आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article In Madhurima About Taking Care Of Father In Law

सासऱ्यांची काळजी घ्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
म्हातारपणात पती-पत्नी एकमेकांना साथ देतात, पण यांपैकी एक देवाघरी जातो, मग त्यांचे एकाकी जीवन सुरू होते. अशा वेळी सुनेने त्यांची योग्य काळजी घेतली पाहिजे. सासू एकटी असेल तर ती सुनेला मदत करू शकते. ती स्वयंपाकघर सांभाळते, स्वत: चहा करून पिऊ शकते. चार पदार्थ सर्वांसाठी करून स्वत:ही खाऊ शकते. पण सासरा एकटा राहिला तर त्याला ती शिक्षाच ठरते. नातवंडांत मन रमवू म्हटले तर त्यांना वेळ नसतो. सुनेजवळ काही मागण्याचा संकोच वाटतो. अंघोळीला जातानाही इतरांच्या वेळा सांभाळून जावे लागते. त्याची हक्काची, त्याच्या हवं-नकोची काळजी वाहणारी पत्नी आता नसतेे. स्वयंपाकघरापर्यंत त्यांची पोहोच नसते. आत जाताच सून विचारणार ‘काय हवंय? स्वयंपाक होतोय अजून.’ की तो पटकन माघारी फिरणार. थोडेसे भाजलेले शेंगदाणे, पोहे, गूळ खावंसं वाटलं तरी सांगणार कोणाला? बाहेर काही खाल्लं तर पोटाला ते सहन होत नाही.

ज्येष्ठ नागरिक संघाच्या कट्ट्यावर गप्पाटप्पांमध्ये वेळ जातो. काही वेळाने पोटात कावळे ओरडतात; पण सूनबाई बाहेरूनच आली नाही, तर घरी जाऊन खाणार तरी काय? वाचन करू म्हटले तरी वाचून वाचून डोळे दुखू लागतात. देवदेव किती करणार? सारेच निरर्थक वाटू लागते. अशा वेळी सुनेने त्यांना आपल्या वडिलांसारखे मानावे, खायला काही जास्त लागत नाही. चार वेळा थोडे थोडे गरम गरम खाऊ घालावे. मोकळेपणाने गप्पा माराव्यात. त्यांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न करावा. नातवंडांना त्यांच्यासोबत खेळण्या, फिरण्याची, गोष्टी सांगण्याची संधी द्यावी. आपणही पतीसोबत कधी त्यांना घेऊन फिरायला जावे. घरातली वृद्ध माणसे म्हणजे चालताबोलता अनुभवांचा खजिनाच. त्यांना सारेच कळायला हवे असते. कोणाचा फोन होता? कोण आलं होतं? काय म्हणत होतं? ते अमक्याचे अमके लागतात का, हे जाणायचे असते. कधी कधी ऐकू येत नसलं तरी ऐकायची उत्सुकता असते. हा त्यांचा दोष नाही. रिकाम्या वेळात त्यांनी काय करावं?

म्हातारपणी शरीराच्या सवयी बदलत जातात. दातांच्या फटीतून हवा जाते. लाळ उडते, जेवताना मचमच आवाज होतो. आजारपणं येतात. पडझड झाली तर हात किंवा पाय मोडतो. ठिसूळ हाडं जुळून येत नाहीत. अशा वेळी सूनबाईला सांगावंसं वाटतं, त्यांचे शेवटचे दिवस सुखदायक कर. मुलानेही आईबाबांची सेवा करावी. एक दिवस तुम्हीही म्हातारे व्हाल.