आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अल्पायुष्य हेच माझं अस्तित्व

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छंदवेडे, साधक या पलिकडे जाऊन रांगोळीचा स्वभाव, तत्त्वज्ञान समजूून घेत अभ्यास करणारे विरळच. रांगोळीची मनापासून आवड असणाऱ्या नयनाताईंनी सलग चार वर्षे झपाटल्यागत या कलेचा अभ्यास केला अन् २०१२ मध्ये ‘फ्लोरल आर्ट ऑफ इंडिया’ या विषयात पीएचडी घेतली. त्यांना गवसलेली ही माहिती आपल्याला आणखी सजग करेल..

अंगणातून उत्सवाच्या निमित्ताने सार्वजनिक ठिकाणी पोहोचलेल्या रांगोळीवर आता तर कुंचल्याचे राजेही अगदी सराईतपणे अधिराज्य गाजवू लागले आहेत. भव्य प्रांगणात पसरलेल्या या रांगोळ्या नजरेच्या एका टप्प्यातही साठवता येत नाहीत. पण काही तास, काही दिवस अखंड मेहनत घेऊन काढलेल्या या कलाकृतीच्या क्षणभंगुरत्वाचा विचार येताच मनात चर्र होऊन जाते. एकीकडे रांगोळीचे सौंदर्य तर दुसरीकडे तिचे क्षणिक अस्तित्व. काय वाटत असेल त्या कलाकाराला? व्यावसायिक पातळीवर भव्य रूप धारण केलेल्या रांगोळीविषयी हे खरं आहेच, पण आपणही देवापुढे, अंगणात छोट्याशा वा मोठ्या जागेत, तेवढ्याच नजाकतीने, तितक्याच प्रसन्नतेने नेमाने ही कलाकृती साकारताे. दुसऱ्या दिवशी आपणच ती मिटवतो. पाहुण्यांच्या स्वागतासाठी एखादी मोठी रांगोळी काढली आणि आप्तेष्टांच्या एखाद्या छोटुकल्याने खोड्या करत मोडली तर काय होते? फक्त थोडी हळहळ. दुसऱ्या दिवशी नवी सुरुवात. काय असेल यामागचं नेमकं तत्त्व?

लहानपणापासून आजी, आई, मोठ्या बहिणींकडून माझ्यापर्यंतही रांगोळीची परंपरा पोहोचली. पण कला विषयात पुढे शिक्षण घेताना या रांगोळीच्या अस्तित्वाबाबत अनेक प्रश्न पडायला लागले. म्हणून फाइन आर्टस विषयात मास्टर्स झाल्यानंतर मी रांगोळीवर पीएचडी करण्याचा निर्णय घेतला. िवविध राज्यांना भेटी दिल्या. विदेशात रांगोळीची काय परंपरा आहे, याचा अभ्यास केला. रांगोळीच्या उगमापासून आतापर्यंत अभ्यास करताना असं जाणवलं की, या कलेमागे असलेलं तत्त्व खूप महत्त्वाचं आहे. ही कला आपल्याला जगण्याचा एक नवा अर्थ शिकवते.

रांगोळी अल्पायु नसती, एखाद्याने चिरकाळ टिकणारी रांगोळी निर्माण केली असती तर? ही कला एकाकडून दुसऱ्याला शिकवलीच गेली नसती. या कलेचा प्रवास तिथेच थांबला असता. पण आजही ती घराघरात जिवंत आहे. किंबहुना ती माणसाला जगण्याचं खूप मोठं तत्त्वज्ञान शिकवून जाते. या जगातली प्रत्येक गोष्ट क्षणभंगुर असते. आपण जीव ओतून साकारलेली, निर्मिलेली प्रत्येक गोष्ट, कलाकृती, एखादे काम कधीही अस्तित्वहीन होऊ शकते. मग यासाठी ते काम करणेच सोडून द्यायचे का? तर नाही, ते नित्यनेमाने पुन्हा पुन्हा त्याच वेळी, तेवढ्याच एकाग्रतेने करायचे. क्षणभंगुरत्व म्हणजेच रांगोळीचं खरं सौंदर्य, स्वभाव, पहिले वैशिष्ट्य अन् त्याही पुढे जाऊन तिच्या विकासाचे तत्त्व आहे. पूर्वी किंवा आताही नेमाने रांगोळी काढणाऱ्या गृहिणींमधील एकाग्रता, सहनशीलता, श्रद्धाभाव रांगोळीतून येत असावा. वर्षानुवर्षे चाललेली ही त्यांची साधनाच तर आहे.

