आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुळांचा शोध आणि पुनर्शोध

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परंपरेतून येणारे लोकतत्त्व म्हणजे भूतकाळ नसतो. परंपरा आपल्यातच असतात. त्या आपल्या जगण्या-मरण्याचा भाग असतात. सतत नव्याने आकाराला येत असतात. कलाकार नवीन मिथकं घडवतो किंवा सनातन चालत आलेल्या मिथकांना नवे आयाम देतो. असे कलाकार मोजके असतात. कावालम पण्णिकर त्यापैकी एक होते.

कावालम नारायण पण्णिकरांची नाटके वेगवेगळ्या नाट्य-महोत्सवात पाहायला मिळणे, ही एक पर्वणी असे. फेस्टिवलच्या ठिकाणचा केरळी लुंगीतील पण्णिकरांचा वावर, सडपातळ शरीरयष्टीमुळे डोळ्यांत भरणारा नसला तरी त्यांचा साधेपणा उजळून टाकणारा असे. अलीकडे मी त्यांचे नाटक पाहिले, ते दोन वर्षांपूर्वी, दिल्लीच्या राष्ट्रीय नाट्य विद्यालयाच्या भारत रंग महोत्सवात. नाटक होते, ‘छाया शाकुंतलम’. माझ्यासाठी विशेष आनंदाची बाब म्हणजे, शकुंतलेची भूमिका करणारी अभिनेत्री फ्लेम युनिव्हर्सिटीतील माझी विद्यार्थिनी, तिताश दत्ता. त्यापूर्वी मी पण्णिकरांना पाहिले होते, ते मुंबईत, केरळात आणि अतुल पेठेंनी पुण्यात २००६च्या ऑगस्टमध्ये आयोजित केलेल्या कावलम पण्णिकर नाट्यमहोत्सवात. आपल्या नेहमीच्या धडाडीने पेठेंनी महाराष्ट्र कल्चरल सेंटरच्या सहकार्याने पण्णिकर-दिग्दर्शित ‘राजा’ (नाटककार- रवींद्रनाथ टागोर), ‘माया’ (नाटककार- कवी शक्तिभद्र) आणि ‘विक्रमोवर्षीय’ (नाटककार- कालिदास) ही नाटके केरळवरून आणली होती. शिवाय, प्रत्येक प्रयोगानंतर पण्णिकर आणि त्यांच्या सोपानम थिएटर कंपनीच्या कलाकारांबरोबर चर्चा.

पण्णिकरांना दोन वर्षांपूर्वी पाहिलं, तेव्हा ते ८५ वर्षांचे ‘तरुण’ होते. भारतभरातल्या वेगवेगळ्या भाषांत नाटक करणाऱ्या आणि वयाची २०-३० वर्षे पूर्ण केलेल्या कलाकारांबरोबर संस्कृत भाषेतून कालिदासाचे ‘शाकुंतल’ करत होते. अत्यंत संयत व्यक्तिमत्त्वाचे पण्णिकर शांतपणे वाहणाऱ्या नदीचे रूप भासले. पण्णिकरही म्हणत की, आपण राहतो, वाढतो, तिथली माती, तिथलं पाणी, तिथला निसर्ग आपल्याला घडवत असतो. रामायण-महाभारतातील गोष्टी, लहानपणापासून ऐकलेल्या-पाहिलेल्या कुटियाट्टम, थेय्यम, मोहिनीअट्टम अशा परंपरांतून येणाऱ्या कथा आणि रूपकं, सतत कानावर पडणारी गाणी, गाण्यातला लय-ताल असा अख्खा आरपार-भवतालच पण्णिकरांच्या नाटकातून रंगमंचावर अवतरताना दिसे.

