आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फिफ्टी, फिफ्टी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शाळेत, कॉलेजात एखाद्या मुलाचे हावभाव मुलींप्रमाणे दिसल्यास मित्र-मैत्रिणींमध्ये हा चर्चेचा मुद्दा होतो. पण या ‘फिफ्टी-फिफ्टी’ संकल्पनेच्या मुळाशी गेल्यास अनेक प्रश्नांची उत्तरे सहज मिळतात.
मी दोन वर्षांपूर्वी जेव्हा माझ्या कॉलेजमध्ये पाऊल ठेवलं तेव्हा तिथे मला एक नवीन मित्र मिळाला-अशोक. तो खूपच बायकी बोलणारा, त्याचे हावभावदेखील तसेच, केसांना सतत हात लावायचा. मुली केस पुढे आल्यावर कसे ते कानामागे सरकवतात तशाच काही हालचाली त्याच्याही होत्या. माझ्या अनेक मैत्रिणी त्यावर खूप हसल्या होत्या. मलाही हसू आवरलं नव्हतं. पण मी काही त्याच्यासमोर हसले नाही; पण मला ते ऑकवर्ड वाटलं होतं.
मी घरी आले. बाबा घरी होता. आल्या आल्या त्यानं मला पाणी दिलं.
तो : चहा घेणार?
मी : हं अर्धा कप. आज खूप दमू दमू झालं गड्या.
तो किचनमधे गेला आणि त्याने चहा ठेवला.
तो : का गं ?
मी : अरे प्रॅक्टिकल्सचा पहिला दिवस आज. आणि मग दंगामस्ती. नवीन मित्र-मैत्रिणींसोबत.
तो : अच्छा तर आज खूप दिवसांनी डोक्याला ताण द्यावा लागला असेल म्हणून बाईसाहेब दमल्या तर…
मी नाक मुरडून बसले. त्याने माझ्या डोक्यावर टपली मारली. काही वेळाने मी त्याला उत्सुकतेने म्हटलं, आजची गंमत ऐक.
तुला माहित्येय, मी आज एका मुलाला भेटले, त्याचं नाव अशोक. तो खूप गर्लिश होत अरे. ‘अय्या,’ ‘अगं बाई,’ (अॅक्टिंगसहित) असं वगैरे बोलत होता. आता मुलीपण अशा नाही बोलत बरं का! मला खूप हसायला येत होतं. पंजाबी ड्रेस घालायलासुद्धा कांकंू करतात पोरी आता. एखादी मुलगी जर पंजाबी ड्रेस घालून आली कॉलेजला तर लगेच तिच्यावर काही तरी कॉमेंट्स होतातच. आणि तो मुलगा... (मी खळखळून हसू लागले.) तो गोड हसला.
मी : मला खूप ऑकवर्ड झालं अरे त्या मुलाशी बोलताना.
तो : (प्रश्नचिन्हांकित नजरेने पाहत) का?
मी : अरे का काय! मुलं मुलींसारखी बोलायला लागली की, विचित्र वाटतंच ना! सपोज हां, सपोज एखाद्या मुलाने मुलींचा ड्रेस घातला तर?
त्याचा अपेक्षित रिस्पॉन्स मिळावा असं मी त्याच्याकडे पाहिलं पण तो काहीच बोलला नाही.
मी : इट्स टू वीअर्ड ना!
तो : का? तुम्ही पोरांचे कपडे घालताच की. ही जी काही जीन्स घातलीयेस ना तू, ते मुळात पुरुषांसाठी निघालेलं वस्त्र आहे. मग तू ते घालतेस तेव्हा तुला किंवा तुझ्या मैत्रिणींना ते सो कॉल्ड वीअर्ड का नाही वाटत? सोयीस्कर ते चालतं का तुम्हाला? तुम्ही पोरांसारखे शर्ट घालून फिरणार तेव्हा मात्र ती फॅशन! दीपिका घालतेच की शर्ट, असं म्हणायला तुम्ही मोकळ्या. मग जर उद्या मी फ्रॉक घालून आलो तर ते मात्र हास्यास्पद असेल तुमच्यासाठी. हो ना?
तो भडकला होता.
मी शांत राहिले.