याच तपश्चर्येच्या खडतरतेचे उदाहरण म्हणजे, बौद्ध भिख्खू. एक साधना या दृष्टीने रांगोळीचा अभ्यास करताना मिळालेली माहिती थक्क करणारी होती. तिबेटमध्ये किंवा भारताच्या लडाखसारख्या काही प्रांतात आजही बौद्ध भिख्खूंच्या तपश्चर्येसाठी हे साधन वापरतात. भिख्खूंची साधना सुरू होते त्या पहिल्या दिवसापासून त्यांना एका बंदिस्त खोलीत रांगोळी काढायला सांगितली जाते. भिख्खूंनी अत्यंत एकाग्रता आणि मेहनतीने दररोज ती रांगोळी थोडी थोडी विस्तारत जायचे असते. अगदी अखंडित. मोडायची नाही. अशा प्रकारे वर्षानुवर्षे एकाच रांगोळीवर मेहनत घेतल्यावर अखेरीस तो दिवस येतो, भिख्खूंच्या सहनशीलतेची परीक्षा पाहण्याचा. ज्या दिवशी भिख्खूंचे प्रशिक्षण संपते व त्यांना दीक्षा देण्याचा दिवस उजाडतो, तेव्हा त्यांचे गुरू ती रांगोळी एकवारही न पाहता थेट मोडून टाकतात. त्यावेळी साधक भिख्खूची जी प्रतिक्रिया असते, त्यावर त्याला दीक्षा द्यायची की नाही ते ठरते. त्या क्षणी त्याच्या चेहऱ्यावर दु:खाचे, ह‌ळहळीचे भाव उमटले तर पुन्हा नव्याने तपश्चर्या.

एक कलाप्रकार म्हणून रांगोळीचा विचार करायचा झाल्यास, भारतात ज्या ६४ कला अस्तित्वात आहेत, त्यात रांगोळीचा समावेश नाही. तंदुल-कुसुम-बलि-विकार म्हणजेच तांदूळ आणि फुलांच्या साह्याने भूमी सुशोभित करण्याची कला ही ६४ कलांमध्ये मोडते. या कलेशी रांगोळी अधिक साधर्म्य पावते. आज भारतात व्यापक स्वरूपात रांगोळीचे दोन प्रकार पडतात. एक म्हणजे पारंपरिक, ठिपके, शुभचिन्हे वापरून काढलेली आणि दुसरी म्हणजे रंगोली अॅज अ फाइन आर्ट. त्यात व्यक्तिचित्र, निसर्गचित्र वगैरे प्रकार येतात. तिसरा एक प्रकार म्हटले तर पब्लिक आर्ट. म्हणजेच त्यातून कन्या भ्रूण हत्या, दहशतवादविरोधात किंवा वृक्षारोपणासंदर्भात सार्वजनिकरित्या संदेश दिला जातो. संस्कार भारती ही पारंपरिक व व्यावसायिक अशा दोन्ही प्रकारात मोडते.
रांगोळीच्या उगमापासून सद्यस्थितीत कलाकार, साहित्य तसेच रचनेतही मला खूप बदल जाणवले. या प्रवाहात झालेला मुख्य बदल म्हणजे पूर्वी अंगणातील रांगोळीच्या कलाकाराला फार ओळख नव्हती. गृहिणी ती स्वत:साठी, घरासाठी काढायची. त्यामुळे उंबरठ्यापर्यंतच ती मर्यादित रहायची. आज व्यावसायिकतेचे रूप घेणाऱ्या रांगोळीचे श्रेय प्रत्येकाला घ्यावे वाटते. अगदी गावातली लहान पोरदेखील रांगोळीच्या शेवटी एका कोपऱ्यात दिमाखदार शैलीत आपले नाव लिहितेय. हा खरोखरच एक चांगला बदल म्हणावा लागेल.

