आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article In Rasik By Arvind Jagtap About Politics In India

चला गाई गाई करा (अक्षरनामा)

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सरकार आपल्याला ‘गाई गाई’ करायला लावतंय बळेच. कारण एकदा आपण या गाईच्या धार्मिक गुंगीत अडकलो, की सरकार आपली कामं उरकायला मोकळं. आता आपण ठरवायचंय, या गुंगीत राहायचं का शुद्धीत राहायचं?

२०१३ -२०१४मध्ये आपल्या देशात शेतकऱ्यांनी अन्नधान्याचे विक्रमी उत्पादन केले. त्याबद्दल कुणी त्यांची पाठ थोपटली नाही. ते जाऊ द्या; पण त्याचा त्यांना काय फायदा झाला? एखाद्या उद्योगाची एवढी भरभराट झाल्यावर त्याचं केवढं कौतुक झालं असतं. पण शेतकऱ्याच्या नशिबी कौतुकही नसतं. पूर्वी शेती करता येत नाही त्याला अडाणी म्हणायचे. आता शेतकऱ्यांना अडाणी म्हणतात. केवढं डेंजर आहे हे! खरे अडाणी आपण आहोत, शहरात राहणारे लोक. आपण जे खातो, ते कसं पिकवायचं, याचं बेसिक ज्ञान नसलेले लोक आहोत आपण आणि गप्पा ओबामाच्या! मला एक प्रश्न नेहमी पडतो, ज्या आवडीने शहरातले लोक कुकरी शो बघतात, त्या आवडीने शेतीविषयीचे कार्यक्रम का बघत नसावेत? त्याविषयी का वाचत नसावेत?

खरं तर शेतकऱ्यांनी आता स्वतःविषयी स्वतःच विचार करायची वेळ आलीय. मला सांगा, शेतकऱ्याचा पोरगा आपला बाप उद्योगपती आहे, हे ठासून का सांगू शकत नाही? एकाच्या कापसावर दुसऱ्याने बनवलेला शर्ट विकणारा तिसरा एजंट लोकांच्या दृष्टीने बिझनेसमन असू शकतो. मग स्वतःच्या जमिनीत, स्वतः पीक घेणारा शेतकरी बिझनेसमन का नाही? शेतकऱ्याला हा विश्वास मिळवून देणं, हे आपलं काम आहे. त्यासाठी फार कष्ट नाहीत. त्याचा माल थेट त्याच्याकडून घ्यायला सुरुवात करायची, एवढं सोपं आहे. पण ‘मेक इन इंडिया’च्या गप्पा मारायच्या आणि सगळ्यात जीवनावश्यक उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्याला कवडीमोल किंमत द्यायची. असं कसं चालेल? त्याची जमीन घशात घालण्याच्या योजना आखून होणार आहे का ‘मेक इन इंडिया?’ आजकाल देशात गोहत्या बंदी हा एक महत्त्वाचा विषय झालाय. ‘चला गाई गाई करा’ या वाक्याशी मराठी माणसाचं भावनिक नातं आहे. आई जेव्हा ‘गाई गाई’ करा म्हणायची, तेव्हा आपोआप गुंगी यायची आपल्याला. बळजबरी आपल्याला थोपटून ‘गाई गाई’ करण्यात आईचा पण बिचारीचा भाबडा स्वार्थ असायचा. तिला तिची कामं आटपायची असायची. आता सरकार पण आपल्याला ‘गाई गाई’ करायला लावतंय बळेच. कारण एकदा आपण या गाईच्या धार्मिक गुंगीत अडकलो, की सरकार आपली कामं उरकायला मोकळं. आता आपण ठरवायचंय, या गुंगीत राहायचं का शुद्धीत राहायचं? शहरी माणसं गुंगीत राहिली तरी धकून जातात. कारण सरकारी ऑफिस, बँक किंवा कंपनीत सगळ्या गोष्टी धकून जातात.

शेतकऱ्याला ही सवलत नसते. त्याने गुंगीत राहून चालत नाही. त्यामुळे गोहत्या बंदीसारख्या गोष्टीत त्याने रमून चालणार नाही. या सगळ्या गोष्टीच्या आड भूसंपादन आहे. गोहत्या बंदीचा शहरातल्या लोकांना एवढा पुळका का? शहरी लोकांनी गाईची चिंता करणे म्हणजे बोकुड जळगावच्या लोकांनी माधुरी दीक्षितच्या पोरांची काळजी करण्यासारखं आहे. शहरातल्या लोकांना साधी हेल्मेट सक्ती सहन होत नाही. भटक्या कुत्र्यांचा तर केवढा त्रास होतो शहरात. भटक्या कुत्र्यावर माया यायला त्यांनी दूध द्यायला पाहिजे का? गाईला एक न्याय आणि कुत्र्याला एक न्याय, असं का? कुत्र्यात पण देव आहेच ना?

