आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article In Rasik By Arvind Jagtap About Politics

कोणता झेंडा घेऊ हाती (अक्षरनामा)

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपला विकास राजकारणाशिवाय होऊ शकतो. किंबहुना तो राजकारणाशिवायच होऊ शकतो, अशी माझी खात्री होत चाललीय. म्हणून मी हा नवीन झेंडा हाती घेऊ म्हणतोय. कुठल्याही पक्षापेक्षा विकासाचा झेंडा हाती घेतलेला बरा नाही का?

विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती?’ हे गाणं लिहिलं, तेव्हा खरंच हा प्रश्न मला सतावत होता. कुठलाच पक्ष किंवा कुठलीच विचारसरणी परिपूर्ण वाटत नव्हती. त्यामुळे कुठलाच झेंडा प्रभावी वाटत नव्हता. पण उत्तर शोधण्याचा प्रयत्न चालू होता, आणि ते उत्तर आता जवळपास सापडलंय.

आधी मी ‘गल्लीत गोंधळ’ आणि ‘गोष्ट छोटी डोंगराएवढी’सारखे राजकीय भाष्य करणारे सिनेमे लिहिले; तेव्हा मित्रांना वाटायचं की, मी कट्टर काँग्रेस-राष्ट्रवादीविरोधी आहे. आजकाल मी बीजेपीच्या काही गोष्टींवर नाराजी व्यक्त करतोय, तेव्हा लोकांना वाटतंय, मी बीजेपीविरोधी आहे, तर मुळात असं का वाटायला पाहिजे? आपण कुठल्या एका पक्षाचे वेडे भक्त का होतो? साले नेते पक्षाशी इतके प्रामाणिक नसतात, तेवढे आपण का? आपण जो चांगला आहे, जो विकास करू शकतो, जो भ्रष्टाचार करत नाही, त्याच्या सोबत असायला पाहिजे. मग तुम्ही म्हणाल, असा कोण ‘माय का लाल’ आहे? तर आता जरा राजकारण सोडून विचार करू या. कारण आपला विकास राजकारणाशिवाय होऊ शकतो; किंबहुना तो राजकारणाशिवायच होऊ शकतो, अशी माझी खात्री होत चाललीय. म्हणून मी हा नवीन झेंडा हाती घेऊ म्हणतोय. हे मला जाणवलं, जेव्हा मी पोपटराव पवार यांचं हिवरेबाजार पाहिलं.

नगर जिल्ह्यात हिवरेबाजार आज जगातलं एक आदर्श गाव आहे. लोक चक्क तिकीट देऊन हे गाव बघायला तयार आहेत. सरकारी अधिकारी इथे प्रशिक्षण घेतात. या गावातला सरकारी दवाखाना पाहिल्यावर गहिवरून आलं. एवढा स्वच्छ आणि सुंदर दवाखाना मी पाहिला नव्हता. हे पोपट पवार म्हणजे, महाराष्ट्राकडून रणजी खेळलेले क्रिकेटपटू. गावात प्रवेश करताना रस्त्यावर दुतर्फा झाडं. इंग्रजी सिनेमात दिसतो, तसा रस्ता आहे तो. हे गाव काही वर्षांपूर्वी दुष्काळी होतं. पण आज त्या गावातल्या डोंगरावर पण बोअरला पाणी आहे. मेडिटेशनसाठी हिवरे बाजारच्या डोंगराएवढी अप्रतिम जागा कुठे शोधून सापडणार नाही. गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान, तंटामुक्तीसारख्या दिवंगत आर. आर. पाटील यांनी राबवलेल्या महत्त्वाच्या योजनेमागचं संवेदनशील डोकं या माणसाचं आहे; पण त्यांनी कधी गवगवा केला नाही. अर्थात, आर. आर. पाटील यांचा मोठेपणा असा होता की, त्यांनीही पोपटरावांना योग्य श्रेय दिलं. हिवरेबाजार, राळेगणसिद्धी, पाटोदा ही आधुनिक महाराष्ट्राची तीर्थक्षेत्रं आहेत. तुम्ही एकदा नक्की जा. आपोआप माथा टेकवून याल.

