आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समथिंग इज बेटर दॅन नथिंग

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लिफ्टची गर्दी पाहून मी हॉस्पिटलच्या पाय-या झटझट चढून वर आलो... बाबा कॉटवर रेललेले. श्वासोच्छ्वास थांबलेला. जबडा उघडा. डोळे पार खोबणीत ओहोटीच्या लाटेसारखे आत गेलेले. त्यांना असं पाहून मी पार हादरून गेलो. पटकन कुणाला बोलवावं, आरडाओरड करावी, असं वाटतानाच ध्यानात आलं की, आता मी त्यांच्या नाकातोंडात श्वास फुंकणार नव्हतो. स्वत:चा संताप, पश्चात्ताप, अशा वेगवेगळ्या भावनांच्या लाटा आवरताना मन म्हणालं, कशाला फुटकळ चहाच्या एका घोटासाठी हॉस्पिटल सोडलं आपण? बाबा म्हणाले होते, ‘वर्जेश, मने घरे लेय जा.’ घरी जाण्याची ओढ त्यांच्यात तीव्र झाली होती. माझ्याशी घडलेला हा त्यांचा शेवटचा संवाद. ते वाक्य आठवून मला गलबलून आलं. हॉस्पिटलच्या इमारती अधिकच दगडी वाटत गेल्या. वरच्या गरगरणा-या पंख्याचं पातं आपल्या गळ्याच्या दिशेनं येतंय की काय, अशा दिवास्वप्नातून जात राहिलो...
मी जर येथेच त्यांच्या कॉटपाशी थांबलो असतो, तर त्यांचे प्राण वाचले असते. काही तरी ट्रीटमेंट होऊन त्यांच्या जिवाची घालमेल मला थोपवता आली असती. म्हणजे, अनाहूतपणे त्यांच्या मृत्यूला मीच जबाबदार होतो. म्हणजे, माझ्या हातून कुठल्याही हत्याराविना एक हत्या झाली का? एक मन म्हणालं, कसला झाटमिंगेल संवेदनशील कवी तू? कुणी तरी एकदा करवादून बोल्लं होतं की, तू कवी आहेस की हजाम आहेस? त्याचं बोलणं कुठे तरी आत आत लागून गेलं. पायाचा मेठा -अंगठा ठेचकाळला. रक्त काळं-निळं पडलं. यापुढे कुणी काळजात सुई जरी टोचली, तरी वेदनेचा साधा उद्गारही आपल्या ओठातून येणार नाही, इतका निबर होत गेलो.
साले खरेच आपण हजामच. कवीबिवी म्हणजे शुद्ध वेडसरपणा. स्वत:ची वाढलेली दाढीही आपण काढू शकत नाही व दुस-याच्या झिंझ्याही उपटू शकत नाही, एवढे परिस्थितीशरण. बाबांना आपण सहज मरू दिलं. त्यांना मरणाची उकळी फुटत होती आणि आपण वाफाळत्या चहाच्या लाटांवर हेलकावे खात बसलो होतो.
आपण एका निष्पाप माणसाची हत्या केली आहे. मात्र, कुठल्याच पोलिस ठाण्यात याचा एफ. आय. आर. नोंदवला जाऊ शकणार नव्हता. हॉस्पिटलच्या लिफ्टमधला प्रसंग भप्पकन नजरेसमोर आला. एक बाई लिफ्टमधून सारखी वर-खाली जात होती. तिला कुणी तरी छेडलं, ठीक आहे ना मिस्टरांना? क्षणात काय झालं कुणास ठाऊक, वेदनेची एक प्रचंड सुनामी लाट तिच्या डोळ्यातून फुटली. अश्रूंचा ओघ वाहू लागला. मी हतबुद्ध झालो. दरदरून घाम फुटला. त्या बाईने पदरानेच डोळे पुसले. लिफ्टच्या कोंडमा-यातून बाहेर आलो. तिच्या वेदनेची झळ घेऊनच पाय-या चढून वर आलो. बाबा इथे शांतपणे कॉटवर. निश्चेष्ट. आपण गोळी लागल्यासारखे. एकांतात तडफडत. रडावं का? म्हणजे आपण शेवटी कधी रडलो? कुणासाठी रडलो? की रडीचे डाव खेळताखेळता रडणंच विसरलोय? की रोज थोडं थोडं रडून घेतोय?