तो : हे बघ हा मुद्दा फक्त हास्यास्पद दिसण्याचा किंवा वरच्या आवरणांचा म्हणजे फक्त कपड्यांचा नव्हे. या मुद्द्याकडे थोडंस गांभीर्याने पाहूया.
मी : म्हणजे?
तो : तुझा भूगोल हा विषय आहे ना?
मी : हो!
तो : काढ बघू जरा पुस्तक त्याचं.
मी सॅकमधून पुस्तक काढलं.
तो : एक धडा पान वाच.
मी कन्फ्युज्ड चेहऱ्याने त्याच्याकडे पाहिलं. बरं, हा काहीतरी बोलतोय तर वाचूया, असं म्हणून मी वाचत सुटले. मला समजलं होतं त्याला काय म्हणायचं होतं ते.
तो : समजलं मी काय म्हणतोय ते?
मी : हो.
तो : हे असंय आपल्याकडे. Man discovered this this. Man did that. Man invented. सगळं काही पुरुष करतो. त्यानं हे सगळं केलं असं पुस्तकच तुम्हाला शिकवतं. There is no word like ‘human being’ आणि असेल तरी तो फार कमी ठिकाणी.
मी : हो रे. इव्हन चेअरमन असतो. बिझनेसमन असतो. म्हणजे बिझनेसमन किंवा चेअरमनचं चेअरवुमन वगैरे करावं अशी माझी इच्छा नाहीये. पण चेअरपर्सन असं म्हणायला काय हरकत आहे!
तो : हं. दुसरी-तिसरीची पुस्तकं आठवतात तुला? त्यात असंच वाचलंय आपण की आई भाजी करत होती. बाबा पेपर वाचत होते. आई पेपर वाचतेय आणि बाबा भाजी करताहेत असं नाही होऊ शकत?
मी त्याला सहमतीदर्शक मान डोलावली.
तो : श्रुती, मला सांग, एखादी मुलगी जेव्हा बिन्धास्त बोलते, एकदम मुलासारखं, तेव्हा आपण तिचं कौतुक का करतो गं मग? किंवा तू हा शर्ट घालून बाहेर फिरतेस तेव्हा तुझ्याकडे बघणाऱ्या मुलांच्या नजरेत वेगळेपण का असतं? माहीत्येय तुला?
मी शांत.
तो : पुन्हा आपणच सगळे हे क्रिएट करतो, श्रुती. एखादा मुलगा मुलीसारखा बोललाच समजा तर काय फरक पडतो! मुळात अमुक अमुक म्हणजे स्त्रियांसारखं आणि तमुक तमुक म्हणजे पुरुषांसारखं असं आपण नकोय ना ठरवू. त्या मुलाचा आवाज कोवळा , हालचाली नाजूक होत्या असं आपण म्हटलं तर? हेच आपल्याला कळत नाही आणि यातूनच आपणच स्त्रियांची किंमत कमी करतो. स्त्रीसारखं बोलणं कमी दर्जाचं, हे आपणच नकळत सांगतो. स्त्री म्हणजे नाजूक, फुलासारखी अशी इमेज बनवून ठेवलीये आपण आणि बऱ्याच मुलींना - स्त्रियांनाही तीच इमेज जोपासायला आवडते. मुलगा म्हणजे भारदस्त, कुणी त्रास दिला तर त्याचे हात-पाय मोडणारा ‘अँग्री यंग मॅन!’ आपण ना आपणच तयार केलेल्या या सगळ्या इमेजेसमध्येेच वावरतोय. तुला माहित्येय ना अर्धनारी-नटेश्वर म्हणजे काय ते. प्रत्येक पुरुषामध्ये एक स्त्री दडलेली असते नि प्रत्येक स्त्रीमध्ये एक पुरुष. अर्थातच रूढ अर्थाने.
मी : अरे म्हणजे फिफ्टी फिफ्टी.
तो : पर्सेन्टेज मे बी डिफरंट, पण ही दोन्ही रूपं आपल्यात असतात, हे मात्र खरं!
किती खरं होतं त्याचं म्हणणं! एका ‘ति’ला या साऱ्याविषयी ‘तो’ बोलत होता. मी अवाक!

dancershrutu@gmail.com
बातम्या आणखी आहेत...