आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साहित्य संस्कृतीचा दिवाळी नजराणा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तेज, दिव्यत्व, भव्यता, दातृत्व, कर्तृत्व असे अनेकानेक गुण उजळविणारा, आसमंत लख्ख करणारा, भरभरून आनंद देणारा सण म्हणजे दीपावली. सुख, समृद्धी यांची पखरण होते तो हा सण. जल्लोषाने सारे वातावरण भारून गेलेल्या दीपावलीच्या दिवसांत विचारशीलतेच्या ज्योती, मशाली आपल्या तेजाने वातावरण प्रकाशमान करीत असतात. त्या कधी उत्तम सांस्कृतिक कार्यक्रमाच्या तर कधी दिवाळी अंकाच्या रूपाने तेवत राहातात. दै. दिव्य मराठीचा २०१६चा दिवाळी अंक आहे विचारमंथनाची मशाल. पेटत्या मशालीच्या अग्निशलाकेमध्ये असलेले विविध रंग जसे डोळ्यांना प्रखरतेने दिसतात, तसेच समाजामध्ये घडणाऱ्या अनेक गोष्टींचे रंग, त्यांचे मीपण, खुपलेपण दिव्य मराठीच्या या दिवाळी अंकात प्रखरतेने प्रतिबिंबित झालेले आहे.
जगातील सुखदु:खं, आशा-निराशा, स्थैर्य-अस्थैर्याचे सारे कंगोरे या दिवाळी अंकातील साऱ्याच लेखांमध्ये रेखाटलेले आहेत. त्यातील काही लेखांची ही झलक...

धर्म आणि लोकशाही : एक अटळ द्वंद्व
धर्म आणि राजकारण यांच्यात द्वंव्द आहे की त्यांचे द्वैत आहे हा चिरंतन प्रश्न आहे. त्याने अनेक विचारवंत तसेच विचारशील माणसांना रात्रंदिवस छळले आहे. या प्रश्नाचे समर्पक उत्तर मिळविण्यासाठी काही आयुष्ये खर्ची पडली आहेत. परंतु अजूनही ते उत्तर काही गवसायला तयार नाही. सेक्युलर असणे ही निव्वळ विचारप्रणाली आहे की, जीवनप्रणाली आहे याचाही शोध अथकपणे सुरू आहे. पण या प्रश्नाची व्याप्तीच इतकी अथांग आहे की, त्याची खोली अजून नीटशी कळलेलीच नाही. कदाचित त्यामुळेच की काय, उथळ राजकारणाला बरे दिवस आलेत. जेव्हा राजसत्ता भ्रष्ट होते तेव्हा तिला धर्मसत्ता मार्गावर आणते असे विधान महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी नुकतेच केले होते. धर्म व राजकारणाची बिनदिक्कत सरमिसळ कशी झाली आहे याचेच हे विधान द्योतक होते. धर्मगुरू व राजकारण्यांनी आपापल्या मर्यादा ओलांडून विवेकहीनतेची जी पायरी गाठली आहे त्यामुळे अनेकांची मती गुंग व त्यापुढची पायरी म्हणजे भ्रष्ट झाली आहे. भारतीय राज्यघटनेनुसार हा देश सेक्युलर आहे याचा सोयीस्कर विसर पडू घातला आहे. त्यामुळे तयार झालेल्या वर्तुळाला प्रख्यात विचारवंत दत्तप्रसाद दाभोळकर यांनी दिलेला हा चिंतनपर छेद.

