आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article In Madhurima By Manjiri Kalwit About Rangoli Artists Of Juchandra Village

रांगोळी जगणारं गाव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्रं, की पेंटिंग? अंहं, ही आहे रांगोळी. व्हाॅट्सअॅपवरून अशा रांगोळ्यांचे फोटो अनेकांनी गेल्या वर्षभरात पाहिलेत. जूचंद्र गावातील कलाकारांच्या या रांगोळ्या आहेत, यापलिकडे आपल्याला तपशील माहीत नसतो. पण त्या मनात घर करून बसतात हे नक्की. म्हणूनच थेट जूचंद्र गावातून, कलाकारांशी गप्पा मारून तुमच्यासमोर आणलाय हा आखों देखा हाल...

सणासुदीच्या काळात धोधो वाहणाऱ्या शुभेच्छा संदेशांमध्ये मंगलमय वातावरण निर्मिती करणाऱ्या रांगोळ्यांचेही फोटो फॉरवर्ड होतात. गेल्या वर्षभरात असे अनेक रांगोळ्यांचे फोटो आले. पण काही रांगोळ्यांनी मनात घर केलं. ‘रांगोळी कलाकारांचं माहेरघर असलेल्या जूचंद्र गावच्या मनोज पाटील किंवा संजय पाटील यांनी आई चंडिकेच्या यात्रेत काढलेली ही रांगोळी’... अशी एका ओळीचीच माहिती असायची त्यात. व्यक्तिचित्रण, निसर्गचित्र असो वा संदेशात्मक रांगोळी, एखादं हुबेहूब चित्र काढावं त्याप्रमाणं रंग अन् रेषांची नजाकत जपत, त्यांचा पुरेपूर वापर करत काढलेल्या त्या रांगोळ्या पाहिल्या की मनात अनेक प्रश्न निर्माण होत.

तना-मनाने तल्लीन होत काढलेल्या या रांगोळ्यांमागील हातात काय जादू असेल? इतकी अप्रतिम रांगोळी साकारणाऱ्या कलात्मक हातामागे नक्कीच गेल्या जन्मीची पुण्याई किंवा वर्षानुवर्षांची मेहनत असावी. आपल्याकडे तर भव्य रांगोळी म्हटलं तर फार फार तर पाच-दहा कलाकारांची नावं पुढे येतील. पण रांगोळी कलाकारांचं माहेरघर म्हणवणाऱ्या गावात नेमके किती कलाकार असतील? गाव किती मोठं असेल? गावाचा विकास कितपत झाला असेल? मोठ्या संख्येने रांगोळी कलाकार असलेल्या गावच्या अर्थकारणात यांचं काय स्थान असेल? या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी थेट गावालाच जाऊन भेट देण्याचे ठरवले आणि मुंबई गाठली.

वसई विरारनंतर नायगावकडे जाताना बाफळा फाट्यावर आत वळलं की, ‘जूचंद्र गावात आपलं स्वागत’ अशा कमानीने आणि कमानीच्या खालीच उभ्या असलेल्या ७-८ जणांनी आमचं स्वागत केलं. गावाची, इथल्या कलेची अन् कलाकारांची ओळख करून देण्यासाठी आदल्या दिवशी संध्याकाळपासून (एवढा वेळ का? हे उत्तर पुढे मिळेल) उभ्या असलेल्या भूषण पाटील यांनी चहा-पाणी देण्यासाठी प्रणित भोईर या कलाकाराच्या घरी नेले. पाचेक मिनिटे तिथे बसून आम्ही निघू लागलो, तेवढ्यात माझी नजर लांबच लांब खिडकीत दोन रांगेत मांडलेल्या बक्षिसांवर पडली. नृत्य, नाटक, चित्र, रांगोळी अशा अनेक स्पर्धांतील प्रणितच्या नावावरची, जिल्हा, राज्य, देश पातळीवरची ती पारितोषिकं कुणी स्वत:हून दाखवलीच नाहीत. तेव्हाच मला इथल्या लोकांच्या साधेपणाची, प्रसिद्धीची फार हाव नसणाऱ्या स्वभावाची जाणीव झाली.

