आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मांडणा (मधुरिमा रांगोळी विशेष)

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ठिपक्यांची रांगोळी ही महाराष्ट्राची खासियत अाहे, तशीच इतर राज्यातही रांगोळीने आपले एक वैशिष्ट्य व परंपरा जपली आहे. राजस्थानातील मांडणा त्यातीलच एक. जन्मापासून मृत्यूपर्यंत प्रत्येक सुख-दु:खाच्या क्षणी विशिष्ट मांडणा प्रकार आजही स्थानिकांकडून काढले जातात.
भारतात सर्वच प्रांतात रांगोळी काढली जाते. प्रदेशानुसार तिचे अल्पना, अय्यपन, कोलम, मुग्गु, मांडणा असे विविध प्रकार पाहायला मिळतात. याशिवाय फुलांची, धान्यांची, पानांची, पाण्यावरील, संस्कारभारतीची असेही वैविध्य आहेच. पूर्वी महाराष्ट्रात ठिपक्यांचीच रांगोळी प्रचलित होती. तर दक्षिणेत ठिपक्यांच्या बाजूबाजूने रेषा ओढून रांगोळी काढण्याची पद्धत. ओणव्याने वाकून एका अखंड रेषेत वक्राकार रांगोळी काढणाऱ्या द्रविडी महिलेचं जणू त्या रांगोळीशी तादात्म्य पावलेलं असतं.
राजस्थानातील प्रथा आणखीनच वेगळी. मातीची जागा गेरूने सारवून त्यावर तांदळाचे ओले पीठ घेऊन बोटांनी किंवा काडीच्या टोकाला कापड गुंडाळून रांगोळी काढायची. त्याला ‘मांडणे’ असे म्हणतात. या मांडण्यातही वेगवेगळे प्रकार असतात. समाजाची लोकसंस्कृती त्यात प्रतिबिंबित झालेली दिसते. कुठल्याही मंगलप्रसंगी, सण, उत्सव इ. वेळी या मांडण्याला फार महत्त्व असते. ते बाहेर अंगणात, भिंतींवर, देवघरात, पूजेची थाळी ठेवण्याच्या, ओवाळण्याच्या ठिकाणी काढले जाते.
दिवाळीच्या सणात तर या मांडण्याला विशेष महत्त्व असते. काही ठिकाणी विटा पाण्यात भिजत घालून नंतर त्या कोरड्या होण्यासाठी निथळत ठेवल्या जातात. कोरड्या झाल्यावर त्या एकाआड एक अशा ठेवून त्यांची उतरंडीसारखी रचना केली जाते. नंतर त्या विटांच्या दर्शनी भागांवर तांदळाच्या पिठाने मंगल चिन्हे काढली जातात. आणि दोन विटांच्या मधल्या जाळीत जेव्हा उजळलेल्या पणत्या ठेवतात तेव्हा ते दृश्य फारच मनोहर दिसते. देवघरात पूजेची थाळी
ठेवण्याच्या जागेवर प्रशस्त मांडणे काढल्या जाते. त्यामध्ये कमळाची फुले , शंख , घंटा इ.ची चित्रे रेखाटली जातात. तसेच देवघराच्या भिंतींवरही मध्यभागी गणपती, शिवपार्वती, कृष्ण, लक्ष्मी इ. देवीदेवतांची चित्रे काढून त्यांच्याभोवती सूर्य-चंद्र, स्वस्तिक, ओम, गोपद्म अशी मंगलचिन्हे रेखाटून मांडणे काढले जातात.
निसर्गातील झाडे, वेली, पशुपक्षी, ग्रह, तारे यांचाही आपल्या जीवनाशी घनिष्ठ संबंध असतो. विशेषतः ग्रामीण भागात तो अजूनही जपला जातो. मग त्याचेही प्रतिबिंब मांडण्यात उमटल्याशिवाय कसे राहील? त्यामुळे गाय, बकरी, उंट आदि प्राण्यांबरोबरच विविध प्रकारचे पक्षीही रेखाटले जातात. मोर या सुंदर पक्ष्याला तर विविध आकारांत रेखाटून त्याचे सौंदर्य अधिकच वाढवलेले असते.
कधी कधी मध्यभागी एखादा मुख्य आकार काढून बाजूने त्रिकोन, चौकोन, वर्तुळ अशी भौमितिक आकाराची नक्षी काढली जाते. त्यातील छोटे छोटे कप्पे उंटांच्या पाठीवरील उंचवटे, प्राण्यांच्या शेपट्या, बदमाचा आकार, पाण्याचे थेंब, लाटा, बिंदू, कुयऱ्या आदी अलंकारिक आणि प्रतीकात्मक आकार काढून भरून टाकले जातात. अशा रीतीने घराच्या आतील आणि बाहेरील भिंती, दाराखिडक्यांच्या चौकटी, पायऱ्या अशा शक्य त्या ठिकाणांना ही मांडण्याची रांगोळी काढून सुशोभित केले जाते.
आता सर्वच समाजातील तरुण पिढीला आधुनिकतेचे वारे लागले आहे. त्यामुळेच ‘मांडणे’ काढण्याच्या प्रचलित जागांशिवाय टीशर्ट, वाॅल हँगिंग, पणत्या, मातीची शोभेची भांडी, कॅनव्हास, स्टोन, काचेची भांडी, फोटो फ्रेम, मातीची खेळणी आदींवर मांडण्याची नाजूक नक्षी काढून त्यांना आकर्षक बनवले जाते. कधी कधी त्यात कुंदन, टिकल्या, मोती, आरसे यांचाही वापर केला जातो, एवढेच नव्हे तर तरुणाईला मोहून घेणाऱ्या टॅटूमध्येही या मांडण्याने जागा पटकावली आहे. शिवाय पूर्वीप्रमाणे फक्त काडी आणि बोटांऐवजी ब्रश, पेन, पेन्सिल या साधनांचाही वापर केला जातो. या जुन्यानव्यांच्या मिलाफातून निर्माण होणाऱ्या कलाकृती खूपच आकर्षक दिसतात.
जाता जाता, देशभर इतर प्रांतांत स्थायिक झालेला जैन समाज हा बव्हंशी मूळचा राजस्थानातील आहे. दिवाळीच्या सणातील ‘महावीर निर्वाण’ या आश्विन वद्य अमावस्येच्या दिवसाला जैनधर्मियांत अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्या दिवशी मंदिरांत किंवा घरी ज्या ठिकाणी निर्वाण लाडू चढवतात आणि दिवा लावतात त्या ठिकाणी आवर्जून मांडणे काढले जाते. ‘मांडणे’ आणि राजस्थान यांचा असा अतूट संबंध आहे.
bharati.raibagkar@gmail.com
बातम्या आणखी आहेत...