शोधमग्न शहाणेंचे ‘प्रास’पर्व
लिहावयाचा शब्द, छापला जाणारा शब्द आणि शब्दामागील भावार्थ या तीनही गोष्टी ज्याला खूप खोल खोल कळतात तो शब्दब्रम्ह जाणणारा शहाणा माणूसच म्हटला पाहिजे. असे शब्दशहाणे या जगात तसे कमीच असतात. मराठी साहित्यात तर अशा शब्दशहाण्यांची जवळजवळ वानवाच. पण काही वेळेस काही गोष्टी जुळून येतात. शब्दविश्वापुरते बोलायचे झाले तर अशी एक व्यक्ती आहे जिच्या आडनावात व गुणांत तो शहाणपणा ओतप्रोत भरलेला आहे. ते म्हणजे अशोक शहाणे. कलंदर व्यक्तिमत्त्व. त्रिकोणाला तीन कोन असतात. पण अशोक शहाणे त्याला चौथा कोन काढून त्रिकोणाचा आयत करून दाखवितात व समोरच्याला ते मनोमन पटतेही. याचे कारण साहित्यातला शब्द कसा वापरावा, कसा लिहावा, कसा घ्यावा, झेलावा, कसा मनात झिरपून घ्यावा याची जिवंत प्रात्यक्षिके अशोक शहाणेंशी संवाद साधताना त्यांच्याकडून सादर होत असतात. बंगाली भाषेवरचे प्रभुत्व, पुस्तक छपाईतील जाणकारी, टाईपांचे स्टिरिओटाइप नसलेले ज्ञान अशा अनेक गोष्टी शहाणेेंकडे आहेत ज्या मनमोही आहेत. तसेच प्रत्येक गोष्टीबद्दल अशोक शहाणेंची स्वत:ची मते आहेत. तीच सारी प्रतिबिंबित झाली आहेत या कलंदर माणसाशी शेखर देशमुख यांनी साधलेल्या संवादातून...

डिकॉस्टा आणि बाबा आमटे
सगळीच माणसे जगत असतात आणि कधी ना कधी ती मरतात. सामान्य माणसाला त्याच्या मुलभूत गरजा भागल्या, थोडी अाध्यात्मिक बैठक लाभली की, तो कृतकृत्य होतो. त्याच्या दृष्टीने त्याने आयुष्याचा पैलतीर नीट गाठलेला असतो. पण जो आयुष्याकडे डोळसपणे पाहातो त्याला छोट्या छोट्या गोष्टींतील कृतक समाधानापेक्षा काही ठोस करायचे असते. कृती व उक्तीमध्ये काहीच फरक राहू नये असा त्याचा अट्टाहास असतो. अशी माणसे मग बनतात असामान्य व्यक्तिमत्त्व. कुष्ठरोग्यांच्या कल्याणासाठी चंदनासारखे झिजणारे बाबा आमटे हेदेखील असेच एक महापुरुष. त्यांच्या कार्यातील एक दुवा असणारा डिकॉस्टा नावाचा माणूस जो पूर्वी अनामिक होता. असे बरेचजण भेटले विश्राम गुप्ते यांना. त्यातूनच त्यांनी साकारली ही सत्यकथा.साहित्यिकाची जी एक नजर असते तिला कुंपणापलीकडचे दिसते. जगणे हे एक काटेरी झुडुपांतून केलेली वाटचालच असते. अधूनमधून दिसणारी, मध्येच हरविणारी आणि पुन्हा गवसणारी. आमटे व डिकॉस्टा हेदेखील असेच पांथस्थ या वाटेवरचे. त्यांचे परस्परांशी असलेले नाते, स्नेहरज्जू यांचे भावबंध उलगडून समोर येतात झर्रकन. त्या बंधांची मिती, कोन, रंग हे जसे दिसले तसेच मांडले गेलेय या साहित्यिक आत्मचरित्रगाथेत.

धुक्यात दडलेली डौलदार तारका
सिर्फ नाम ही काफी है असे सर्रास म्हटले जाते खरे. पण ते लागू पडते फारच थोड्या व्यक्तींच्या बाबतीत. काळाच्या गडद पाऊलखुणा अंगावर झेलूनही स्वत:चे अस्तित्व कळीकाळाच्या माथ्यावर कोरून ठेवणाऱ्या व्यक्ती असामान्यच खऱ्या. इनग्रिड बर्गमन ही कलावती त्यातलीच एक. मुळची स्वीडिश पण तिची अख्खी चित्रपट अभिनय कारकिर्द बहरली, तरारली ती ब्रिटिश व अमेरिकन चित्रपटांमध्ये. तिचा जन्मही पहिले महायुद्ध सुरू होते त्या काळातील. तिने शेवटचा श्वास घेतला तो ऐंशीच्या दशकात. तिचे आयुष्य उणेपुरे सदुसष्ट वर्षांचे. चित्रपटाच्या दुनियेतील सर्वोच्च असे सगळे मानसन्मान तिच्या पायाशी लोळण घेत आले. कारण तिचा अभिनय होताच तसा बावनकशी सोन्यासारखा. कासा ब्लान्का, डॉ. जेकिल अँड मिस्टर हाइड, गॅसलाइट, स्पेलबाउण्ड, अनास्ताशिया असे तिचे एकेक चित्रपट आठवताना वाटते की, सोन्याच्या खाणी गवसत आहेत आपल्याला. वास्तवात जगताना ती नेहमी धाव घ्यायची एका अज्ञात प्रदेशाकडे तो ज्ञात करून घेण्यासाठी. स्खलनशीलतेपासून सहनशीलतेपर्यंतचे सारे रंग जिच्यात सामावून गेले होते, तरी ती अधूनमधून धुक्यासारखी धुसर दिसायची त्या इनग्रिड बर्गमन या ‘कलावती’ व कला‘कृती’चा ठाव घेतला आहे संजय आर्वीकर यांनी.

