आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article By Vidya Athalye, Madhurima, Divya Marathi

आनंदी मन, निरोगी शरीर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

1975 मध्ये मी नोकरीवर रुजू झाले तेव्हा स्त्रियांनी नोकरी करण्याचे नावीन्य उरलेच नव्हते. उलट बहुतेक विवाहोत्सुकांना नोकरी करणारी पत्नी हवी असण्याचा जमाना होता. मध्यमवर्गीय कुटुंब असल्याने मी वडिलांच्या सल्ल्यानुसार एलआयसी पॉलिसी काढली, त्यातील पूर्णत्वाची तारीख होती मे 2012. त्या वेळी मनात आलेले विचार आजही स्पष्ट आठवतात, इतकी वर्षे आपण खरेच एकच नोकरी, तीही इतरांच्या दृष्टीने रटाळच, करणार आहोत का? काय असू आपण 2012मध्ये?
आज तब्बल 38 वर्षे नोकरी पूर्ण करून निवृत्त झाल्यावर मनात विचार आला, अरेच्चा, 38 वर्षांचा काळ लहान नव्हता. दिवस किती वेगाने गेले. रेमिंग्टन टाइपरायटर जाऊन कॉम्प्युटर वापरायला सुरुवात करूनही 15 वर्षे उलटली. गावाबाहेर असलेला शांत निसर्गरम्य विद्यापीठाचा परिसर, जूनमध्ये फुलणारा बहावा, रम्य पुरातन महादेवाचे देऊळ, लौकिक अर्थाने लघुलेखकासारखी रटाळ नोकरी (जी मला कधीच रटाळ वाटली नाही.) आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या प्राध्यापकांच्या हाताखाली काम करताना खूप शिकायला मिळाले. माणूस म्हणूनही अत्यंत बुद्धिवंताचा सहवास लाभला. अपवाद वगळता एखादाच स्वार्थी, न्यूनगंड असलेला अधिकारी भेटला, पण या सगळ्यांनी आयुष्य समृद्ध केले. प्रपंच सुरूच होता, मुलींचे बालवय, शाळा, मग तरुणपण, कॉलेज, सासूसास-यांची मदत, त्यांचे आजारपण, सृष्टी नियमानुसार चक्र सुरूच होते. मुलं लहान लहान म्हणेपर्यंत गोड नात आयुष्यात आली. आजीची पदवी मिळाली. मग सतत नातीला भेटण्याची ओढ, पण अजून 4-5 वर्षे नोकरी होती. मग निवृत्तीचे वेध लागले. पण नोकरीतील शेवटची वर्षे प्रचंड कामात गेली. काही विचार, नियोजन करायला वेळच मिळाला नाही. सभोवताली होणा-या बदलाचा वेग थक्क करणारा होता. कार्यालयात नवीन तरुणांची भरती झाली होती. सर्व जण संगणकावर सफाईने काम करत; पण झाले काय की काम लवकर संपून मोबाइलवर गप्पा गाणी सुरू असत. सर्वांच्या वागण्यात एक छानसा मोकळेपणा असे. मनुष्य स्वभावानुसार वादावादी होई; पण मी जेव्हा नव्याने रुजू झाले होते, तेव्हा महिलांचे गट होते. पुरुष सहका-यांशी कामाव्यतिरिक्त कोणीच सहसा बोलत नसे. पण अलीकडे सगळ्यांच्याच वागण्यात खूप मोकळेपणा आला. एकमेकांना पहिल्या नावाने हाक मारण्याची प्रथा मनाला भावून गेली. नोकरीत असल्यामुळे सर्वच बाबतीत वेळा पाळण्याची बंधने होती व त्यातूनच रोजच्या आयुष्यालाही एक शिस्त होती. वेळ जात नाही असा प्रश्न न पडता, वेळ कुठून आणू असाच प्रश्न पडे. निवृत्तीनंतर ब-याच गोष्टी करण्याचे मनसुबे रचले जात.
प्रत्यक्ष निवृत्ती झाली आणि आता तुमचा वेळ कसा जातो, असे प्रत्येक जण विचारू लागला. खरंच निवृत्त होऊन 18 महिने झाले. कार्यालयाचा परिसर, सहकारी आठवतात, पण रितेपण अजून तरी जाणवले नाही. खूपशी पुस्तके वाचायची राहिली होती. काही वाचलेली पुन्हा वाचली. नव्याने अर्थ लावण्याची सवय लागली. वृत्तपत्रांतले अग्रलेख, अगदी शब्दकोडी सकाळी पहिल्या चहाबरोबर वाचायची (निवांतपणे) मजा खरेच और. मग खूपशा किचकट, न जमणा-या पाककृती उत्कृष्ट जमायला लागल्या. आईचे बोल आठवले. डोके शांत ठेवून केलेले सर्व काम जमतेच, पण ते शांत ठेवायला वेळच नव्हता आणि आता वेळच वेळ. मनातल्या मनात खूप मजा वाटली. मग खूप परिचितांना, मैत्रिणींना भेटायचा बेत आखला. पण या बाबतीत चक्क निराशा पदरी पडली. फोनवर छान गप्पा मारणारे प्रत्यक्ष घरी गेल्यावर तितकेसे खुश नसत. त्यांचे व्याप असत. शिवाय कोणाला ठरावीक वेळेत मालिका बघायच्या असत. मग भेटी देणे कार्यक्रम आटोपता घ्यावा लागला. वेळेअभावी रखडलेले पर्यटन सुरू केले व खरेच आपल्या देशाला लाभलेला समृद्ध निसर्ग, त्याचे मनोहारी आणि रौद्र दर्शन जीवन समृद्ध करू लागले. एक मात्र नक्की, तुम्ही खूप आनंदी असा, निराश असा, एकटे असा अथवा जोडीदाराबरोबर; निसर्ग तुमच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनतो आणि आयुष्य अधिक अर्थपूर्ण करतो.
नोकरीमुळे मिळालेल्या मैत्रिणी हा तर निवृत्त आयुष्यातील अमूल्य ठेवा आहे. ब-यापैकी लाभलेली निरोगी प्रकृती हीसुद्धा नोकरीची देणगी आहे. आयुष्यात अजून काय हवे? आनंदी मन, निरोगी शरीर, हवे ते करायला हवे तिथे जोडीदारासह जायला खूपसा मोकळा वेळ.


vidula.athalye@gmail.com