आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बहुमूल्य आरोग्यचिट्ठी! (औषधजागर)

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तपासणीनंतर डॉक्टर रुग्णाला देत असलेले प्रिस्क्रिप्शन हा केवळ कागदाचा तुकडा नसतो, तर ती एक आरोग्यचिठ्ठी असते. तिचे हस्ताक्षराच्या माध्यमातून महत्त्व जाणणे जितके डॉक्टरांसाठी महत्त्वाचे असते, तितकेच रुग्ण आणि औषध विक्रेत्यांसाठीही ती जाणून घेणे जबाबदारीचे असते...

डॉक्टरांकडे जातो, तब्येतीच्या कुरबुरी सांगतो, डॉक्टर तपासतात व एक चिठ्ठी लिहून देतात. आपण ती चिठ्ठी घेऊन फार्मसीच्या दुकानात जातो. चिठ्ठी दाखवून दिलेली औषधे घेऊन घरी येतो. आता आपण म्हणाल, यात नवीन विशेष ते काय सांगितले? खरे आहे, हे तर नेहमीचेच. पण मला आपले नेमके लक्ष वेधायचे आहे ते या रुटीन प्रक्रियेतील ‘चिठ्ठी’कडे. कारण ‘आपल्याला त्यातले काय समजणार’ अशी धारणा व एकंदरच उदासीन, त्रयस्थ दृष्टिकोन आपल्यापैकी बहुतांश जणांचा या चिठ्ठीबाबत असतो.

लॅटिन शब्द ‘रेसिपी’वरून ‘Rx’ म्हणजे ‘तू घे’ असे रूढ होऊन Rx ही प्रिस्क्रिप्शनची खूण व ओळख झाली. रुग्णाने कोणती औषधे घ्यावीत, याबाबत डॉक्टरांनी मांडलेली ही कुंडली. फार्मासिस्टसाठी व रुग्णांसाठी हा विनंतीवजा आदेश. त्यामुळे दोघांनाही ते नीट समजणे आवश्यक. रजिस्टर्ड डॉक्टरांनी रुग्णाच्या औषधोपचाराबाबत लिहिलेला हा कायदेशीर दस्तएेवज.

प्रिस्क्रिप्शनमध्ये काय अंतर्भूत असावे? कशी असावी ही चिठ्ठी?
- प्रिस्क्रिप्शन छापील लेटरहेडवर असावे. डॉक्टरांचे पूर्ण नाव, अर्हता, पत्ता, नोंदणी क्रमांक असावा.
- रुग्णाचे नाव, पत्ता, शक्यतो वय अन्् वजनही लिहिलेले असावे.
- प्रिस्क्रिप्शनवर तारीख लिहिलेली असावी.
- Rx, प्रत्येक औषधाचे पूर्ण नाव, डोसेज फॉर्म, त्याची मात्रा (पॉवर), दिवसातून किती वेळा व किती दिवस घ्यायचे, एकूण गोळ्या किती घ्यायच्या, हे तपशील असावेत.
- डॉक्टरांची सही व स्टॅम्प असावा.
- फार्मसीच्या दुकानात या प्रिस्क्रिप्शनवर औषधे दिल्यावर ‘Dispensed’ असा स्टॅम्प फार्मासिस्टने मारावा व तारीख, फार्मासिस्ट, फार्मसी नाव हे तपशील असावे.

समजा चिठ्ठीत, ABC Tablets 50 mg 1-0-1×5 असे असेल तर ५० मिलिग्रॅम पॉवरच्या ABC या टॅबलेट्स रुग्णाने सकाळी व संध्याकाळी एक याप्रमाणे पाच दिवस घेणे, असा याचा अर्थ. कधी ‘0’ ऐवजी ‘X’ अशी खूणही असते. या खेरीज, औषध जेवणाआधी की नंतर, प्रिस्क्रिप्शन एकदाच वापरायचे की परत रिपीट करायचे (Repeat/Refill) ही महत्त्वाची माहिती स्थानिक भाषेतून लिहिणे, फेरतपासणीसाठीची तारीख हा तपशीलही रुग्णांच्या सोयीसाठी असल्यास प्रिस्क्रिप्शन अधिकच परिपूर्ण होते.

वर नमूद दिलेले सर्व तपशील आपल्या प्रिस्क्रिप्शनमध्ये असतात का? काही डॉक्टरांची प्रिस्क्रिप्शन असतात अगदी परिपूर्ण, सुवाच्य लिहिलेली, काही तपशील मराठीतही लिहिलेली. अशा सर्वगुणसंपन्न प्रिस्क्रिप्शनवर औषधे देताना दुकानातील फार्मासिस्टलाही काही अडचण येत नाही. मात्र अनेकदा आपण पाहतो, ती प्रिस्क्रिप्शन असतात ‘अपूर्ण’. कधी औषधांची पॉवर लिहिलेली नाही, कधी डोसेज फॉर्म नाही, कधी एकूण किती दिवस द्यायचे ते नाही. आता असं बघा की, एकच औषध ब्रँड अनेक पॉवरमध्ये उदा. १०, २०, ५० मिग्रॅ. इ. व वेगवेगळ्या डोसेजफॉर्ममध्ये म्हणजे टॅबलेट, कॅप्सूल, सिरप इत्यादी, असा उपलब्ध असू शकतो. पण जर प्रिस्क्रिप्शनमध्ये नेमकेपणाने हा तपशील लिहिलेला नसेल तर रुग्णाने काय समजायचे, फार्मासिस्टने काय द्यायचे? औषधांचा योग्य परिणाम होऊन आजार नियंत्रणात येण्यास औषध योग्य प्रकारे, योग्य मात्रेत, पूर्ण कालावधीसाठी घ्यायलाच हवे. पण त्यासंबंधीच्या सूचनाच जर चिठ्ठीत सुस्पष्ट नसतील तर मग परिस्थिती गोंधळाची होते.

