आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article In Rasik About Three Tourism Spot's Of Nepal

महिमा तीन पर्यटनस्थळांचा (ट्रॅव्हलटाइम)

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नेपाळमधील मनकामना देवी मंदिर असो, गौतम बुद्धांचे जन्मस्थान असलेले लुम्बिनी असो वा रामायणातील सीतेच्या जन्माच्या कथेशी नाळ जोडणारे जनकपूर असो; ही तिन्ही ठिकाणे भारतीय इतिहासाशी जोडलेली असून दोन्ही देशांच्या वर्तमानातही हे संदर्भ महत्त्वाचे ठरत आहेत.
माणसाचा स्वभावच असा आहे की, त्याला काही रंजक, चित्ररूपात, गोष्टीरूपात सांगितलेलं आवडतं. असेच एका गोष्टीरूपाने माझ्या कायम स्मरणात राहिलेले नेपाळचे ‘मनकामना देवी मंदिर’!! काठमांडू, पोखरा आणि चितवन या तीन शहरांच्या जंक्शनवर वसलेले शहर! मनकामना कायमचे लक्षात राहते ते अनोख्या केबल कारमुळे. नेपाळच्या गोरखा जिल्ह्यात स्थित असलेले हे मंदिर! पार्वतीच्या भगवती रूपाचे हे मंदिर आहे. ‘मनकामना’ नावावरूनच आपल्याला अर्थबोध होतो की, मनातल्या इच्छा पूर्ण करणारी देवी! हे मंदिर समुद्रसपाटीपासून साधारणपणे १३०२ मी. उंचीवर वसलेले आहे. समुद्रसपाटीपासून हे मंदिर बरंच म्हणजे १३०२ मी. उंचीवर असल्याने सर्वांनाच चढून जाणे शक्य होत नाही. त्यामुळे येथे अनुभवण्यासारखी अजून एक गोष्ट म्हणजे केबल कार. पूर्वी या मंदिरात जायचे म्हणजे तीन तास चढाई करून जावे लागत असे. पण आता या कारमुळे मंदिरात जाणे सहज शक्य झाले आहे. ही कार ऑस्ट्रियामधून मागवलेली आहे व ही कार सर्व्हिस १९९८मध्ये सुरू झाली. हिचा वेग म्हणाल तर साधारणपणे दर दहा मिनिटाला २.८ किमी. अशी जाऊ शकते. कुरीन्तर, समुद्रसपाटीपासून २५८ मी. उंचीवर असलेल्या या ठिकाणावरून ही कार चालू असते. जवळजवळ ३१ केबल कार या पॅसेंजर कार आहेत आणि ३ कार्गो कार. प्रत्येक कारमध्ये ६ लोक अशी व्यवस्था असते. पॅसेंजर नेणाऱ्या व्यक्ती किंवा ही कार चालवणारे लोक हे व्यवस्थित प्रशिक्षित असतात. या कारने मनकामना देवीच्या दर्शनाला जाण्याचे तिकीट हे ७ दिवसापर्यंत चालते. म्हणजे तिकीट काढल्यानंतर ७ दिवसांमध्ये एकदा, आपण कधी पण दर्शनाला जाऊ शकतो. सध्याची या मंदिराची अवस्था म्हटले तर दैन्यावस्था झालीय. याला कारण म्हणजे, १९३४चा भूकंप! यामुळे मंदिराचा दरवाजादेखील निखळला आहे. मंदिराचे दोन मोठे स्तंभदेखील हलले आहेत. त्यात पुन्हा २०११च्या भूकंपामुळे मंदिराचा ढाचा अजून कमकुवत झाला आहे आणि त्याला डागडुजीची नितांत गरज आहे. पावसाच्या पाण्यामुळे निर्माण होणारे प्रश्न यामुळे पुरातत्त्व विभागाच्या मते, ‘हे मंदिर आता येथून हलविणे योग्य’ असा इशारा देण्यात आला आहे.