मागे कवी विठ्ठल वाघ यांनी बैलासाठी एक खूप गोड शब्द सांगितला होता. ते म्हणाले, बैल हा आपला ‘दूधभाऊ’ असतो. कारण आपण एकाच गाईचं दूध प्यायलेलं असतं. ही अस्सल शेतकऱ्याची संवेदनशीलता असते. बैलसुद्धा त्याचा दूधभाऊ असतो! बारकाईने बघा, शहरात गाई कचराकुंडीवर चरत असतात, प्लास्टिकच्या थैल्या खातात, तेव्हा कुठे असतात गोरक्षक? आता या उत्साही लोकांची नवीन मागणी काय, तर गाईला राष्ट्रमाता घोषित करा. अरे, महात्मा गांधी जर या देशात राष्ट्रपिता म्हणून सुप्रसिद्ध असतील, तर गाईला राष्ट्रमाता घोषित करणे हा क्रूर विनोद नाही का? असं ऊठसूट कुणाच्याही आईला आपली आई म्हणून स्वीकारतो का आपण? आणि म्हणायचं असेल, तर शेतकरी आपल्या ‘काळ्या आई’ला जो मान देतो, तो गाईला देतो का आपण? पार्किंगसाठी सोसायटीत पाच-दहा लाख रुपये सहज मोजतात लोक. मग एक गाय तिथं उभी करायला काय अडचण आहे? पावसापाण्यात एखादी गाय सोसायटीत आली तर केवढी बोंबाबोंब होते. इथे आपण गाईविषयी चर्चा करण्याचं महत्त्वाचं कारण आहे, की कुठल्याही शेतकऱ्याला गाय देवासारखी असते. पण शेतात पीक टिकणार की नाही, हा प्रश्न आहे. चारा लांबची गोष्ट आहे. अशा वेळी गरज आहे शहरातल्या लोकांनी गावोगाव जाऊन जनावरं जगवण्यासाठी प्रयत्न करण्याची. त्यांना चारा मिळेल याची काळजी घेण्याची. हा उपदेश नाही. मी स्वतः काही छोटे मोठे प्रयत्न सुरू केले, त्यानंतर ही विनंती करतोय. गोहत्या बंदीची मागणी चूक नाही; पण कोंबडीचा रस्सा न ओरपणाऱ्याने ती मागणी करावी.

श्रावणाचा मोठा ब्रेक झाल्यावर गणपती विसर्जनाला जाताना सोबत मटणाची पिशवी नेणारे लोक आहेत आपल्याकडे. त्यांनीसुद्धा गोहत्या बंदीचे उपदेश केल्यावर हसावं का रडावं, तेच कळत नाही.एकच माफक अपेक्षा आहे की, सगळ्या प्राण्यावर आपण सारखं प्रेम करावं. जे शहर एकाच वेळी शंभर मर्सिडीज घेऊ शकत, ते शंभर गाई सांभाळू शकत नाही? शंभर शेतकऱ्यांशी डायरेक्ट त्याचा माल बाजारभावात विकत घेण्याचा करार करू शकत नाही? आसपास शंभर छोटी तळी बांधू शकत नाही? शंभर बंद पडलेले बारव किंवा आड पुन्हा सुरू करायचे प्रयत्न करू शकत नाही? आपण जे अन्न खातो ते पिकवणारा शेतकरी आहे. आपण ठरवायचं, आपण खाल्ल्या अन्नाला जागायचं, का नाही? आणि हो, धावपळीच्या जीवनात विसरायला होतं म्हणून, आठवण करून देऊ या एकमेकांना. माणूस हासुद्धा प्राणी आहे! जाता जाता धुमील यांची ही कविता...

एक आदमी रोटी बेलता है
एक आदमी रोटी खाता है
एक तिसरा आदमी भी है
जो न रोटी बेलता है, न रोटी खाता है
वह सिर्फ रोटी से खेलता है
मैं पुछता हूं, ‘यह तिसरा आदमी कौन है?’
मेरे देश की संसद मौन है!

jarvindas30@gmail.com