आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक नातं असंही...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कुठलंही नातं हा खूप नाजूक आिण तितकाच गुंतागुंतीचा विषय. त्यातून स्त्री-पुरुष या नात्याला असंख्य पैलू, चौकटी आिण बंधनंही. परंपरागत नाती समाजमान्य असतात, मात्र काही नाती फार खुलेपणानं स्वीकारली जात नाहीत. विविध कार्यालयांमध्ये एकत्र काम करणाऱ्या स्त्री-पुरुष सहकाऱ्यांमधली मैत्री हे असंच एक नातं...

नात्यास आपुल्या नाव देऊ नकोस काही
साऱ्याच चांदण्यांची जगतास जाण नाही
व्यवहार कोविदांचा होईल रोष होवो
व्याख्येतूनच त्यांची प्रज्ञा वाहात जाई
एक निखळ, स्वच्छ, मैत्रीपूर्ण नातं धिटाईनं स्वीकारण्याची हिंमत देणाऱ्या कविवर्य कुसुमाग्रजांच्या या काव्यपंक्ती. बदलत्या आर्थिक-सामाजिक परिस्थितीमुळे घराबाहेर पडलेल्या महिलांना आज िवविध क्षेत्रं साद घालत आहेत. परिणामी खासगी, सरकारी, कॉर्पाेरेट, शिक्षण, आरोग्य, अशा नानाविध ठिकाणी काम करणाऱ्या महिलांची संख्या प्रचंड वाढली आहे. या निमित्तानं स्त्री-पुरुषांना सहकारी म्हणून काम करत असताना आलेले बरेवाईट अनुभव, त्यांच्यातलं कार्यालयीन नातं असा विषय आम्ही मागच्या वेळी मधुरिमा कट्ट्यावर दिला होता. मात्र या विषयाकडं अजूनही किती संकुचित वृत्तीनं बघितलं जातं याचा प्रत्यय आला ते कट्ट्याला मिळालेल्या प्रतिसादावरून.

नोकरी करणारी स्त्री असो अथवा पुरुष, कामकाजाच्या निमित्तानं कुटुंबापेक्षा कार्यालयीन सहकाऱ्यांच्या ते अधिक काळ सहवासात असतात. कुठलंही नातं निर्माण होण्यासाठी, ते टिकून राहण्यासाठी परस्परांचा सहवास हा एक निकष मानला तर कार्यालयीन सहकाऱ्यांमध्ये अशी नाती लवकर निर्माण होतात. अर्थात तो त्यांच्या नोकरी - व्यवसायाचा एक भाग असतो याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. नात्यांबद्दलची एक विशिष्ट चौकट समाजानं तयार केलेली आहे. त्यामुळेच मग त्या ठरावीक समजुतींना छेद देणारी नाती सहजी स्वीकारली जात नाहीत. एकाच ऑफिसमध्ये काम करणाऱ्या दोन पुरुषांच्या परस्परातल्या मैत्रीकडे जिगरी दोस्ती म्हणून कौतुकानं पाहिलं जातं. मात्र हेच महिलांची परस्परांतली मैत्री-गप्पा हा कायम चेष्टेचा विषय समजला जातो. त्यावर उलटसुलट प्रतिक्रिया दिल्या जातात. जिथे महिलांच्या मैत्रीबाबत अशी अवस्था तिथे महिला आणि पुरुष यांच्यातल्या मैत्रीबद्दल काय बोलावे?

वास्तविक नात्याला कितीतरी असंख्य छटा असतात. जन्माचं, रक्ताचं, जोडलेलं, मानलेलं असे अनेक पदर असतात. वयाच्या सगळ्याच वळणांवर मैत्रीचं नातं हवंहवंसं वाटणं हा मानवी स्वभाव आहे. व्यक्त होण्यासाठीची ती एक प्रमुख मानसिक गरज आहे. पण दुर्दैवानं या मैत्रीकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन स्वच्छ नाही. पुणे-मुंबई-नाशिक यांसारख्या काही शहरांमध्ये कदाचित या बाबतीतले अनुभव वेगळे असतीलही. पण ते अपवादात्मक. स्त्री-पुरुष मैत्रीसंदर्भात समाजाच्या मनात पक्क्या बसलेल्या चुकीच्या समजुती, हे यामागचं मुख्य कारण. त्यामुळे विचारांच्या स्पष्टतेअभावी बऱ्याचदा ही नाती खुरटतात. अन्न-वस्त्र-निवारा या माणसाच्या मुलभूत गरजा आहेत. मात्र या गोष्टींइतकाच महत्त्वाचा आहे बौद्धिक विकास. त्याला-तिला व्यावसायिक प्रगतीच्या संधी उपलब्ध होणं. स्त्री-पुरुषांमधल्या परस्पर सहकार्याशिवाय असा विकास, संधी शक्य होत नाहीत. त्यामुळंच मग याबाबतीत मदत आिण मार्गदर्शन करणाऱ्या, विचारांचं आदान-प्रदान करणाऱ्या व्यक्तींमध्ये स्नेहभाव निर्माण होणं नैसर्गिक आहे. दरवेळी पती-पत्नीमध्ये किंवा समाजमान्य नात्यांमध्येच असं आदानप्रदान होईल ही अपेक्षा योग्य नाही. वैचारिक मैत्री िंकंवा ट्यूनिंग सगळ्यांसोबत निर्माण होत नाही हे वास्तवही आपण समजून घ्यायला हवं. आपल्या मर्यादांचं भान आणि वागणुकीची सीमा याची जाणीव, नोकरी करण्याइतपत प्रगल्भ असलेल्या व्यक्तींमध्ये असतेच. म्हणूनच ऑफिसमधल्या बायकोच्या मित्राकडे किंवा नवऱ्याच्या मैत्रिणीकडे संशयाच्या चष्म्यातून पाहण्याची आवश्यकता नाही. उलट अशी नाती संबंधित स्त्री-पुरुषांच्या करिअरसाठी कशी पूरक ठरू शकतील, याचा विचार कुटुंब-नातेवाईक-समाजानं करावा. कंपनी-कार्यालय व्यवस्थापनानंही सहकाऱ्यांमध्ये गुणात्मक मूल्यं असणारी नाती कशी निर्माण होतील यावर भर द्यावा. अशी मैत्री असणाऱ्यांनीही एकमेकांचा स्त्री-पुरुष या पलिकडे जाऊन फक्त माणूस म्हणून परस्परांचा आदर करावा. एकमेकांच्या गुणवत्तेची कदर करावी.

कार्यालयीन स्त्री-पुरुष सहकाऱ्यांमध्ये निर्माण होणारी मैत्री हा आधुनिक युगातल्या नात्याचा एक नवा पैलू आहे. त्यावर नीती-अनीती, प्रथा-परंपरा, चूक-बरोबर असे शिक्के मारून भावनिक - वैचारिक गोंधळ घालत बसण्यापेक्षा नि:शंकपणे अशी नाती स्विकारायला हवीत. फक्त त्यासाठी गरजेची आहे ती विचारांची सखोलता आिण आचरणातली व्यापकता. काय म्हणणं आहे तुमचं?
vandana.d@dbcorp.in