सिलिकॉन व्हॅली- नवकल्पनांची
सळसळ आणि सत्तेचा संघर्ष

आजूबाजूला बघितले तर कोणाच्या तरी शर्टावर किंवा टीशर्टवर लिहिलेले असते सिलिकॉन व्हॅली. जगात कुठे ना कुठे हा शब्द सारखा डोळ्यासमोर येत राहातो. कशाची तरी सारखी आठवण देत राहातो. व्हॅली म्हटले की ही फुलं डोलणारी किंवा झुळझुळत्या झऱ्यांचे लेणे लाभलेली नयनरम्य दरी असेल असे कोणासही वाटू शकते. पण जग आता इतके भोळे नक्कीच राहिलेले नाही. सिलिकॉन व्हॅली ही आयटी क्षेत्रातील माणसांची पंढरी आहे, ती उत्तर अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यातील सॅनफ्रॅन्सिस्को बे एरिया भागाचा दक्षिण हिस्सा आहे, ही मािहती आता बऱ्याच लोकांना असते. कारण त्यांचा मुलगा, मुलगी किंवा कोणी ना कोणी नातेवाईक या पंढरीत असतो किंवा तिथे जाऊन तिथल्या वातावरणाने भारून आलेला असतो. माहिती-तंत्रज्ञानावर आधारित उद्योगधंद्यांची जननी समजल्या जाणाऱ्या िसलिकॉन व्हॅलीत जगभरातल्या ग्राहकाने काय खरेदी करावं, काय करू नये, याचे निर्णय घेतले जाताहेत आणि अर्थातच या व्हॅलीतील आयटी कंपन्यांमध्ये जसा टिकून राहण्यासाठीचा संघर्ष आहे, तसेच तो प्रतिस्पर्धी कंपन्यांना नामशेष करण्यासाठीचा देखील आहे. सिलिकॉन व्हॅली या नाममुद्रेच्या लखलखाटामागील विश्वाचा धांडोळा घेतला आहे सुनील खांडबहाले यांनी.

‘सेल्फी’पलीकडले ब्रेसाँ, कोडाल्का आणि रघु राय
छायाचित्राची दुनिया ही वेगळी असते. तिथे आपल्याला हवे तसेच दाखविणार असे मनाशी ठरवून छायाचित्रकाराला काहीही करता येत नाही. जे दिसतेय त्यातील गर्भितार्थ, अनर्थ हे सारे एका चौकटीत बंदिस्त करून ते प्रेक्षकासमोर मांडणे हे छायाचित्रकाराने करावयाचे खरे काम. छायाचित्रणाची कला जेव्हापासून अस्तित्वात आली हे जग चिरंजीव झाले असे म्हणता येईल. मोबाइल आला. सेल्फी काढणारे सेल्फिशही वाढले. पण एसएलआर कॅमेराने काढलेल्या छायाचित्राचे मोल काही वेगळेच. ते फिल्मवर की डिजिटल तंत्राने काढलेले छायाचित्र हा मुद्दा गौण. अनेक महत्त्वाच्या छायाचित्रकारांनी क्षण कॅमेरात टिपून ही मर्मबंधातील भूतकाळाची ठेव वर्तमान, भविष्यासाठी जतन करुन ठेवली. इतिहास सांगणाऱ्या साधनाचा दर्जा मिळवून दिला. हे स्वत:पलीकडचे जे छायाचित्रकारांचे पाहाणे आहे, त्यातील घटनांच्या कोलाजमधून मनोहारी असे छायाशिल्प साकारले आहे इंद्रजित खांबे यांनी.

