आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कामशास्त्र आणि चौसष्ट कला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जीवन ही एक कला आहे. ती समजून-उमजून शिकली पाहिजे, त्यासाठी सातत्य आणि संयम बाळगला पाहिजे. एकदा हे साधले की, जीवन सुखकर होण्यास मदत होते. कामशास्त्राच्या शिक्षणात ६४ कलांची महती सांगताना वात्स्यायनाला नेमके हेच सूचित करायचे होते.

विवाहापूर्वी कन्येला कामशास्त्राचे शिक्षण योग्य प्रकारे विश्वासू आणि अनुभवी स्त्रीकडून द्यावे, असे वात्स्यायनाने कामसूत्रामध्ये नमूद केले आहे. सदर कन्येला कामशास्त्राचे शिक्षण देण्यासाठी सहा प्रकारच्या स्त्रीआचार्यांचे वर्णनही वात्स्यायन करतो. या सहापैकी कोणत्याही एक प्रकारच्या स्त्रीकडून कन्येने कामशास्त्राचे शिक्षण घ्यावे. स्त्रीआचार्यांचे वात्स्यायनाने सांगितलेले सहा प्रकार पुढीलप्रमाणे आहेत.

१) स्त्रीपुरुष शरीरसंबंधाचा अनुभव असणारी धात्री कन्या, २) अशाच प्रकारची अनुभव असलेली विश्वासू सखी, ३) कन्येच्याच वयाची मावशी, ४) मावशीसारखी विश्वास योग्य अशी वयस्कर दासी, ५) चांगल्या स्वभावाची पूर्व परिचित संन्यासिनी किंवा ६) वयाने मोठी बहीण.
ज्या स्त्रीकडून कामशास्त्राचे शिक्षण घ्यायचे, तिने त्या कन्येला हे शिक्षण एकांतात द्यावे, असेही वात्स्यायन सुचवतो. कामशास्त्राचे शिक्षण घेताना कन्येला कामशास्त्राला पूरक ठरणाऱ्या ६४ कला अवगत असाव्यात, असे पुढे तो सांगतो. या कला पुढीलप्रमाणे-

१. गीतम् – गाणे, २. वाद्यम् – वाद्य वाजवणे, ३. नृत्यम् – नृत्य करणे, ४. आलेखम् – चित्रकला, ५. विशेषकच्छेद्यम् – भोजपत्राच्या पानांना कुंकवाच्या आकारात कापणे, ६. तन्डुलकुसुमवलीविकाराः – पूजेसाठी तांदूळ आणि विविध रंगी फुलांची सजावट करणे, ७. पुष्पास्तरणम् – घराला फुलाने सजवणे, ८. दशनवसनाड़रागः – शरीर, कपडे आणि दातांना रंग लावणे, ९. मणिभूमिका कर्म – जमिनीवर मणी टाकून सजवणे, १०. शयनरचनम् – शय्या तयार करणे, ११. उदकवाद्यम् – पाण्यातून ध्वनी तयार करणे, १२. उदकघातः – कलात्मक पद्धतीने जलक्रीडा करणे, १३. चित्रयोगाः – विविध औषधे मंत्र, तंत्र यांचा प्रयोग करणे, १४. माल्यग्रथनविकल्पाः – विविध प्रकारच्या माळा तयार करणे, १५. शिखरकापीडयोजनम् – डोक्यावर आभूषण धारण करणे, १६. नेपथ्यप्रयोगाः – वस्त्रअलंकार यांनी सजणे, १७. कर्णपत्रभडः – विविध अलंकाराने सजणे, १८. गन्धयुक्तिः – काही द्रव्य मिसळून सुगंधी मिश्रण तयार करणे, १९. भूषणयोजनम् – आभूषणामध्ये मण्याची गुंफण करणे, २०. ऐन्द्रजालयोगः – इद्रजाल क्रीडा करणे, २१. कौचुमारयोगाः –कुचुमार तंत्रात सांगितलेले योग, २२. हस्तलाघवम् – हातांमध्ये हळुवारपणा आणणे, २३. विचित्रशाकयुषभक्ष्यविकारक्रिया – विविध प्रकारे भोजन बनवण्याचे कौशल्य..., २४. पाकरसरागासवयोजनम् – पेयप्रदार्थ बनवण्याचे कौशल्य, २५. सुचीवानकर्मानी – सुई ओवणे, शिवणकला, २६. सूत्रक्रीडा – हस्तसूत्राने विविध चित्रे काढणे, २७.

