आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article By V P Diwan In Rasik About Vinoba Bhave And Their Memories In Vai

विनोबा आणि वाई : एक अपूर्व अद्वैत ( शताब्दी स्मरण )

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
२१ जानेवारी रोजी ‘विनोबा वाई आगमन’ शताब्दीस प्रारंभ होत आहे. याच प्रसंगी तेथील कोटेश्वर मंदिराच्या जिर्णोद्धाराचे भूमिपूजन तसेच विनोबांवरील व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने विनोबांच्या वाईमधील जडणघडणीवर प्रकाश टाकणारे हे टिपण…

२१ जानेवारी १९१७ रोजी विनोबा महात्मा गांधींच्या कोचरब आश्रमातून, प्रकृती सुधारणे व अध्ययन हे दोन हेतू ठेवून आपल्या मूळ गावी वाईला आले आणि त्यांनी आजोबांनी बांधलेल्या कोटेश्वर मंदिरात आपला मुक्काम ठेवला.

विनोबा वाईत आले तेव्हा ते २१ वर्षांचे होते. अजून ते ‘विनायक’च होते, विनोबा झाले नव्हते. ज्या गांधींच्या आश्रमातून ते आले होते, ते गांधीही अजून ‘महात्मा’ झाले नव्हते. काठेवाडी पोशाखातील ते फक्त ‘देशभक्त गांधी’ होते, आणि दक्षिण आफ्रिकेतून भारतात येऊन त्यांना जेमतेम दोन वर्षंही झाली नव्हती. विनोबा आले तेव्हा वाईचा चेहरा सनातनी होता. वेदोक्त प्रकरणात शाहू महाराजांना विरोध करणाऱ्या सनातनी कर्मठ ब्राह्मणांचा वाई हा बालेकिल्ला होता.

वाईच्या प्राज्ञपाठशाळेत विनोबांना शांकरभाष्य, उपनिषद व वेदांताचा अभ्यास करण्याचा ‘मोह’ झाला. प्राज्ञपाठशाळेत पाऊल टाकताच प्रथम त्यांनी आपल्या गुरुंना स्वामी केवलानंद सरस्वतींना प्रश्न केला, ‘आपण अस्पृश्यांना वेद शिकवणार का?’ गुरुकडून ‘होय’ उत्तर आल्यावरच त्यांनी तेथे वेदाध्ययनाला सुरुवात केली. त्या वेळी प्राज्ञपाठशाळेतील विद्यार्थी-शिक्षकांवर टिळक-सावरकर याचबरोबर सशस्त्र क्रांतीच्या विचारांचा प्रभाव होता. तेथील एक विद्यार्थी लक्ष्मण जोशी (पुढे तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी नावाने ख्यात पावले) याने आपल्या भाषणात, ‘समाजधारणेस दंडसंस्थेची कशी आवश्यकता आहे’ हे प्रभावीपणे मांडले. विनायकने (विनोबांनी) त्यांचे सर्व मुद्दे खोडून काढले. ‘अहिंसेच्या तत्त्वज्ञानात उदात्त व भव्य राज्यशास्त्रही असू शकते, व अहिंसेचे शौर्य हीच मानवसमाजाची धारणाशक्ती असून शस्त्रसामर्थ्य मानव्यास दुर्बल बनविते व समाजाच्या विनाशाची बीजे रोवते’ हा सिद्धांत सांगून दंडाचे वैय्यर्थ सिद्ध केले.

विनोबा वाईत आले, त्याच वर्षी टिळकांनीही वाईला भेट दिली. हा एक विलक्षण योगायोग आहे. टिळक युगाचा अस्त आणि गांधी युगाचा उदय होत असल्याची एक प्रकारे ही चाहूलच होती. याच काळात विनोबांनी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांना एका पत्रात लिहिले, ‘टिळकांचे युग संपत आले आहे, असे माझ्या प्रवासातील अनुभवावरून निश्चित करता येते. सत्याग्रहाचे शस्त्र लोकांच्या बुद्धीवर नवा प्रभाव पाडील, असे दिसते. आता गांधींचे युग सुरू होईल. गांधींच्या मार्गाशिवाय दुसरा कोणताही मार्ग राष्ट्राला पुढे नेऊ शकणार नाही.’ वाईत आलेल्या २१ वर्षांच्या विनोबांची ही भविष्यवाणी होती!

प्राज्ञपाठशाळेतील विनोबांचे गुरू स्वामी केवलानंद सरस्वती हे अस्पृश्यता निवारण चळवळीचे महात्मा गांधींचे प्रमुख सल्लागार होते. सामाजिक व धार्मिक सुधारणेची दृष्टी असलेल्या केवलानंदांनी ‘धर्मकोशा’ची निर्मिती केली. विनोबांचे त्या वेळचे प्राज्ञपाठशाळेतील शिक्षक परचुरे शास्त्री हे मुळशी आणि स्वातंत्र्यलढ्यातील सत्याग्रहात अग्रेसर राहिले. म. गांधींच्या साबरमती व सेवाग्राम आश्रमात राहिले. दुर्दैवाने, त्यांना कुष्ठरोग झाला व महात्मा गांधींनी त्यांची सेवा केली. त्या वेळचे विनोबांचे सहअध्यायी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी व इतिहास संशोधक ग. ह. खरे यांचे कार्य सर्वश्रुत आहे. शंकरराव देव जे नेहरूंच्या जवळचे व काँग्रेसचे सरचिटणीस झाले. एकाच काळात, एकाच ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणाहून काही मंडळी एकत्र येतात, आपापल्या क्षेत्रात पुढे नाव कमावतात, देशाला व समाजाला दिशादर्शन करतात, हे सारे विलक्षण आहे. त्यामुळे हे केवळ ‘विनोबा वाई आगमना’चे शताब्दी वर्ष नाही; तर एका ऐतिहासिक कालखंडाचे शताब्दी वर्ष आहे.

विनोबांनी वाईतील त्यांच्या आजोबांनी उभारलेल्या कोटेश्वर मंदिरात मुक्काम केला, त्या मंदिरालाही भावे कुटुंबाच्या तीन पिढ्यांची सामाजिक सुधारणेची पार्श्वभूमी आहे. इ. स. १८७०च्या सुमारास विनोबांच्या आजोबांनी हे मंदिर बांधले. त्या सनातनी काळात ते मंदिरात मुस्लिम गवयाचे गाणे ठेवीत. विनोबांच्या वडिलांनी, महात्मा गांधी व जमनालालजींच्या मार्गदर्शनाने हे मंदिर १९२९मध्ये अस्पृश्यांना खुले केले. अस्पृश्यांना खुले झालेले हे वाईतील पहिले मंदिर आहे. याच मंदिरात राहून विनोबांनी महात्मा गांधींच्या ‘सत्याग्रहाश्रमतत्त्वां’चा प्रचार केला.

वाईत वर्षभर राहून विनोबांनी जे कार्य केले, त्याचा अहवाल त्यांनी पत्राद्वारे गांधीजींना कळविला. गांधीजींनी उलट टपाली विनोबांना लिहिले, ‘ईश्वर तुला दीर्घायुष्य देवो आणि भारताच्या उन्नतीसाठी तुझा उपयोग होवो.’ पुढे विनोबांनी ‘भारताच्या उन्नतीसाठी’ जे कार्य केले, त्या सर्व कार्याची बीजे त्यांच्या वाईतील कार्यात आहेत. ‘विनायक’ म्हणून आलेल्या तरुणाला वाईने ‘आचार्य विनोबा’ बनवून देशकार्यास सुपूर्द केले.

shrikoteshwardevtrust.vinoba@gmail.com