जनकपूर
श्रीलंका हा देश जसा भारताशी रामायणाच्या बाबतीत संबंधित आहे, तसेच नेपाळ पण काही कमी नाही. आपल्याला माहीत आहे की, जनक राजाला सीता एका पेटीत सापडली होती. सीता जेथे सापडली ती जागा म्हणजे जनकपूर!! मग त्याने तिला वाढवले व योग्य वेळी तिचा विवाह रामाशी लावून दिला. राम आणि सीता हिंदूंचे दैवत आहे, त्यामुळेच नेपाळमधील जनकपूर हे हिंदूधर्मीयांचे धार्मिक स्थळ आहे. या जागेला महत्त्व येण्यासाठी एवढंच एक कारण नाही, तर जैनधर्मियांचे तीर्थंकर महावीर वर्धमान आणि बौद्ध धर्माचे प्रवर्तक गौतम बुद्ध यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी म्हणून हिंदू धर्मीयांमध्येदेखील जनकपूरला अनन्यसाधारण महत्त्व आहे. जनकपूरला जाण्यासाठी सप्टेंबर ते मार्च हा काळ उत्तम. कारण या काळात तेथे अनेक उत्सव असतात, ज्यांचा आनंद आपल्याला लुटता येतो. १८९८मध्ये बांधलेलं जानकी मंदिर हे नेपाळमधील अनेक भव्य मंदिरांपैकी आहे. त्या वेळचा या मंदिराचा खर्च म्हणे ९ लाख होता. त्यामुळे या मंदिराला नौ लाखां मंदिर असेही म्हणतात. या मंदिराजवळच राम आणि सीतेचा विवाह झाला, तो विवाह मंडप आणि रामाचे सर्वात जुने मंदिरदेखील आहे. या शहरात जवळपास २०० कुंडं आहेत, ज्यामध्ये लोक धार्मिक स्नान करतात. त्यापैकी मोठे आणि महत्त्वाचे म्हणजे धनुष सागर आणि गंगा सागर!! या कुंडाप्रमाणे धनुषधामदेखील बघण्यासारखे आहे. रामाने सीता स्वयंवराच्या वेळेस शिवधनुष्य तोडले, त्याचे काही अवशेष येथे आहेत, अशी मान्यता आहे आणि त्याला वंदन करण्यासाठी भारत आणि नेपाळमधील अनेक लोक येथे भक्तिभावाने येतात. जनकपूर येथे जाण्या-येण्यासाठी काठमांडू येथून बसने आणि विमानानेदेखील चांगली व्यवस्था आहे. जनकपूरला डोमेस्टिक विमानतळ आहे. आपल्याला माहीत असलेल्या आणि जगभर प्रसिद्ध असलेल्या मैथिली पेंटिंग्जदेखील जनकपूरमधल्याच!!

लुम्बिनी
बौद्धधर्मीयांच्या अनेक धार्मिक स्थळांपैकी जसे की बुद्धगया, कुशीनगर, सारनाथ याबरोबरच लुम्बिनीलादेखील अनन्यसाधारण महत्त्व आहे. युनेस्कोने जागतिक वारसा असं जाहीर केलेले लुम्बिनी! पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या अनेक स्थळांपैकी एक! हे पर्यटनस्थळ नेपाळच्या रुपंदेही जिल्ह्यात असलेले बौद्धांचे धार्मिक स्थळ आहे. गौतम बुद्धांचे जन्मस्थान. राणी मायादेवी यांनी सिद्धार्थ गौतम याला येथे जन्म दिला, असे आपण इतिहासात वाचतो, तेच हे ठिकाण. येथील बोधीवृक्षाखाली गौतमांना जेव्हा निर्वाणप्राप्ती झाली, त्या वेळी त्यांना गौतम बुद्ध या नावाने ओळखले जाऊ लागले. लुम्बिनी येथे मायादेवी यांचे मंदिरदेखील बघण्यासारखे आहे. गौतम बुद्धांना जन्म देण्यापूर्वी मायादेवी यांनी ज्या पुष्करिणीमध्ये स्नान केले, ते कुंडदेखील येथे आपल्याला बघायला मिळते. याच कुंडात गौतम बुद्धांनीदेखील पहिले स्नान केले, अशी आख्यायिका आहे. याचबरोबर बोधीवृक्षाचेदेखील आपल्याना दर्शन करता येते. मौर्य राजवटीचा राजा अशोक याने जेव्हा लुम्बिनी येथे भेट दिली, तेव्हा त्याने उभारलेला स्तंभ अशोक स्तंभदेखील आपल्याला येथे बघायला मिळतो. आज जर आपण पहिले तर आपल्याला जुन्या बुद्ध मठांचे अवशेष बघायला मिळतात. नवीन मठदेखील बांधलेले आहेत. व मंदिराच्या आसपास १.५ किमी पासून ते ५ किमी पर्यंतची जागा ही केवळ बौद्ध मठांसाठी दिली गेलेली आहे.
पुन्हा भेटूच, पुढच्या लेखात; अजून काही नवीन, मनोरंजक स्थळांबद्दल जाणून घ्यायला!!

nileshg.21@gmail.com