतो, याबाबत दुमत नसावं. ऐसीअक्षरे, डिजिटल कट्टा, चपराक, मायबोली, रेषेवरची अक्षरे, पुस्तकविश्व असे आॅनलाइन मराठी दिवाळी अंक वाचकांचे आवडीचे आहेत, व जगभरात जिथेजिथे मराठी माणसं आहेत तिथे हे अंक वाचले जातात. हे अंक पीडीएफ वा ब्लाॅगपोस्ट या स्वरूपात असतात. या अंकांचं आणखी वैशिष्ट्य म्हणजे ते सेव्ह करून ठेवून केव्हाही, कुठेही वाचता येतात. तसंच आवडलेले लेख इतरांसोबत शेअरही सहज करता येतात. अंकाचे संपादक व लेखकांच्या दृष्टीने महत्त्वाचं म्हणजे, प्रत्येक लेख किती जणांनी वाचला व अंकाचे वाचक कोणत्या भौगोलिक प्रांतात आहेत, याचं स्पष्ट चित्र दिसत असतं. जे छापील दिवाळी अंकाबाबत एका मर्यादेबाहेर शक्य नसतं. अंक विकत घेतलेला कळतो, पण तो वाचलाय का किंवा त्यातलं काय वाचलंय, काय आवडलंय, हे या अंकांबाबत शक्य नसतं. आॅनलाइन अंकांमध्ये वाचकांची प्रतिक्रियाही तिथेच दिसते, ती इतर वाचकांनाही दिसू शकते.

महाराष्ट्रासारखाच साहित्यवेडा प्रांत म्हणजे पश्चिम बंगाल. या राज्यात दुर्गापूजेच्या वेळी, ज्याला बंगालीत पूजो म्हणतात, असे अंक निघतात. हे शारदीय नवरात्र म्हणून या अंकांना शारदीय अंक किंवा पूजावार्षिकी म्हणतात. महाराष्ट्राप्रमाणेच बंगाली वृत्तपत्रांचेही असे शारदीय अंक असतात, ज्यांना जगभरातून मोठी मागणी असते. एई समय, देश, वर्तमान, शुकतारा, भ्रमण, नवकल्लोळ, पत्रिका, सानंदा, आनंदलोक, आनंदमेळा, १९-२० (उन्नीश कुरी) असे शारदीय अंक वंगवाचकवर्गात लोकप्रिय आहेत. यातील देश हा अंक आनंदबाझार पत्रिका या वर्तमानपत्र समूहाचा असून तो १९३३पासून प्रसिद्ध होत आहे. तो अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जातो. यात उत्तमोत्तम बंगाली कवी व लेखकांचं साहित्य वाचायला मिळतं.

यंदा कोणकोणते अंक वाचायचे आहेत त्याचा अंदाज घ्यायला लागा, अंकांच्या जाहिराती येऊ लागल्या आहेत. विकत घ्यायचे नसतील तर लायब्ररी लावा, पण चार-पाच अंक तरी नक्की वाचा. डिसेंबरपर्यंत जेवढं वाचून होईल तेवढं आम्हाला कळवा, इतर वाचकांनाही त्याचा फायदा होईल. चला तर, लागा तयारीला.
बातम्या आणखी आहेत...