आमचे मित्र रवींद्र बनसोड यांनी औरंगाबाद जिल्ह्यात वाळूजजवळ असलेलं पाटोदा हे गाव मला आणि प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांना दाखवलं. भास्कर पेरे नावाचे एक अतिशय सिंपल, पण किमयागार सरपंच आहेत पाटोदे गावाचे. या पेरे साहेबांनी गावात विकास कसा केला? आधी प्रश्न होता, गावातल्या लोकांनी कर भरण्याचा. (शहरातल्या बऱ्याच विद्वानांना वाटतं की, गावात करच नसतो. आपणच काय ते फक्त टॅक्स भरतो देशात फक्त.) तर गावात लोकांनी स्वतःहून कर भरावा, म्हणून त्यांनी देशातली पहिली मोफत पिठाची गिरणी सुरू केली, ज्यात कायम फुकट दळून मिळेल. अट एकच, टॅक्स भरलेला असला पाहिजे. आज गावात टॅक्स चुकवणारा एकही माणूस नाही. विश्वास बसणार नाही, पण या गावात मिनरल वॉटर २५ पैसे लिटर आहे. (हो...पंचवीस पैसे लिटर. प्रिंटिंग मिस्टेक नाही.) ग्रामपंचायतीच्या एटीएमवर ते मिळतं. बायका-माणसं एटीएम कार्ड घेऊन हंडा भरून आणतात. आज, त्या गावातला प्रत्येक माणूस मिनरल वॉटर पितो. या गावात ग्रामपंचायतीतर्फे सोलर प्रकल्पातून अंघोळीसाठी गरम पाण्याची सुविधा आहे. हे कसं शक्य होतं? कारण, या गावात कुठल्या जातीच्या महापुरुषाचा पुतळा नाही. चित्रं आहेत, खूप उंचीवर. सगळ्यांना सारख्या उंचीवर ठेवून गावाने जातीपातीचा प्रश्नच निकालात काढलाय. आणि हे साधे सरळ पोपटराव आजवर अठरा देशांत या विकासाच्या मॉडेलवर बोलून आलेत. आणि शेजारी औरंगाबाद महानगरपालिका खड्ड्यात गेलीय! सोबत बहुतेक सगळ्याच महापालिका. विदेशात सोडा; बऱ्याच महापौरांना पुन्हा त्यांच्या वॉर्डातसुद्धा विचारत नाही कुणी.

पाटोद्यात सयाजी शिंदे यांनी भास्कर पेरेंशी चर्चा करून त्यांच्या साताऱ्यामधल्या गावाचा कायापालट करून टाकलाय. मकरंद अनासपुरेने नगरमधल्या गोगलगाव गावाला पंधरा दिवसांत स्वच्छ आणि सुंदर करून दाखवलं. अभिनेता जितेंद्र जोशी पुणे-मुंबई हायवेवर थांबला, टोल नाक्यापुढे. तिथे चहा, वेफर विकणारे लोक कचरा करून ठेवायचे सगळा. त्याने विनंती केली, फक्त त्यांना. आज तिथे प्रत्येक जण आपला डस्टबिन ठेवून चहा विकतो. हे लोक करू शकतात, तर आपण का नाही? मार्केटिंगमध्ये पदव्या घेणारी मुलं लोकांचे फालतू प्रॉडक्ट विकण्यात वेळ घालवतात आणि नोकर म्हणून जगतात. त्यांनी शेतकऱ्यांना एकत्र करून त्यांच्या मालाला डायरेक्ट बाजारपेठ मिळवून दिली, तर स्वतःचा उद्योग पण उभा राहील. गावरान बियाण्याची बँक प्रत्येक जिल्ह्यात लोकप्रिय होऊ शकते. आपल्याला हुरडा खायला गाव आठवतं. बारकाईने बघा. येताना आपण पिशवीत काही ना काही तरी भरून आणतो गावातून. पण आता जातानासुद्धा गावांसाठी आपली पिशवी भरलेली असली तर अच्छे दिन नक्कीच येतील.

खरं तर काही वर्षांपूर्वीपर्यंत पाण्यासाठी गावातले लोक सरकारवर अवलंबून होते का? आपल्या विहिरी होत्या, बारव होते, नद्या होत्या. मग आता आपण का सरकारकडे हात पसरतोय, सारखे सारखे? कशाला टिनपाट नेत्यांचे भले मोठे होर्डिंग लावतो गावात, साध्या डांबरी रस्त्यासाठी? त्यापेक्षा म्हशीचे फोटो लावा. त्यांनी चारा खाल्ला तर दूध पण दिलंय. बैलाचे फ्लेक्स लावा. पोळ्याला नैवेद्य दाखवला की, वर्षभर राबत आलाय तो शेतात. कुत्र्याचे फोटो लावा. चोरांना येऊ दिलं नाही त्याने. ते दिलं सोडून आणि चोरांचेच फोटो लावायची फॅशन आलीय आजकाल गावोगाव. (तुम्ही म्हणाल, सगळेच नेते वाईट नसतात. मी म्हणतो, जो चांगला नेता आहे तो होर्डिंग लावणाऱ्याच्या कानाखाली मारेल. कारण, या होर्डिंगने आपल्या देशाची कचराकुंडी होत आलीय.) मला सांगा, कशाला पाहिजे ही गटबाजी? जातीयवादी राजकारण? कुठल्याही पक्षापेक्षा पोपटराव पवार, भास्कर पेरे यांचा विकासाचा झेंडा हाती घेतलेला बरा नाही का?

jarvindas30@gmail.com