आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मनाने जवळ असणे महत्त्वाचे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपली मुले कायमच आपल्याजवळ राहणार नाहीत, हे सत्य हसतहसत स्वीकारणे यातच शहाणपणा आहे. मुलांना पंख फुटणार. ती आकाशात उंच भरारी घेणार आणि त्यांच्या भरारीकडे डोळे भरून पाहण्यातच आईवडिलांना सुख असते, हेही सत्य आहे.

बाहेर सुखद गारवा आणि मनात आठवणींचा उष्ण गारवा. म्हटलं तर सगळं सुखावह अन् आनंदी. समाधान अगदी ओतप्रोत भरलेलं. पण हे आज वाटतंय; १६-१७ वर्षांपूर्वीचं ते वर्ष मात्र फारच हळवं होतं. पाण्याने डोळे सतत भरलेले असायचे. जीवनातून काहीतरी हरवत चाललंय, आपलं असं काहीतरी हातातून निसटत चाललंय, ही हुरहूर सतत मनात असायची. काळजी-चिंता-प्रेम-आनंद-भविष्यात गोड स्वप्न असे सतत संमिश्र भाव मनात दाटलेले होते. याचे कारण म्हणजे, माझा मुलगा सुदीप राजस्थानमध्ये ‘पिलानी’ येथे इंजिनिअरिंगच्या शिक्षणासाठी जात होता.

१९९८मध्ये बारावीत तो मेरिट लिस्टमध्ये आला, तो दिवस अत्युच्च आनंदाचा, अभिमानाचा ठरला. पण दुसऱ्याच दिवशी आता हा आपल्यापासून दूर जाणार, ही हुरहूर मनाला लागली.
इंजिनिअरिंगसाठी त्याला मुंबईतही प्रवेश मिळत होता. आपल्या छत्रछायेपासून दूर तो एकटाच जातोय, म्हणून मनात सतत वाईट विचारच येऊ लागले. मुले दूर शिक्षणासाठी गेली आणि वाईट संगतीला लागल्याचीच उदाहरणे डोळ्यापुढे येऊ लागली. लोकलचा प्रवास, हॉस्टेलचे वास्तव्य, धोक्याचे वय वगैरे वगैरेमुळे मन खूप धास्तावलेे. तसा तो समंजस, विचारी अन् कॉन्फिडंट होता. सहजासहजी कुणाच्या बोलण्याला भाळणारा नव्हता. त्याचे स्वत:चे विचार पक्के होते. तरीही आई म्हणून मनात भीती होतीच. म्हणून पिलानीला ठेवले तर हे सगळे धोके कमी आहेत, असे मला वाटले. एक तर शहरी वातावरणाचा संपर्क नाही. फक्त शिक्षण आणि हॉस्टेल एवढाच दैनंदिन संपर्क. कॉलेजचे वातावरणही चांगले म्हणून आणि त्याची स्वत:ची इच्छाही महत्त्वाचीच होती. पिलानीलाच अॅडमिशन घेण्याचे त्याच्या मनात होते, म्हणून अखेर पिलानीलाच गेला तो.

सगळ्या प्रक्रिया पूर्ण करून जसे त्याचे जाण्याचे दिवस जवळ येऊ लागले, तसे अश्रूला बांध घालणे कठीण जाऊ लागले. एकीकडे त्याची जाण्याची तयारी, बरोबर देण्याच्या सामानाची खरेदी, बांधाबांध, खाण्याचे पदार्थ करण्याची गडबड आणि दुसरीकडे लोकांच्या बोलण्याचे विचार, त्यांची उदाहरणे. या साऱ्यात मेरिटमध्ये आल्याच्या आनंदापेक्षा आता हा आपल्यापासून दूर जाणार, हे दु:खच जास्त मोठे वाटू लागले.

कुणी म्हणायचे, ‘झाले, मुलगा आता तुम्हाला परका झाला.’ कुणी ‘एकदा मुलं घर सोडून गेली की, परत येत नाहीत.’ असे म्हणून स्वत:च्या मुलांची किंवा इतरांच्या मुलांची उदाहरणे द्यायची. अशा वेळी
‘अशी पाखरे येती - आणिक स्मृती ठेवुनि जाती’ हे गाणं सतत मनात येऊन डोळे भरून यायचे.