माझं एक नाटक... निषेधाचं!
नाटक हा माणसाच्या जगण्याचा आरसाच असतो. जगताना जशी आपल्याला सुखदु:खाची किनार अनुभवायला मिळते, स्थैर्य-अस्थैर्याच्या हिंदोळ्यांवर हेलकावे घ्यावे लागतात तसेच नाटकाचेही असते. नाटक माणसाचे अंतरंग उघड करते, त्याच्या अंतर्मनात शिरते. रसिका आगाशे यांना नाटक व जीवनाचे नेमके मर्म कळले आहे. त्यांनी लिहिलेली व दिग्दर्शित केलेली नाटके ही समाजातील उणीवा व नेणिवांवर थेट बोट ठेवणारी, भाष्य करणारी. इतक्या उघडपणे भूमिका घेणारे रंगकर्मीही अगदी कमीच आढळतील. रसिका अागाशे यांचा रंगभूमीकडे बघण्याचा दृिष्टकोनच निराळा आहे. त्या रंगदेवता वगैरे दृष्टिकोनातून इथे बघत नाहीतच. त्यांच्या लेखी रंगमंच जिवंत झाला पाहिजे तो प्रबोधनासाठी. जित्याजागत्या लोकांना खऱ्या अर्थाने जागे करण्यासाठी. एनएसडीच्या पदवीधर असलेल्या आगाशेंनी याच तळमळीतून रंगमंचीय अविष्कार केले. ‘प्रोस्टेट थिएटर’ या वर्गात मोडणारं, दिल्लीतल्या निर्भया बलात्कार प्रकरणावर अभिव्यक्त होणारं. ‘म्युझियम’, किंवा मुजफ्फरनगर दंगलींच्या पार्श्वभूमीवर स्वत:ची भूमिका मांडणारं ‘अंधेरे के रोमिओ-ज्युलिएट’ ही आगाशे यांनी लिहिलेली-दिग्दर्शित केलेली काही नाटकं. हा अर्थातच किंवा प्रायोगिक रंगभूमीचा समांतर असा नाट्यप्रवाह. आपल्या नाटकाकडे धंद्यापेक्षा परिवर्तनाचे माध्यम म्हणून आपण कसे पाहातो हे उलगडून दाखवले आहे रसिका आगाशे यांनीच.

साक्षी मलिक, गाँव मोखरा, जिला रोहतक...
काही क्षेत्रांचा उल्लेख झाला की, आपण डोळे झाकून सांगतो हे तर काय पुरुषांनी खेळायचे मैदान. जसे कुस्ती. हिंदकेसरीपासून अनेक किताब लख्खकन डोळ्यासमोर येतात कुस्ती म्हटली की. लाल मातीची असो वा मॅटवरची कुस्ती तिथे मर्द पहिलवानांचा हुंकार घुमायचाच असे पहिलेवहिले चित्र डोळ्यासमोर येते. पण नियमाला अपवाद असतातच. महिला कुस्तीपटूंनी या क्षेत्रात केलेला शिरकाव. विविध स्पर्धांत त्या बजावत असलेली कामगिरी हे आता तसे जुने झालेय पण त्या कहाणीला नवीन पैलू पडले ते यंदाच्या वर्षीच्या ऑलिम्पिकमध्ये साक्षी मलिक या महिला कुस्तीपटूने ब्राँझ पदक जिंकल्यानंतर. साक्षी ज्या मातीतून घडली, रुजली व विस्तारली ती भूमी आहे हरियाणा राज्यातील रोहतक जिल्ह्यातील मोखरा गावाची. हरियाणा राज्यात सर्वाधिक भ्रूणहत्या नोंदल्या जातात, त्याच राज्याचे कपाळ साक्षी मलिकने आपल्या कामगिरीने उजळवून टाकावे हा तर झाला खासा सामाजिक न्याय. सरकारी निबरपणा, खेळाडूंविषयी असलेली अनास्था, महिला म्हणून वाट्याला येणारा कनिष्ठपणा अशा अनेक आव्हानांशी झालेली कुस्ती खेळून साक्षी ते डाव जिंकली. ती आज जितकी बुलंद दिसते आहे, ते थोरपण या मातीतूनच उगवले आहे... त्याचा धांडोळा घेतला आहे विकास झाडे यांनी.(पूर्वार्ध)
बातम्या आणखी आहेत...