आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article By Veera Rathod In Rasik On Death Anniversary Of Namdeo Dhasal

युद्धखोर काव्यपुरुषाच्या सावलीत... ( रग आणि धगधग )

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मृत्यू कुणाच्याच हातात नसतो, हे अंतिम सत्य महाबोधी करुणाकारानेच सांगून ठेवलंय. तरीही ढसाळ मृत्यूला हरवून मृत्युंजय ठरले, कारण ढसाळ असंख्य रोपांच्या रक्त-मुळांत आपला अंश ठेवून गेलेत. तेथून उपसून काढता येणार नाही त्यांना...

‘पद्मश्री नामदेव ढसाळ’ केवळ हे नाव जरी उच्चारले, तरी आपल्या डोळ्यांसमोर उभा राहतो, दलित-वंचितांच्या पिठापासून विद्यापीठापर्यंत लढलेला पँथर! विद्रोहाच्या मशाली पेटवण्यापासून करुणेची आराधना भाकणारा महाकवी! केवळ कविता लिहून जगणारे अनेक असतील; पण कविता जगून, स्वत:ला आगीत झोकून देणारे अपवाद असतात. त्यापैकीच एक ढसाळ होते. अंधार पांघरून काळनिद्रेत निजलेल्या माणसांना शिलगावून उजेडाची गाणी गायला लावणारा, तो एक कबीर होता. वंचितांच्या न्यायासाठी स्वत:चं आयुष्य हसत हसत उधळणारा फकीर होता. त्याने अनंत काळाचे दु:ख भोगणाऱ्या वस्त्यांतील तरुणांच्या हातात विद्रोहाच्या पेटत्या मशाली देऊन नव्या उष:कालाकडे झेपावण्याला प्रवृत्त केले. जुलमाच्या सर्वच शृंखला खिळखिळ्या करण्यासाठी आजन्म युद्धरत राहून समतेची मशाल विझू दिली नाही.

ढसाळांना जाऊन दोन वर्षं झालीत. पण त्यांच्याशी जोडलेल्या आठवणी आजही अस्वस्थ करून जातात. मग केवळ नि:शब्द होऊन शांतपणे या महाकवीचं स्मरण करीत राहून, त्यांची ऊर्जा पुन:पुन्हा आपल्या अंतरंगात निर्माण करण्याचा प्रयत्न करत राहतो. अर्थात, ढसाळांच्या स्मृतिदिनी त्यांची आठवण येणं एक स्वाभाविक गोष्ट, परंतु माझ्यासाठी ती आयुष्यभरासाठीची साठवण आहे. माझ्या कवितेच्या पाठीवर ज्या ज्या थोरामोठ्यांचे आशीर्वादाचे प्रेरणादायी हात पडले, त्यातला पहिला हात नामदेव ढसाळांचा होता. तो माझ्यासाठी कुठल्याही पुरस्कारापेक्षा नक्कीच मोठा होता. जगाच्या दु:खांचा संपूर्ण डोलारा अंगाखांद्यावर घेऊन चालत गेलेल्या या महाकवीला जवळून पाहण्याचं, त्यांच्याशी हितगुज साधण्याचं भाग्य मिळालं. कवितेतल्या या क्रांतीसूर्याची थाप आपल्या पाठीवर पडावी, यासाठी अनेक जण धडपडले असतील, तसा मीही धडपडलो. त्यांचा स्पर्श मला लाभला आणि माझ्या कवितेला चिरंजीवित्वाचा आशीर्वाद मिळाला.

