आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article In Madhurima About Guru Shishya Parampara

गुरूपौर्णिमा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुरुशिष्यांच्या प्रचलित गोष्टी जशाच्या तशा स्वीकारण्यापेक्षा स्वत: विचार करून चांगला गुरू कोणाला म्हणायचं हे ठरवण्याची गरज आहे.
नापास मुलांसाठी तडवळकर ट्रस्टतर्फे चालवलेल्या दहावीच्या ओंकार वर्गात गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम आयोजित केला होता. अभ्यासातील तयारीबरोबरच मुलांच्या इतर क्षमतांचाही विकास व्हावा यासाठी असे अनेक कार्यक्रम, उपक्रम तिथे घेतले जातात.

मुलांची भाषणे सुरू होती. गुरुशिष्याच्या नात्याची सर्वश्रुत असलेली द्रोणाचार्य-एकलव्याची गोष्ट एक आदर्श (?) म्हणून एका मुलाने सांगितली. ‘धन्य ते गुरू अन् धन्य तो शिष्य!’ असा पद्धतीनुसार शेवटही केला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षा विजयाताई यांनी आपल्या भाषणात या गोष्टीची दखल घेतली व त्या अनुषंगाने त्या आपले विचार सांगू लागल्या. त्या म्हणाल्या, ‘मुलांनो, आदर्श गुरुशिष्याचं उदाहरण म्हणून गेल्या कित्येक पिढ्यांत द्रोणाचार्य-एकलव्याची गोष्ट सांगितली जात आहे. अत्यंत आदरभावानं ती सांगितली जाते आणि त्याच आदरभावासह ती स्वीकारलीही जाते. पण मुलांनो, या गोष्टीत तुम्हाला काही खटकण्यासारखं जाणवतं का? विचार करा बरं.’

काही क्षण शांततेत गेले. मग एका मुलानं बिचकत हात वर केला. उठून उभे राहत तो म्हणाला, ‘द्रोणाचार्यांनी एकलव्याला अंगठा मागितला हे बरोबर वाटत नाही.’
विजयाताई म्हणाल्या, ‘शाब्बास! बरोबर विचार केलास तू. आणखी काही चुकीची बाब आढळते का या गोष्टीत?’

