आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article In Niramay, Kishor Rahatkar, Divya Marathi

थोडी शिस्त, वक्तशीरपणा आणि काळजी केली तर...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मागच्याच महिन्यातील घटना. एका कार उत्पादक कंपनीतील पस्तिशीतील सीनिअर इंजिनिअर मला भेटायला आले, सोबत सुविद्य पत्नी आणि शाळेत जाणारा मुलगा. सुखवस्तू कुटुंब, सहा आकडी पगार. ती त्यांची तिसरी भेट होती. त्यांचे आरोग्याचे अनेक प्रश्न होते. मी त्यांच्या कामाचे स्वरूप समजून घ्यायला लागलो. सर्वप्रथम त्यांचे रोजचे दहा-बारा तासाचे काम, उत्पादन विभाग. त्यातील किमान आठ तास उभे राहून कार्य. रोजच्या, आठवड्याच्या, महिन्याच्या, टार्गेट्सपर्यंत पोहोचणे सहजही नसते आणि सोपे तर मुळीच नसते. त्यामुळे कामाचा ताण, कर्मचारी- मशीन्स, त्यांचा आपसातील समन्वय, सततच्या मिटिंग्ज. कशीबशी मिळणारी आठवड्यातून एक सुटी. थोडे जरा बाहेर फिरून आलो की सुटी संपली. पुन्हा दुस-या दिवसापासून फॅक्टरी सुरू. अशा परिस्थितीत तब्येतीचे तीनतेरा वाजणारच.

मी त्यांचे बॉडी कॉम्पेझिशन तपासले. जुजबी सात, आठ किलो वजन अधिक होते. हल्ली आपल्याला वीस-तीस किलो ओेव्हरवेट बघण्याची सवय झाली आहे. म्हणून सात, आठ किलोंसाठी जुजबी लिहितो. फॅटस जवळपास दहा टक्के जास्त मसल्स बरेच कमी, बोन डेन्सिटी ठीक, परंतु पाण्याचे प्रमाण खूपच कमी होते. अर्थात यातले त्यांना काहीच माहीत नव्हते. ठळक लक्षणे मात्र होती. जसे - प्रचंड थकवा, हातापायाला गोळे येणे, भूक न लागणे, अ‍ॅसिडिटी, डोकेदुखी इत्यादी. कंपनीत काम करणारे अनेक इंजिनिअर्स माझे क्लायंट्स आहेत. जवळपास याच प्रकारची त्यांची दिनचर्या असते.
फार पूर्वी गुरुकुलातले शिक्षण असायचे त्यानंतर किमान गुरु तरी असत. मध्यंतरी गुरु असण्यापेक्षा ट्यूशनचे फॅड सुरू झाले. परंतु आता खरेच गुरूची आवश्यकता सर्वच क्षेत्रात निर्माण झाली आहे. कारण सभोवती उपलब्ध असलेली अमर्याद माहिती. सध्याचा काळ इंटरनेटचा आहे. गुगलवरून माहिती शोधून, वाचून, जमेल, झेपेल असा अभ्यास करून क्लायंट्स येतात. गुगलवर सर्च केल्यावर ज्या असंख्य साईट्स उघडतात, त्यातून अगदी 10 साईट्स निवडल्या तरी जे हाती लागते ते अनेक वेळा गोंधळात टाकणारे, एकमेकांच्या विरूद्ध आणि भ्रामक असू शकते. या माहितीच्या सागरात आवश्यक असलेली माहिती नेमकी स्वत:साठी कोणती व त्यातून नेमके ज्ञान मिळवायचे कसे हा प्रश्न आपल्या मनात निर्माण झाला आहे.

आपल्या प्रत्येकालाच आरोग्याच्या संबंधित आवश्यक सर्व काही पर्सनलाईज्ड असणे आवश्यक असते. आपल्या सध्याच्या आरोग्याच्या समस्या, उंचीप्रमाणे वजन, आपली दिनचर्या, आहारपद्धती-शाकाहारी की मिश्राहरी, अ‍ॅक्टिव्हिटी लेव्हल, त्याप्रमाणे कॅलरीजची गरज, न्यूट्रिशनची गरज, परंतु खूप महत्त्वाचे असलेले व्यायाम. कंपनीत काम करणा-यांचे प्रथमदर्शनी म्हणणे असते की, ‘अहो, जेवायला वेळ नाही, तर व्यायाम कसा करणार!’ डाएट म्हणजे केवळ चुकीचे खाणे टाळणे असे नाही, कमी खाणे तर मुळीच नाही. डाएट म्हणजे आवश्यक सर्व काही, पोषणाचे संतुलन राखून, योग्य वेळी खाणे. व्यायामासाठी सर्वात सोयीचे म्हणजे एकदा शिकून घेतले की घरच्या घरी करता येऊ शकतील असे व्यायाम. यामध्ये शरीराच्या सर्व अवयवांना, सर्व सांध्यांना व सर्व स्रायूंना व्यायाम व्हायला हवा तसेच स्ट्रेन्दनिंग, कार्डिओ व स्ट्रेचेस असे तीनही व्यायाम प्रकार असावेत. आपले शरीररूपी मशीन जरी खूप गुंतागुंतीचे असले तरी त्याला मेन्टेन करणे मात्र बरेच सोपे आहे. म्हणून आपल्या कुटुंबाच्या जबाबदारी सोबतच स्वत:ला जपण्याचा दृढनिश्चय व योग्य मार्गदर्शन असेल तर सगळे कसे सहज जपून येते बघा.

फंडा असा आहे
कंपनीतील मशीन असो. आपली गाडी असो की आपले शरीर, आहे गुंतागुंतीचे, परंतु थोडी शिस्त थोडा वक्तशीरपणा आणि थोडी काळजी केली तर मशीनची प्रॉडक्टिव्हिटी वाढेल, गाडीचे लाईफ वाढेल आणि आपले शरीर मध्येच सोडून जाणार नाही हे निश्चित. ब्रेक डाऊनपेक्षा प्रिव्हेन्टिव्ह मेन्टनन्स केव्हाही चांगले, नाही का ? आजार उद्भवल्यास त्याला बरे करायला हवे, पण टाळण्यासाठी पूर्ण प्रयत्न करणे अधिक हिताचे व लॉजिकल आहे.

(लेखक डाएटिशनिस्ट आणि न्यूट्रिशनिस्ट आहेत)