वीणाडमरुकवाद्यानी – वीणा, डमरू अशी वाद्य वाजवणे, २८. प्रहेलिका – प्रहेलिका, २९. प्रतीमाला – प्रतीयोगीतेचे कौशल्य, ३०. दुर्वाचक योग – कठीण श्लोकाचे उच्चार करणे, ३१. पुस्तकवाचनम् – पुस्तक वाचण्याची कला, ३२. नाटकाख्यायिकादर्शनम् – नाट्य, ऐतिहासिक कथा यांचे ज्ञान, ३३. काव्यसमस्यापूरणम् – कवितेद्वारे समस्या पूर्ती, ३४. पटिकावेत्रवानविकल्पाः – वेताच्या विविध वस्तू बनविणे, ३५. तक्षकर्मानी – विविध भांड्यांवर नक्षीकाम करणे, ३६. तक्षणम् – मोठेपणा, ३७. वास्तूविद्या – गृहनिर्माण कला, ३८. रुप्यरत्नपरीक्षा – रुपये, रत्न यांची परीक्षा, ३९. धातुवादः - धातूशास्त्र, ४०. मणीरागाकरज्ञानम् - मणी रंगवण्याचे ज्ञान, ४१. वृक्षायुवेदयोगाः – वृक्ष तथा सर्व वनस्पतींची चिकित्सा, ४२. मेषकुकुटलावकयुद्धविधिः – कोंबडा तसेच विविध प्राण्यांच्या लढाया, ४३. शुक-शारीकाप्रलापनम् – पोपट, मैना यांना शिकवणे, ४४. उत्सादने संवाहने केशमर्दने च कौशलम् – शरीर आणि डोक्याचे मालीश करण्याची कला, ४५. अक्षरमुष्टीकाकथनम् – सांकेतिक अक्षरांचे अर्थ समजून घेणे, ४६. म्लेच्छितविकल्पाः – गुप्तभाषा जाणून घेण्याची कला, ४७. देशभाषाविज्ञानम् – विविध देशांतील भाषांचे ज्ञान, ४८. पुष्पशकटिका – फुलांनी विविध वस्तू सजवणे, ४९. निमित्तज्ञानम् – शकुन विचार, ५०. यंत्रमातृका - स्वयंचलीत यंत्रांचे ज्ञान, ५१. धारणमातृका – स्मरणशक्ती वाढवण्याची कला, ५२. सम्पाठ्यम – पाठांतराची कला, ५३. मानसीकाव्यक्रिया – विविध अक्षरांनी श्लोक बनवणे, ५४. अभिधानकाशः – शब्दकोशाचे ज्ञान, ५५. छन्दोज्ञानम् – छंदांचे ज्ञान, ५६. क्रियाकल्पः – काव्यलकारांचे ज्ञान, ५७. छलितयोगाः – बहुरूपी होण्याची कला, ५८. वस्त्रगोपनानी – विविध प्रकारचे वस्त्र धारण, ५९. घृतविशेषः - विविध प्रकारच्या घृतांची कला, ६०. आकर्षक्रीडा – आकर्षक खेळ खेळण्याची कला, ६१. बालक्रीडनकानी – लहान बालकांच्या विविध खेळांचे ज्ञान, ६२. वैनयिकिना विद्यानां ज्ञानम् – नम्रता शिकवणाऱ्या विद्येचे ज्ञान, ६३. वैजयिकीना विद्यानां ज्ञानम् – विजय मिळून देणाऱ्या विद्यांचे ज्ञान, ६४. व्यायामिकीनां विद्यानां ज्ञानम् – व्यायाम विद्येचे ज्ञान.

वात्स्यायनाने ६४ प्रकारच्या कला विवाहापूर्वी कन्येने आत्मसात कराव्या, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. या कलांचा नीट अभ्यास केल्यास, त्या कन्येला विवाहानंतरचे जीवन सुखकर पद्धतीने जगता येईल, असे त्याला वाटते. आजही आपली मुलगी सासरी गेल्यावर तिने कसे वागावे, सुखी संसार करण्यासाठी आवश्यक गोष्टी कोणत्या, या संबंधीचा विचार सर्व पालकांनी करायला हवा. या विचारासाठी वात्स्यायनाने केलेले मार्गदर्शन आजच्या सर्व कन्यांसाठी आणि त्यांचा पालकांसाठी अत्यंत उपयुक्त असे आहे. कारण या मार्गदर्शनात ज्या कलांचा उल्लेख आहे, त्यामध्ये पाककला आहे, चित्रकला आहे, तसेच शय्या सजवण्याची कला आहे, इतकेच नाही तर विविध औषधीचे ज्ञान आणि लहान बालकांच्या खेळण्याचे ज्ञान मिळवण्याची कला आहे.

एखाद्या स्त्रीला विवाहानंतर सुखी संसारासाठी या सर्व गोष्टींचे ज्ञान मिळवणे आजही गरजेचे आहे, हे लक्षात घेतल्यास आजच्या समाजाने वात्सायनाने केलेले मार्गदर्शन अभ्यासले पाहिजे.
(ayurvijay23@rediffmail.com)
बातम्या आणखी आहेत...