आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समाधानाचे वर्तमान (वर्तन-परिवर्तन)

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
व्यसनी व्यक्तीचे मनोविश्व नकारात्मक विचारांनी काळवंडलेले असते. हीच नकारात्मकता त्याला स्वत:मध्ये बदल घडवण्यावाचून रोखत असते. परंतु भूतकाळाच्या दलदलीतून तो बाहेर आला आणि भविष्याची अनावश्यक चिंता सोडून वर्तमानात जगायला शिकला, तर बदलाचा क्षण चुकत नाही...

कार्य करत असताना असे लक्षात येते की, जसजसा एखादा माणूस व्यसनाधीन होतो, तसतसा त्याच्या अंगी असलेल्या सुदृढ व्यक्तिमत्त्वाचा ऱ्हास होण्यास सुरुवात झालेली असते. त्या संदर्भात विचार करता असेही दिसून येते की, सुरुवातीस त्याची मानसिकता बदलत जाऊन त्याचा परिणाम त्याच्या शरीरावर होत जातो. तसेच लहानपणी झालेल्या धार्मिक, अाध्यात्मिक स्वरूपाच्या संस्कारांकडेदेखील तो पाठ फिरवितो. त्याचे वैयक्तिक तसेच घराण्याचे नाव गमावून सामाजिक प्रतिष्ठा/पत मातीमोल करून तो एकाकीपणे आपल्याच व्यसनविश्वात रममाण होताना दिसतो.

सर्वसाधारणपणे अशा व्यक्तींची मानसिकता तयार होण्यास घरात अतिप्रमाणात होणारे लाड किंवा वाजवीपेक्षा अति धाक, अथवा घरातीलच एखादी व्यसनाधीन व्यक्ती वा व्यसनाधीन मित्र परिवाराचा सततचा सहवास, एखाद्या प्रिय व्यक्तीचा दुरावा, मनाविरुद्ध घडलेली/सतत घडणाऱ्या घटना, शालेय व कॉलेजजीवनात सोबतच्या किंवा आपल्यापेक्षा मोठ्या असणाऱ्या मित्रांच्या व्यसनाकडे आकर्षित होऊन तसेच करण्याची ओढ, परीक्षेतले अपयश, एकतर्फी प्रेम, गैरसमजातून निर्माण झालेले बदनामीकारक प्रसंग, शिक्षणपूर्तीनंतर नोकरी न मिळाल्यास, मनासारखी नोकरी न मिळाल्यास आलेले नैराश्य, व्यवसाय-धंद्यात कष्ट करूनही मनाजोगती प्रगती न होणे, व्यवसायात दिवाळखोरी होऊन त्यामुळे होणारे कर्ज, घरातील एखाद्या व्यक्तीचे गंभीर स्वरूपाचे आजारपण व त्याच्या इलाजासाठी होणाऱ्या खर्चाची चिंता, नातेवाईक किंवा समाजात स्वत:चा मोठेपणा दाखविण्यात आपल्या आमदनीपेक्षा जास्त खर्च होऊन झालेले कर्ज, मनाविरुद्ध झालेला विवाह, घरातील रोज रोज होणाऱ्या कटकटीमुळे आलेली हतबलता, सोबत शिकत असलेल्या मित्रांची प्रगती किंवा यशस्वीतेतून आलेले वैफल्य आदी घटक कारणीभूत असतात.

तसेच त्याला हवे तसे प्रेम, वैचारिक स्वातंत्र्य व मानसन्मान न मिळाल्यास मनातील गोष्टी मनातच साठवून दाबून त्याचा क्षोभ होऊनदेखील माणसाच्या मानसिकतेत बदल घडू शकतो. व्यसनाधीन माणसाच्या व्यसनाचा परिणाम एका टप्प्यानंतर त्याच्या शरीरावरदेखील होताना दिसतो. जसे त्याने केलेल्या व्यसनाच्या नशेची ग्लानी असेपर्यंतच त्याला झोप लागते. नंतर त्याला झोप न लागणे, व्यसनामुळे निर्माण झालेली अतिप्रमाणातील उष्णता डोळ्यांबाहेर पडून ते लालबुंद होणे, लघवीच्या जागी व गुदद्वारात आग होणे, डोळे थरथरणे, हात-पाय व शरीराला कंप येणे, त्वचेवर काळे डाग पडणे, भूक मंदावणे, पाणी प्यायल्यास लगेचच उलटी होणे, खोकल्याची उबळ येऊन दम लागणे, तोंडावाटे कफ/पित्तासोबत रक्त पडणे, छोट्या व मोठ्या आतड्यांना सूज येणे, सतत कळा येऊन पोट दुखणे, अति अशक्तपणा येऊन चक्कर येणे, समाधानकारक रतिक्रीडेच्या आनंदापासून वंचित राहणे, शरीरास खूप घाम येणे, मल-मूत्राचा, घामाचा उग्र दर्प येणे, तहान लागणे, डोक्यात नेहमी विचित्र विचार निर्माण होऊन ‘भ्रमिष्ट’ अवस्था येणे, याच अवस्थेत एखादा गंभीर अपघात घडून शरीराचा अवयव निकामी होणे, ‘लिव्हर सोरासिस’सारखा गंभीर स्वरूपाचा आजार होणे, अतिप्रमाणात व्यसन केल्याने मेंदूवर त्याचा परिणाम होऊन त्याची वृत्ती संशयी बनून प्रत्येकाविषयी संशय घेऊन त्या व्यक्तीस अद्वातद्वा बोलून शिवीगाळ करणे, प्रसंगी मारहाण करून स्वत:च्या व इतरांच्या शरीरास इजा पोहोचवणे, कौटंुबिक जबाबदारी नाकारणे, घरातील मोठी मंडळी अथवा पत्नी एखाद वेळेस मोठ्या आवाजात किंवा रागाने बोलल्यास त्यांच्यावरच तोंडसुख घेऊन, घरातून बाहेर निघून जास्त प्रमाणात व्यसन करून घरी येणे किंवा बाहेरच कोठेतरी झोपणे, आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांच्या समोर पत्नी व घरातील लोकांचा अपमान करणे, आदी प्रकार घडत राहतात.