विद्यार्थी असताना जिंदाबाद-मुर्दाबाद करीत, विद्यार्थी चळवळीत वावरत होतो. तेव्हापासून ढसाळांमधल्या पँथर आणि क्रांतिदर्शी मूर्तिभंजक कवीने प्रचंड प्रभावित झालो होतो. ‘रक्तात पेटलेल्या अगणित सूर्यांनो…’ या हाकेने एक गारूड केलं होतं. माझ्यासारखी तांडे, पाडे, वाडी-वस्तीवरची पोरं संमोहित झाली होती. ‘गोलपीठा’पासून ‘गांडू बगीचा’, ‘तुझी यत्रा कंची’, ‘मूर्ख म्हाताऱ्याने डोंगर हलविले’, ‘या सत्तेत जीव रमत नाही’, ‘मी मारले सूर्याच्या रथाचे सात घोडे’, हे सारं वाचताना आपल्यालाही अशी कविता लिहिता येईल काय, असं वाटायचं. मी लमाण-बंजारा, भटके विमुक्त आणि आदिवासींची कविता लिहू लागलो होतो. सारे मित्र कौतुक करायचे. आमचं दहा-वीस जणांचं टोळकं पैठण गेटला इर्शाद हॉटेलवर रात्र रात्र चहा-सिगारेटसोबत चळवळ, समाज, साहित्य आदी बाबींवर गहन चर्चेत डुंबायचं. तेव्हा सचिन तायडे आणि मी रूम करून राहायचो. सिद्धार्थ मोकळे नावाचा चळवळीचा प्रचंड किडा असलेला मित्र रूमवर यायचा. तसा तो आमचा परमनंट ‘गेस्ट’ होता. तेव्हा सचिन म्हणायचा, तुझ्या कवितेला ढसाळांची प्रस्तावना घेऊयात. तेव्हा ते अशक्य वाटायचे. एवढा मोठा कवी लिहील का आपल्या कवितेवर? सारं कल्पनेत होतं, तेव्हा. पुढे सिद्धार्थ, सचिन मुंबईला गेले. सचिन म. टा., चित्रलेखात काम करू लागला. सिद्ध्या आत्मभान संघटनेचं काम करायचा. याच दरम्यान सिद्धार्थने माझ्या काही कविता ढसाळांना ऐकवल्या. त्या त्यांना नवीन वाटल्या आणि आवडल्याही. नंतर सिद्धार्थने थेट प्रस्तावनेविषयीच बोलून टाकले. ढसाळांनीही होकार दिला. मग माझ्या गाडीचे मीटर जोरात धावू लागले. फोनवर बोलणं, पुढे प्रत्यक्ष भेटणं, कविता ऐकवणं सुरूच होतं. पहिल्यांदा जेव्हा फोनवर बोललो होतो, तेव्हा किती भारावून गेलो होतो म्हणून सांगू? फोनच खाली ठेवावा वाटत नव्हता. भेटून कविता ऐकवल्यावर त्यांची दाद मिळणं म्हणजे, आनंदाचे उत्सव साजरे करीत होता माझ्यातला कवी. ढसाळांना भेटल्यावर, आत्माराम राठोड, मोतीराज राठोड, डॉ. ऋषीकेश कांबळे (जे त्यांच्यासाठी ‘ऋष्या’ होते) इथपासून मराठवाड्यातली विद्यार्थी च‌ळवळ, भटक्या विमुक्तांची चळवळ अशी बरीच चर्चा व्हायची. त्यांच्याशी बोलताना प्रचंड भीतीही वाटायची. आपलं बोलताना काही चुकलं तर हा पँथर तासून काढेल, वाटायचं. पण जवळ गेल्यावर कळले की, हा विद्रोही पँथर आतून किती निरागस आणि हळव्या मनाचा आहे ते. राहून राहून वाटायचं, मीच उशीर केला या महाकवीपर्यंत पोहोचण्यात.

एकदा डॉ. प्रफुल चौधरी या माझ्या डॉक्टर मित्राला घेऊन ढसाळांना भेटायला बॉम्बे हॉस्पिटलमध्ये गेलो होतो. प्रफुलला फारसं माहीत नव्हतं ढसाळांबद्दल. मी त्याला सांगितलं, पँथरपासून पद्मश्रीपर्यंत बरंच काही. त्याला तेव्हा वाटले नाही, हा एवढा मोठा माणूस आहे म्हणून. पण ढसाळ गेल्यावर बरेच दिवस माध्यमांतून ढसाळांवर चर्चा सुरू होती, तेव्हा कळलं त्याला ढसाळ किती मोठे होते ते. आणि दुर्दैवाने, याच दरम्यान माझी कवितेची स्क्रिप्ट काही प्रकाशकांकडून साभार परत आली होती. काहींनी वारेमाप रक्कम मागितली होती. प्रफुलला आश्चर्य वाटले, ढसाळ या कवितेवर लिहिणार होते, तर प्रकाशक हे पुस्तक का नाकारताहेत? त्याला प्रकाशन विश्वातले लागेबांधे माहीत नव्हते. प्रसिद्ध प्रकाशकाकडे कुणाचा तरी वशिला लागतो, नाहीतर कुण्यातरी कळपातलं मेंढरू असावं लागतं. तेव्हा कुठे काम जमतं. खरं तर ढसाळांनी शब्द दिल्याप्रमाणे एक रेघ जरी ओढली असली तरी पुरेसं होतं. कधीकधी नियतीही साथ देत नाही, असंच काहीसं झालं होतं, माझ्या कवितेच्या बाबतीत. शेवटी प्रफुलने पैसे लावले, नि ‘सेनं सायी वेस’ छापली गेली. कसलीच ओळख नसताना सिद्ध्यासारख्या एका सामान्य पोराचे ऐकून ढसाळांनी पाठराखणी करण्याचा भरवसा दिला, हे केवळ आमच्या दु:खांची जातकुळी एकच असल्यामुळे.