तिथून आम्ही निघालो, कलाकारांनी आमच्यासाठी भरवलेल्या कलाप्रदर्शनाकडे. भूषण पाटील हळुहळू गावची माहिती उलगडू लागले. आठ-दहा हजार लोकसंख्या असलेल्या जूचंद्रची नुकतीच नगरपालिका अस्तित्वात आली. पूर्वी ते वसईत होतं. पाटील, म्हात्रे आणि भोईर यापेक्षा वेगळं आडनाव इथं सापडणार नाही. सगळेच आगरी. मिठाचे आगर आणि भातशेती हे दोन मुख्य व्यवसाय. पण गावातील मोठा तरुण वर्ग आता आसपासच्या शाळा, महाविद्यालयांमध्ये कलाशिक्षक म्हणून रुजू आहे. कुणी चित्रकलेत, कुणी शिल्प, नाट्य तर कुणी कोरिओग्राफर, फोटोग्राफर. रांगोळीत तर प्रत्येकजण तोडीस तोड. रांगोळी काढण्यासाठी निमंत्रण आलेच तर ती काढून यायची. मिळेल ते मानधन स्वीकारायचे. व्यवसाय वाढवण्यासाठी आटापिटा करण्याचा स्वभाव नाही. त्यामुळेच एवढ्यांपैकी फक्त दोनतीन लोकांचीच नावं सोशल मिडीयावर फिरताहेत. एका घराआड एक एवढ्या मोठ्या संख्येने रांगोळीचे अस्सल कलाकार दडलेले. इथल्या रांगोळीची ख्याती ऐकून आम्ही आलो असलो तरी गावाला शंभर वर्षांची नाट्यपरंपरा लाभली आहे. एका वेळी पाच-पाच नाटकं सुरू असतात. प्रेक्षकवर्गही तितकाच हौशी. गावात अनेक सक्रीय भजनी मंडळं. शिल्प-मूर्तीकामही मातीतच रुजलेलं. रामचंद्र पेंटर (पाटील), मुलगा जयवंत हे या परिसरातले दिवंगत ज्येष्ठ चित्रकार. थम्प्स अपचा मूळ लोगोही त्यांनीच तयार केला.

आई चंडिकेचं देवस्थान पंचक्रोशीत प्रसिद्ध. एप्रिलमध्ये भरणाऱ्या तीन दिवसीय यात्रेत दूर-दूरवरून लाखो भाविक येतात. हल्ली इथल्या रांगोळ्या पाहण्यासाठी येणाऱ्यांची गर्दी वेगळीच असते. इथले पुरुष कलाकार जगात ख्याती मिळवत असले तरी उंबरठ्यावरच्या रांगोळीवर मात्र महिलांचेच राज्य. सण, लग्नविधी, धार्मिक मुहूर्ताला दारासमोर रांगोळी काढण्यात महिलांचा हातखंडा. इथल्या शिवछत्रपती समाज सेवा मंडळाने १९८० साली घरोघरी रांगोळी स्पर्धा आयोजित केल्या होत्या. अर्थात आपलं अंगण हेच व्यासपीठ. रंगावलीने सजलेल्या अंगणांतून काही अंगणांना पारितोषिक दिले जायचे. तेथूनच महिलांची ही कला घरातील लहान तरुणांमध्ये प्रसवू लागली. गावातील तरुण या स्पर्धेत हिरिरीने भाग घेऊ लागले. त्यानंतर मंडळाने वसईतील ज्येष्ठ रांगोळीकार शंकर मोदगेकर सरांचं प्रात्यक्षिक शिबीर खास तरुणांसाठी आयोजित केलं आणि तेथूनच इथल्या कलाकारांना रांगोळीच्या विस्तारित स्वरूपाची, रंगछटांच्या मुक्त उधळणीची अन् त्यातील बारकाव्यांची जाणीव झाली. १९९०मध्ये मंडळाने तरुणांची ही कला एकत्र प्रदर्शन स्वरूपात लोकांसमोर यावी, या हेतूने जिल्हा परिषदेतील शाळेत प्रदर्शन भरवले. या प्रदर्शनातूनच भूषण पाटील, शैलेश पाटील, जयकुमार भोईर, संजय पाटील, मनोज पाटील, हर्षद पाटील, मेघ:श्याम पाटील, लोशन पाटील, पंकज पाटील, प्रणित भोईर, प्रविण भोईर, प्रसाद पाटील, राज म्हात्रे असे कलाकार उदयास आले. यानंतर गावचे कलाकार आजूबाजूच्या स्पर्धांमध्ये भाग घेऊ लागले. वसई तालुका स्तरावरील रांगोळीतील सर्वच बक्षिसे जूचंद्रच्या घरांत येऊ लागली. पुढे जिल्हा, राज्य, राष्ट्रीय पातळ्यांवरही कलाकारांनी आपला ठसा उमटवला.