प्रेमाने कावालम म्हणून त्यांच्या गावाच्या नावावरून ओळखले जाणाऱ्या पण्णिकरांची ओळख फक्त त्यांच्यापुरती किंवा त्यांच्या नाटकांपुरती नव्हती. त्यांचा गावच त्यांच्याबरोबर असे!
पण्णिकरांनी काही वर्षे वकिली केली, पण नंतर नाटकावरच आपले लक्ष केंद्रित केले. ६०च्या दशकात ते केरळ संगीत नाटक अकादमीचे सेक्रेटरीही झाले. अकादमीच्या कामाच्या निमित्ताने केरळमधल्या गावा-गावांतलं नाटक बघितलं. तिथला समाज आणि कलाव्यवहार त्यांनी समजून घेतला.

कावालम नाटककार होते आणि दिग्दर्शकही होते. साक्षी(१९६४), आवनावन कदंबा(१९७५), ओट्टायन(१९८८), करिमकुट्टी(१९८३), कोम्या(१९८६), अरनी(१९८९), थय़्य़ थय्यम (१९९०) आणि पोरानदी (१९८५)ही त्यांनी लिहिलेली काही नाटके. केरळमध्ये आधुनिक कला-परंपरेची पायाभरणी करणाऱ्या जी. अरविंदन यांनी १९७४मध्ये त्यांचे ‘आवानावन कदंबा’ हे नाटक दिग्दर्शित केले. पण, कावालम यांनी स्वतःची नाटके स्वतःच दिग्दर्शित केली. ‘मध्यमावियोगम’ हे त्यांनी दिग्दर्शित केलेले पहिले नाटक १९७८मध्ये उज्जैनमधल्या कालिदास समारंभात सादर झाले, त्यांच्या जवळजवळ सर्व संस्कृत नाटकांचा पहिला प्रयोग याच समारंभात होत असे. पुढे, भासाची ‘उरुभंगम’ आणि ‘कर्णभारम’ तर, कालिदासाची शाकुंतलम आणि विक्रमोवर्षीयम् ही संस्कृत नाटके दिग्दर्शित केली. त्यांच्या संस्कृत आणि मल्याळम नाटकांचे प्रयोग जगभरात झाले.
कोणत्याही चांगल्या दिग्दर्शकाला आपण अस्सल कलाकार म्हणून संबोधतो, तेव्हा त्या कलाकाराच्या निव्वळ नाट्य-रूपांमुळे वा नाटकीय कसबांमुळे नव्हे; तर, नाटक उभे करण्यामागच्या विचारांमुळे. दिग्दर्शक विशिष्ट भाषेतले नाटक का करतो? एखादा दिग्दर्शक ठरावीक नाटकी रूप का हाताळतो? यामागचे लॉजिक स्पष्ट असणे महत्त्वाचे असते. एखादा दिग्दर्शक ते बोलून दाखवतो आणि दुसरा बोलून दाखवत नाही. पण, ते लॉजिक आणि त्यामागचा विचार असणे आणि दिसणे महत्त्वाचे असते. मल्याळम रंगभूमीवर नाटके करणाऱ्या पण्णिकरांचे संस्कृत नाटक करण्यामागचे त्यांचे म्हणून एक लॉजिक होते. त्यांच्यासाठी, भासाचे संस्कृत नाटक करणे म्हणजे स्वतःच्या लेखनाला समृद्ध करणे होते. भास वा कालिदासाची संस्कृत नाटके करणे म्हणजे कलात्म आणि नाटकीय आव्हाने स्वीकारणे असते. त्या वेळी पण्णिकरांसारखा दिग्दर्शक नव्या शक्यतांचा शोध घेतो. त्यांच्या दृष्टीने, आताच्या काळात भासाची नाटके करणे म्हणजे, आताची नाट्यकला समृद्ध करण्याचा प्रयत्न होता. उदाहरणार्थ, भासाच्या ‘मध्यमावियोगम’ या नाटकात एक पात्र वृक्ष उखडते आणि ते घेऊन युद्ध करते, असा प्रसंग आहे. आता हा प्रसंग ‘आधुनिक’ वास्तवदर्शी रंगमंचावर उभा करणे आव्हानच असते. इथे, पण्णिकरांचा नाट्यदिग्दर्शनामागचा विचार पुढे येतो. त्यांच्या मते, आपण भारतीय पारंपरिक आणि आदिवासी परंपरांतून येणाऱ्या रंगभाषेशी आपली नाळ जोडणे महत्त्वाचे आहे. आधुनिक पाश्चात्त्य रंगभूमीपासून प्रेरणा घेऊन वा इंग्रजी नाटके करून ही नाळ जोडता येणार नाही. तर, इथल्या भाषा-संस्कृतीत नांगर मारलेले नाटक इथे बोलल्या जाणाऱ्या लोकभाषेतून आणि संस्कृती व्यवहारातून आकाराला येणे महत्त्वाचे ठरते. या पार्श्वभूमीवर, उखडलेल्या वृक्षाबरोबरचे युद्ध दाखवत असताना इथल्या परंपरांतून येणाऱ्या रंगभाषेचे भान असणे अपरिहार्य ठरते. हे भान अ-शक्य, अ-वास्तव वाटणारे आयुष्य रंगमंचावर उभे करताना कलाकाराला रूपकात्मक दृश्य-समज देते.

