आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाश रूढींचे : घडणारे आई-बाबा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आई-बाबा आणि मुलांच्या दृष्टिकोनातून लग्न या निमित्ताला वेग-वेगळं महत्त्व आहे.
पालक ज्याप्रमाणे या निमित्ताचं महत्त्व मुलांना समजावून सांगत असतात, त्याचप्रमाणे मुलंही हल्ली यातील अवाजवी महत्त्व निदर्शनास आणू लागली आहेत.

अक्षयचं लग्न पक्कं झालं, तशी अभय आणि अश्विनी उत्साहानं तयारीला लागले. निमंत्रण पत्रिका छापायच्या होत्या. दुपारी निवांत वेळी अश्विनीनं लग्नपत्रिकांचा जमवलेला संग्रह बाहेर काढला. आकर्षक किंवा आगळ्यावेगळ्या पत्रिका जपून ठेवण्याचा तिचा छंद होता. किती नमुने जमवले होते तिनं! एखाद्या पत्रिकेला रेखीवपणे खऱ्या हळदी-कुंकवाचे बोट लावून वर अक्षतांचे दाणे चिकटवलेले, एखादी पत्रिका खलित्याप्रमाणे गुंडाळी करून रेशमी गोंडा लावलेली. एका फुलाच्या आकाराच्या पत्रिकेच्या पाकळ्या दुमडून झालेल्या षटकोनी घडीत चक्क मोत्याच्या अक्षता ठेवलेल्या! काही पत्रिका साधेपणांनी उठून दिसणाऱ्या. काहींतला मजकूर काव्यमय, तर काहींतला आपुलकीनं आग्रहाचं निमंत्रण देणाऱ्या पत्रासारख्या. अश्विनीचा हा ठेवा वैशिष्ट्यपूर्ण होता. उत्तम प्रतीचा वेलव्हेट पेपर किंवा दर्जेदार हँडमेड पेपर वापरलेल्या पत्रिका तर फारच आकर्षक वाटत होत्या. पण त्या प्रकारच्या पत्रिका काढण्यासाठी लागणारा खर्च बजेटमध्ये बसेल की नाही याची तिला शंका होती. अश्विनी विचारात गढलेली असतानाच अनिलचा, तिच्या मामेभावाचा फोन आला.

‘हॅलो अश्विनी, गौरीचं लग्न आहे. पुढच्या महिन्यात २६ तारखेला. मी अक्षयला निमंत्रण मेल केलंच आहे आणि फोनवरही कळवतोय. नक्की यायचं! पत्रिका छापणार नाही आहोत. तेव्हा हेच निमंत्रण!’
‘अरे, का बरं? पत्रिका का नाही छापणार?’ अश्विनीने स्वाभाविकपणे विचारलं.
अनिल म्हणाला, ‘अगं, पर्यावरणाचं नुकसान होऊ नये म्हणून गौरी किती ठाम आहे तुला माहीत आहे ना! पत्रिकेला कागद वापरायचा म्हणजे त्यासाठी पर्यायानं झाडं तोडली जाणं आलंच, आणि प्लास्टिकचा पेपर वापरला तर नंतर त्याचं विघटन होत नसल्यानं कचऱ्याचा प्रश्न!’
‘हो, तो बरोबर आहे म्हणा! पण अरे, हौस असते ना?’ अश्विनीला ही चाकोरी मोडण्याचं नवलच वाटत होतं.
अनिल म्हणाला, ‘हो, पण तिचं म्हणणं एवढा पैसा खर्च करून हौसेने काढलेल्या पत्रिका कोणाच्या लक्षात राहतात? पत्रिका जपून ठेवणारी व्यक्ती क्वचितच असते. तूसुद्धा कितीतरी पत्रिका टाकूनच दिल्या असशील ना?’
अश्विनी म्हणाली, ‘तरी एवढी रीत सोडून चाकोरीबाहेर जाणं मला नाही बाई जमणार. अनिताला मान्य आहे का हे?’
‘होऽऽ. तिलाही मनापासून पटलंय गौरीचं म्हणणं. इतकंच काय, अक्षता टाकून तांदूळही वाया घालवायचे नाहीत असं ठरवलंय आम्ही. ‘ते वाचवलेले तांदूळ एखाद्या गरीब कुटुंबाला देऊ’ असं आम्ही कार्यालयाच्या मॅनेजरना म्हटल्यावर त्यांनीही ही कल्पना उचलून धरली. त्यांच्या कार्यालयात त्या महिन्यात होणाऱ्या ८-१० लग्नांच्या घरच्यांनाही त्यांनी हे सुचवून त्यांनाही सामील करून घेतलंय आणि सगळ्यांचे मिळून एक पोतं तांदूळ एका अनाथाश्रमाला देणार आहोत.’
‘अरे वा!’ आता मात्र अश्विनी कौतुकानं उद््गारली. इतरही काही जणांनी गौरीचं, अनिताचं म्हणणं स्वीकारलेलं ऐकून तिलाही ते विचार करण्याजोगं वाटू लागलं.
अनिल पुढे सांगू लागला. ‘कित्येक बाबतीत गौरीचा अगदी कटाक्ष असतो. आमच्या कंपनीत चहासाठी डिस्पोजेबल कप आम्ही वापरत होतो. गौरीनं ते बंद करायला लावलं. मग स्टीलचे आणि काचेचे कप आणले आम्ही. गावाला किंवा कुठेही जाताना बाटलीबंद पाणी विकत घेऊन रिकाम्या बाटल्यांचा कचरा वाढवलेला तिला चालत नाही. घरून निघतानाच घरची बाटली भरून घ्यायची असं निक्षून सांगणं असतं. ओल्या कचऱ्याचं व्यवस्थापनही घरीच करते आणि इतरांनाही करायला शिकवते. त्यासाठी मार्गदर्शन करते.’ अनिलच्या बोलण्यातून गौरीबद्दलचा अभिमान आणि कौतुक स्पष्टपणे जाणवत होतं.
‘छान! धन्य आहे तिची! बरं ठेवते फोन. तुमच्या निमंत्रणाचा मेल बघेनच, पण तुमचं सगळ्यांचं मनापासून अभिनंदन!’ असं म्हणून अश्विनीनं फोन ठेवला.
अनिल आणि अनितानं मुलीचं म्हणणं ऐकावं या गोष्टीचं अश्विनीला नवल वाटत होतं. ती विचार करू लागली. आईवडिलांनी मुलांना घडवायचं ही रूढ समजूत असली, तरी काही वेळा मुलांचे विचार अधिक योग्य असतात. तेव्हा आपला मोठेपणा बाजूला ठेवून मोकळ्या मनानं त्यांचं म्हणणं, विचार स्वीकारायला हवेत. त्यातच खरा मोठेपणा आहे.
sunila0810@gmail.com
बातम्या आणखी आहेत...