खाण्या-पिण्याकडे दुर्लक्ष होऊन शारीरिक, मानसिक दौर्बल्य येऊन अशा व्यक्तींचा आत्मविश्वास नष्ट होऊन केवळ ‘निकामी व व्यसनी व्यक्ती’ अशी छबी बनून समाजातील चर्चेचा विषय ठरून प्रतिष्ठा खालावते. परिणामी समाजाचा या व्यक्तीकडे व कुटुंबाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो.
कुणीही व्यसनाधीन माणूस समाजात जाण्याचे सहसा टाळत असतो. कारण आपण व्यसनी असल्याचा ‘सल’ त्याच्या अंतर्मनाला सतत टोचत असल्यामुळे नातेवाईक मंडळींच्या शुभकार्यात उदा. लग्न समारंभ, धार्मिक सणवार, वास्तुशांती, उद््घाटन प्रसंगात सामील होणार असल्याने आपणास कोणी काही बोलेल, अपमानित करेल किंवा अपमानास्पद वागणूक देईल, अशी भीती वाटत असते. ती अनेकदा खरीही ठरते. त्याला वेगळे ठेवून त्याच्याकडे लक्ष न देता समाज वावरत असतो.

आपल्याला समाजसुद्धा विचारत नाही, असा गैरसमज करून त्याची वृत्ती संकुचित बनते. तो पुन्हा व्यसन करून व्यसनाशिवाय आपण जगूच शकत नाही किंवा जगावे तरी कुणासाठी? व का? इतरांना आता आपली आवश्यकता आहे का? असे आपणच आपले ‘अनुत्तरित’ प्रश्न निर्माण करून सामाजिक जबाबदारी टाळतो. तो समाजाच्या दृष्टिकोनातून शून्य किंमत ठरून आपोआपच समाजाबाहेर फेकला जातो.

व्यसनाधीन झालेल्या व्यक्तीचे व्यसन सुटण्यासाठी घरातील, परिवारातील आप्तेष्ट देवाला नवससायास करतात. त्याला तेथील रक्षा, पाणी, गंडे, दोरे आणून बांधतात. ‘तू हे मंत्रविलेले, जागरूक अशा देवस्थानाचे उपाय चालू असेपर्यंत जर का व्यसन केलेस तर तुला खूप त्रास होईल, रक्ताच्या उलट्या होतील.’ अशा वा यापेक्षा भयानक स्वरूपाच्या भीतिप्रद गोष्टी सांगतात.

लहानपणी झालेल्या संस्काराची पकड थोड्याफार प्रमाणात असल्यामुळे काही काळ तो व्यसन थांबवितो, नंतर मात्र त्याच्या मनातील न्यूनगंड त्याला स्वस्थ बसू देत नाही. तो परत व्यसन करू लागतो. परंतु, व्यसनी व्यक्ती व्यसन करून मंदिरात किंवा पूजापाठ होत असलेल्या ठिकाणी जाणे टाळते. याचाच अर्थ, संस्कारांची त्याला असलेली जाणीव जिवंत असते वा देव-धर्माविषयी त्याच्या मनातला विश्वास कायम असतो.

मुख्यत: मानसिक, शारीरिक, आध्यात्मिक व सामाजिक पत/प्रतिष्ठा व्यसनाधीनतेमुळे घालवलेल्या व्यक्तीस सर्वप्रथम गरज भासते, ती मानसिक आधाराची. तो एकदा मिळाला की, स्वत:विषयी वाटणारी असुरक्षितता कमी होऊन अंगी असलेल्या गुणांची जाणीव जागृत होते आणि गुणांमुळे ती व्यक्ती आयुष्यात यशाचे शिखर गाठू शकते.

या सगळ्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे, झाल्या-गेल्याचा खेद बाळगण्यापेक्षा भविष्याची चिंता न करता केवळ वर्तमानाचाच विचार करून सुखी-समाधानी जगण्याचा मार्ग त्या व्यक्तीला गवसतो. पण याची जाणीव जितकी व्यसनाधीन व्यक्तीला असणे गरजेचे ठरते, तितकीच समाजालाही असणे आवश्यक ठरते.

nileshsoberlife@gmail.com