नाटकातले एखादे पात्र प्रवास करत असते. मध्येच ते पात्र पर्वतरांगांमधून उतरते आणि वाहत्या पाण्याला लागते. पुढे, नदीच्या पाण्यात शिरल्यावर भोवऱ्यात सापडते. असा नाटकी-प्रवास असेल, तर साहजिकच त्या दृश्यात हालचाल असते. ती संहितेत असतेच. त्या पात्राच्या प्रवासात तर असतेच ती. पण ती मांडायला दृश्यात्म कविता लागते. अशी दृश्यात्म-कविता सादर करताना पण्णिकर लोक-कल्पनांकडे आकर्षित झाले. काव्य, रंगमंच आणि रचना यांचे पुरेपूर भान ठेवत रंगमंचीय अवकाशात खेळणाऱ्या पण्णिकरांच्या नाटकात साहित्य, नृत्य, आणि संगीत सहज मिसळून गेलेले आपल्याला दिसतात.

आपण लोक-रंगभूमी वा लोक-नृत्य म्हणतो, तेव्हा तो एक विचार असतो. ती एक संकल्पना असते. ते एक तत्त्वज्ञान असते. पण्णिकरांचे नाटक लोक-तत्त्व उभे करणारे होते. अमाप नाटकीय शक्यता अजमावत असताना लोक-तत्त्व उभे करणे, त्यांना महत्त्वाचे वाटले. हे करताना, संस्कृत नाट्यपरंपरा आणि लोक-नाट्यपरंपरा यांची सांगड मोठ्या खुबीने पण्णिकरांनी घातली. ज्याला पण्णिकर नाट्यधर्मी आणि लोकधर्मी म्हणत असत, त्या मार्गी आणि देशी परंपरांचा सुंदर मिलाप पण्णिकरांनी घडवून आणला. मार्गीला अभिजात वगैरे संबोधून आपण त्यांचे जग खुंटित करत असतो. अभिजात आणि लोकप्रिय अशी विभागणी वैचारिक चौकटीच्या गैरहजरीत उथळ ठरते. पण्णिकरांनी एका बाजूला संस्कृत नाटक केले आणि दुसऱ्या बाजूला मल्याळम. ते कालिदासाकडे प्रेरणास्रोत म्हणून पाहात. कारण त्यांना ब्रिटिश वा पारशी रंगभूमीचा भूतकाळ नको होता. पाश्चात्त्य रंगभूमी आकर्षित करत नाही, हे त्यांनी मान्य केले होते. भवतालातून म्हणजे भारतीय इतिहास-संस्कृतीतून येणारे भान त्यांना महत्त्वाचे वाटत होते.

