आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article Creativity Behind Making Poem By Veera Rathod

काव्यार्थ - कविता माझी माय, माझी सखी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कवितेची नी माझी भेट झोळीत झुलताना पासूनची असे सांगणारे नवाेदित कवी वीरा राठाेड मुळचे अाैरंगाबादचे. एकीकडे प्राध्यापक म्हणून अापली नाेकरी संाभाळताना दुसरीकडे लहानपणापासून काव्यविश्वाशी जाेडली गेलेली नाळ जपणाऱ्या या कवीस अनंत फंदी पुरस्कारासारख‌्या पुरस्कारांनीही कविता करण्यास एकप्रकारे प्राेत्साहनच दिले. त्यांच्या कवितेमागच्या भाववृत्तीचा हा धांडाेळा :

मायीने पान्हा पाजावा अन् अंगात बळ यावं. सखीने ओठांवरून फिरवावे ओठ ज्याने सारा पाश झुगारून जगण्याला सामोरं जाण्याची ऊर्मी यावी. नुकत्याच पावलं टाकणाऱ्या लेकराने बोट धरून चालण्याचा आग्रह धरावा नि कुठलाच किंतु परंतु मनात न येता आपली पावले मुकाट चालती व्हावी, याहून जगण्याला लागतं तरी काय, बस तृप्त होऊन जगत राहावं हीच तर असते ना कविता. व्यक्ती माय आणि सखी या दोन ठिकाणी संपूर्ण रिता होत असतो. आणि जो कवी असतो त्याला तिसरं हक्काचं स्थान असतं ते कवितेकडे. गोंधळून गेलेल्या, भोवतालच्या अंधाऱ्या कोलाहलाला घाबरलेल्या, हतबल-निराश झालेल्याला माय व सखीची कूसच शांत करीत असते, धीर देत असते. साऱ्या प्रार्थनांचे अर्थ इथेच जन्म घेत असतात आणि इथेच कळतही असतात. अशीच कूस बहुधा कवितेला लाभलेली असावी, अशी माझी भाबडी धारणा आहे. म्हणूनच मला लिहावे वाटते की, ‘तू अबोला घेऊ नकोस, जगण्याचा रस्ता सरकेल हाताशी आलेला.’
तशी कवितेची नी माझी भेट झोळीत झुलताना पासूनची. कविता वा गीत हे तसे मी माझ्या लमाण बंजारा संस्कृतीची देण मानतो. त्याला कारण असे की, जोपर्यंत मला कवितेचा अर्थ कळला नव्हता तोपर्यंत माझ्यासाठी माझ्या कवितेची पायाभरणी ही तांड्यातली गीत काव्यमय जीवनपद्धती होय. मला शब्द कळू लागल्यावर पहिल्यांदा माझ्या कानात शिरलेली आिण जिभेवर आरूढ झालेली ही लमाण-बंजारा लोकगीते. याडी(आई) आजीबरोबरच तांड्यातल्या असंख्य बाया बापुड्यांनी गीतांचा लळा लावला, माझ्या कवितेची भूमी तयार करून भरणी पेरणी केली. सुखात तर सारेच आनंदात गातात, पण सुखाबरोबरच दु:खातही आेठांवरचं गीत खाली न पडू देता त्याला हसवण्याचे प्रयत्न करणारी माझ्या याडीची आर्त व्याकूळ ‘ढावलो’(दु:खभरले गाणे) गीते माझ्या मनावर विलक्षण प्रभाव पाडून गेलेली आहेत. त्यांच्या प्रभावातून अजूनही बाहेर पडू शकलो नाही. तांड्यातल्या कुठल्याही सण समारंभात स्त्री-पुरुष, लहान थोर मिळून दिवस दिवस, रात्र रात्र नाचत गात असह्य जगण्याचे आेझे लीलया पेलून नेण्याची अवघड कला या गीतकाव्याच्या साह्यानेच शिकली आिण माझ्यापर्यंत पोचती केली. ज्याचंच रूप ‘सेनं सायी वेस’ म्हणजे सर्वांचं कल्याण कर म्हणता येईल.