मुंबईतील ज्येष्ठ रांगोळीकार गुणवंत मांजरेकरांनी इथल्या कलाकारांना आपल्या ग्रुपमध्ये सहभागी करून घेतले व देशभरातल्या प्रदर्शनांमध्ये जूचंद्रची ही अस्सल कला पोहोचवली. केवळ पारंपरिक रांगोळी प्रकारावर न थांबता इथल्या तरुणांनी संस्कार भारती, कणा रांगोळी (ठिपक्यांची), व्यक्तिचित्र, निसर्गचित्र, शिल्प रांगोळी, थ्रीडी, सामाज जागृतीपर रांगोळी, भौमितिक रांगोळी, फ्लोराेसंट, पाण्याखालील, पाण्यावरील रांगोळी हे सर्व प्रकार हाताळले. यातील एखादा प्रकार उच्चारताच गावातल्या प्रत्येक माणसाच्या तोंडून एकाच माणसाचं नाव येतं. पण हे सगळे प्रकार अगदी सहजपणे हाताळणारेही इथे बरेच आहेत.आता तर शाळांमधून मुलांनाही रांगोळीचे प्रशिक्षण दिले जाते. रांगोळी कलाकारांची पुढची पिढीही घडवली जात आहे. दरवर्षी नवे कलाकार ग्रुपशी जोडले जातात.

रांगोळी म्हटलं की कितीही व्यग्रतेतून उत्साहाने पुढे येणारे इथले तरुण. पाटीलांनी आम्हाला कलाकरांची ओळख करून देण्यासाठी ज्या हॉलमध्ये नेले, तिथले चित्र पाहून आम्ही थक्क झालो. १५-२० भव्य रांगोळ्या आमच्या स्वागतासाठी तयार होऊन बसल्या होत्या. आदल्या दिवशी संध्याकाळपासूनच रांगोळ्यांना सुरुवात झाली होती. तब्बल १२ ते १५ तासांच्या जागरणानंतर सगळे कलाकार आपापल्या रांगोळीवर शेवटचा हात फिरवत होते. जणू इथे मोठी स्पर्धा सुरू हाेती. कुणी कुणाचेही रंग वापरत होते, फक्त आपापल्या रांगोळीतील रंगछटांनुसार विशेष रंग प्रत्येकाच्या बाजूला. एकेक रांगोळीतील बारकावे पाहताना भान हरपले. संस्कारभारतीची रांगोळी काढणाऱ्या राज म्हात्रेंनी नुकतीच सुरुवात केली होती. पण पंगतीत जेवण वाढण्यात सराइत वाढपी कसे भराभर पदार्थ वाढत जातात. त्याप्रमाणे मुठीतून रांगोळी सोडताना त्यांचा हात मूळ बिंदूपासून गरागर फिरत डिझाइनचं एक वर्तुळ कधी पूर्ण करून येत होता, आम्हालाच कळत नव्हते. पाहता पाहता अर्ध्या तासात संस्कारभारतीचा तो आठ बाय आठचा भव्य गालिचा मस्त रंगसंगतीत सजून बसला. गावात कोणताही कार्यक्रम असला तरी आदल्या दिवशी रात्रभर जागून रांगोळ्या काढण्याचा आमचा हा नेहमीचाच उद्योग असल्याचं त्यांनी सांगितलं. पण रात्र म्हटली की त्यासोबत येणाऱ्या व्यसनांचं वारं अजूनही आम्हाला शिवलं नसल्याचं त्यांनी अभिमानानं सांगितलं. प्रसिद्धीची फार भूक कुणालाही नाही, पण मौखिक स्तुती ऐकूनच इथल्या तरुणांना विविध जिल्हे, राज्यातही रांगोळ्या काढण्यासाठी आमंत्रित केले जात आहे.

अशा प्रकारे कला संस्कृती जपणारं, कष्टकऱ्यांचं हे गाव एका भेटीत तरी ‘कुणाची दृष्ट न लागो’ याच पठडीतलं वाटलं. रांगोळीसाठी, रांगोळीसोबत आणि हरेक सुख-दु:खाचे क्षण रांगोळीतून व्यक्त करणाऱ्या या कलाकारांची ख्याती अशाच प्रकारे परराज्य, परदेशात पसरू दे, अशी प्रार्थना आई चंडिकेला करत, आम्ही गावाचा निरोप घेतला.

सर्वात मोठे सीमोल्लंघन
नुकतेच दसऱ्यानिमित्त दुबईतील एका मोठ्या दांडिया कार्यक्रमात इथल्या शैलेष, हर्षद आणि प्रसाद पाटील या तिघांना रांगोळी काढण्यासाठी विशेष आमंत्रण मिळाले होते. दुबईच्या भूमीवर ५० बाय ५० फूट आकारात दोन्ही देशांच्या पंतप्रधानांची साकारलेली व्यक्तिचित्रात्मक रांगोळी तिथे मोठ्या कौतुकाचा विषय ठरली.
manjiri.kalwit@dbcorp.in