आठवलं. एकदा असाच कॉलेजमधून दुपारी घरी आलो तर काय, घरात फुल राडा. बाबांनी दारूच्या नशेत धूत होऊन धतिंग घातलेलं. काय करावं, समजलंच नाही. बाबांना आवर घालणं पार मुश्कील होऊन गेलेलं. रागाच्या भरात मला एक जाडजुड पट्टी हाताला लागली. त्वेषाने त्यांच्या पायावर सपासप वार करत सुटलो. माझा हा अवतार पाहून सगळे घाबरले. आईने मला ओढलं. शिव्या घातल्या. धुत्कारलं. बाबा पाय घेऊन कळवळत होते. आई म्हणाली, ‘भोसडीना कय थय गयु तो आपणानेच निस्तरवा पडसे.’ मी बसकन मारली. माझ्यातलं हिंस्र जनावर गुरगुरत होतं. लचके तोडून झाले होते समोरच्या बाबाचे की माझे, याचा ठावठिकाणा लागत नव्हता. वाटलं, संपवून टाकावं स्वत:ला. विहिरीच्या तोंडाशी उभं राहावं. मारावी उडी. आपल्याला पोहताही येत नाही. जगण्यापेक्षा मरण एकदम जबरी. सगळ्या गोष्टी सहजसोप्या करून टाकते. मात्र, आपण साले जन्मापासून घाबरगांडू आहोत. कुठे खुट्टं झालं, तरी फाटते. आपण ज्यांच्यावर वार केले, ती अगदी दुबळी व्यक्ती होती.
बाबांचा कॉटवरला लोळागोळा झालेला शरीराचा लगदा व आपण सपासप त्यांच्यावर वार करतोय, ही घटना आपण आता कुठे बसवावी? सगळं संपलेलं आहे. त्यांना घशाचा कॅन्सर डिटेक्ट झाला. तो दिवस अजूनही आठवतो. हे इतकं समजून चुकलं, तरी ते मशीनवर शांतपणे कपडे शिवत होते. मला वाटलं, त्यांना हे समजल्यावर ते कोसळतील. मात्र ते म्हणाले, हे सगळं नाकात असलेल्या सर्दीसारखं. त्यांच्या या बोलण्याने मी अवाक्च झालो. त्यांच्या डोळ्यावर जमा होत जाणारी मृत्यूची साय पाहून रोज थोडं थरथरून घ्यायचो. मला वाटायचं, त्यांना लहान मुलासारखं अल्लद उचलून घ्यावं, त्यांच्या केसातून हात फिरवावा, कपाळाचं प्रेमानं चुंबन घ्यावं. ते म्हणायचे, समथिंग इज बेटर दॅन नथिंग. हे वाक्य आठवून काळीज पुन्हा काळवंडून गेलं. पुन्हा तो सपासप वाराचा प्रसंग आठवला.
एका दुबळ्या शरीरावर प्रेम करण्यापेक्षा आपण का एवढे त्या वेळी क्रूर वागलो? स्वत:ची किळस वाटत राहिली. वाटलं, कुणी तरी पाठीमागून येऊन आपला हात मुरगळावा. पाठीवर रट्टे मारून रक्त येईपर्यंत मारावं. फाटलेल्या जबड्यातून रक्त येऊ देताना सगळ्या गुन्ह्यांची आपण लाळ गाळत कबुली द्यावी. एखादं कन्फेशन बॉक्स शोधावं. सगळ्या प्रश्नांची उत्तरं हू की चू न करता खरीखरी द्यावी. हलकं व्हावं. मात्र, हे हलकं होणं हे लघवीसारखं नसावं. म्हणजे, तुम्ही खूप तुंबलेले आहात व शहराच्या सार्वजनिक मुतारीत लाइन लावून उभे आहात. हे सगळं विचित्र चाललंय. बाबांचं आता जेवण बंद झालेलं आहे, व मला लक्कन आठवून गेलं, दारूच्या धुंदीत त्यांनी जेवणाची भरलेली थाळी आईवर भिरकावून दिलेली. काय आठवतंय, आता हे सगळं. बाबांचा काही एक महिन्याचा खेळ उरलाय. त्यांच्या नाकातली नळी त्यांच्याच हातून निघाली, तेव्हा घरातले वासेही बिथरले. निघालेली नळी घालणार कशी? तडक विरारला डॉक्टरकडे घेऊन गेलो. फक्त नळी टाकण्याचे कुणी माझ्याकडे लाख रुपये जरी मागितले तरी द्यायची तयारी करूनच गेलेलो. काय काय जमवलेलं आहे व ते कसं विकावं, याचा मनातल्या मनात हिशेब करत होतो... डॉक्टरनं दोन मिन्टात नळी टाकली. रिक्षात मी व बाबा एकमेकांचे हात धरून बसून राहिलो. सपासप वाराचा ठणका अधिकच वाढत गेला. वाटलं, आपण कुणावर प्रेम नाही करू शकत. खूप फसवं व तकलादू जगतोय आपण. बाबांच्या देहाची वाळू आपल्या मुठीतून थोडीथोडी घरंगळतेय व आपण दाखवतोय की नाही; हा काय जिवाचा लहानसा तुकडा आपण मुठीत धरून ठेवलाय कधीचा...
varjesh24@gmail.com