लोकतत्त्व म्हणजे मातीशी नाते. लोकांशी असलेले नाते. लोकांतून ते येत असते, त्यातला नाद मला आवडतो, असे पण्णिकर म्हणत. त्यांच्यासाठी नाद आणि भवताल वेगळा नव्हता. परंपरेतून येणारे लोकतत्त्व म्हणजे भूतकाळ नसतो. परंपरा आपल्यातच असतात. त्या आपल्या जगण्या-मरण्याचा भाग असतात. सतत बदलत असतात. सतत नव्याने आकाराला येत असतात. कलाकार नवीन मिथकं घडवतो किंवा सनातन चालत आलेल्या मिथकांना नवे आयाम देतो. असे कलाकार मोजके असतात. कावालम पण्णिकर त्यापैकी एक होते. त्यांना गोष्ट सांगण्यात इंटरेस्ट होता. निसर्ग आणि माणसांमध्ये होणाऱ्या नातेसंबंधातील घुसळणीतील गोष्ट सादर करणे, त्यांना महत्त्वाचे वाटत होते.
आपल्या परंपरेतून येणाऱ्या लोकतत्त्वाची मांडणी नाटकातून करणे म्हणजे, दुसऱ्या किंवा आपल्याला परक्या असणाऱ्या संस्कृतीचे आकलन करून घेणेही अभिप्रेत असते. अनोळखी संस्कृतीतील रंगभाषिक व्यवहार कलाकाराने समजून घ्यायला हवा. पण, तो आपल्या संदर्भात आणि इथल्या भवतालाच्या पार्श्वभूमीवर व्हायला हवा, असा ठाम विचार पण्णिकरांनी वेळोवेळी मांडला. त्यांच्या मते, ओरिजिनल विचार आणि कलारूप स्व-भाषेतूनच आकाराला येते. पण्णिकरांच्या “स्व-भाषिक” रंगभाषा-विचारांचे प्रत्यंतर “मुळांकडे परत चला” या साठ-सत्तरीच्या दशकात उभ्या राहिलेल्या चळवळीत दिसून येते. केरळमध्ये पण्णिकर असोत वा कर्नाटकात बी. व्ही. कारंत वा ईशान्येकडच्या कन्हायलाल या समकालीन दिग्दर्शक-नाटककारांच्या कलारूपांमध्ये आपापल्या मुळांच्या शोधांचे प्रतिबिंब पडलेले दिसते.

“मुळांकडे परत चला”ची चळवळ धोक्यांशिवायची नव्हती. नाही. वसाहतीकरणाला प्रतिक्रिया देतात त्यांचे आणि आपले असे काही सुट्टे-सुट्टे मांडता येईल? वसाहतपूर्व आणि वसाहतीनंतरच्या परंपरा अशा तुकड्यांत पाहता येईल? पाश्चात्त्य आणि भारतीय नाटक कोणत्या अर्थाने वेगळे होते/आहे? लोक-तत्त्व, लोक-विचार म्हणताना कोणते लोक? इथल्या जात-वर्ग व्यवस्थांचे काय करायचे? संस्कृत नाटक आणि इतर भारतीय भाषांतील जिवंत रंगभूमी यांचे नातेसंबंध कोणत्या स्वरूपाचे आहेत? असे आणि इतर प्रश्न उपस्थित होतात. भारतासारख्या वैविध्यपूर्ण आणि गुंतागुंत असणाऱ्या समाज-संस्कृतीत असे प्रश्न अधिक तीव्र बनतात. प्रश्न उपस्थित करणारा नाट्यव्यवहार समाजाला प्रगल्भावस्थेकडे नेतो, आणि म्हणून, पण्णिकरांचा नाट्यव्यवहार महत्त्वाचा ठरतो.
potdar.ashutosh@gmail.com

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...