शेवटी त्याचा जाण्याचा दिवस उजाडला. सुरुवातीला आठ दिवस पहिल्या वर्षाच्या मुलांच्या आई-वडिलांना त्यांच्याजवळ हॉस्टेलवर राहण्याची परवानगी होती, म्हणून आम्ही दोघेही त्याच्यासोबत गेलो. हॉस्टेलवरची त्याची खोली, तिथले वातावरण, कॉलेजचा परिसर सगळेच खूप छान होते. शहरी वातावरणाची गडबड नाही, गोंधळ नाही. गाडी-लोकल प्रवास नाही. परिसरातच सारे त्यामुळे तसे टेन्शन नव्हते. म्हणून मी थोडीशी काळजीमुक्त झाले. पण दुसऱ्या दिवशी त्यांच्या मेसमध्ये जेवण पाहिले आणि मन गलबलून गेले. मेसमधले जेवण चांगले होते, पण त्याच्या आवडीचे, त्याला हवे तशा चवीचे काहीच नव्हते. डोळ्यात टचकन पाणी आले.

पहिल्याच दिवशी सगळे जेवायला बसले आणि वाढणाऱ्याने भराभरा दोन-दोन पोळ्या वाढल्या. वाढपी दोन वा तीनदा सर्व्ह करायला यायचे. तेवढ्या वेळात तुम्हाला जेवढे हवे तेवढे वाढून घ्यायचे. ते पुन्हा यायचे नाहीत. माझ्या मुलाची तर एक पोळी पण संपायची नाही, (कारण तो सावकाश जेवणारा) आणि बाकीचे पाच-पाच पोळ्या खाऊन घ्यायचे. हे जेव्हा माझ्या लक्षात आले, तेव्हा मला रडूच फुटले. कुणाच्या लक्षात येणार नाही, अशा रीतीने मी हळूच डोळे पुसले. मी त्याला एक-दोनदा सांगायचा प्रयत्न केला, ‘अरे, ते वाढायला आले की तू दोन-दोन पोळ्या घेत जा ना. ते परत येत नाहीत. मग तुझे पोट कसे भरणार?’ पण ते वय व त्याचा स्वभाव. ‘आई, मी माझे करतो गं सगळं अॅडजस्ट. तू नको बरं काळजी करू.’ असं तो म्हणायचा आणि ‘हे’ही मला गप्प बसण्याची खूण करायचे. मग मी मनात आलेला कढ मनातच दाबून टाकायचे.
आजही लिहिताना ती आठवण येतेय आणि डोळ्यातून घळाघळा पाणी वाहतेय.

असो. शेवटी, त्याला घडवायचे होते. शिक्षण, करिअर, पैसा, प्रतिष्ठा या साऱ्यासाठी या सगळ्या गोष्टींना सामोरे जाणे भाग होते. त्याच्या प्रगतीसाठी - सुखासाठी - आनंदासाठी हा दुरावा सहन करणे क्रमप्राप्त होते. पाहता पाहता चार वर्षे झाली. हळूहळू त्याच्या नसण्याची व असण्याचीही सवय झाली. दोन-तीन दिवसांनी येणारी पत्रं, आठवड्याला फोन, सुट्टीतले येणे हे सगळे अंगवळणी पडले. शिक्षण झाले आणि नोकरीनिमित्त अमेरिकेला गेला तो. आता वाटते, आधी निदान तो आपल्या देशात तरी होता; आता तर परदेशात? पुन्हा तीच घालमेल-तेच रडणे, पडणे, तीच हुरहूर, तोच हळवेपणा. हे सारे तसेच घडले, पण हळूहळू त्याचीही तीव्रता कमी झाली.

शेवटी हे सारे जीवनातील टप्पे आहेत. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात थोड्याफार फरकाने ही अशी वळणं येणारच. आपली मुले कायमच आपल्याजवळ राहणार नाहीत, हे सत्य हसतहसत स्वीकारणे यातच शहाणपणा आहे. मुलांना पंख फुटणार. ती आकाशात उंच भरारी घेणार आणि त्यांच्या भरारीकडे डोळे भरून पाहण्यातच आईवडिलांना सुख असते, हेही सत्य आहे.

alka.subhedar55@gmail.com
बातम्या आणखी आहेत...