मुलं पुन्हा विचारात पडली. पण कुणी काही बोलेना, तेव्हा विजयाताईंनी विचारलं, ‘द्रोणाचार्यांनी एकलव्याला शिकवायला आधी नकार का दिला होता?’
‘तो क्षत्रिय नव्हता म्हणून,’ दोन-तीन मुलांनी चटकन उत्तर दिलं.
‘तुम्हाला बरोबर वाटतं का हे कारण?’ विजयाताईंच्या या प्रश्नावर मुलं गप्प राहिली. थोड्या वेळानं एका मुलानं आपल्या ऐकीव माहितीवरून म्हटलं, ‘द्रोणाचार्य राजघराण्यातल्या मुलांना शिकवत होते. त्यामुळे त्या मुलांपेक्षा इतर कोणी श्रेष्ठ होऊ नये असं त्यांना ‘राजनिष्ठेमुळे’ वाटत असेल ना?’
अध्यक्ष म्हणाल्या, ‘अस्सं! पण हे तरी बरोबर वाटतं का? द्रोणाचार्य हे जर ‘गुरू’ असतील, तर कुणालाही विद्या देणं हे त्यांचं कर्तव्य नाही का?’
मुलं बुचकळ्यात पडली. ‘राजनिष्ठा’ आणि ‘कर्तव्य’ याचा गुंता त्यांना सोडवता येईना. मग अध्यक्षाच पुढे बोलू लागल्या, ‘हे पाहा मुलांनो, तुम्ही आठवी-नववीत नापास झाल्यानं किंवा त्यापूर्वीच काही कारणानं आधीची शाळा सोडून या ओंकार वर्गात प्रवेश घेतलात तेव्हा तुम्हाला तुमची जात कोणी विचारली होती का? किंवा एखाद्या फॉर्मवर कुठे जातीचा उल्लेख भरून घेतला होता का?’
‘नाही मॅडम,’ ‘मुळीच नाही,’ अनेकांकडून उत्तर आलं.
‘मग कुणाला वििशष्ट जातीमुळे इथे प्रवेश नाकारल्याचं तुम्ही ऐकलं आहे?’ या प्रश्नाला सगळ्यांकडूनच नकारार्थी उत्तर आलं.
‘नाही ना? अन् आणखी एक गोष्ट लक्षात घ्या, तुमची प्रगती व्हावी यासाठी इथे प्रयत्न हे सगळ्यांसाठी सारखेच केले जातात. काही वर्षांपूर्वी नववीत सर्व विषय नापास झालेला वसीम शेख नावाचा एक मुलगा दहावीला ६५ टक्क्यांच्या वर गुण मिळवून या वर्गातून पहिला आला होता. हा मुलगा गरीब कुटुंबातला अन्् वेगळ्या समाजातला असूनही या वर्गाच्या संस्थापक पतकी मॅडमना आणि सगळ्या शिक्षकांना किती मनापासून आनंद झाला होता! त्याचा सत्कारही केला होता. मग ही गोष्ट किती मोलाची आहे! हो की नाही?’
‘होऽऽ!’ सगळ्यांना या गोष्टीचं महत्त्व उमगलं होतं.
‘आता तुम्ही या वर्गात येण्यापूर्वीचे तुमचे काही अनुभव सांगा बरं,’ अध्यक्षांनी मुलांना बोलतं केलं.
‘हितं यायच्या आधी, आमच्या आधीच्या शाळांत मी निस्ता दंगा करायचो. शाळा बुडवायचो. समद्या सरांचा लई मार खाल्ला. पण हितं आल्यावर शाळंला दररोज येऊ वाटतं. अन्् अभ्यास बी करू वाटाया लागलंय,’ एका खोडकर मुलानं प्रामाणिकपणे सांगितलं.
एक मुलगी म्हणाली, ‘आधीच्या शाळेत आम्हाला काही समजलं नाही की सर रागवायचे. पण इथे नीट समजावून सांगतात. तिथे अभ्यास करायला किंवा फळ्यावर चित्र काढायला आम्हाला कोणी चान्स देत नव्हते. पण इथे तो मिळतो.’
‘छान!’ अध्यक्षा बोलू लागल्या, ‘म्हणजे लोकांनी झिडकारलेल्या, घरच्यांनी आशा सोडलेल्या अशा मुलांना इथले सारे शिक्षक जवळ करतात, ज्ञान तर देतातच, सर्वांगीण विकासाचाही प्रयत्न करतात आणि संस्कारही देतात. द्रोणाचार्य हे धनुर्विद्या शिकवण्यात श्रेष्ठ शिक्षक असतील, पण एकलव्याला नाकारण्यात त्यांच्या मनाचा संकुचितपणा दिसतो आणि त्याचा अंगठा मागणं हा तर सरळसरळ अन्याय झाला. कोणत्याही स्तरातल्या, कोणत्याही क्षमतेच्या मुलांना ज्ञान देणारा, त्यांच्यातले सुप्त गुण ओळखून ते विकसित करणारा, दुर्गुण घालवणारा, संस्कार आणि व्यापक विचार देणारा तोच खरा गुरू. आपल्याला संस्कार, विचार हे एकाच गुरूकडून मिळतील असं नाही. आपल्या अवतीभवतीच्या लोकांमधूनही चांगले गुण, चांगले विचार आपण सजगपणे टिपले पाहिजते. उदाहरणार्थ, सध्याच्या इतरांना मागे टाकून पुढे जाण्याच्या स्पर्धेच्या जगात एका नापास झालेल्या मुलानं स्वत:च्या अपयशाचं दु:ख असतानाही चांगले मार्क मिळालेल्या त्याच्या मित्राचं अभिनंदन इतकं मनापासून आणि खऱ्या आनंदानं केलेलं मी पाहिलं की, मन मोठं करण्याच्या बाबतीत त्याला गुरू मानलं पाहिजे असं वाटतं. असे आणखी काही मोलाचे गुण आपल्याला इतर काही जणांमध्ये आढळतील. तेव्हा, गुरुशिष्यांच्या प्रचलित गोष्टी जशाच्या तशा स्वीकारण्यापेक्षा तुम्ही स्वत: विचार करून चांगला गुरू कोणाला म्हणायचं हे ठरवावं.’ अध्यक्ष विजयाताईंचं भाषण साऱ्यांना खऱ्या गुरूचा शोध घ्यायला शिकवणारं होतं. होय ना?

sunila0810@gmail.com