आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Career: हेल्थ केअर मॅनेजमेंट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आरोग्य सांभाळणे ही नव्या जीवनशैलीची गरज होऊन बसली आहे. त्यामुळे आरोग्य क्षेत्रात वाढत्या संधी निर्माण होत आहेत. केवळ एमबीबीएस होऊन तेवढ्यावर भागत नाही. कारण स्पेशालिटी अणि सुपर स्पेशालिटी ही काळाची गरज आहे. पण एकदा डॉक्टर होऊन अन्य ठिकाणी काम न करता स्वत:चे हॉस्पिटल असणे हे प्रत्येकाला हवे असते. त्यासाठी हॉस्पिटल बांधणे, यंत्रसामग्री, कर्मचारी, व्यवस्थापन अशा सर्वांची निकड असते.

हॉस्पिटलचा कारभार वाढावा म्हणून तेथे अन्य तज्ज्ञ डॉक्टरांची गरज लागते. अशावेळी हेल्थ केअर मॅनेजमेंटमधील एमबीए पदवी मिळवल्यास एखाद्या तारांकित किंवा चेन हॉस्पिटल किंवा आंतरराष्‍ट्रीय दर्जाच्या हॉस्पिटलमध्ये चीफ ऑफिसर किंवा चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, चीफ ऑपरेशन्स ऑफिसर, व्हाइस प्रेसिडेंट एच. आर. फायनान्स अशा करिअरच्या संधी उपलब्ध होतात.

हे क्षेत्र प्रशासकीय स्वरूपाचे आहे. तेथे नेतृत्वगुण लागतात, निर्णयक्षमता लागते, धडाडी लागते, कर्मचा-यांवर देखरेख करणे, त्यांचे वेतन, प्रशिक्षण, व्यवस्थापन इत्यादी सांभाळणे ही महत्त्वाची कामे आहेत. त्याचबरोबर रुग्णांना अधिकाधिक उत्तम सोयीसुविधा कशा पुरवता येतील, हॉस्पिटलमधील लॅब, ऑपरेशन थिएटरमधील यंत्राचं नियोजन आणि व्यवस्थापन, संगणकीय प्रणाली, स्वच्छता, आपत्कालीन व्यवस्था अशा कितीतरी गोष्टी सांभाळाव्या लागतात.

तिथे एमबीए विद्यार्थ्यांची गरज भासते. कारण डॉक्टर रुग्णांच्या प्रकृतीवर नजर ठेवून असतात. बंगळुरूमध्ये ‘जेम्स बी स्कूल’ संस्थेने या क्षेत्रातील एमबीए हा कोर्स सुरू केला आहे. या कोर्सचे वैशिष्ट्य म्हणजे सोमवार ते शुक्रवार स्कूलशी टायअप असलेल्या हॉस्पिटलमध्ये प्रत्यक्ष काम करण्याची संधी मिळते आणि शनिवार ते रविवार संपूर्ण वेळ एमबीएची तयारी.
दोन वर्षांनंतर पूर्णवेळ एमबीए ही पदवी दिली जाते आणि भारतामधील 30 शाखांमधील कुठल्याही हॉस्पिटलमध्ये नोकरीही दिली जाते. अर्थात अशा कोर्सची फी जरी भरपूर असली तरी शिकतानाचे वेतन, आणि नंतर मिळणा-या प्लेसमेंटमुळे काळजीचे कारण नाही. मात्र हा कोर्स मेडिकल /पॅरामेडिकल, नर्सेस, फिजिओथेरपिस्ट, लॅब टेक्निशियन्स, डेन्टिस्ट, फार्माकोलॉजिस्ट, बायोटेक्नोलॉजिस्ट अशांसाठी उपयुक्त आहे. जे विद्यार्थी कुठल्याही शाखेतील बॅचलर पदवी घेऊन रेग्युलर हेल्थ केअर क्षेत्रामध्ये येऊ इच्छितात अशांसाठी बॅचलर ऑफ हॉस्पिटल अ‍ॅडमिनिस्ट्रेशन, पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन हॉस्पिटल अ‍ॅडमिनिस्ट्रेशन, मास्टर्स ऑफ हॉस्पिटल अ‍ॅडमिनिस्ट्रेशन, एमबीए इन हेल्थ केअर मॅनेजमेंटसारखे अभ्यासक्रम ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स), टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (टीस) मुंबई, सिम्बॉयसीस, पुणे अशा ठिकाणी उपलब्ध आहेत.

उपचाराइतकेच व्यवस्थापनही महत्त्वाचे
* रुग्णांना अधिकाअधिक उत्तम सोयीसुविधा कशा पुरवता येतील, हे पाहाणेही महत्त्वाचे असते.
* हॉस्पिटलमधील लॅब, ऑपरेशन थिएटरमधील यंत्राचं नियोजन, संगणकीय प्रणाली, स्वच्छता, आपत्कालीन व्यवस्था अशा गोष्टी सांभाळाव्या लागतात. तिथे एमबीए विद्यार्थ्यांची गरज भासते.
* डॉक्टर रुग्णांच्या प्रकृतीवर नजर ठेवून असतात. तर रुग्णालयाच्या व्यवस्थापन व प्रकृतीवर लक्ष ठेवण्यासाठी अधिकारी तंत्रज्ञही लागतात.