एक कला, एक साधना याही पलिकडे जाऊन रांगोळीचा विचार केल्यास प्रखर स्मरणशक्ती आणि बौद्धिक विकासाकरिता रांगोळी हे अत्यंत महत्त्वाचे साधन आहे. रांगोळीच्या या पैलूवर आणखी स्वतंत्रपणे अभ्यास व्हावा, अशी माझी इच्छा आहे. किंबहुना जगातील काही तज्ज्ञांनी या दिशेने अभ्यासही सुरू केला आहे. भारताच्या दक्षिण भागातील कोलम हा रांगोळी प्रकार अत्यंत कठीण असतो. ठिपक्यांच्या रांगोळीपेक्षाही तो गुंतागुंतीचा. प्रत्येक रेष, प्रत्येक आकारात, एकसुरीपणा आणण्याचे आव्हान असते. पण कधीही शाळेत न गेलेल्या तिथल्या गृहिणी ही रांगोळी मिनिटा-दोन मिनिटात काढून मोकळ्या होतात. वक्र रेषांनी साकारलेली ही कोलम ठिपक्यांना जुळवून न काढता ठिपक्यांभोवती काढली जाते. ही कठीण रांगोळी काढताना महिलांना कुठून सुरुवात करायची, संपवायची कशी हे कसे लक्षात राहते, यावर जपानच्या विद्यापीठाने संशोधन केले आहे. दररोज या रांगोळ्यांचा सराव झाल्याने गृहिणींचे गणित आणि तर्कशास्त्र पक्के झाल्याचे या संशोधनात आढळले. साहजिकच कुटुंबातील व्यक्तींवरही याचा परिणाम होतो. दुर्दैवाने शहरांमधून रांगोळी आज हद्दपार होत आहे. ग्रामीण भागात, निमशहरी भागात किंवा फ्लॅटमधील काही गृहिणींनी ही संस्कृती जिवंत ठेवली आहे. आपणही बौद्धिक विकासासाठी, एकाग्रतेसाठी आणि जीवनातील महत्त्वाचं तत्त्व शिकण्यासाठी आपल्या पुढच्या पिढीला रांगोळी हे महत्त्वाचं माध्यम असू शकतं, हे पटवून द्यायला हवं.

एथनोमॅटिक्स म्हणजे पारंपरिक गणितीय पद्धत. भारतात थोर गणितज्ञ होऊन गेले. मग आज मुलांसाठी कठीण विषय गणितच का बनला आहे? ब्रिटिशांनी आपल्या शिक्षणपद्धतीत बदलल्या. यामुळे पारंपरिक भारतीय गणिती शिक्षण पद्धती लोप पावत आहेत. मुलांचं गणित पक्कं करण्यासाठी रांगोळी हेही उत्तम माध्यम असू शकतं, याचाही विचार व्हायला हवा. भारतातील रांगोळीला युनेस्कोने अमूर्त संस्कृतिक वारसा अशी मान्यता दिल्यास, तिच्यावर अधिक संशोधन होऊ शकेल. वैयक्तिक पातळीवर पत्रव्यवहार मी सुरूही केला आहे. पण यासाठी रांगोळी कलाकारांनी संघटित व्हावे लागेल. रांगोळीला भारतीय सांस्कृतिक वारशाचा दर्जा मिळाल्यास, कलाकारांना अधिक प्रोत्साहन मिळेल.

दिवाळीनिमित्त एवढंच. अंगणात-दारासमोर मस्त रांगोळी काढा. येत नसल्यास, सवय नसल्यास ती जोपासा. महिना-दोन महिने सलग काढून आपल्या एकाग्रतेत झालेला फरक पडताळून पाहा आणि पुढेही ती जोपासायची की नाही, हे ठरवा. शुभ दीपावली.
शब्दांकन: मंजिरी काळवीट, औरंगाबाद.
nay.mil@hotmail.com
बातम्या आणखी आहेत...