प्रिस्क्रिप्शनचे ‘अपूर्ण’ असणे हा एक मुद्दा व त्याची ‘वाचनीयता’ हा दुसरा महत्त्वाचा मुद्दा. आपल्यापैकी ज्यांनी प्रिस्क्रिप्शन वाचण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला असेल ते सहमत होतील की, अनेक डॉक्टरांचे हस्ताक्षर वाचणे हे एक मोठे आव्हान आहे. आता डॉक्टरांचे हस्ताक्षर सुंदर असावे, अशी कोणाचीच अपेक्षा नाही. पण ते सुस्पष्ट वाचता येईल, असे असावे. मुख्य म्हणजे अर्थाचा अनर्थ करणारे नसावे, ही माफक अपेक्षा असणे रास्तच आहे. इथे ‘ध’चा ‘मा’ होणे आरोग्यासाठी विघातक ठरू शकते. आपल्या देशात १ लाखावर विविध ब्रँड‌्स आहेत. अनेकांची नावे अगदी सारखी, एखाद्या अक्षराचा फरक अशी आहेत. उदा. ‘Pan 20’ या गोळ्या अॅसिडिटीसाठीच्या, तर ‘Pah 20’ या (व्हायग्रासारख्या) गोळ्या लैंगिक दौर्बल्यासाठीच्या. Diamox हे अँटिबायोटिक, तर Diamol हे पोटातील गॅससाठी.

या थोड्या उदाहरणांवरूनसुद्धा वैद्यकीय अपघात होऊन कसा रुग्णास त्रास होऊ शकतो, याची कल्पना करता येईल. रुग्णांची वाढती गर्दी, त्यामुळे येणारा दबाव, अपुरा वेळ, ताणतणाव, तत्सम कारणे अपुऱ्या व वाईट अक्षरात लिहिलेल्या प्रिस्क्रिप्शनमागे जरूर असू शकतात. पण त्यामुळे निर्माण होणारे धोके व प्रिस्क्रिप्शन आरोग्यचिठ्ठी न राहता ‘अनारोग्यचिठ्ठी’ होणे हे रुग्णहितासाठी नक्कीच योग्य नाही. यावर उपाय म्हणून कॉम्प्युटरनिर्मित चिठ्ठ्या मिळताहेत, पण त्याचे प्रमाण अगदीच नगण्य आहे.

बाहेरील अनेक देशांमध्ये प्रिस्क्रिप्शन लिहिण्यासाठी स्टँडर्ड ढाचा वापरणे डॉक्टरांसाठी बंधनकारक असते. त्यामुळे प्रिस्क्रिप्शनची अपूर्णता ही समस्या तेथे कमी आहे, पण हस्ताक्षराची समस्या मात्र तेथेही दिसतेच.

प्रिस्क्रिप्शन कसे लिहावे, याचे शिक्षण वैद्यकीय अभ्यासक्रमात जरूर अंतर्भूत असते. पण प्रत्यक्ष प्रॅक्टिस चालू केल्यावर ते ज्ञान अमलात आणले जातेच असे नाही. या समस्यांचा विचार करून महाराष्ट्रात अन्न व औषध प्रशासनाने २०१४मध्ये प्रथम ‘मॉडेल प्रिस्क्रिप्शन’साठीचा मसुदा वैद्यकीय व्यावसायिकांसाठी जारी केला. त्यात वरील नमूद केलेल्या बेसिक तपशिलाखेरीज डॉक्टरांनी औषधाचे ‘मूळ नाव’ लिहावे, नाव कॅपिटल अक्षरात लिहावे, असे नमूद केलेले आहे; ज्यामुळे औषध अचूकतेने देण्यास मदत होईल, सारख्या ब्रँड‌्सच्या नावामुळे होणारे घोटाळे होणार नाहीत. ‘स्वस्त’ ब्रँडचा पर्यायही रुग्णाला सांगावा, असेही या ‘मॉडेल प्रिस्क्रिप्शन’मध्ये आहे. मेडिकल कौन्सिलने सुचवलेल्या प्रिस्क्रिप्शन मसुद्यातही ‘कॅपिटल अक्षरात’ डॉक्टरांनी नावे लिहावीत, असे नमूद आहे.

एकंदर पाहता, आपणा सर्वांचाच रुग्ण, डॉक्टर, फार्मासिस्ट, नर्सेस, प्रिस्क्रिप्शनकडे पाहण्याचा दृष्टिकोन अधिक व्यापक व जबाबदारीचा व्हायला हवा. डॉक्टरांनी आपल्याला काय औषधोपचार लिहून दिलेत, हे जाणून घेणे रुग्णाचे कर्तव्य व हक्कही आहे. त्यामुळे रुग्णालाही ते वाचता आले पाहिजे, म्हणून डॉक्टरांना याबाबत विचारून ते समजून घेणे रुग्णाचे कर्तव्य आहे. याच अर्थ असा नव्हे की, रुग्णांनी विनाकारण प्रश्न विचारून डॉक्टरांना हैराण करावे. दोन्हींकडून सामंजस्याचा दृष्टिकोन या बाबतीत असायला हवा.

symghar@yahoo.com