सुदाम राठोड आणि मी मुद्दाम तब्येतीबद्दल विचारपूस करायला गेलो, तेव्हा बराच वेळ स्वत:ला विसरून ढसाळ बोलत होते आणि आम्ही ऐकत होतो. अधूनमधून कविता ऐकवत होतो. नव्या लिहित्या पोरांबद्दल ढसाळ आवर्जून बोलायचे. दलित साहित्यात जे साचलेपण आलंय ते भटके विमुक्त, आदिवासी पोरांनी लिहिते झाल्याने दूर होईल, असं वाटायचं त्यांना. म्हणूनही कदाचित सुदामची कविता आंबेडकर प्रबोधनी प्रकाशनच्या वतीने काढूयात, असंही ते म्हणाले होते. सुदामने त्यांच्यावर लिहिलेल्या कवितेतल्या ‘हे कव्या, तू या शतकाचा भाष्यकार आहेस, तुला नुसता दलित तरी कसा म्हणू, तू अखिल माणसांचा पक्षकार आहेस.’ या ओळी ऐकताना भरून आलं होतं. ढसाळांचा त्यांच्या मित्रांमध्ये फार जीव होता. हॉस्पिटलमध्ये असताना कधीकाळीचे जिवाभावाचे मित्र भेटायला आले नाहीत. तुम्ही पोरं किती जीव लावता, पुन्हा पुन्हा विचारपूस करता.... एखाद्या पहाडाला भावूक होऊन बोलताना मी अनुभवत होतो. मित्रांचे शल्य त्यांच्या मनात शेवटपर्यंत राहिले असावे कदाचित.

जन्मभर तरुण मनाने तरुणांसारखा जगलेला, तरुणांची भाषा बोलणारा तरुण कवी, कार्यकर्ता शेवटच्या श्वासापर्यंत लिहिता होता. ‘दलित पँथर एक संघर्ष’ याच काळात पूर्णत्वाला आले. वर्तमानपत्रात स्तंभलेखनही चालूच होते. बहुधा कुण्या तरी संपादकाचा त्यांना फोन आलेला होता. लेखाबद्दल काहीतरी चर्चा सुरू होती. बोलता बोलता अचानक ढसाळ गरम झाले आणि फोनवरील त्या व्यक्तीला झापू लागले, ‘तू म्हणशील तसं लिहायला ढसाळ काय मागणी तसा पुरवठा करणारा लेखक वाटला की काय? इथं खाटल्यावर पडून मी काही टाइमपास म्हणून लिहीत नाही. माझा लेख एडिट करायला फार मोठा समजतोस का? ढसाळ मानधनासाठी लिहीत नाही, एवढी गोष्ट ध्यानात ठेवावी. आता पुढचे लेख मला देता येणार नाहीत.’ आणि त्यांनी फोन कट केला. आम्ही गंभीर झालो होतो. ते पुन्हा हसून आमच्याशी गप्पा मारू लागले. मी विस्मयचकित होऊन त्यांच्या या भावमुद्रा टिपत होतो. त्यांची लेखनाप्रतीची निष्ठा, आपल्या विचार-भूमिकेतला ठामपणा, करारीपणा, मोकळेपणाने दाद देणे, सतत नवा विचार त्यांच्या बोलण्यातून येत असे. मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच एखाद्या मृत्युंजय माणसाला इतक्या जवळून अनुभवले. कुठल्या क्षणाला काय होईल, याची शाश्वती नसताना हा महाकवी जगावर, जगातल्या दु:खावर, वंचितांच्या स्वप्नांबद्दल गंभीर होऊन बोलत होता. साक्षात मृत्यू दारात उभा असतानाही त्याला न घाबरता हसून त्याच्याशी संवाद साधत होता. मृत्यूचे असे मित्रवत स्वागत करणे पाहून मृत्यूही बराच काळ या वाघाला स्पर्श करण्यासाठी नक्कीच घाबरला असणार.

राहून राहून वाटतं, अजून काही दिवस हा क्रांतिकवी जगायला हवा होता. तशीही काही त्याच्या जाण्याची वेळ नव्हती; पण मृत्यू कुणाच्याच हातात नसतो, हे अंतिम सत्य महाबोधी करुणाकारानेच सांगून ठेवलंय. तरीही ढसाळ मृत्यूला हरवून मृत्युंजय ठरले, कारण ढसाळ असंख्य रोपांच्या रक्त-मुळांत आपला अंश ठेवून गेलेत. तेथून उपसून काढता येणार नाही त्यांना. उद्या नक्कीच या रोपांना त्यांच्या विचारांची फुलं-फळं लगडतील. त्यांनी म्हटल्याप्रमाणे दलित-पीडित-वंचितांची एखादी माउली जन्माला येईलच, या आसेवर प्रचंड विश्वासाने आम्ही किल्ला लढवत राहू पँथर… तुझ्यातल्या युद्धखोर काव्यपुरुषाला… जयभीम!

veerarathod2@gmail.com