आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

होरपळ : सीरियातला आक्रोश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दुसऱ्या महायुद्धापासून सिरियामध्ये सुरू झालेले नागरी युद्ध अद्यापही शमलेले नाही. शिया आणि सुन्नी या दोन पंथांमधील या युद्धात आतापर्यंत हजारो-लाखो लोकांना ठार मारण्यात आले, अनेक जण बेघर झाले, अनेक जण बेपत्ता आहेत. या युद्धाची सर्वाधिक झळ बसली ती, महिला आणि मुलींना. यातल्या कित्येकींवर अजूनही पाशवी बलात्कार होत आहेत. अनेक महिला आणि मुली तुरुंगात खितपत पडल्या आहेत. तुरुंगातच त्यांच्यावर पाशवी अत्याचार करण्यात येत आहेत. सिरियामधील हे युद्ध आणखी किती दिवस चालू राहणार आहे? या युद्धात आणखी किती महिला आणि मुलींचा बळी जाणार आहे? सध्या कुणाकडेही या प्रश्नांची उत्तरे नाहीत.
सिरियामधील नागरी युद्धाचा इतिहास हा काही आजचा इतिहास नाही. तिथे धर्माच्या नावावर मानवतेची हत्या करण्याचे प्रकार भूतकाळातही घडत होते. या युद्धाला दुसऱ्या महायुद्धापासूनची पार्श्वभूमी आहे. या हत्याकांडामध्ये लक्षावधी लोक मारले गेले, तेवढेच जखमी झाले किंवा बेपत्ता झाले. या युद्धामुळे सिरियामधील अर्धीअधिक जनता स्थलातंरित झाली. दुर्दैवाने, या इतिहासापासून सिरियाने काहीच बोध घेतला नाही. या हत्याकांडाची जागा आता शिया-सुन्नी या दोन पंथातल्या रक्तरंजित संघर्षाने घेतली आहे. ज्यात भविष्यातील भौगोलिक वादाची आणि दहशतवादाची मुळे खोलवर रुजली आहेत.
खरे तर सन २०११मध्ये मध्यपूर्वेतील अरबी राष्ट्रांसारखी सिरियाने एकदम उसळी घेतली. सरकारविरोधी चळवळ नेस्तनाबूत झाली. ती मोडण्यात आली. परंतु सिरियाचे राष्ट्राध्यक्ष बशर अल असद यांनी या घटनेचे स्वागत केले नाही किंवा या बदलाला प्रतिसादही दिला नाही. उलटपक्षी त्यांनी त्यांच्या भूमिकेला विरोध करणाऱ्यांचा छळ करण्याचे, वेळ पडलीच तर त्यांची हत्या करण्याचे दबावशाही तंत्र अवलंबले. या वादातूनच सिरियामध्ये नागरी युद्धाची बीजे रोवली गेली. या युद्धाचा गैरफायदा घेत वेगवेगळा अजेंडा असलेले धर्मांध बंडखोरांचे हजारो गट तयार झाले. धर्मनिरपेक्ष म्हणवणारेही आता स्वत:ला एक तर जहालमतवादी इस्लामिक किंवा जिहादी समजायला लागले, ज्यांच्यामुळे या युद्धात तेल ओतले गेले. हे नागरी युद्ध अधिक प्रमाणात भडकण्याचा धोका निर्माण झाला. बंडखोर गटांना अजून बळ मिळण्याची भीती निर्माण झाली.
संयुक्त राष्ट्र संघ आणि इतर संस्थांच्या सन २०१३च्या अहवालानुसार, सिरियाच्या नागरी युद्धात जवळपास ९० हजार लोक मारले गेले. सद्य:स्थितीत हा आकडा जवळपास अडीच लाखाच्या घरात गेला आहे. यावरून येथील नागरी युद्धाची तीव्रता किती भयंकर आहे, याची कल्पना आल्यावाचून राहात नाही.
या अराजकतेचा फायदा घेऊनच अनेक इस्लामिक दहशतवादी गट या प्रांतात प्रबळ झाले. त्यांची व्याप्ती वाढत गेली. इराकमध्ये जशी ‘अल कायदा’सारखी दहशतवादी संघटना प्रबळ झाली, तशाच दहशतवादी संघटना सिरियाच्या उत्तर आणि पूर्व प्रांतात निर्माण होऊन त्यांनी त्या परिसरावर आपली पकड घट्ट करण्याचा प्रयत्न केला. याची धग जवळच्या इराकपर्यंत पोहोचली. अशा दहशतवादी संघटनांमुळे सिरियामधील नागरी युद्धात आता बाहेरच्या गटांच्या युद्धाची भर पडली आहे. अल कायदाशी संबंधित असलेल्या दहशतवादी संघटना आता तेथील बंडखोर इस्लामिक गटांशी लढत आहेत. जिहादींना लक्ष्य करत आहेत. अल कायदा या दहशतवादी संघटनेचा भाग असलेल्या ‘नुस्रा’ या गटाने तर सिरियामधील सरकारी दलांनाच लक्ष्य केले आहे.

या धुमश्चक्रीत मात्र प्रामुख्याने निरपराध महिला आणि मुले सापडली आहेत. त्यांना दर दिवशी जहालवादी आणि जिहादी गटांना तोंड द्यावे लागत आहे. या सर्वांकडून त्यांचा अतोनात छळ होत आहे. इसिस आणि इतर जहालमतवादी गटांनी तर आता युद्धाचा भाग म्हणून महिला आणि मुलांचा क्रूर छळ करण्यास सुरुवात केली आहे. बंडखोर गटांमुळे निर्माण झालेल्या नागरी युद्धात सिरियन सुरक्षा दलानेही महिलांना लक्ष्य करून छळायला सुरुवात केली आहे. अनेक महिलांवर पाशवी बलात्कार करण्यात आले. त्यानंतर त्यांना जेलमध्ये कोंडण्यात आले. सिरियामधील तुरुंग आता अशा अबला महिला आणि मुलींनी भरून गेले आहेत.

सिरियन नागरी युद्धात बलात्कार हा एखाद्या साथीच्या रोगासारखा पसरला आहे. हे दुष्कृत्य दोन्हीही गटांकडून केले जात आहे. अर्थात, कोणत्याही युद्धात बलात्कार हा कायमच महत्त्वाचा मुद्दा राहिला असला, तरीही सिरियाच्या युद्धामध्ये ही गोष्ट अतिशय गंभीर मुद्दा बनली आहे. इसिस ही संघटना यात आघाडीवर आहे. महिला आणि मुलींवर बलात्कार करून शिक्षेचे नवीन हत्यार त्यांनी सिरियामध्ये उपसले आहे. त्या माध्यमातून ते समाजामध्ये दहशत निर्माण करत आहेत. त्यातील काही

मुली तर १४ वर्षे वयाच्या आहेत. त्याच्याही पुढे जाऊन ‘इसिस’ने त्या मुलींच्या कुटुंबीयांना बोलावून त्यांच्यासमोर पाशवी बलात्काराची हकिगत सांगण्यास भाग पाडले आहे. फक्त ज्या मुली आणि महिलांनी या अज्ञात तुरुंगात मुलांना जन्म दिला, त्यांनाच फक्त त्या नरकातून बाहेर काढण्यात आले. पण उर्वरित महिलांच्या बाबतीत हे दुष्टचक्र अद्यापही सुरूच आहे. महिला आणि मुलींच्या अत्याचाराला, त्यांच्यावरील बलात्काराला कुठेही अंत दिसत नाही...
उमा श्रीराम
umasri@gmail.com
बातम्या आणखी आहेत...