कवितेकडे वळण्याचे नेमके एक कारण मला सांगता येणार नाही. पण जसजसे जीवन कळू लागले, जीवनातील दाहकता पोळू लागली, वास्तव अंगाला भिडू लागले, जीवनातील दाहकता पोळू लागली, वास्तव अंगाला भिडू लागले, तेव्हा मनातली कालवाकालव, अस्वस्थता, भरून आलेल्या मनाचा बांध आसवांसोबत शब्दाचे रूप घेऊ लागला. तंाड्यातल्या इतर बापांप्रमाणेच माझाही बाप दारूत आकंठ बुडालेला. याडीनं सारं सारं सोसलं, मरणापलीकडचं. नात्यागोत्यातल्या आप्तस्वकियांनी हात वर केले. तेव्हा कुणाला सांगणार होतो, हे दु:खभरले गाणे. सांगायला कविताच तर होती तेवढी जवळची. मी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना कविता अभ्यासत होतो, एेकत होतो, अनेक कवी भेटत होते, पण माझ्या मनात दडून बसलेल्या कवितेला वाट मोकळी करून दिली डॉ. शत्रुघ्न फड नावाच्या सज्जन व्यक्तीने. कालांतराने मला वेगवेगळ्या आशयाच्या, शैलीच्या, धाटणीच्या, विचारांच्या भिन्न भिन्न प्रवाहातील कवितांची आेळख करून दिली कवी पी. विठ्ठल यांनी. या माझ्या दोन गुरुंच्या उपकारातून मी कधीच उतराई होऊ शकणार नाही, ज्यांनी मला कवितेच्या सागरात उडी मारायला शिकविले.
मी कविता का लिहितो, याचे उत्तर मला देता येणार नाही. कारण मी आजपर्यंत कविता लिहिली नाही तर मी जे काही जगलो, जगतोय, त्याचे कविता हे एक शब्दरूप चित्र आहे. ते अनुभवच इतके दाहक होते की, कधीच कोणत्या कवितेला शब्दांसाठी, रचनाबंधासाठी, प्रतिमा-प्रतीकांसाठी अडून बसण्याची गरज पडली नाही. तिने जशा आेठावर भावना आल्या तशा सरळसरळ आपल्या व्यथांचा जाहीरनामा वाचून टाकला. म्हणूनच मला कुठल्याच अनुभवांशी प्रतारणा करावीशी वाटली नाही. हे स‌र्व करताना माझ्यासमोर होता तुकाराम, माझ्यासमोर होता कबीर, गालीब, सुर्वे आिण ढसाळ. आपण दुर्लक्षिलेल्या जगातले म्हणून साहजिकच माझ्या कवितांचे विषयसुद्धा दुर्लक्षिलेल्यांच्या जगातलेच. या जगण्याने मला जीव दिला, भोवतालच्या मातीने माझी मुळं पोसली. बरीचशी दमछाक होत राहिली, पण यातूनच माझ्या कवितेची भूमी आिण भूमिका तयार होत गेली. माझ्या कवितेला मी केवळ कविता मानत नाही तर तिला जीवनशोधाची परिक्रमा मानतो. या प्रवासात माझी पावलेे कुठे अडखळू नयेत, माझा आ‌वाज कुठे दाबला जाऊ नये, माझ्या मनात कुठल्याही भीतीने घर करू नये, म्हणून मी तिच्या हातात हात दिलाय. माझी कविता मला प्रामाणिक जगण्याचे बळ देते, जीवनासाठी प्रचंड विश्वास निर्माण करते. काळोखाच्या निबिड अरण्यातून जाताना अंधाराचा कुठलाच डाग लागू न देण्याचं जणू ती मूक वचनच देते. तिने माझ्या मुठीत रंगांची खाणच भरून दिलीय, यातलेच एक एक रंग देत जातो मी ज्याच्या त्याच्या हातात. ही रंगांची पेटी जरी माझ्या हातात असली तरी मी माझ्या जगण्याबरोबरच कवितेतल्या शब्दाला अमुक एक रंग लागू दिला नाही कधीच. मला मनोमन वाटते की, माझी कविता कधीच आेवळ्या-सोवळ्यात अडकू नये. ती कोंडलेल्यांचा आ‌वाज व्हावी. सनातन अनुत्तरित प्रश्नांची उत्तरे तिने शोधावीत. ज्या पावलांना रस्त्याने स्वीकारले नाही त्यांच्यासाठी तिने रस्ता तयार करावा. ज्या डोळ्यांना माहीत नाही स्वप्न काय असते, त्यांच्या डोळ्यात स्वप्नांची बीजे तिने पेरीत जावी. असे जरी घडले नाही यदाकदाचित कालचक्रात पण तिच्या स्वरांनी, शब्दांनी मला जरी अस्वस्थ करण्याचे काम केले तरी मी समजेन, माझी कविता जिवंत आहे.

शब्दांकन - विष्णू जोशी
vishnujoshi80@gmail.com